पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असंभव


"जागूं मैं सारी रैना बलमा."

मारूबिहागचे स्वर तरलतेने, तरळत श्रोत्यांच्या कानांना तृप्त करण्यास कारणीभूत होत होतेच , पण सभागाराच्या भिंती ही स्तब्ध होऊन हा  सुरांचा पाझरता अमृत रस प्राशन करत होत्या. सगळी कडे एक तृप्त शांततेत "अरोबिंदो चक्रवर्ती" डोळे मिटून गाण्यात तल्लीन होते. शुद्ध आणि तीव्र दोन्ही मध्यमांचा  प्रयोग करत लीलया  समेवर आले की श्रोते " वाह वाह" दाद दिल्या शिवाय राहूच शकत नव्हते. धोधो धबधबा वहावा, तश्या ताना निसृत होत होत्या. कधी बोल ताना, तर कधी आकारात घेतलेल्या ताना आणि कधी भरभर धावणाऱ्या स्वरांच्या ताना,  जिवाचे कान करून ऐकणाऱ्यांच्या काळजाचा अक्षरशः ठाव घेत होत्या. नदीच्या डोहात बागडणारी पोरं जशी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, भिजत असतात, तशाच त्या ताना ही श्रोत्यांचे अंतर्मन भिजवित होत्या.


 स्थाईच्या मुखड्याची एक झकास तिहाई घेऊन, अरोबिंदो चक्रवर्ती ह्यांनी राग मारूबिहागची इतिश्री केली, आणि क्षणार्धात सर्व कोमल स्वरांची मलिका भैरवी आळवायला सुरवात केली.

"नाम बता पनिहारी". 

टाळ्यांच्या कडकडाटात एक हात उचलला गेला. तर्जनी आणि अंगठा जुळवून उरलेली तीन बोटं वर करत " सुंदर" चा इशारा झाला ,आणि अरोबिंदोजींच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले.

भैरवी संपवून, आपले सारे साज आणि साजिंद्यांना घेऊन ते स्टेजवरून उतरले. चाहत्यांनी घातलेला गराड्यातून हसतच विनम्रपणे त्यांनी स्वतः ची सुटका करून घेतली, आणि गाडीत येऊन बसले. शेजारी त्यांचा दहा वर्षाचा  मुलगा कल्याण  येऊन बसला. त्यांनी विचारलं.

" मग काय तर ? नेहमी प्रमाणे  तुझा लाडका मारुबिहाग रंगला ना मना सारखा?"

 मुलानेही पहिल्या सारखीच  मस्त ची खूण केली.  बापाने मुलाला आपल्या जवळ कुशीत घेतलं.  ते दहा वर्षाचं पोर मायेच्या कुशीत लगेच निद्राधीन झालं.

 बापाची माया मुलाच्या केसांवरून हात फिरवित होती आणि ते स्वतः भूतकाळात फिरायला  गेले.


अरोबिंदो चक्रवर्ती भारतातले नामांकित गायक होते. त्यांना, ही प्रसिद्धी खूप लहान वयातच मिळाली होती.  त्यामागे त्यांची गायनाची अथक तपस्या होती. त्यांनी ती तपस्या करताना दिवस, रात्र, तहान, भूक, थकवा ह्या कशाचीच पर्वा केली नव्हती. एकच लक्ष्य गायन. लहान वयातले खेळ , मुलांची आपसातली मस्ती, हे सगळं बाजूला सारून  गायन आणि फक्त गायन कलेला आपलं सर्वस्व अर्पण केल होतं त्यांनी . त्यांच्या गुरूंना त्यांचा अतिशय अभिमान होता.


 नेहमी स्टेजवर पोहोचण्या अगोदर अरोबिंदो आपल्या गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि स्टेजवर पोहचून सरस्वती मातेचे स्मरण करून,डोळ्याच्या खुणेने गुरूं कडून सुरवात करण्याची परवानगी घ्यायचे. जर काही कमी जास्त झालं तर गुरू नंतर त्यांना रागवायचेही.


एकदा एका संगीत समारोहात "विनती" नावाच्या एका मुलीने त्यांच्या अगोदर,  मूळच्या कर्नाटकी पद्धतीच्या  राग शिवरंजनीची एक बंदिश म्हटली.

"सुमिरन करले मोरे मना"

 आणि अरोबिंदो तिच्या प्रेमात पडले. दोघांचं  लग्न झालं. विनतीचा आवाज सुरेल होता,पण तिला म्हणावा तितका शास्त्रीय गायनात रस नव्हता. त्यामुळे अनेकदा सांगून ही, ती गाण्या पासून दूरच असायची.  मात्र अरोबिंदोंच्या गाण्यावर ती फिदा होती. त्यांच्या  प्रत्येक कार्यक्रमात ती जातीने हजर असायची.


एका वर्षाने त्यांच्या घरात एका गोड  मुलाचा जन्म झाला. दोघांनी कल्याण रागावरून त्याचं नाव कल्याण ठेवलं. मुलगा घरातल्या संगीतमय वातावरणात वाढत होता. बापाच्या रियाज़च्या वेळेस हातातले सगळे खेळ बाजूला टाकून, लुटु लुटु धावत येऊन, समोर मांडी ठोकून बसायचा. त्याला थोडं बोलता यायला लागलं आणि तो ही गाणं गुणगुणायला लागला. लहान कल्याणच्या आवाजात सुरेलपणा खच्चून भरला होता.  सहसा तो बेसुर होत नव्हता. इतक्या लहान वयातील ही "देवाची देणगी" म्हणून अरोबिंदो आणि विनती देवाचे ॠणी होते. दोन वर्षाचा झाल्यावर तर तो चांगलंच म्हणायला लागला. बापा बरोबर मांडीला मांडी लावून, जमेल तसं  आनंदाने रियाज़ करायचा.


अरोबिंदोंनी एक मस्त परिसर पाहून ,तिथे घर बांधण्याचा श्रीगणेशा केला होता. अधूनमधून तिघं ते घर बघायला जायचे.  घराचं काम प्रगतीवर होतं. त्यादिवशी तिघं घर बघायला म्हणून गेले. अरोबिंदो कांट्रेक्टरशी बोलत होते.  पाच वर्षाचा कल्याण त्यांचा हात धरून मागे पुढे झुलत होता. विनती वर चढून गेली. थोड्याच वेळात धाडधाड धाडधाड आवाज आला आणि विनती खाली कोसळताना दिसली. रचून ठेवलेल्या विटांना धक्का लागला आणि विटा आणि विनती खाली आल्या. कल्याण जोरात "मां" म्हणून ओरडला आणि स्तब्ध झाला. विनतीला उपचारासाठी ताबडतोब दवाखान्यात नेलं. कल्याणचा हात धरून अरोबिंदोंनी त्याला गाडीत कोंबलं. दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी विनतीला तपासून सांगितलं “काळजीचं काहीच कारण नाही." मात्र दवाखान्यात चार पाच दिवस तरी राहवं लागेल. अरोबिंदोंनी सुटकेचा श्वास घेतला. त्यांच्या ओळखीच्यांची आणि चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.  प्रेस रिपोर्टर ही गर्दी करू लागले होते.


 सगळ्यांना त्यांच्या सेक्रेटरीने सांभाळले, आणि ते स्वतः कल्याणला घेऊन घरी निघाले,  कल्याणची काय व्यवस्था करायची ते बघायला. वाटेत त्यांनी कल्याणला कुशीत घेतलं आणि म्हणाले

" घाबरू नको हं? मां आता बरी आहे. ती चार पाच दिवसात घरी येईल तो पर्यंत तू शेजारच्या मावशीकडे राहशील ना?"

कल्याणने मान हलवली. 

" माझं बाळ खूप घाबरलं ना ? आता मी आहे ना? मग कां म्हणून घाबरायचं?"

 म्हणत त्यांनी कल्याणला मायेने कवटाळलं. कल्याणच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते,पण तोंडातून बोल फुटत नव्हते. परत अरोबिंदोंनी त्याला जवळ घेत म्हटलं

" रडतो कशाला बेटा सगळं ठीक आहे. हं."   इतक्या वेळात कल्याण एकही शब्द बोलला नव्हता. आता अरोबिंदों 

ना थोडं विचित्र वाटलं. ते परत म्हणाले

"बेटा काय होतंय तुला? बोल ना?" 

 कल्याणचा जीव गुदमरल्या सारखा होतोय, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पाठीवर चापट्या मारून त्याला 

"बरं वाटतंय का? " असं विचारलं. कल्याण आपला गळा धरून, नुसता काही अडकल्या सारखं करत होता. 

"बेटा ! बोल तुला काय होतंय ?"

 हे अनेकदा विचारून ही तो काही बोलेना आणि काहीतरी विपरीत तर नाही ना? असा  विचार येऊन ते हादरलेच. लगेच गाडी वळवून ते परत दवाखान्यात पोहोचले.


 कल्याणची तपासणी झाल्यानंतर, त्यांना जे सांगण्यात आलं ते अकल्पनीय होतं. भीति मुळे कल्याणची वाचा गेली होती. तो ऐकू शकणार होता, पण बोलू शकणार  नव्हता. हे ऐकताच अरोबिंदो हतबल होऊन तिथेच बेंचवर बसून राहिले. बिचारा कल्याण दीनवाण्या  चेहऱ्याने वडिलांकडे पहात होता. अरोबिंदोला कळतच नव्हतं हे काय झालंय?  विनती ठीक आहे, हे ऐकून बरं वाटतं न वाटतं तोवर अशी भयंकर बातमी कळावी? 

"  जे त्याला असहनीय होईल,असं काही वेगळं घडलं  तर कदाचित कल्याण बोलेल ही ." डॉक्टरांनी असं म्हटल्यावर तर दोघं आई बाप स्तब्धच झाले, पण एक आशा ही वाटली.


विनती दवाखान्यातून परत आली होती.  मात्र घरात भयाण शांतता होती. काय करावं ? कसं होणार? पुढे काय? हे अनुत्तरित प्रश्न उभे होते. अरोबिंदोंच्या मनात कल्याणला नामवंत गायक बनवण्याचं स्वप्न होतं. ते तर बाजूला राहिलं आता त्याला बोलता करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. सगळे डॉक्टर, स्पेशलिस्ट झाले ,जो जिथे सांगेल तिथे कल्याणला घेऊन दोघं जायचे. हाती मात्र काहीच लागत नव्हतं. अरोबिंदोंचा रियाज ही थोडा कमी झाला होता.


  आणि एक दिवस रियाज करत असता, अरोबिंदोंना असं जाणवलं की कल्याण रियाजच्या वेळेस आनंदात असतो.  विशेषतः मारुबिहाग, शिवरंजनी आणि खमाज हे राग म्हटले की रंगून जातो. बस त्यांनी ठरवलं आपल्या प्रत्येक रियाज़च्या वेळेत,  मैफिलीत कल्याणने असायलाच हवं. कधी विनती यायची तर कधी नाही. कल्याण मात्र प्रत्येक मैफिलीत हजर असायचा. विनती बरोबर गेली की तिला असं जाणवायचं की कल्याणच्या चेहऱ्यावर विषादाच्या रेषा उमटतात. गाणं स्टेजवर चालू असायचं आणि कल्याणला गुदमरल्या सारखं होतं असतं,असं तिला वाटायचं. ते तिने अनेकदा सांगितलं ही‌.

 हे सगळे विचार करता करता घर कधी आलं ते कळलंच नाही.आजचा कार्यक्रम संपवून अरोबिंदो आणि कल्याण घरी आले होते.


 दिवस पुढे सरकत होते.  दिवस महिन्यात आणि महिने वर्षात बदलत होते. अरोबिंदोंचं नाव गायन क्षेत्रात दुमदुमत होतं.  किती तरी सन्मानाचे मानकरी ते झाले होते. कल्याण खाणाखुणा करून त्यांची तारीफ किंवा नापसंती दर्शवायचा. आता तो बावीस वर्षाचा तरुण झाला होता. शिक्षण त्याचं चालू होतं. त्याने अर्थशास्त्रात एम.ए. केलं होतं.


यंदा परत एकदा अरोबिंदो ह्यांना लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये एक कार्यक्रम द्यायचा होता. ते त्या तयारीत होते. रोज रियाज, साजिंदे ह्यांची जुळवाजुळव चालू होती. कल्याण आणि विनती ही बरोबर जाणार होते. 

कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ आली. ते सभागृहात पोहोचले. अरोबिंदोंनी, आता ह्या जगात नसलेल्या आपल्या गुरूचं स्मरण केलं.  मां शारदेला नमन केलं. आणि राग यमन आळवायला सुरवात केली. सुरवातीचा षडज् लावताच सभेत "वाह" ची दाद मिळाली. राग विस्तार करुन त्यांनी बडा ख्याल गायला सुरुवात केली.

"गुर बिन मेरा कौन आधार"

 स्वरांचा ठहराव, आवाजातलं गांभीर्य आणि रियाज, सगळ्यांची जुगलबंदी वातावरण श्रवणीय बनवित होती. राग यमन नंतर त्यांनी राग खमाज गायला सुरुवात केली .

"चली नार गुलजार"

आणि कल्याणचा चेहरा खुलला. अरोबिंदो खमाजची चंचल प्रकृती खूप छान संभाळून त्याला खुलवत होते, फुलवत होते.आलाप आळवत,ताना घेत ते पूर्ण रंगात आले होते, गंधर्व नगरीची सैर करण्यासच  जणू ते निघाले होते.श्रोते ही पूर्णपणे आनंदात नहात होते. 


आणि अचानक जे आयुष्यात कधी घडलं नाही ते घडलं. अरोबिंदो गाता गाता आरोह मधे कोमल निषादचा प्रयोग करून गेले. त्यांना दरदरून घाम फुटला. पुढच्या ताना सुचेना एकदम ब्लैंक झाल्या सारखं वाटायला लागलं. मागे बसलेल्या शिष्यांनी दोन चार ताना म्हटल्या, हार्मोनियमवाल्याने ही आपली कलाकारी दाखवली. तबलची ने ही आपलं कौशल्य दाखवून घेतलं. पण अरोबिंदो तर जणू स्टेज वर नव्हतेच .

श्रोत्यांना कळेना काय होणार? आणि, आणि अचानक खमाजच्या  सुरेल चंचल स्वरातील ताना सभागृहात उमटल्या. कल्याण आपल्या जागेवरून चालत स्टेज वर पोहोचला होता. आणि त्यानं खमाज रागाचं गायन  सुरु ठेवलं होतं. अरोबिंदो  आणि विनती आश्चर्याने बघत होते, ऐकत होते.  हे काय? हा चमत्कार म्हणावा की काय? ही असंभव गोष्ट संभव कशी होऊ शकते?  ते त्यांना कळत नव्हतं. इतक्या वर्षात एक शब्दही गळ्यातून ज्याने काढला नाही तो स्वर कसे काय आळवायला लागला ? हो आता त्याच्या गायनात म्हणावी तितकी बारीकी नव्हती, चपळता नव्हती, स्वरांवर पकड मजबूत नव्हती.  पण सुरेलपणा, नजाकत आणि रागाची शुध्दता संभाळत तो जे गात होता, त्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.  न बोलणाऱ्या कल्याणने असंभव गोष्ट संभव करून दाखवली होती.


अरोबिंदोंनी  उठून सगळ्यांची माफी मागितली. थोड्यावेळ अश्रूधारा वाहू दिल्या. कल्याणला मिठी मारली. विनती ही स्टेजवर पोहोचली होती. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट अविरत चालू होता .कल्याण बद्दलची माहिती सर्वज्ञात होती. भावनांचा भर ओसरला आणि परत गायन सुरू झालं. अधूनमधून कल्याण साथ देत होता. 


ह्या असंभव घटनेचा हे सभागृह साक्षीदार  झालं होतं.

आज ईश्वराने असंभव घटनेला संभव करून, एक  चमत्कार घडवला होता.


राधा गर्दे

कोल्हापूर 






 




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू