पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

किराणा सामान...माझी समज



  


खरंतर मला किराणासामान म्हणजे ग्रोसरी  वगैरे हे उशीराच कळलं. मला वाटायचं किराणासामान म्हणजे काजू,  बेदाणे, बदाम,अखरोट वगैरे.

मी त्यावेळेस इयत्ता साहवीत होते.त्या दिवशी आई म्हणाली 

' चल! मी सांगते ती किराणा मालाची यादी लिहिता येईल ना तुला? '

मी आनंदाने चित्कारत म्हटलं 

'हो!  हो! आणि मी तुझ्या बरोबर येणार सुद्धा  ते सामान घ्यायला.'

मी लगेच पेन आणि कागद घ्यायला धावले आणि डोळ्या समोर चित्र रंगवून लागले. एका काचेच्या बरणीत भर भरून काजू आहेत तर दुसरीत बेदाणे,तिसरीत बदाम,चौथीत अखरोट ( मी आईला सांगणार फोडलेलेच घे. उगाच फोडत कोण बसणार?) काय सुंदर दिसतील  फळीवर ठेवलेल्या बरण्या. कधी वाटलं तर गुपचूप खाऊ शकेन. पण धाकट्या दोघी बहिणी आल्या मागोमाग तर ? आणि तिघींनी घेतलं तर आईला कळेल आणि मग….? नको नको त्यापेक्षा आईलाच विचारून घेतलेलं बरं. माझ्या तोंडात काजू बेदाण्याचा स्वाद घुमायला लागला आणि आईची हाक ऐकू आली.

" आजच्या दिवसात पेन आणि कागद आणणार आहेस का?" 

मी लगेच धावले आणि म्हणाले 

"हं सांग."

आई म्हणाली 

"हो लिही..

३ कि. साखर

२कि. गूळ

…. तुरीची डाळ,

…… मुगाची डाळ

मी वाट बघत होते ती म्हणेल

२ कि काजू

२ कि बेदाणे….वगैरे वगैरे.


ती बोलत होती, मी लिहीत होते, पण चित्त काजू, बेदाण्यात. 

आईने सांगितलेलं सगळं सामान लिहिलं. आई म्हणाली "आण ती यादी इकडे. बघू काही राहिलं तर नाही ना?"

मी लगेच आशेने उद्गारले 

"अगं! किराणा तर तू लिहायला सांगितलाच नाही."

आईने माझ्या कडे बघितलं, यादी कडे बघितलं आणि म्हणाली 

"अगं बाई शहाणे मग ही कसली यादी?"

मी ही लगेच उत्तरले

"हे तर फालतू सामान पण किराणा ? तो कुठे सांगितला?"

आईने आता जरा आश्चर्याने विचारलं

"तुला किराणा म्हणजे नक्की काय वाटतं?"

मी ..

"म्हणजे काजू बेदाणे वगैरे."

"नाही बेटा! त्याला सुका मेवा म्हणतात. किराणा म्हणजे हेच सगळं सामान." आईचं हे वाक्य ऐकलं आणि फळीवरच्या बरण्या धडधडून खाली पडल्या. 

आणि तो प्रसंग मी आज ही विसरत नाही. किराण्याची यादी आता मोबाईलवर बनते पण 

"बाळ! तो सुका मेवा. किराणा म्हणजे  हेच "

हे वाक्य काही माझी पाठ सोडत नाही.


राधा गर्दे

कोल्हापूर





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू