पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सहजीवनाची पन्नास वर्षे

 -----------------------------------------
--सहजीवनाची पन्नास वर्षे !

-----------------------------------------
--विश्वनाथ शिरढोणकर,इंदूर,म. प्र. 
-----------------------------------------
---- नावाने,चेहऱ्याने, स्वभावाने,वागणुकीने, संस्काराने, विचाराने, किंवा ज्याच्या आवडीनिवडी ही आपल्याला माहीत नसाव्यात अशा कोणी तरी अनोळखी व्यक्तीने आपल्या आयुष्यात यावे आणि चक्क पन्नास वर्ष राहावे? हल्ली तरुणांच्या अति महत्वकांक्षा व अति अपेक्षांनी ग्रस्त असल्यामुळे आज विवाह संस्था मोडीत येऊ पाहत असलेल्या या ' लिव्ह इन ' च्या काळात मुक्तपणे वावरणाऱ्या तरुण पिढीला इतक्या  दीर्घ सहजीवनाचे आश्चर्य वाटू शकते. पण सहजीवनाचे पन्नास वर्ष हे वास्तव्य आहे. कारण आमच्या संस्कारात,'चट मंगनी-पट ब्याह-तुरंत तलाक-तुरंत पुनर्विवाह ' असे काहीच नव्हते.  
---काही ही ओळख नसताना एखाद्या बरोबर आयुष्याचे पन्नास वर्ष घालवणे म्हणजे एखाद्या डोंगराची अनेकदा प्रदक्षिणा घालण्या सारखे आहे.या प्रदक्षिणाचा स्वानुभव हाच या जगण्याचा सार आहे. पन्नास वर्ष एखाद्याअनोळखी व्यक्ती सोबत राहून जगणे सोपे होते का अवघड होते? आता अचानक आपल्या आयुष्यात या अनोळखी व्यक्तीच्या येण्याने अनेक बदल घडतात. सर्वात अगोदर तर नाती, प्रेम, भावना, एकदुसऱ्याचा स्वभाव, आवड-निवड, गरजा, व्यवहार, कर्तव्य, उत्तरदायित्व, या सर्व गोष्टी आयुष्यात नव्याने घर करतात. लग्न झाले म्हणजे नाती जुळतातच. पण प्रेम ? त्यासाठी सावधगिरीने पाऊल उचलावे लागते. सर्वप्रथ आपल्या जोडीदाराच्या अनेक निरर्थक शंका कुशंका आणि नसत्या प्रश्नांना सामोरे जाऊन, जोडीदाराला पटेल असे समाधान कारक उत्तर द्यावे लागते. त्या प्रमाणे वागावे देखील लागते आणि नंतर जोडीदाराचा विश्वास संपादन झाल्यावरच प्रेमाचा प्रश्न उद्भवतो. पण या विश्वास संपादनाच्या अगोदर गरज आणि आवडी निवडीची परीक्षा होते. दोघांची आवड आणि गरजा एक सारख्या नसतात.अनेक वेळा प्राथमिकता देखील एक सारखी नसते. मग मतभेद हे आलेच. हे सर्व काही वर्षांमध्ये नीट नेटके झाल्या वर इथून पुढे सहजीवनाचा प्रवास सुरु होतो , हे म्हणजे ' डबल इंजिनची सरकार. '    
----तर असा हा आंबट-तिखट-कडवट-खारट-गोड-आणि पाण्यासारखा अगदी साध्या चवीचा,जगण्यासाठीचा तडजोडीच्या रस्त्यावरचा अवघड असा प्रवास असतो.आयुष्याच्या या उतार वयात स्मरण विस्मरणाची गंमतच म्हणायला हवी. आपला जोडीदार अनेक गोष्टी विसरू लागला आहे हे लक्षात आल्यावर सहज आठवण होते ती त्या अनेक प्रसंगांची जेव्हा आपण अनेक गोष्टी विसरत असू आणि नंतर असे कळत होते की आपण विसरले असलो तरी अनेक गोष्टी आपला जोडीदार विसरलेला नव्हता. त्याला आपल्या गोष्टी विसरण्याचा अंदाज असायचा आणि तो या बाबतीत सावधगिरी बाळगून असायचा. आणि आपल्या कामाच्या व्यस्ततेत आपल्या लक्षात अनेक वर्ष देखील हे येत नसे, आणि आपला जोडीदार कधी याचा उल्लेख ही करत नसे. संसाराची घडी विस्कटित देखील होऊ देत नसे. खरंच कमाल आहे ना ? पण आता हे उपकार मानायचे का हा प्रश्न वेगळा पण परतफेडीचे क्षण नक्कीच आहे.असा हा स्मरण विस्मरणाचा खेळ. एक दुसऱ्याला सांभाळत आयुष्याचा प्रवास. या साठी स्मरण-विस्मरणाचा खेळ खेळावा, म्हणून मी माझी एक कविता येथे देत आहे:-  
------------------------
स्मरण - विस्मरण  !!
-----------------------
विसरण्यासाठी  आठवावे  

विसरणे  मज  काय आहे ?


विसरता विसरता आठवावे 

विसरणे म्हणजे काय आहे ?


विसरल्यावर आठवणींचा 

उपयोग असा  काय आहे ?


विसरता आले तर विसरावे 

अशी कोणती आठवण आहे ?


विसरल्याने  जर  विसरला 

ती कोणती आठवण आहे ?


आठवणी कोणाला छळत आहे  

विसरण्यात कोण रमत आहे ?


एक  वेदना, एक  रोग आहे 

ही भारी आहे की तो जड आहे ?
----------------------------
--शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? पाळण्यातल्या बाळाचे नाव आत्या ठेऊन मोकळी होते. पुढे त्या नावाचे काय होते ? बाळ नावाप्रमाणे वागतो का ? किंवा नावा प्रमाणे त्याची अंगकाठी, चेहरा मोहरा असतो का ? नाव ठेवताना हे सर्व ज्योतिषी सुद्धा सांगू शकणार नाही.नाव ही ओळख नसते. नाव हे संबोधन आहे. एखाद्यावर प्रेम जडले की असे सांगितले जाते की अमुक नावाच्या मुलावर किंवा अमुक नावाच्या मुलीवर प्रेम आहे. पण वास्तवात हे प्रेम नावा पेक्षा चेहऱ्यावर जास्त असते.आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे ' लव्ह एट फर्स्ट साईट.' लग्नानंतर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस मुलींचे नाव बदलण्याची पद्धत असते. आणि नंतर अनेक वेळा उखाणे घेऊन या बदललेल्या नावाची घोकंपट्टी देखील होते. बरे नावं देखील काळा-वेळा प्रमाणे बदलत असतात. सुमन,चंदा,राधा,दुर्गा, मंदा, कुंदा ही नावं कालबाह्य झाल्या नंतर जुनाट समजली गेली आणि त्या नंतर नावात शेवटी ' ता' असण्याऱ्या नावांची पद्धत अचानक वाढली. म्हणजे एकता, नम्रता, कविता, सविता, विनिता,सुजाता,संगीता इत्यादी. आजच्या वर्तमान काळात आणखी भलतीच नावं ऐकायला मिळतात. कुत्र्या-मांजरांचे नाव माणसांना आणि माणसांचे नाव कुत्र्या मांजरांना, अशी परिस्थिती आहे. म्हणून नाव सार्थक असतं का ? हा शोधाचा विषय असावा.  

--हिंदीचे प्रसिद्ध हास्य कवी काका हाथरसी यांनी १०८ नावांवर छान कविता लिहिलेल्या आहेत. इथे फक्त काही ओळी देत आहे, त्या वाचा म्हणजे कळेल की नावाचा माणसाच्या व्यक्तिमत्वाशी काही देखील संबंध नसतो. 

----------
--'चतुरसेन बुद्धू मिले, बुध्दसेन निर्बुद्ध,
श्री आनन्दीलालजी रहें सर्वदा क्रुद्ध।।
रहें सर्वदा क्रुद्ध, मास्टर चक्कर खाते,
इंसानों को मुंशी, तोताराम पढ़ाते ।।
---------
---चेहरा आठवणीत राहतो आणि प्रेम करण्यासाठी तर चेहरा एक आवश्यक असे कारण आहे. नावाशी कुणी प्रेम करत नाही. किंवा शरीराच्या वेवेगेवेगळ्या अवयवांशी कोणी वेगवगेळे प्रेम करत नाही. म्हणून चेहरा हा महत्वाचा. नावाने हाक मारल्या नंतर चेहऱ्याने समोर यावे अशी अपेक्षा असते.चेहरा वेगवेगळे भाव देखील प्रकट करू शकतो. नावात ही दमखम नाही. फार तर दूर बसलेल्यांना त्या नावाचा दरारा वाटू शकतो, पण त्यात देखील चेहरा दडलेला असतो. ज्या नऊ रसांचा उल्लेख होतो ते सर्व नऊ रस चेहऱ्यामुळे आपल्याला कळतात. या साठी कोणत्याही शाळेत जाण्याची गरज नाही. सर्व नवऱ्यांना याचा दांडगा अनुभव असतो. चेहऱ्याला ईश्वराने अनेक कामे वाटलेली आहे. चेहऱ्याचे सर्वात मोठे काम म्हणजे, कपाळ, डोळे, नाक, कान,हनुवटी सारख्या अवयवांना सांभाळून ठेवणे आणि भाव अभिव्यक्तीसाठी यांचा वापर करणे. एखादा तीळ गालावर असेल तर स्त्रियांच्या साठी सुंदरतेची ती विशेषता समजली जाते. मुलीच्या गालावर तीळ असेल तर पुरुषाला तिचे जास्त आकर्षण असते.  

---- आता पन्नास वर्षे सहजीवनाचा प्रवास म्हणजे असहमतीतून उपजलेलया सहमतीचा प्रवास म्हणायला हवा. ' ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे.' आपल्या प्रत्येक होकाराला नकार आणि जोडीदाराच्या प्रत्येक नकाराला होकार ' असे म्हणता येईल. शेवटी एक दुसऱ्या जवळ पर्याय देखील काय असतात?' जीना तेरी गली में, मरना तेरी गली में.' ही नियति जिथे असेल तिथे पर्याय नसतो. फक्त समर्पण असतं. माझीच एक कविता ' समपर्ण ' येथे देत आहे.   

------------
-समपर्ण !!
-----------
ती मेनका झाली                           
मी विश्वामित्र झालो ! 
तिने हळूवार डोळे मिटले 
मी तिच्या पापण्या झालो ! 
ती माझा श्वास झाली 
मी तिचे हृदय झालो ! 
तिने आपली चूल मांडली 
मी चूलिसाठी सरपण झालो ! 
तिच्या आस्था जपण्यासाठी 
मी स्वत: वटवृक्ष झालो ! 
तिचे डोळे बोलके होते 
मी कायम मुका झालो ! 
ती माझी काठी बनली 
मी तिचा खांदा झालो ! 
कळेना, कुठे हरपला भान 
मी असा झालो मी तसा झालो ! 
रेटता रेटला आयुष्याचा गाडा 
मी असा गेलो मी तसा आलो !  
------------------
---स्वभावाची ओळख फक्त चेहऱ्याने होत नाही. त्या साठी संपर्कात यावे लागते. बोलावे लागते. कामासाठी हातांचा वापर करावा लागतो. विशेष म्हणजे स्वभावाच्या ओळखी साठी बुद्धीचा वापर देखील करावा लागतो. बोलण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. इच्छा प्रदर्शित करावी लागते. आवडी-निवडी समोर आणाव्या लागतात. पसंती नापसंती दर्शवावी लागते. हे सर्व एक दिवसात होत नाही. एक दिवसात अंदाज बांधता येतो, पण स्वभावासाठी एक दुसऱ्याला समजून घ्यावे लागते. तेव्हा कुठे एक दुसऱ्याचा स्वभाव समजतो, प्रेम वाढते,आपुलकी वाढते, एक दुसऱ्यांच्या भावनांना महत्व मिळते. वाचण्यासाठी डोळे महत्वाचे, पण रडण्यासाठी डोळे फक्त अश्रू गाळू शकतात.डोळ्यांच्या अश्रूंना वेदनेची पूर्तता फक्त चेहऱ्यामुळे येते. रागाने डोळे वटारता येतात पण डोळ्यांच्या वटारण्याला चेहऱ्यावर आणावेच लागते. 

---पूर्वी नवऱ्याला/जावयाला अरे तुरे किंवा एकेरी नावाने संबोधित केले जात नसे. कोणा एका घराचा जावई सर्व गावाचा जावई मानला जात असे. जावयाच्या सभ्य वागणुकीसाठी कदाचित एक प्रकारे ही प्रेरणा असावी. आत्म नियंत्रणाची ही सामाजिक पद्धत आपल्या देशात च होती. याच प्रमाणे नवीन नवरी साठी सर्व जागी सुनबाई हे संबोधन असायचे. नाही म्हटले तरी संबोधनाचे मनावर खूप ओझे असते. जावईबापू, सासूबाई,सुनबाई किंवा बाबा,दादा,भाऊ,अण्णा, काका, मामा,भावजी,आई,काकू,आत्या,मावशी,ताई,अक्का,या संबोधनांमध्ये मान, सम्मान, आदर तर असायचाच पण नात्यांच्या पलीकडे जाऊन नात्यांचा गोडवा आणि भावनांचा ओलावा स्पष्ट अनुभवात यायचा. याच आदर आणि सम्मानाच्या भावनांमुळे परस्पर विश्वास निर्माण होतो.आणि याच आदर आणि सम्मानामुळे नाती घट्ट होतात.आज तर डेड,मॉम, हाय, हॅलो मुळे ही सर्व नाती आणि आपुलकी आपण गमावून बसलो आहोत.        

---लग्ना नंतर सर्वात अगोदर नवीन नात्यांना जोपासणे ही एक सर्वात मोठी प्राथमिकता असते. नाती जोपासण्यासाठी एक दुसऱ्याचा विश्वास कमावणे फार गरजेचे. हा विश्वास, व्यवहार आणि वागणुकीने जोपासता येतो. व्यवहार आणि वागणूक सर्वस्वी वैचारिक प्रगल्भते मुळे श्रेष्ठ ठरते. प्रगल्भता चिंतन-मनन मुळे वाढते. वागणूक किंवा व्यवहार हा सहजीवनात महत्वाचा ठरतो. कारण व्यवहार हा संस्काराचा एक भाग आहे. नैतिकता आणि अनैतिकतेची जाण असून, त्याची नीट पडताळणी करून त्या प्रमाणे योग्य तो निर्णय घेऊन वागल्याने माणूस उत्तम संस्कारित होतो. हे सर्व एकत्रित कुटुंबात आपसूकच शिकायला मिळते. या साठी एकत्रित कुटुंब हे महत्वाचे कारक आहे. एकत्रित कुटुंब म्हणजे जगण्यासाठी आयुष्यात लागणाऱ्या अनुभवाचे विद्यापीठ आणि एकल कुटुंब म्हणजे आधुनिक मॉंटेसरी.(प्राथमिक विद्यालय देखील नाही). 

--सहजीवनात माणसाच्या वाईट सवयींचा समावेश नसला पाहिजे. विशेष करून जोडीदाराला आणि इतर कुटुंबियांना त्रास होईल अशी वागणूक सहजीवनात व्यवधान निर्माण करते आणि जगणे असह्य होते. कारण लग्न म्हणजे एका नवीन संस्थेचा निर्माण असतो.आपण हे चांगले जाणतो की संस्था जशी जशी वाढत जाते तसे तसे त्यात नकारात्मक घटक देखील निर्मित होत असतात. वैयक्तिक दुर्गुण म्हणजे त्यात क्रोध,स्वार्थ, ईर्ष्या, लोभ, मोह,अहंकार यांचा देखील समावेश होत असतो. आमच्या ५० वर्षांच्या सहजीवनात अहंकार किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा एक दुसऱ्याला न समजण्याने कधीच दुरावा आला नाही. वाद झाले ते आवडी-निवडी,सोयींबद्धल किंवा पोरांसाठी. याला आपण तडजोड म्हणू शकतो. आमचा दोघांचा स्वभाव आत्मकेंद्रित नाही. नाही म्हटले तरी स्वतः:साठी सर्व ओढून घेण्याची प्रवृत्ती ही कुटुंबासाठी विनाशक तर स्वतः:साठी घातक ठरते. कारण आत्मकेंद्रित स्वभाव देखील आपल्याला एकटे पाडतो. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते. याचे विश्लेषण होऊ शकते पण तुलना करू नये. बौद्धिक क्षमता ही प्रत्येकाची वैयक्तिक पुंजी असते. पण जगावे सगळ्यांना च लागते म्हणून कुटुंबात इतरांना समजून घेणे महत्वाचे. मी इतके केले पण माझ्यासाठी कुणी काहीच केले नाही या भावनांचा देखील कुटुंबात शिरकाव नसावा.  
---आपल्या इकडे संस्कारांचे खूप महत्व असते. जन्म ते मृत्यू पर्यंत आपण संस्कारित आयुष्य जगत असतो. कुटुंबात आणि समाजात संस्कारी वागणूक, आपले जगणे सोपे करत असते.संस्कार रुजविण्यासाठी च सोहळे असतात. याच संस्काराचा एक भाग म्हणजे लग्न सोहळ्यात लग्नाच्या सर्व विधी. नवऱ्या मुलाला आणि मुलीला लक्ष्मी-पूजना पर्यंत भटजी याची अनेकदा आठवण करवीत असतात. त्यातील एक भाग म्हणजे लग्नात मुलीला नवऱ्याने, मंगळसूत्र घालणे, नंतर जोडवे, बांगड्या, घातलेल्या पत्नीच्या कपाळी कुंकू लावणे. मला असे वाटते ही पद्धत विवाहितेच्या ओळखी साठी आणि दोघांनी एकमेकांसाठी एकनिष्ठ राहावे म्हणून स्वनियंत्रणच्या दृष्टीने सुरु झाली असावी. नंतर या सर्वांशी भावना जुळल्या गेल्या. घरात आणि बाहेरच्या कामांची वाटणी म्हणा किंवा जिम्मेदारी म्हणा ही इथूनच सुरु झालेली असावी. कालांतराने शिक्षण वाढले,आर्थिक सुबत्ता वाढली. पुरुष सत्तात्मक समाजात पुरुषांच्या बरोबर मान्यता प्राप्त करण्यासाठी स्त्रियांचा संघर्ष अद्याप ही सुरु आहे,आणि नवं ते सोनं आणि जुनं ते टाकाऊ ही भावना समाजात सर्वत्र व्याप्त झालेली दिसून येते. कुटुंबात आणि समाजात जगण्यासाठीचे सर्व आधुनिक लाभ पुरेपूर घेऊन जुने स्थापित व मान्यता प्राप्त बंधन कोणाला ही नाकारता येऊ शकते, पण हे करताना दुट्टपीपणा असू नये. सोयीप्रमाणे रूढी परंपरांचा फायदा घेत मनाप्रमाणे काही गोष्टी नाकारण्याने आयुष्यात अर्धवटपणा येतो. अगोदर याची खात्री करून घ्यावी की जुनं ते सगळेच टाकाऊ आहे का? आणि त्या प्रमाणे आपल्या कर्तबगारितेने सिद्ध देखील करावे. म्हणजेच कल्याणकारी असा सार्थक बदल म्हणवला जातो.   

-----लग्नानंतर सासर आणि माहेर हे महत्वाचे. सर्वात अगोदर माहेर आणि सासर याचा नीट अंतर समजावयास हवा.माहेर म्हणजे काय अन  सासर म्हणजे काय? वर्तमान आधुनिक विचारांच्या आणि आपल्या साठी पुरुषांपेक्षा जास्त स्वातंत्र्य मागणाऱ्या आणि भोगणाऱ्या पुरोगामी स्त्रियां साठी हे महत्वाचे आहे. हे समजण्यासाठी शिक्षण हे महत्वाचे आहेच पण याच बरोबर संस्कारित असणे देखील महत्वाचे आहे. माहेर म्हणजे ज्या घरात मुली जन्माला येतात. आता या माहेरी सर्व प्रथम तिचे लाड होतात, तिचे कौतुक होते, तिची सर्व हौस मौज पूर्ण करत योग्य असे तिचे संगोपन होते. तिच्या शिक्षणाची व्यवस्था होते, कुटुंब व्यवस्थेत पोरी संस्कारित होतात. म्हणजॆ लग्नाच्या वयात येई पर्यंत अगोदर तिला जगण्यासाठी जे जे हवे असते ते सर्व मिळते. याच्या प्रत्युत्तर मधे  ती घरात सर्व मोठ्यांचा आदर सम्मान करणे शिकते. अर्थात अगोदर तिला कुटुंबा कडून प्रेम आणि आपुलकी मिळते आणि नंतर प्रत्युत्तर मध्ये आणि परतफेड म्हणून ती जे लहानपणा पासून शिकते, ते म्हणजे तिच्या द्वारे कुटुंबातील वडीलधाऱ्यांना दिला जाणारा आदर आणि सम्मान. आणि वयात आल्या नंतर आई वडील आनंदाने तिच्या लग्नाची व्यवस्था करतात.आता लग्नानंतर सासरी तिच्या साठी सगळे अनोळखी व नवखे असतात. म्हणून अगोदर तिला सासरी वडीलधाऱ्यांचा आदर आणि सम्मान करावयाचा असतो आणि प्रत्युत्तर मध्ये आणि परतफेड म्हणून सुनबाईचे लाड आणि कौतुक केले जाते. हे म्हणजे आयुष्यात डेबिट क्रेडिट सारखे आहे. 
---सासर आणि माहेरचा अंतर नीट समजावयास हवा. लग्नानंतर माहेरच्यांकडून अपेक्षा कमी होतात तर सासरच्यांकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. जावयाने आणि सुनेनी याला अपेक्षांचे ओझे समजू नये. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणे कधीच शक्य नसते हे सर्व संबंधित पक्षांनी समजायला हवे. या साठी मोकळे पणाने संवाद असायला हवे. संवाद नसतील तर आयुष्य जगणे अवघड होते. अबोला कोणत्याही समस्यांचे समाधान नसते. 
--माझी एक कविता येथे देत आहे. नाही म्हटलं तरी आयुष्यभर साथ देण्यासाठी जोडीदारचे आभार तर मानायलाच हवे।   

--------

सोबती !
---------
एक कथा ही तुझ्या संघर्षाची 
राहिली सोबत इतक्या वर्षांची !!

आली होती घेऊन भाषा डोळ्यांची 
भासली नाही गरज सात जन्मांची !!

एक सुंदर उपमा आहे संसाराची 
बनली सावली माझ्या आयुष्याची !!

झाली माउली आपल्या पोरांची 
किती झळ सहन केली संसाराची !!

भासू नाही दिली उणीव गरजांची 
उत्तम ही शिवण तुझ्या पदराची !!

म्हणे , घरातली चूल असते मातीची 
न समजली समज तुझ्या आस्थेची !!

नाही दिली चाहूल कधी तुझ्या मनाची 
किती कठीण परीक्षा असते उंबरठ्याची !!

ठरली श्रेष्ठ कला तुझी कळा सोसण्याची 
न बोलता बोलण्याची प्रेमळ स्वभावाची !!

वाढविलीस पोरं ही अशी ही मायेची 
त्यांना लाभो कृपा सदैव समर्थांची !!

जिथं संपते वाट आपल्या घरकुलाची 
बघ तिथेच दिसावी वाट शेवट मोक्षाची !!
--------------
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू