पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझा लोकल ट्रेनचा एक अनुभव

सुमारे २ वर्षे झाली असतील त्या घटनेला ! माझा तळेगाव दाभाडे येथे ' लॅटिस ' या वसाहतीत एक फ्लॅट आहे. त्यात माझा भाचा राहतो.  कधी कधी तिथे जाण्याचे, राहण्याचे प्रसंग मला येतात. मी सोलापूरचा असल्याने सोलापूरला परतते-वेळी मला प्रथम तळेगाववरून पुण्याला येताना सकाळी ७.५० ची तळेगांव-पुणे लोकल धरावी लागते. ती पुण्याहून फलाट नंबर २ वर येते व तिथूनच परत पुण्यासाठी निघते त्यामुळे गर्दीचा सामना करावा लागत नाही. ती लोकल धरल्यानंतर मी सकाळी ८.५० पर्यंत पुणे स्टेशनला पोहोचतो व पुण्याहून सोलापूरला जाण्यासाठी मुंबईवरून पुण्याला येणारी इंद्रायणी एक्सप्रेस पुढे तशीच सोलापूरला येते व ती सकाळी ९.३० ला पुण्याहून निघते व दुपारी १.३० पर्यंत सोलापुरात पोहोचते. हे नेहमीचे रूटिन मला माहित होते त्याप्रमाणे मी घरातून वेळेवर तळेगाव स्टेशनवर पोहोचलो. लोकलचे साधे तिकीट काढले. मला स्टेशनवर सोडविण्यासाठी भाचा आला होता. तो मला सोडून घरी गेला. 


           मी पुणे-तळेगांव लोकलची वाट पहात फलाट नंबर २ वर उभा राहिलो. इतक्यात पुणे-तळेगाव लोकल २० मिनिटे उशीरा येणार असल्याची अनौनसमेंट मी ऐकली. मी काहीसा हादरलो. कारण ही लोकल जर धरली नाही तर कदाचित मला पुढे पुण्याहून इंद्रायणी एक्सप्रेस मिळणार नाही अशी भावना माझ्या मनात दृढ झाली. दरम्यान लोणावळा-पुणे लोकल फलाट नंबर १ ला ५ मिनिटात येणार असल्याची देखील अनौनसमेंट झाली. फलाट नंबर १ वर जाण्यासाठी दादरा चढून जाण्याची वेळ होती. माझ्या गुडघेदुखीमुळे मला सुटकेस घेऊन दादरा चढणे अवघड होते. सकाळची वेळ असल्याने कुणी हमाल स्टेशनवर दिसेना. 


            मी भांबावलेल्या अवस्थेत पुन्हा भाच्यास फोन केला व वस्तूस्थिती सांगितली. तो पुन्हा स्टेशनवर येण्यासाठी निघाला. मी विचार केला की भाचा येईपर्यंत जर लोणावळा-पुणे लोकल आली तर काय करायचे ? म्हणून मी घाईने तशीच सुटकेस घेऊन दादरा चढुन फलाट नंबर १ ला आलो. लोकल तोपर्यंत आलेली नव्हती. तोपर्यंत फलाट नंबर २ वरील अनेक प्रवासी फलाट नंबर १ ला आले, व गर्दी वाढली. मी अशा गर्दीत कसा चढणार याचे मला टेन्शन आले. इतक्यात भाचा आला. त्याने " तुम्ही सुटकेस कशाला आणाली, मी आणली असती " असे म्हणाला. मी त्याला " लोकल चुकेल म्हणून मी गडबडीत आणली " असे सांगितले.  मी त्यास तोंडी म्हणालो की मी कसाही डब्यात शिरतो तू फक्त सुटकेस नंतर हातात दे. कोणता ही डबा असू दे. इतक्यात लोकल आली. मी गडबडीत मिळेल त्या डब्यात चढलो.

 

           मी डब्यात चढलो खरा, पण गडबडीत तो फर्स्ट क्लास डबा आहे की सेकंड क्लास हे मी पाहिले नाही. लोकल हलली. डब्यात सर्व माणसे बसलेली होती, कुणीही उभे राहिलेले दिसले नाहीत.  माझे लक्ष सीटकडे गेले, कुशनचे सीट होते. कुशन असलेले सीट म्हणजे फर्स्ट क्लास ! माझी खात्री झाली की मी साध्या तिकिटावर फर्स्ट क्लासमध्ये बसलो होतो. डब्यातील सर्व लोक नेहमीप्रमाणे गप्पा मारत होते, कुणाकडेही माझ्यासारखी सुटकेस नव्हती. ते कदाचित पासधारक असावेत. मी मात्र कदाचित चेकर येईल म्हणून टेन्शन मध्ये होतो. समजा चेकर आला तर " गडबडीत चढलो " अशी अडचण सांगू व तिकीट फरकाची रक्कम भरू असे मी मनाशी ठरविले.


          तळेगांव ते पुणे दरम्यान येणाऱ्या प्रत्येक स्टेशनला आता चेकर येईल, कदाचित, पुढच्या स्टेशनला येईल या भीतीने एक तासाचा प्रवास मी अक्षरशः टेन्शन मध्ये काढला. माझी भाडे फरक देण्याची तयारी होती मात्र शेवटपर्यंत चेकर आला नाही. पुणे स्टेशन आल्यानंतर मी चेकर येईल असे वाटले पण शेवटपर्यंत कोणीही आले नाही. आमची लोकल पुणे स्टेशनला

फलाट नंबर ६ वर थांबली. दरम्यान स्टेशनवर मुंबई वरून येणारी इंद्रायणी एक्सप्रेस पुणे स्टेशनवर फलाट नंबर ४ वर आली होती. तिला निघण्यास काही मिनिटांचाच अवधी होता म्हणून पुन्हा कुलीची वाट न पाहता मी पुन्हा सुटकेस घेऊन दादरा चढून पुन्हा फलाट नंबर ४ वर आलो. गडबडीत बोगीत चढलो, जीवात जीव आला. वेळेवर सोलापुरात पोहोचलो.


          काही काही चुकीच्या घटना अनवधानाने आपल्या आयुष्यात घडतात, ते हेतुपुरस्सर नसते, तर त्याला त्या त्या वेळची परिस्थिती कारणीभूत असते. कोणी काहीही समजो पण मी प्रामाणिक होतो, चेकर आला असता तर मी तिकीट फरकाची रक्कम त्यास देऊ केली असती पण तसे घडले नाही. चेकरला मी हुडकत हिंडणे अपेक्षित नव्हते, कदाचित माझी ट्रेनही सुटली असती. आयुष्यात ट्रेन संबंधीचा हा एक वेगळा स्वानुभव मी शेअर करतो. 



सुधीर ना.इनामदार.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू