पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रतीक्षा मांडवीची: प्रतिभा लेखिकेची

प्रतीक्षा… कसा आहे नं हा शब्द! हा शब्द वाचूनच मन हळहळते, हृदयाची कालवाकालव होते, मन बेचैन होते! 
प्रतीक्षा म्हणजे एकाअर्थी परीक्षाच! परीक्षा संयमाची, प्रेमाची, कर्तव्याची, दृढनिश्चयाची आणि मनाची!

राम म्हणजे आपण सर्वांचेच आराध्य!
खरंतर रामायणातील कुठल्याही पात्राबद्दल वाचले की मन कसे शांत होते… या कलियुगात जिथे भाऊ भावाचा वैरी झाला आहे, तिथे रामायण वाचून एक आध्यात्मिक, मानसिक शांतता मिळते. चित्त स्थिर होते.
रामायणातील प्रत्येक पात्र कर्तृत्वाचा कळसच! 
रामायण म्हणजेच संयम, प्रेम, जिव्हाळा, कर्तव्य पूर्ती, भाव भावनांचा उद्वेग! रामायणात प्रत्येकाने आपल्याला नाते जपणं शिकवलं आहे. एकमेकांच्या भावना समजून, खडतर परिस्थितीत एकमेकांना आधार देणे शिकवले आहे!

हिंदीत, मराठीत व इंग्रजीत अनेको कविंनी, साहित्यिकांनी रामायणाच्या वेगवेगळ्या पात्रांबद्दल लिहिले आहे. राम, लक्ष्मण, हनुमान, सीता, उर्मिला, कैकयी, मंथरा…बरेच वाचन झाले आहे, प्रत्येकाची मनस्थिती वेगळी, प्रत्येकाची कर्तव्ये वेगळी…आणि सर्वांकडूनच बरेच काही शिकण्यासारखे, अंगिकार करण्यासारखे…
पण ‘मांडवी’ हिच्या बद्दल अजून तरी कुठेही वाचण्यात आले नव्हते!

ज्येष्ठ कवयित्री सुषमा ठाकूर यांनी जेव्हा सांगितले की त्या मांडवी वर खंडकाव्य लिहित आहे तेव्हा मला खरोखरच आश्चर्य झाले की आपण जे नाव फक्त ऐकून आहोत, त्यावर कुणी एक लेख नव्हे, काव्य नव्हे तर अख्खं खंडकाव्य लिहित आहे! किती सखोल अभ्यास केला असेल आणि कसा? कारण या पात्राबद्दल मी तरी कुठेही वाचले नाही! मनात एक कुतुहल निर्माण झाले की काय असेल मांडवीची कथा.. किंवा व्यथा?
असो, विचार केला पुस्तक प्रकाशित झाले की आपण नक्कीच वाचायचे. 
पण दुसरी आनंद मिश्रित आश्चर्यकारक गोष्ट अशी झाली की सुषमा ताईने चक्क शॉपिजन कडूनच पुस्तक प्रकाशित करण्यासाठी विचारले! मराठी विभाग प्रमुख शॉपिजन या नात्याने माझ्या साठी ही फारच आनंदाची गोष्ट होती!
पण मनात एक दडपण देखील होते, की आपल्या एवढ्या जवळच्या व्यक्तीचे पुस्तक आहे, सर्व नीट होईल नं, वेळेत होईल नं, त्यांना आवडेल की नाही… वगैरे वगैरे. पण पुस्तक अगदी वेळेत पूर्ण झाले, सुषमा ताईला आवडले आणि माझे ‘विभाग प्रमुख’ हे कर्तव्य पार पडले. 

मग माझ्यातल्या वाचक जागा झाला. 
पुस्तक हातात येताक्षणी विचार केला की पुस्तक जरी लहान असेल तरी हे पुस्तक घाईघाईने वाचून काढायचे नाही. निवांत हळुवार वाचायचे. कारण मांडवीच्या मनातील भावना, सुषमा ताईच्या शब्दांतून माझ्या मनापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि खरोखरच त्या पोहोचल्या! 

पुस्तकाची सुरुवात झाली आहे ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सप्रे यांच्या या आशयघन शब्दांनी, 
“स्त्रीला जगत जननी आदिशक्ती वगैरे म्हटले जाते. एवढे असूनही तिचे प्रारब्ध मात्र पुरुषांशी बांधलेले असते. त्याचे कारण मला वाटते निसर्गतः निखळ प्रेम करण्याचा व सर्वस्व समर्पण करण्याचा तिचा स्वभाव.”

मनोगतात सुषमा ठाकूर यांनी खंड काव्य या काव्य प्रकाराची एक सुंदर ओळख करून दिली आहे. शिवाय 
कोणाचेच प्रेम अथवा कोणाकडूनही फारसे महत्त्व न मिळालेल्या व्यक्तिरेखांमधील एक ठळक व्यक्तिरेखा मांडवीची आहे, असे त्यांना जाणवले व तिच्यावर, किंवा तिच्या दुःखावर, भावनांवर हे खांडकाव्य लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी केला व यात त्या यशस्वीही झाल्या.

नंतर सुषमाजींनी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे व या पुस्तकाच्या प्रकाशनात त्यांचे सहाय्य करणारे अनेक लोकांचे अगदी मनापासून आभार मानले आहे, ही त्यांच्या विनम्र स्वभावाची पावती आहे.
यात माझा सुद्धा उल्लेख केला आहे, एक गोड मैत्रिण म्हणून मला संबोधले आहे. संबंधातील हा गोडवा असाच कायम राहू दे! 

रामाच्या राज्याभिषेकाची तयारी यापासून खंड काव्याची सुरुवात झाली त्यानंतर मंथरेने कैकयीचे कान भरले आणि रामाचे, सीता व लक्ष्मणासह वनगमन झाले.

मागे राहिले अश्रु गाळत बसलेले अयोध्यावासी आणि अयोध्येच्या दोन राजस्नुषा ज्यांचे अश्रु सुद्धा सुकून गेले होते…एक उर्मिला आणि दुसरी मांडवी!

आणि मग सुरू झाली ‘प्रतीक्षा मांडवीची’ ! किती कठिण तप होते‌ हे! उर्मिलेचा लक्ष्मण तिच्या नजरेआड होता, खूप खूप लांब होता, म्हणून तिला तर प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता पण मांडवीचा भरत तर तिच्या नजरे समोर होता, सतत १४ वर्ष! पण तरी तिच्या नशिबी फक्त प्रतीक्षा होती! आपल्या हक्काचा माणूस आपल्या जवळ असूनही जवळ नसणे याहून मोठे काही दु:ख असूच शकत नाही! 

राग-अनुराग, प्रेम- प्रीती भरत -मांडवीची प्रणय नीती निकट राहुनी बिकट अंतर, क्षण मग रुक्ष होती किती ।।

म्लान झाले वदन देखणे, नसून काही दोष जिचा 
तिला आठवे गतजीवन अन प्रारब्धाचा भोग तिचा ।।

असूनी नाथ मी अनाथ, का दैवा ऐसी बिकट स्थिती राहुनीही हा दुरावा, अशी कशी ही जीवन रीती ।।

पती असूनीही जवळी माझ्या, झाले मी योगिनी अशी एक तपाची ही कहाणी, सुफळ संपूर्ण करू कशी !!


एकामागे एक ऋतू पालटत होते…त्या एकेका ऋतुचे वर्णन आणि मांडवीच्या मनाची तगमग सुषमा ताईने अचूक शब्दांत मांडली आहे! 

जरी बरसेल घननीळा, नसेल जवळ माझा सावळा विहंगम त्या शृंगार धारा, अंतरी देतील असह्य कळा ।

सुंदर संध्याकाळी, आषाढाच्या प्रथम दिवशी, कोजागिरीचा चंद्र पाहतांना, हिवाळ्याचा गारवा अनुभवतांना भरत आणि मांडवीच्या मनाची चलबिचल, त्यांचा मनावरचा संयम, एकमेकांवरचे प्रेम, आदर आणि विश्वास अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त केला आहे…

आषाढस्य प्रथम दिवसे यात कवयित्री म्हणते,

आणि अचानक कसे कळेना, नभी आषाढ ढग जमले सोसाट्याच्या वाऱ्यासंगे, वेगाने ते बरसू लागले ।।

मनात भरताच्याही तेव्हा निराशेचा एक ढग आला काळोखाची जाणीव होऊन चेहरा त्याचा काळवंडला ।।

कोजागिरीचा चंद्र पाहून उर्मिला, मांडवीस म्हणते,

जरी दूर असू आम्ही दोघे, हे अंतरच आम्हांस संयम देते असुनी जवळ तुम्ही मात्र, सावरणे मना किती कठीण जाते ।।

एक एक शब्द अगदी हृदयाच्या तळातून निघाला आहे, लेखिकेने मांडवीच्या मनातील भावना स्वतः अनुभवल्या आहेत. असे लेखन एक अतिशय भावनिक व हळवे मन असलेली आणि निसर्गावर भरभरून प्रेम करणारी व्यक्तीच करू शकते. सुषमा ताई अशीच आहे यात तिळमात्र शंका नाही. 

खंडकाव्याचा शेवट पण आनंददायक आहे. डोळ्यांच्या कडा पाणावल्या जातात. शेवटी मांडवीची प्रतीक्षा संपली आहे, ते वर्णन करताना कवयित्रीचे शब्द बघा,

शुभ शकुनाचा हा मधुर स्वर, आता नक्कीच होणार मिलन,
मिठीत त्याच्या अति लज्जेने बावरे मांडवीचे तन ।।


पूर्ण झाले आज तप त्या निग्रही, निश्चयी तापसीचे शिवपार्वती आशिषाने खरे मिलन होणार भरत मांडवीचे।।

एखादी कृती तेव्हाच वाचकांच्या मनाला भिडते जेव्हा लिहिणारा आपले म‌न ओतून लिहितो. या खंडकव्यात सुषमा ताईने एका स्त्रीच्या संयमाचे, पतिव्रतेचे, कर्तव्याचे इतके सशक्त वर्णन केले आहे की स्तुती करतांना शब्द कमी पडतात.

पुस्तक वाचून एक सुंदर अनुभूती होते. आजच्या युगात निस्वार्थ प्रेम, कर्तृत्व, आणि संयम जेथे वेशीवर टांगले जाते आणि शारिरीक सुखच सर्वतोपरी मानले जाते तेथे हे खंडकाव्य वाळवंटात ‘ओएसिस’ सारखे भासते.

नक्की संग्रही ठेवा आणि जेव्हा कधी मन उद्विग्न वाटेल, वाचा, पुन्हा पुन्हा वाचा!

© ऋचा दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू