पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्यात्म आणि मराठी भाषेतील संत साहित्य

  -: आध्यात्म आणि मराठी भाषेतील संत साहित्य:-

 

मराठी विषयी संत ज्ञानेश्वर माऊली  आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथांत सहाव्या अध्यायात काय म्हणतात पहा,

“ माझा  मराठाची बोलु कवतिके | परि अमृतातेही पैजा जिंके| ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन”

यातून त्यांचे मातृभाषे विषयीचे प्रेम, स्वाभिमान, स्वकर्तव्य एकदमच प्रकट होते. ती संस्कृत किंवा देववाणी एवढी श्रेष्ठ नसेल पण तिचे कौतुक करण्या एवढ्या योग्यतेची ती निश्चितच आहे. ती तिच्या गोडव्याने अमृताचाही पराभव करील याची ग्वाही ज्ञानेश्वर माऊली देत आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे प्राकृतात आणलेली गीताच आहे. गीता ही श्रीकृष्णाने संस्कृत भाषेत अर्जुनाला कथन केलेली आहे हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळे पूर्वी मुठभर लोकांच्या पुरतेच अध्यात्मिक ज्ञान हे मर्यादित राहिले होते. ते सर्व सामन्य लोकांपर्यंत पोहचावे या उद्देशाने आणि तळमळीने माऊलीने ज्ञानेश्वरीचे लेखन केले.  इतरही संत बरेच आहेत. त्यांना आपण महाराज ही उपाधी मागे लावतो. पण ज्ञानेश्वरांच्या बाबतीत तसे नाही. आपण त्यांना माऊली म्हणण्याचे कारण म्हणजे, त्यांनी ज्ञानेश्वरी मध्ये जी भाषा वापरली आहे ती अतिशय लडिवाळ अशी आहे. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला एखादी गोष्ट लडिवाळ भाषेत समजावून सांगते त्याप्रमाणे माऊलीनी  गीतेमधल्या  एकेका श्लोकासाठी कितीतरी ओव्या लिहिल्या आहेत, आणि ते आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी ते खुप दाखले देतात. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांना संन्यासाची पोरे म्हणून समाजाकडून खुप त्रास आणि मानहानि सहन करावी लागली आहे. परंतु त्यांनी समाजावर प्रेमच केले. भोगाव्या लागलेल्या त्रासाचा कुठेही त्यांच्या भाषेत आपल्याला उद्वेग दिसून येत नाही. व्यंकटेश स्तोत्रामध्ये एक ओळ आहे “पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद.” तसं समाजाकडून त्यांच्या बाबतीत झालेले अपराध त्यांनी क्षमाशील राहून सहन केले आणि ते साऱ्या जगाची माऊली झाले. तसचं सर्व संताच्या बाबतीत घडलं आहे. महाराष्ट्राला संतांची भूमीच म्हणलं आहे. खुप संत महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी आपल्या साहित्यातून समाज जागृतीचे मोठे काम केले आहे.  तथाकथित समाजाला अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर काढण्याचं काम आपल्या साहित्यातून सर्व संतांनी केले आहे. त्यांचे आपल्यावर खुप मोठे ऋण आहे. पण शेवटी असं असत, गोड्या पाण्याच आख्खं सरोवर जरी आपल्या पुढे असलं तरी पाणी प्यायचं का नाही हे ज्याचे त्याने ठरवायचं असत. आपल्याला जेव्हा ती भक्तीची तहान लागेल तेव्हाच आपण त्याचा शोध सुरू करतो आणि आपली ओंजळ भरून घेण्याचा प्रयत्न करतो. ओंजळच म्हणावी लागेल, कारण एवढ्या मोठ्या साहित्य संपदेच्या सरोवरातले ओंजळभर ज्ञान ग्रहण करण्याचीच आपली कुवत असते. निदान माझ्या बाबतीत तरी मी तसचं म्हणेन. शेवटी ज्ञान हे ज्ञानच असत, ते कोणत्या भाषेतून मिळवतो हे खुप गौण असत. त्यासाठी रामदास स्वामी यांनी  दासबोधात सातवा दशक, पहिला समास यामध्ये एके ठिकाणी म्हणलं आहे,

जयासी नाहीं परमार्थ | तयासी न कळे येथीचा अर्थ | नेत्रेविण निधानस्वार्थ | अंधास कळेना ३१ त्याचा अर्थ अध्यात्म दृष्टी नसणारे लोक संतांच्या ग्रंथावर अनेक आक्षेप घेतात, तसाच हा भाषेचा आक्षेप. भाषा कोणतीही असो, तिच्यामुळे ज्ञानाचे वाहन होते आहे ना हे महत्त्वाचे. पण पूर्वी काही दुराग्रही लोक भाषेच्या  प्रश्नावर वादंग माजवीत असत. त्यांच्या साठी रामदास स्वामींनी पुढील ओवी लिहली आहे.

येक म्हणती मऱ्हाटे काये |हे भल्यांसी एको नये | ती मुखे नेणती सोये | अर्थान्वयाचा विचार न करता काही लोक म्हणतात मराठीत काही अर्थ नाही. चांगल्या माणसांनी मराठी ग्रंथ ऐकू नयेत. असे म्हणणारी माणसे मूर्ख असतात. शब्दांचा परस्परांशी संबंध लावून त्याचा अर्थ काढण्याची विद्या त्यांना अवगत नसते. असे समर्थांचे म्हणणे आहे. दासबोधाची भाषा सडेतोड आहे. ह्या पुढच्या काही ओव्यांमधून रामदास स्वामींनी त्यासाठी काही दाखले दिले आहेत. ते थोडक्यात पाहूयात. ते म्हणतात , एखाद्याच्या हातात लोखंडाची पेटी पडते, ही काय लोखंडाची पेटी आहे म्हणून त्याने उघडून न पाहता टाकून दिली तर तो त्याचा कर्मदरिद्रीपणा आहे. त्यात असलेल्या हिरे, रत्नजडीत सोन्याच्या दागिन्यांना, द्रव्याला  तो मुकेल. तसेच समजा अंगणात परीस  पडला आहे, म्हणून का त्याची किंमत कमी होणार आहे? तो कुठे पडला आहे हे महत्त्वाचे नाही. त्याचा सदुपयोग करणे महत्त्वाचे असते. चिंतामणी रत्न रस्त्यात पडले आहे म्हणून ते दुर्लक्षित करणे योग्य आहे का? ते लगेच उचलून त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. असे अनेक दाखले समर्थांनी दिले आहेत. ते कशाकरता तर केवळ पूर्वी पंडित लोक मराठी भाषेला कमी लेखायचे. सर्व वेदांचे सिद्धांत हे संस्कृत मध्येच आहेत असा त्यांचा गैरसमज होता. किंवा ते मराठीत मांडू नयेत असे त्यांचे म्हणणे होते. हे सर्व ज्ञान जर संतांनी मराठीत आणलं नसत तर ते आपल्याला उपलब्ध झालं नसतं. म्हणून मराठीत जर अनुभवसिद्ध अद्वैत आत्मज्ञान सहजासहजी मिळत असेल तर ते अवश्य स्विकारायला पाहिजे. त्याचा अव्हेर करून चालणार नाही.  खाण्याची एकच गोष्ट आहे किंवा एकच पदार्थ आहे, तो जर का दोन वेगवेगळ्या भांडया मध्ये ठेवला तर त्याची रुची थोडीच बदलणार आहे. त्याप्रमाणे भाषांमध्ये भेद असतो पण त्या भेदांमध्ये अर्थ एकच असतो. भाषा बदलल्याने अर्थाची हानी होत नाही. आपल्या कार्यात यश येण्यासाठी अर्थच शेवटी उपयोगी पडतो. खरे सांगायचे म्हणजे मराठीमध्ये हे आत्मज्ञान व्यक्त केल्याने संस्कृतमध्ये एवढा अर्थ भरला आहे हे आपल्या ध्यानात आले. अर्थ हे शेवटी सार आहे.आणि भाषा असार आहे. केवळ अभिमानाने आणि अंहकाराने माणूस वाद वाढवित जातो. फळ खाताना ज्याप्रमाणे आपण उत्तम तो भाग काढून खातो आणि साली टरफले टाकून देतो त्याप्रमाणे भाषेतील अर्थाचे आकलन करून घेणे योग्य ठरेल. संस्कृत भाषेत जो वेदांत सांगितला आहे तोच वेदांत मराठीत समजून घेणे आपल्याला सोपे जाते. जसे की, मोती शिंपल्यात तयार होतो म्हणून त्याचा दर्जा थोडाच कमी होता? माकडाला नारळाची किंमत कळत नाही. तो वरून ओबडधोबड दिसतो म्हणून त्याला आतल्या गोड गराची, पाण्याची किंमत समजत नाही आणि तो नारळ फेकून देतो. तसे काही जणांचे असते. अद्वैत मराठीत समजायला सोपे असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

 संत हे खुप सहनशील असतात. समोरचा कसा जरी वागला तरी ते त्यांचा विवेक सोडत नाहीत. संयमाने वागतात. आणि आपल्यापुढे आदर्श ठेवून जातात. संत एकनाथांच उदाहरण पाहूया. संत एकनाथ महाराज रोज स्नाना साठी नदीवर जात असत आणि नंतर देवपूजा करत असत. ते खुप क्षमाशील आहेत आणि त्यांना राग येत नाही म्हणून त्यांची ख्याती होती. त्यामुळे एकदा एका यवनाने त्यांना राग येईल असे कृत्य करायचे ठरविले. एक दिवस ते नदीवरून स्नान करून येत असताना त्या यवनाने पहिले आणि पान खाऊन त्याची पिचकारी त्यांच्या अंगावर थुंकली. एकनाथ पुन्हा नदीवर गेले स्नान करून परत आले पुन्हा त्या यवनाने तसेच केले. पुन्हा ते नदीवर स्नानासाठी गेले. असे एकशे आठ वेळा झाले. बघे लोक मजा बघत होते. शेवटी तो यवनच थुंकून थुंकून थकला पण एकनाथ मात्र शांतच होते. तो यवन त्यांच्या पाया पडला आणि त्याने क्षमा मागीतली. तेव्हा ते शांतपणे म्हणाले, “क्षमा कसली मागतोस मला तर तुझे आभार मानायला हवेत. तुझ्यामुळे मला आज गंगेचे  १०८ वेळा स्नान घडले. म्हणून तर संत एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म म्हणलं जायचं. नंतर एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन महाराजांच्या कृपेने त्यांना दत्त दर्शन झाले. आणि प्रत्यक्ष दत्तगुरूंनी  त्यांना भागवत आणि भावार्थ रामायण प्राकृतात लिहावयास सांगितले. एकनाथी भागवत हे भागवता मधल्या अकराव्या स्कंधावर आधारित आहे. जो ज्ञानाचा स्कंध आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला उपदेश आहे. साधारण १८ हजार ओव्या आहेत. ३१ अध्याय आहेत. पहिले पाच अध्याय त्यांनी पैठण मध्ये लिहले. त्यातील काही पाठ केलेल्या ओव्या त्यांचा शिष्य काशीमध्ये असाच म्हणत होता तेव्हा काही पंडितांनी त्याला टोकलं तेव्हा त्यांनी हे एकनाथ महाराजांनी लिहलं आहे म्हणून त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांना तिथं कशी बोलावून घेतलं गेलं. त्यांची विचारणा झाली. तेव्हा त्यांनी त्याचा अर्थ त्यांना सांगितला. भागवत सर्वसामान्यांच्या पर्यंत पोचण्यासाठी ते प्राकृतात आणले पाहिजे ही भूमिका स्पष्ट केली. त्या पंडितांच्या कडून त्यांना मान्यता घेऊन मग पुढील २६ आध्याय काशीमध्ये बसून पूर्ण केले. असं प्रत्येक संतांना अध्यात्मिक साहित्य निर्मिती करताना खुप त्रास सहन करावा लागला आहे.

  नामदेव महाराजांना पण तत्कालीन समाजातील लोकांचा खुप त्रास झाला. त्यावेळी वामदेव नावाच्या गृहस्थांनी त्यांच्या विरुद्ध खुप कट कारस्थाने केली. त्यांच्यावर चोरीचे दरोड्याचे खोटेच आळ घेतले गेले. आणि परिणामी त्यांना पंढरपूर गावच्या हद्दपार केले गेले. ती बरीच मोठी कथा आहे. इथे सांगत बसले तर वेळ पुरणार नाही. तिथून फिरत फिरत ते पंजाबात पोहचले तिथेही त्यांनी किर्तने केली भक्तीचा मार्ग लोकांना दाखवला. त्यामुळे तिथे अजुनी नामदेवांची मंदिरे आहेत. नंतर वामदेवांनी  नामदेवांच्या वर केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. आणि नामदेवांना सन्मानपूर्वक पंढरपूरला बोलावण्यात आले. प्रत्यक्ष देव नामदेवांशी बोलायचे. देवाशी प्रेमाच भांडण करताना एका अभंगात नामदेव म्हणतात,

पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा| पतित पावन न होशी म्हणून जातो माघारा |

द्यावे तेव्हा घ्यावे ऐसा असशी तू उदार |काय धरू मी देवा तुझे कृपणाचे द्वार|

अजूनी आपण सर्वजण त्यांनी रचलेली विठ्ठलाची आरती म्हणतो ,

 युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ..... ही आपल्या सर्वांना माहित आहेच.

तुकारामांची गाथा आणि त्यातले अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांना सुद्धा तत्कालीन समाजाकडून त्रास सहन करावा लागला. म्हंबाजी बुवा तर त्यांच्या वाईटावरच टपलेले होते. त्यांना त्यांचे अभंग चंद्रभागा नदीत बुडवावे लागले. त्यांचा  भक्तीभाव कामास आला आणि ते पुन्हा वर तरुन आले असे म्हणले जाते. त्यामुळेच कदाचित तुकाराम महाराजांनी “न लगे मुक्ती धन संपदा |संत संग देई सदा” ह्या अभंगाची निर्मिती केलेली असावी. सर्वच संतांनी सत्संगाच खुप महत्व सांगीतलं आहे. आपल्या आयुष्यात चांगल्या संस्कारामुळे आपली जडणघडण चांगली होत असते. नुसते सुशिक्षित असून उपयोग नाही तर सुसंस्कारीत  असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही समाजाला काही देऊ शकता. हे चांगले संस्कार संतांनी आपल्याला त्यांच्या साहित्यातून दिले आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी त्यांच्या एका प्रवचनात छान उदाहरण दिले आहे.

आपण हातात काठी ठेवली तर कुणाला तरी मारावेसे वाटेल. कात्री घेतली तर कापावेसे वाटेल, पण जपाची माळ घेतली तर जप करावासा वाटेल. साध्या वस्तूचा आपल्यावर एवढा परिणाम होतो तर माणसांचा आणि मित्रांचा किती होतो याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे कुणाच्या सहवासात रहावं आणि कुणाच्या नाही हे सर्वस्वी आपणच ठरविणार असतो.  जनाबाई काम करता करता सदोदित विठ्ठल नामात दंग झालेल्या असायच्या. त्यामुळे त्यांनी  बनवलेल्या शेणाच्या गवऱ्या त्यांना सुद्धा नामाचा संग मिळाला तर त्यातून सुद्धा नाम ऐकू येत होत. एकदा जनाबाईंच्या आणि त्यांच्या शेजारणीच्या गवऱ्या एकत्र झाल्या आणि ती शेजारीण सर्व गवऱ्या माझ्याच आहेत असं म्हणू लागली. न्याय निवडा कसा करायचा हा प्रश्न आला. तेव्हा जनाबाई म्हणल्या ज्या गवऱ्या मधून तुम्हांला विठ्ठलाचे नाम ऐकू येईल त्या माझ्या गवऱ्या आहेत. ज्ञानेश्वरांच्या सहवासात रेड्याने सुद्धा मंत्र म्हणले. तेव्हा संत संग किंवा त्यांच्या साहित्याचा संग आपल्या आयुष्यावर नक्कीच परिणाम करू शकतो.

जिथे शाश्वताची भक्ती आहे तिथे चांगलेच विचार जन्म घेतात. तिथे माणसाच रंगरूप त्याची जात पात पहायची नसते. तर त्याचं मनाचं सौंदर्य अनुभवायचं असतं. चोखामेळा पण मोठे संत होऊन गेले. त्यांचे अभंग सुद्धा खुप विचार करण्यासारखे आहेत. ते म्हणतात,  “ ऊस डोंगापरी परि रस नव्हे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा | नारळ वरुता कठीण | परि अंतरी जीवन | फणसा अंगी काटे | आत अमृताचे साठे | हे सर्व संत आध्यात्मात पुढे गेलेले होतेच. त्याचं साहित्य किती जरी वर्षे जग पुढे गेल तरी कायम अजरामरच राहणार आहे. सध्या अलीकडेच गीतरामायण लिहलेले ग. दि. माडगुळकर , ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो. त्यांनी  गीत रामायण अजरामर करून ठेवलेलं आहे. त्यांच्या रचना सुद्धा प्रासादिक आहेत. प्रत्येक गीतातला प्रत्येक शब्द अगदी चपखलपणे बसलेला आहे. अमुक ठिकाणी अमुक शब्द हवा होता असं कधीच मनात येणार नाही. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा , हे गीत जीवना बद्दलच खुप मोठं तत्त्वज्ञान सांगून जात. प्रत्येक गीत आपल्या समोर साक्षात रामायण उभं करत. लोक साक्ष शुद्धी झाली, सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, यामध्ये प्रत्येक शब्द सीतेचे अचूक वर्णन करून जातो. ती रामाची स्वामिनी आहे, आणि किती जरी लोकापवाद झाले तरी ती निरंतर रामाची स्वामिनीच राहणार आहे. तिची सहनशीलता सुद्धा सुता ही क्षमेची या शब्दातून व्यक्त होते. जी भूमी लोकांचा त्यांच्या पापासकट भार सांभाळत असते, आणि लोकांना क्षमा करत असते , तिची ती कन्या आहे. त्यामुळे ती पण तशीच आहे.

 लोकमान्य टिळकांची सुद्धा आध्यात्मिक बैठक खुप चांगली होती. त्यामुळेच ते वयाच्या पन्नाशीच्या पुढेसुद्धा मंडालेच्या तुरुंगात कठीण परिस्थिती मध्ये दिवस काढू शकले. नुसतेच त्यांनी दिवस काढले नाहीत तर, गीतारहस्या सारख्या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली. जो पूर्णपणे कर्माच्या तत्त्वज्ञानावर लिहला आहे. तिथे त्यांना ना जेवण चांगले मिळत होते, ना लेखनाची चांगली साधने उपलब्ध होती. साधी शिसपेन्सिल मिळायची ती सुद्धा तिथला कर्मचारी वर्ग त्यांना टोक करून द्यायचा. तुरुंगा मधल्या ४०-४५ डिग्री तपमानात त्यांनी लेखन केलेलं आहे. प्रत्येक संतांनी खुप कठीण परिस्थितीत जीवनाच  दर्शन घडविणार, जीवनाच तत्त्वज्ञान सांगणार असं खुप मोठं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. प्रत्येकाचा अभ्यास करायला आपल्याला एक जन्म पुरणार नाही. पण सत्संगात राहून सत्कर्म करत राहिलो तर निवृत्ती नक्की येऊ शकते. निवृत्ती आली की ज्ञान प्राप्ती सहज शक्य होऊ शकते. मग पुढे ज्ञान प्राप्ती झाल्यावरच  मुक्तीच्या  सोपनाकडे आपण वाटचाल करू शकतो. त्यामुळे आध्यात्माचा सोपान चढणे एवढे सहज शक्य नसते तसेच अप्राप्य पण नसते. माणूस आयुष्यभर पैसा कमावून तेरा कोटी रुपये एखाद्या वेळेस कमावू शकेल. पण तेरा कोटी जप सहजासहजी करू शकणार नाही. कारण हे आपलं अंतिम ध्येय आहे हेच आपण आपल्या संसाराच्या व्यापात विसरून जातो. आपल्या भाडोत्री देहालाच आपण मी समजत राहतो. त्यातल्या आत्म्याची ओळख पटवून घेण्यासाठी कोणीतरी वाटाड्या हवा असतो. तो म्हणजेच आपला गुरु असतो. त्याचं महत्व  अनन्य साधारण आहे.  सर्व संतांनी ते आपल्या साहित्यात विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. आपण मी पण सोडून देऊ तेव्हाच गुरु आपला हात धरतात. त्यासाठी गोंदवलेकर महाराज अगदी व्यवहारातलं साध उदाहरण देतात. एक शिष्य बरेच दिवस एका जागी बसून साधना करत असतो. त्याची साधना चालू असताना त्याचे गुरु तेथून जात असतात. तो गुरूंना पाहून म्हणतो, मी इथं अमुक इतके दिवस बसून न कंटाळता साधना करत आहे. त्याला झालेला गर्व गुरूंच्या लक्षात येतो. ते म्हणतात, “ अजून दोन दिवस तू इथे बसून साधना कर, तुला परमेश्वर प्राप्ती होईल. शिष्याला आनंद होतो. तो मनात म्हणतो, ‘इतके दिवस केले तेव्हा अजून दोन दिवस सहज करेन.  तो ध्यान देऊन साधना करायला लागतो. पण पाचच मिनिटात त्याला तिथे बसणे अशक्य व्हायला लागत. त्याच्या पायाला मुंग्या येऊ लागतात. तेव्हा त्याला कळत, की गुरु आपल्याकडून साधना करवून घेत होते म्हणून ती होऊ शकली. आणि गुरु आपण जेव्हा अहंम बाजूला ठेवतो तेव्हाच आपला हात धरतात. तसेच महारांजाच्या कडे येणारे एक सद्गृहस्थ त्यांच्या मुलीचं लग्न ठरत नाही म्हणून चिंताग्रस्त असतात. नंतर मुलीचं लग्न ठरत, ते ठरल्या मुहूर्तावर होत. ते झाल्यावर ते महाराजांना मी लग्न कसं थाटात केल ते वर्णन करून सांगू लागतात. तेव्हा महाराज म्हणतात, “लग्न करणारे आपण असू तर ते तीन वर्षापूर्वीच का नाही केल?” तेव्हा ते गृहस्थ म्हणतात, “तेव्हा ते जमलं नाही.”  म्हणजेच काय तर करणारे आपण नसतो हा दाखला महाराज सहज देऊन जातात. कर्ता करविता परमेश्वर असतो. ह्यासाठी रामदास स्वामी  यांनी दासबोधात सहावा दशक, सातवा समास इथे एका ओवीत म्हणलं आहे,

  मी कर्ता ऐसे म्हणशी |तेणे तू कष्टी होशी | राम कर्ता म्हणता, पावसी यश, किर्ती, प्रताप |      

         ********************************************

जयश्री देशकुलकर्णी

कोथरूड. पुणे – ३८                                                        

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू