पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ट्रेनचा प्रवास

ट्रेनचा प्रवास


          ट्रेन प्रवासाची मजा काही औरच असते. लहानपणी आम्ही ट्रेनला ' आगगाडी ' म्हणत असू तर अगदी लहानपणी तिलाच ' झुकझुकगाडी ! मात्र लहानपणी ट्रेन केवळ दुरूनच पाहण्याचे योग आले. मी जेव्हा आजोळी पंढरपूर येथे राहण्यास होतो तेव्हा नदीच्या वाळवंटातून दुरूनच आम्हाला आगगाडी रेल्वे पुलावरून जाताना दिसे. लहानपणी ट्रेन जवळून पाहिल्याचे आठवत नाही. जशी माणसे मोठी होतात तसतसे वाहनाला शोभेल असे शब्दप्रयोग देखील बदलत जातात. बरेचदा ट्रेनचा उल्लेख ' रेल्वे 'असा सर्रास केला जात असे. खरंतर ' रेल ' आणि ' वे ' दोन्ही शब्द एकत्रित करून लोक सर्रास रेल्वे ने प्रवास केल्याचे सांगत. मात्र ' ट्रेन ' हा शब्द सॉफीस्टिकेटेड वाटतो व आजकाल सर्वत्र तो चर्चिला जातो.


          माझ्या नोकरीच्या काळात कधीही ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव घेता आला नाही त्याची कारणे अशी की सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना एस. टी.ने प्रवास करणे शक्य होते त्यामुळे नोकरीच्या कालावधीमध्ये मी एस.टी.नेच प्रवास करीत असे. मात्र सेवानिवृत्तीनंतर अनेकदा ट्रेनने वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे प्रसंग आले व खऱ्या अर्थाने प्रवासाचा आनंद घेता आला असे म्हणता येईल. आगाऊ रिझर्वेशन केले की प्रवास छान होणार हे गृहीत धरलेले असते.


          ट्रेनचे अनुभव अनेकविध असतात व ते व्यक्तिनिहाय वेगवेगळे असतात. अनेकदा असे होते की वेगवेगळी अनोळखी माणसे त्यांच्या रिझर्व्हेशन प्रमाणे आपल्या बोगीत समोरच्या बाकावर येऊन बसतात. त्यांच्या बॅगा सीटखाली ठेवतात. काहींना स्टेशनवर सोडविण्यासाठी काही घरचे लोक आलेले असतात ते त्यांना डब्यात बसल्यानंतर हाय-हेल्लो करत असतात काही ग्रामीण भागातील असतात तर काही शहरी. काहींची भाषा आपल्या भाषेपेक्षा वेगळी असतात. कधी कधी काही चौकस प्रवासी आपल्याला आपला ठावठिकाणा व आपल्या नोकरी उद्योगाविषयी विचारतात. अशी चौकस माणसे बोगीत भेटली की प्रवासाचा शीण बिलकुल जाणवत नाही. मग विचारांची देवाण घेवाण होते. आपल्या पूर्वायुष्यात कधीही न भेटलेल्या व्यक्ती प्रवासातील काही तासापूरते इतके जवळ येतात व आपलेसे होऊन जातात. 


            मी अनेकदा ए.सी.कोचने देखील प्रवास केला आहे. तेथील प्रवासी जरी काहीसे सधन असले तरी संवाद करण्यास तेवढे इच्छुक नसतात. काही त्यांच्याच विश्वात रममाण असतात, एखाद्या जवळ एखादे पुस्तक वाचण्यासाठी असते. हल्ली सर्वांना मोबाईलने स्वत्व बहाल केले आहे, त्यात अनेकजण गुंतलेले असतात. काही जण फोनवरून इतरांना महत्वाचे मेसेजेस देत असतात तर काही विशेषतः तरूण असतील तर व्हिडिओवर हवा तो सिनेमा मोबाईलवर पाहतात. आजकाल प्रत्येक कोचमध्ये मोबाईल प्रेमींसाठी चार्जर पॉईंट केलेला असतो. काही जण प्रवासादरम्यान त्यांच्या मोबाईलचे चार्जिंग फुल करुन घेतात. काही कानात एअर फोन घालून सिनेमातील गाणी ऐकतात. काहीजण त्यांच्या  सोबतचा लॅपटॉप काढुन त्यावर निवांत काम करत बसतात. सहसा रात्रीचा प्रवास व तो ही ओव्हरनाईट असेल व जर रिझर्व्हेशन असेल तर रात्रीच्या ट्रेनने बसुन सकाळी हव्या त्या स्टेशनवर उतरता येते.


             कोणत्याही रेल्वे स्टेशनचा माहोल मात्र लक्षवेधी असतो. वेगवेगळया ट्रेन्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर थांबलेल्या असता तर काही यावयाच्या असतात. अनेक प्रवासी आलेल्या गाडीतून खाली उतरतात तर नवीन प्रवासी बोगीत चढतात. अनेकजण गाडी प्लॅटफॉर्म वर येण्याची वाट पाहत असतात. काही हमाल मंडळी डोक्यावर बॅगा घेऊन प्रवाशाबरोबर पाहिजे त्या बोगीपर्यंत जातात. काही फेरीवाले पाणी बॉटल्स तर काही चहा विक्रेते बोगीपर्यंत जाऊन त्यांचा व्यवसाय करतात. काही वडापाव वाले देखील ट्रेनच्या खिडकीपाशी जाऊन त्यांच्या मालाची विक्री करतात. काही प्रवासी गाड्यांचे डिस्प्ले पाहण्यात मश्गुल असतात व त्यांची गाडी कधी येणार याची वाट पाहतात. गाड्यांची अनौनसमेंट, पॅसेंजरचा आरडाओरडा, येणाऱ्या गाड्यांची शिट्टी व ट्रॅकचा आवाज असा संयुक्त गदारोळ कोणत्याही स्टेशनवर सतत चालू असतो.


          एक नित्याचा स्टेशनचा अनुभव शेअर करावा असे वाटले म्हणून हा पोस्ट-प्रपंच.


दि.५ मार्च, २०२४.               सुधीर नारायण इनामदार....



    

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू