पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माकड गेले शाळेत

माकड गेले शाळेत 


टीना , मोना आणि सोना शाळेत जायला निघालेल्या असताना त्यांना एक माकड भेटते. माकडही शाळेत येण्याचा हट्ट करते. पुढे काय गंमत घडली ते वाचा खालील कवितेतून. 


टीना ,मोना व सोना, निघाल्या होत्या शाळेत 

एक खट्याळ माकड, भेटले त्यांना वाटेत 

मलाही यायचेय शाळेत, माकड म्हणाले तिघींना

टीचर ओरडतील आम्हाला, तिघी म्हणाल्या माकडाला 


पाहून माकडाचा, वेडा हट्ट 

म्हणाल्या तिघी,थांब पाच मिनिटं 

मोनाने दिला माकडाला, शाळेचा गणवेश 

म्हणाली, हा घातल्यावरच, मिळेल तुला प्रवेश 


गणवेश घालून तयार झाली, माकडाची स्वारी

दप्तर घेऊन शाळेत जायला, वाटत होते भारी

तिघींसोबत माकडाने, प्रवेश केला शाळेत

जमली त्याची गट्टी, बालदोस्तांसमवेत


अंगावर गणवेश, पायात मोजे व बूट 

माकड दिसत होते, खूपच क्यूट 

माकडाने करताच, हूप हूप हूप 

हसू लागले सर्व,  खूप खूप खूप 


शाळा भरल्याची घंटा, वाजू लागली जोरात 

माकडाने प्रवेश केला, तिघींसोबत वर्गात 

प्रार्थना संपताच, क्लासटीचर, घेऊ लागल्या हजेरी

विचारू लागल्या, कोण बसलंय, मोनाच्या शेजारी


माकड म्हणाले, मिंटू माकडतोंडे, आहे माझे नाव 

आनंदवन आहे, माझे राहण्याचे गाव

लिहून घ्यावे, नाव माझे, हजेरीपटावरती

आजच झालो, आहे मी, या शाळेत भरती


हजेरी झाल्यावर, क्लासटीचर, शिकवू लागल्या कविता

झोपून गेले माकड, कविता ऐकता ऐकता

माकडाला आवडला नाही, शाळेतील अभ्यास 

आवडला त्याला फक्त, खेळाचा तास


एका दिवसातच माकड, कंटाळले शाळेला

लागले शाळा सुटायची, वाट बघायला

शेवटी एकदाची, शाळा सुटली

माकडाने शाळेतून, धूम ठोकली


पळाले माकड, आनंदवनातल्या घरी

कविता वाचून, आली ना मजा भारी?


ऋजुता देशमुख



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू