पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी वसुंधरा बोलतेय


     मी वसुंधरा बोलतेय 


‘स्स्...हाय...नका रे अशी चाळण करू माझ्या अंगाची...किती शोषण करणार आहात तुम्ही माझं...खोल...आणखी खोल...कितीही खोदलं तरी पाणी नाहीच लागत ना...अरे...माझ्या जवळच नाही तर तुमच्या आडात तरी कोठुन येणार...नुसतं पाण्यासाठीच नाही तर मोठ्या मोठ्या उंच इमारतींसाठी सुद्धा…किती छिद्र पाडताहात...आई गं...


शिवाय माझ्या अंगावरच्या डोंगरांचे तोडलेले लचके...भुईसपाट केलेल्या टेकड्या...दुष्टपणाने तोडुन टाकलेली मोठमोठी झाडं...रसायनमिश्रित पाणी, घरातला कचरा, निर्माल्य आणि घाण टाकुन प्रदूषित केलेल्या नद्या, समुद्र... विषारी वायुंच्या धुरामुळे काळवंडलेले आकाश…अरे! माझे अलंकार आहेत ते...


अरे! तुमच्या या प्रदूषणामुळे नष्ट होण्याच्या मार्गाला लागलेल्या पशुपक्ष्यांच्या एकेक प्रजाती...नाही का दिसत तुला…? निसर्ग साखळीत एका छोट्याशा किटकाला सुद्धा खूप महत्त्व असतं बरं... तुझ्या बुद्धीच्या जोरावर नको होऊस असा उन्मत्त...एवढीशी मुंगी महाकाय हत्तीला सुद्धा जेरीस आणते...माहीत असेलच तुला…


अरे! हे पशु, पक्षी, फुलं, पानं...लेकरंच आहेत बरं माझी...अगदी तुझ्यासारखीच...पण त्यांनी आपली मर्यादा नाही सोडली...निसर्गाचे नियम नाही बसवलेत धाब्यावर...पण तू...तुला जरा कुशाग्र बुद्धीचं देणं काय मिळालं...तिचा सदुपयोग करायचं सोडुन...हं... विनाशकाले विपरीत बुद्धी...दुसरं काय...पण यामुळे जे प्रामाणिक प्रयत्न करताहेत...खऱ्या विकासासाठी...दीन-दुबळ्यांच्या उद्धारासाठी...माझ्या रक्षणासाठी...त्याला खीळ बसते रे...


अरे! किती किती म्हणून पाढे वाचावे तुझ्या गुन्ह्यांचे...अधुनमधुन मी प्रयत्न करते तुला सावध करण्याचा...पण तुला कळत कसं नाही माझ्या मनातलं...की डोळे असुन आंधळा आणि कान असुन बहिरा झालायस…


मला भूमाता म्हणता आणि माझी अशी दूर्दशा करता? शोभतं का रे हे तुम्हाला? 

असे जागतिक दिन साजरे करायचे आणि अवस्था मात्र दीनाहुन दीन करायची, एक दिवस उदोउदो करायचा आणि…


मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सावध करतेय…माझ्याही सहनशक्तीला काही मर्यादा आहेत, माझ्या शक्तीची झलक तुम्हाला अधून मधून पाहायला मिळतेच आहे, पण यापेक्षाही विनाशकारी झलक तुमच्या मुलाबाळांना पाहायला मिळेल.

त्यांच्यासाठी घरदार, पैसा-अडका कमावून ठेवाल, ते स्वतःही कमावतील, पण शुद्ध हवा, स्वच्छ पाणी हे पैसे देऊनही जेव्हा मिळणार नाही तेव्हा काय करणार! त्या पैशांनी ना तुम्हाला श्वास घेता येणार, ना तुमची तहान भागणार. मिडास राजाची गोष्ट आठवुन पहा जरा…


बस्… आज एवढेच पुरे…पुढच्या जागतिक वसुंधरा दिवसापर्यंत माझ्या परिस्थितीत काही सुधारणा झाली तर ठीक, नाहीतर…


@©®भारती महाजन-रायबागकर 

चेन्नई 

२२-४-२४

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू