पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राज्ञी

*राज्ञी*


(स्वगत सीतेचं)


    प्रभू .... नाथ,...स्वामी...कसं हो हे असं झालं,..

माझंच चुकलंय,असं मला निश्चितच वाटतंय,लक्ष्मण भावोजींनी आखून दिलेली ,लक्ष्मणरेषा ,पार करून मी त्या अतिथीला भिक्षा दिली,पण मी तरी काय करू ना,तो त्या रेषेच्या आतून भिक्षा घ्यायला तयारच नव्हता.आणि दारी आलेला याचक,भिक्षा न घेता परत गेला तर,काहीतरी चुकचूकल्यासारखं वाटतं ना. पण तो हा मायावी राक्षस,रावण आहे,हे मला कसं कळलं नाही.पण कुणाच्या कपाळावर कुठे लिहीलं असतं का? तो फसवा बदमाश आहे,म्हणून,असं असतं ना तर, ह्या समाजात अशा बदमाशांना,पळता भुई थोडी झाली असती.कधी कधी असंही वाटतं,अशा बदमाशांच्या कपाळावर बदमाश असं गोंदवणं एवढीच शिक्षा त्याला करावी.कारण माणूस आर्थिक,सामाजिक ,शक्ती,सामर्थ्ययुक्त झाला की त्याचा अहंकार वाढतो,आणि मग मी म्हणेन ती पुर्व दिशा,असल्या दर्पाने तो समाजात वावरू लागतो. माता अहल्यांना नाही का? प्रत्यक्ष  देवराज इंद्राने,गौतम ऋषिंचं मायावी रूप धारण करून,लुटलं होतं ,बिचा-या अहल्या मातेचा काय दोष होता.

      कशी ही दैवगती ना,आज मी ही इथे,कोसो योजनं दूर,आपणास मी कुठे आहे हे माहीतही नसावं,पण पण माझ्या हृदयात माझे राघव कायम असतात बरं का.... .नव्हेनव्हे मी मिटल्या नयनांनी जेव्हा जेव्हा ,आपला‌आठव करते,आपली ती प्रसन्न भावमुद्रा मला आश्वस्त करते. सीते, सीते ,हा आवाज,मम कानात घुटमळतो,नि एक गोड लहर शरीरात प्रवेशते,नि मन आपल्या त्या प्रसन्न ‌ पर्णकुटीत प्रवेशते.किती सुंदर तो मंदाकिनीचा खळाळणारा प्रवाह,त्या शीतल जलाचं स्नान,तो पर्णकुटीत प्रवेशणारा मंद मंद समीर,ते सुगंधित फुलांचे ताटवे, आल्हाददायक वातावरण,

ती कंदमुळे फळे,सगळं सगळं आठवतं,थोडी खुष होते,नी  चक्क हरवते हो.एवढ्यात ह्या राक्षशिणीचा घोगरा आवाज कानावर येतो नि पुनश्च जाणीव होते,आपण कुठेतरी राक्षसांच्या पहा-यात आहोत.त्यातल्या त्यात ती त्रिजटा राक्षशीण आहे ना ती जराशी,माणुसकीचं बोलते,एरवी सगळ्या मारण्या कापण्याचंच बोलत असतात.

    येथे पोहचल्यानंतर मी चार पाच दिवस कांहीच खाल्ल नव्हतं.सारखी माझे राम येईपर्यंत मी कांहीच खाणार नाही ,असं म्हणत होते.पण देवराज इंद्राने मला अशी दिव्य खीर खायला दिली की मी काहीही न खाता मला येथे राहता येईल.( वाल्मिकी रामायण नुसार). त्रिजटा ने मला समजावलं,की,राम येथून कोसो योजनं दूर आहेत,शिवाय वनवासी आहेत तेव्हा,अस्त्र शस्त्र आणि सेना, जमवून बलाढ्य रावणाशी युद्ध करून त्याला हरवे पर्यंत बराच वेळ लागेल.ती राक्षसी होती पण माझ्याबद्दल खूप सहानुभूती बाळगत होती.

   ‌‌    काल एक वानर,आपली मुद्रिका घेऊन आला होता.मी ओळखले बरं का त्या मुद्रिकेला आणि त्यालाही. हा आपलाच दुत असावा आणि ना आपल्या आठवणीने,पार खचून गेले ,वेड्यासारखी त्या मुद्रिकेशीच बोलू लागले.मुद्रिके राघवांच्या बोटांचा तो तुला झालेला स्पर्श अनुभव दे ना मला.

त्या मुद्रिकेला मी आपल्याच बोटात धारण केली.आणि क्षणभर का होईना, आपल्या स्पर्शाच्या अनुभुतीने सुखावले.एवढ्यातच मला दुताने आपल्यासाठी काहीतरी खूण म्हणून मागितले.माझे दागिने तर मी रस्त्यातच आपणाला मार्ग सापडावा म्हणून टाकले होते.अचानकच मला माझा  चुडामणी आठवला,आणि मग तो मी त्या आपल्या दुताला,हनुमंताला दिला.हनुमंताच्या शेपटीला चिंध्या गुंडाळून त्यास अग्नी लावल्याचं मला त्रिजटा ने सांगितलं,खूप वाईट वाटलं.हनुमंताला अग्नीपासून अपाय होऊ नये म्हणून म्हणून मी अग्निदेवांचा धावा केला.पण पहाते तो काय,हनुमंताने पेटलेल्या शेपटीने सगळी लंका पेटवून दिली होती.

  ‌‌‌‌        तो दुष्ट रावण रोज एकवेळा येतो,...आपल्याबद्दल नको नको ते बोलतो....आणि मी त्याला स्विकारावं,म्हणून पुढे सरसावतो,पण माझ्यात सुद्धा इतकी शक्ती कुठून येते कळत नाही.अहो मी साधं गवताचं पातं त्याच्या विरोधात उगारलं तरीही ते अग्निसारखी ज्वाला धारण करतं.आणि तो दुष्ट रावण निघून जातो.म्हणतात ना निश्चयाचं बळ कुठेतरी असतंच .

       आज तर माझ्यापुढे चक्क रामाचं धडावेगळं शिर आणि धनुष्य ठेवलं होतं. माझ्यातली मी पार कोसळले.हे काय बघतेय मी माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना.डोळे मिटून आपला आठव केला.अंतरंगात ही माझे रघुनाथ मला दिसेचना.हे काय झाले राघवा,अहो 

एकांतात घेतलेली शपथ विसरलात का?

मला माझा प्राण कंठातून निघून जातोय की काय असे झाले.इतक्यात तो दुष्ट रावण आला,म्हणाला,बघ तुझा  प्रिय राम तुला सोडवायला येईल असे वाटले होते ना,माझ्या वीर सैनिकांनी त्याला मारलंय, हे  बघ तुझ्या रामाचं शिर आणि हेच त्याचे धनुष्य. आता तू माझा स्विकार कर,विश्वातली सारी सुखं तुझ्या पायाशी आणून ठेवतो.मी तरीही ठामपणे नकार दिला.तो निघून गेल्यावर,हे शिर रावणाची मायावी शक्ती असल्याचं,आणि आपण वानरसेनेसह सागर ओलांडून आल्याचं, जेव्हा त्रिजटा ने सांगितलं,तेव्हा कुठे

 माझ्या जीवात जीव आला.

     युद्ध सूरू  झाल्यावर , लक्ष्मणाला शक्ती लागली,तर हनुमंताने संजीवनी बुटीसाठी,संपूर्ण पहाडच उचलून आणला, आपल्यावर इंद्रजीताने नागपाश अस्त्र टाकलं ,आणि गरूडाने आपली त्यातून सुटका केली ,याची इंत्यंभूत माहीती ,मला त्रिजटा देत असे.आपली विजयपथावरील चाल ऐकून मी मनोमन सुखावत असे,पण तसं दाखवताही येत नव्हतं कारण त्रिजटा सोडून इतर सगळ्या राक्षशीणी,माझ्या विरोधकच होत्या.एक दिवस तो कपटी लंकाधिपती,आपल्या रामबाणाने रथावरून कोसळल्याचं ऐकलं,नि मला हायसं वाटलं.

        चला आज तो दिवस उजाडला,आज मला माझे राम राघव,ज्यांची मी तनमनाने वाट बघतेय ते सुखद दर्शन ह्या नेत्रांना लाभणार,  लक्ष्मण भावोजी,हनुमंत  सगळे सगळे दिसणार,खूप आनंद झाला होता.बिभीषणाने त्रिजटाला मला घेऊन येण्यास सांगितले,नि काय सांगू,रस्ता चालणं ही नकोसं झालं होतं.वाटत होतं,मला पंख असते तर केव्हाच उडून ,आपणासमोर उभे ठाकले असते.पण विचारातच रस्त्याची लांबी उमगलीच नाही,नि पोहोचले.आणि आपलं ते मनात साठवलेलं प्रत्यक्ष रूप समोर पाहून,नेत्राने केव्हाच जवळ पोहोचले होते, मन म्हणत होतं देवाब्राम्हणासाक्षात लग्न झालंय,पतीची भेट जाऊ दे पण,बोलायला तर हरकत नसावी ना. पण लोकपाल ,अयोध्यापती, राजे श्रीराम,कुठल्याश्या विचारात मग्न होते.

  आणि आपण आज्ञा केलीत,चिता पेटवण्याची,माझ्या अग्निपरीक्षेची,उपस्थित सर्वजणांच्या मुखातून हाय हाय निघालं. जरासा विचार केल्यावर एकांतातलं बोलणं आठवलं,आपण मला अग्निदेवांच्या‌ स्वाधीन केलं होतं ना.मी निर्भयपणे चितेत शिरले.मला अग्निदेवांचंच तर रक्षण होतं ना,आणि अग्निदेवांनी माझ्या निष्कलंकतेची ग्वाही दिली.उपस्थित असलेल्या सर्वांना आनंद झाला.आपला नि माझा जयजयकार झाला.

      बिभीषणाला राज्याभिषेक झाल्यानंतर पुष्पक विमानातून,आपण

अयोध्येकडे निघालो.अयोध्यावासीयांचे  प्रफुल्लीत चेहरे बघून मन सुखावलं बरं,आपण वनवासाला निघालो होतो तेव्हा ,कित्ती रडवेले,उदास होते ना ते.कित्ती आनंदाने स्वागत झाले ना ,आपले अयोध्येत.कौसल्यामाता,कैकयीमाता, सुमित्रामाता यांना भेटल्यावर तर आनंदाने अगदी उर भरून आला.आज आपली पट्टराणी सम्राज्ञी म्हणून , आपणासवे राजगादीवर बसताना,आनंदसंमिश्रीत भावना होती, आयुष्यातली अनेक स्थित्यंतर मनपटलावर साकारली.खरंच एक क्षण जाणवलं,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,दोष ना कुणाचा.अलिकडेच ना मला छानपैकी वनविहार करावा, खळखळ वाहणा-या पाण्यात,डुंबून बसावं असली काहीतरीच इच्छा होतेय.मी कौसल्यामाताना‌ तसं सांगितलं,आणि त्या इतक्या आनंदित झाल्या,की त्याचं वर्णन शब्दात करता येतच नाही.आपण मात्र खूप नाराज अस्वस्थ दिसत होतात.मी कारण विचारले तर काही बोलला नाहीत.मी दासीकडून कारण जाणून घेतले.खूप वाईट वाटले. आपल्या कुलातील सर्व पुर्वजाना स्मरून,मी एक शपथ घेतली की ,माझ्यामुळे जर या कुलास नीचत्तम ठरवले जात असेल तर ,मी या कुलापासून दूर दूर निघून जाईन.

     दुसरे दिवशी पहाटेच,लक्ष्मण भावोजी मला रथामधे बसवून ,वनविहारासाठी घेऊन निघाले.प्रथमत: वनविहारासाठी जात असल्याच्या भासात मी आनंदी होते.पण रथ जसजसा आणिक पुढे जाऊ लागला आणि लक्ष्मण भावोजींच्या नेत्रात तरळलेलं पाणी बघितलं, तशी हा आनंदाचा क्षण नसून,कांहीतरी विपरीत घडतंय ,याची कल्पना आली.रथ जेव्हा वाल्मिक ऋषिंच्या आश्रमापाशी थांबला,तेव्हा सगळ्याच विचाराचे स्पष्ट आकलन झाले.गुरूदेव वाल्मिकींनी माझं मनापासून स्वागत केलं.त्याच्या शांत धीरगंभीर आवाजाने आत प्रवेशताना जरा बरं वाटलं.त्यांनी येथील मुलींना माझ्याकडे लक्ष देण्यास सांगितले.आत आलेय खरे पण फक्त शरीराने मी इथे असते पण मन सतत अयोध्येत पोहोचलेले.राघवा सतत आपला आठव मज सतावतो.आपला वियोग सहन करणं खूप कठीण जातंय.दोन तीन दिवस झाले मी सतत पडून असते,नि डोळ्यातून आसवं गळत असतात.एकवेळा गुरुदेवांनी हे पाहीलं नि म्हणाले,बेटा राघवांना विसरणं कठीण आहे,पण अशक्य नाही.आश्रमातल्या मुलींमधे मिळून मिसळून रहा,हळूहळू विसरायला होईल.

      राघवा आज खूप आनंद होतोय, गुरूदेव आणि गौतमी माता, यांच्या, आधाराने,मी आपल्या दोन पुत्रांना जन्म दिलाय.वाटतं उल्हासाने, आनंदाने ही वार्ता आपणापर्यंत पोहचवावी,पण गुरूदेव म्हणाले योग्य वेळ आल्यावर सांगू.बाळांच भाग्य इतकं चांगलं की,ती जन्मली त्याच दिवशी, शत्रुघ्न भावोजी कुठलातरी पत्ता काढत आश्रमात पोहोचले.आज आश्रमात नविन दोन बालकं जन्मल्याचे गुरूदेवांनी सांगितले,आणि बालकांना बघून शत्रुघ्न भावोजींनी आपल्या गळ्यातले हार बाळांच्या गळ्यात घातले.त्यांना हे आपलेच पुतणे असल्याचं माहीतही नव्हतं.अगदी अचानकपणे आपल्या कुळातुनही,बालकांचे स्वागत झालेले पाहून मन नकळतच आनंदले.बाळांची नावं लव आणि कुश असे गुरूदेवांनी ठेवले.

   ‌‌‌‌    आता लवकूश  मोठे झालेत. गुरूदेव त्यांना चहू वेदांचे शिक्षण देताहेत.

गोड आहेत माझी बाळं अन् हुशारपण.त्याच्यासाठी गायीच दुध काढणं,पहाटेच उठून दळण दळणं,स्वयंपाक करणं यातच माझा दिवस निघून जातो. एकवेळा माझ्याबरोबर वाळली लाकडं जमा करायला  रानात जात असताना, गुरूदेवांनी सांगितलेली राजा रामाची कथा,लव कुश  सांगत होते.राजा राम किती मोठे आहेत,पराक्रमी आहेत ते सांगत होते.आणि माझा आनंदाने उर भरून वाहात होता.पण मुलांना कुठे‌ माहीताय की हे राजा रामच त्यांचे पिता आहेत.

        एके दिवशी बघते तर काय,मुलांनी आश्रमाबाहेर अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवुन ठेवला,आणि हनुमानाला पण बंधक बनवुन ठेवलं.कुणालाही जुमानेना,मग आपण आलात,नि मग गुरूदेवाच्या मध्यस्थीने अनर्थ टळला.मुले हल्ली गुरूदेवांनी शिकविलेले रामायण गायला अयोध्येत जातात कळलं.काल जेव्हा ह्या मुलांची माता कोण? म्हणुन मला अयोध्येच्या राजसभेत बोलाविल्याचं कळलं.खुप वाईट वाटलं,स्त्री असल्याचं एवढं मोठं दु:ख आज मला जास्त जाणवलं.राघवा आपण तर सर्वज्ञ आहात  ना!तरी सुद्धा ह्या मुलांची माता कोण हे आपण एक प्रजाधिपती म्हणून विचारता आहात ना.

राघवा आपल्या शुद्ध चारित्र्याच्या नारी जातीने किती परीक्षा द्यायच्या,आणि तीने एकटीने कसं सिद्ध करायचं,की ही मुले तुमचीच आहेत म्हणून.आता मात्र मला जगण्याचाच कंटाळा आलाय.

.     *देवी भगवती मला तुझ्यात सामावुन घे*

      कडकडाट होऊन जमीन दुभंगली आणि सीता देवी भगवतीसह निघून गेली.राघवास अनावर शोक झाला.

        राघवा ,आजही कलीयुगात, स्त्रीयेला ,तिच्या चारित्र्याच्या नावाखाली

प्रगतीपासून वंचित ठेवलं जातंय.शिक्षणापासून वंचित ठेवलं जातंय,खोट्याच बदनामीखाली छळलं जातंय.पुरूषांना नकार दिलेला‌ आवडत नाही म्हणून कधी खरा तर कधी खोटा बलात्कार नावाचं अस्त्र‌ वापरून तिचं,मानसीकरित्या हनन केलं जातंय, जगणं नाकारलं जातंय, प्रभू..दिल्लीतील निर्भया,अमरावती वर्धा चंद्रपूर ही अलीकडचीच उदाहरणं,... राघवा.... बघताना अनंत वेदना होत आहेत राघवा,आतातरी ह्या कलीयुगात हा अनर्थ टाळण्यासाठी, रामा प्रत्येक स्त्री ला स्वयं शक्ती द्या.

  

  

©स्वाती संजय देशपांडे. नागपूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू