पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आमची #पुष्पा आजी

ही कथा खरंच घडली आहे हा.. फेकत नाहीये मी..

 

माझी आजी, म्हणजे आईच्या आईची गोष्ट आहे..

पूर्वीच्या काळी म्हणजे आजीच्या लहानपणाच्या काळी साधारण न्हाण आलं की मुलीला शिकवायची नाही ही पद्धत अगदीच सर्रास होती.... शहरात कदाचित वेगळं असू शकेल, पण पार खेडेगावात तर “जिथे तिथे मुलींना आगाऊपणाने वचावचा बोलणं शिकवणारा पुढारलेपणा” पार गावाच्या वेशीबाहेरच ठेवला जायचा, मुलगी म्हणजे परक्या घरच धन,  त्यात माझ्या आजीच्या माहेरी चार मुलं, समवयस्क दोन मुली, आणि एक धाकटी मुलगी, म्हणजे तीन तीन परक्या घरच्यांच्या ठेवी होत्या घरी..

 

माझ्या आजीला ना शिकायची प्रचंड म्हणजे प्रचंड आवड होती, पण तो काळ इंग्रजांच्या वेळेचा होता, त्यामुळे परकर पोलका सोडायची वेळ आली, की पोरींनी गपचूप घराच्या कोनाड्यात बसून राहायच, अशीच पद्धत होती.. तिच्या माहेरचे पुरुष पुढारलेल्या विचारांचे होते त्यामुळे किमान अक्षर ओळख तर घरातल्या सगळ्याच बायकांना होती..  तरी तेव्हा माझी आजी तिच्या चौथीपर्यंत शिकलेली होती.. त्यात तिचे बाबा, ‘सरकारात’ नोकरी करत होते, आजीचे बाबा मामलेदार होते, त्यामुळे त्यांची अनेक ठिकाणी बदली होत असे.. सहाजिकच त्यामुळे कुठचीही एक शाळा नव्हती.. कधी रत्नागिरी, कधी राजापूर, कधी अथणी, तर कधी अजून कुठे.. तिच्या बाबांची बदली कधी कोकणात व्हायची, तरी कधी देशावर.... थोडक्यात काय तर इतके सगळे प्रॉब्लेम्स येऊन सुद्धा माझी आजी त्या काळी तिच्या चौथीपर्यंत शिकलेली होती.. घरी बसल्यावर घरकाम, शिवणकाम, बागकाम, सगळ्यांत मुख्य म्हणजे सुग्रास जेवण बनवायला शिकलंच पाहिजे हा दंडक होता....

 

कालांतराने आजीला सोळाव लागलं आणि तीच माझ्या आजोबांशी लग्न झालं.... आजी चौथी शिकलेली तर आजोबा तेव्हाचे इंटर पास..  (म्हणजे आत्ताचे बारावी पास..).. त्यात लग्नं व्हायच्या आधी अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य कोकणात गेलेलं असणारी  माझी आजी, लग्नानंतर एकदम बॉम्बेत आली.... सासरी एकत्र कुटुंब, सासू सासरे, तीन नणंदा, दोन दीर, एक जाऊ, आणि नवरा.. इतकस लहानस कुटुंब होत.. अर्थात पुढे शिक्षणाचा विचार म्हणजे प्रचंड पाप..

 

गावात बालपण घालवलेली १६ वर्षांची मुलगी, अचानक मोठ्या शहरात आल्यावर सहाजिकच बावरून गेली.. तस तर आजही कितीही सुशिक्षित अनुभवी मुलगी असली तरी सासरी गेल्यावर बावरतेच म्हणा.... त्यामुळे तब्बल ७५-८० वर्षांपूर्वीची परिस्थिती भीषणच असणार..

 

एकच होत, आजीला वाचता येत असल्याने, दुपारची जेवणावळ झाल्यावर आजी मिळेल तो मराठी कागद शेवटच्या शब्दापर्यंत वाचत असे..

(होय, पूर्वी जेवणावळच असायची आमच्या घरी.. किती तरी माणसं असायची जेवायला, जेवण करायला महाराज असायचा, सतराशे साठ पदार्थ, तिखट गोड आंबट तुरट, अगदी षड्रसपूर्ण जेवण बनायचं घरी.. त्याशिवाय घरच्या सुनांच्या हातून बनलेले विशेष पदार्थ रोज हवेच असायचे.. कधी वडे, कधी अनेक प्रकारची भजी, चक्का बांधून बनवलेलं केशर मिश्रित श्रीखंड, केसरी जिलेब्या, अनेक प्रकारच्या खिरी (बोटव्याची, शेवयांची, गव्हल्यांची), वेगवेगळे लाडू (रवा, बेसन, घरी केलेले मोतीचूर, बुंदीचे लाडू), पुरणाचे नानाविध प्रकार.. हे सगळे प्रकार रोज बनवले जायचे, ते ही मोठ्या प्रमाणावर लागायचे..) 

 

नणंदांची लग्न, त्यांचे संसार, धाकट्या दीराच शिक्षण, सोबतच मोठ्या जावेला गेलेले दिवस, जावेची काळजी, नवऱ्याच्या अनेक इच्छा, घरातल्या लहानसहान गोष्टी बघणे, शिवाय सगळ्या स्वयंपाकघराचा भार एकटीच्या खांद्यावर आनंदाने पेलणारी माझी आजी होती....  

 

लग्न झाल्यावर सहाजिक स्वत:चा संसार आला, मुलं बाळं आलीच, दिवस गेल्यापासून बाळं जन्माला घालण्याचा काळ किती विलक्षण असतो ते प्रत्येक आईला माहिती असतच... आजीला एकूण सहा मुलं झाली, आणि प्रत्येक मुलाच्या वेळेला आजी नवनवीन पुस्तकं वाचत बसायची..... चौथी पास असणारी माझी आजी, कधी तेव्हाच्या दहावीची मराठी भाषेतली पुस्तकं वाचू लागली ते कुणालाच समजलं नाही..

 

माझी आई धरून एकूण सहा भावंडं आजीच्याच आधाराने मोठी होऊ लागली.. एकत्र कुटुंब असल्यामुळे थोरल्या दीरांची मुलं आजीच्याच सोबत असायची.... चौथी पास असणाऱ्या माझ्या आजीने एकूण १३ मुलं वाढवली आहेत, मोठ्या दीराची सहा मूलं, स्वत:ची सहा मुलं आणि एक धाकटा दीर.. एकूण १३.. त्यांच्या आनंदात ती आनंदी झाली, दु:खात दु:खी झाली, समोर आलेली परिस्थिती उत्तम रित्या सावरून घेत तिचं आयुष्य पुढे पुढे सरकत होत..

 

माझी आई, तीन मावश्या, दोन मामा ह्या सगळ्यांचा अभ्यास घेताना आजीची ओळख हिंदी भाषेसोबत झाली.. आत्ताच्या मुलांना बहुतेक पहिलीपासून हिंदी भाषा शिकवतात, (नक्की लक्षात नाहीये माझ्या), मी शिकत होते तेव्हा आम्हाला सातवी नंतर हिंदी किंवा संस्कृत भाषा निवडायचा ऑप्शन मिळाला होता.... बहुतेक तसंच आई आणि तिची बाकीची पाचही भावंड शिकत असताना त्यांच्या सातवी किंवा आठवी नंतर हिंदी भाषा शिकवली गेली असावी त्यांच्या शाळेत..

 

आजीच्या सगळ्या मुलांसाठी हिंदी भाषा नवीन होती, जशी त्या सगळ्यांना नवीन होती, तशीच ती हिंदी भाषा आजीलाही नवीनच  होती.. माझ्या आजीने त्या काळात ह्या अडचणीवरही कुणाचीही मदत न घेता तिचा तिचा रस्ता शोधून काढला, आणि तिने तिच्या सर्व मुलांना त्यांना समजेल इतके हिंदी शिकवले.. आजीची सगळी सहा मुलं अत्यंत उत्तम मार्क मिळवत शिकत होती, आणि त्याला नक्कीच माझ्या आजीनी घरातली सगळी काम सांभाळत, प्रत्येकाला न थकता केलेली मदत अत्यंत महत्वाची आहे.. आजीची सगळीच मुलं पदवीधर आहेत, माझ्या एका मावशीने तर संस्कृत भाषेत पदवी घेतलेली आहे.... माझी आई जेव्हा जेव्हा ही आठवण सांगायची ना आम्हा मुलांना, तेव्हा आम्हाला आमच्या आजीचा प्रचंड अभिमान वाटायचा..

 

आजीची मुलं शिकत असताना आजीने त्यांची हिंदीची पुस्तकं वाचत तिची स्वत:ची हिंदी भाषेची अक्षर ओळख बऱ्यापैकी वाढवली होता.... तिची मुलं मोठी झाली, आणि कालांतराने तिच्या सहाही मुलांची लग्न झाली.. आता आजी सासू झाली होती, तिला अत्यंत उच्चशिक्षित जावई मिळाले होते.. आणि तितक्यात छान शिकलेल्या सुना मिळाल्या होता.... माझ्या दोन्ही मामीना ही  आजीच खूप कौतुक आहे..  

 

आजीच्या मुलांची लग्न झाली, आणि मग माझ्यासारखं एक एक अवली व्यक्तिमत्व आजीची नातवंड म्हणून जन्माला आलो....

सोळाव्या वर्षी लग्न करून आलेल्या आजीला आता चार उच्चशिक्षित जावई, दोन गोंडस सुना, आणि आम्ही अकरा नातवंड इतका मोठा परिवार होता.. गंमत म्हणजे आम्हा सर्व नातवंडांचा अभ्यास आमच्या so called चौथी पास आजीने जमेल तेव्हा उत्तम रित्या घेतलेला आहे..

 

तिला कायम एकच खंत होती, “मी शिकलेली नाही रे पोरांनो तुमच्यासारखी.. माझ्या आप्पांनी आम्हा मुलीना शिकू दिलं नाही.. तुम्ही सगळे खूप नशीबवान आहात, तुमचे आईबाबा उच्चशिक्षित आहेत, नुसते अक्षरांनीच नाही तर विचारांनी सुद्धा सुशिक्षित आहेत .... तुमच्या सर्वांच प्रगतीपुस्तक बघताना मला कायम वाटत, कदाचित आमचंही शिक्षण असाच झालं असत तर..”....  हे शब्द ऐकले की आजीची सगळीच मुलं, आणि त्या मुलांची मुलं, अगदी शांत व्हायची, एकदम गपगार, डोळ्यात पाणी असायच ना सगळ्यांच्याच.

 

आमचे काका आजोबा नेहमीच म्हणायचे, ज्यांच्या हाताची करंगळी शेजारच्या बोटाच्या म्हणजे मराठीत ‘रिंग फिंगरच्या’ सर्वात वरच्या म्हणजे तिसर्‍या पेराच्याही वर जात असेल, तर ती व्यक्ती प्रचंड हुशार असते, आणि अशा व्यक्ती शक्यतो महत्त्वाच्या उच्च पदस्थ जागांवर काम करत असतात, उदाहरणार्थ, कलेक्टर, पोलिस कमिशनर, राज्यपाल वगैरे...., आणि आमच्या आजीची करंगळी अगदी तशीच होती, तिसर्‍या बोटाच्या सर्वात वरच्या पेराच्याही वर जाणारी.. जर शिकली असती तर खात्रीने मोठ्या पदावर असती.. पण....

 

आम्ही नातवंड सातवीत गेल्यावर मात्र आमचे पालक आजीच्या मागे लागलो.. “काकू (माझ्या आजीला तिची सगळी मुलं काकुच म्हणत असत..), आता आमची मुलं शाळेतून ह्यापुढे हिंदी किंवा संस्कृत शिकणार.... तू पण शिक.. म्हणजे शाळेत नव्हे, पण खाजगी शिकवणी लावूया तुझ्यासाठी.. तुला शिकण्याची आवड आहे ते माहिती आहे आम्हाला.

 

त्यावर आजी कदाचित खुश झाली असावी, पण एकत्र कुटुंब, संसार, आजोबा.. आणि सगळ्यात फालतू समज, “लोकं काय म्हणतील, ह्या वयात शिकले तर समाज तोंडात शेण घालेल..”.. अजूनही आजी एकत्र कुटुंबांचाच भाग होती, जरी सासू सासरे नसले, तरी थोरला दीर, थोरली जाऊ, त्यांचे चार जावई, धाकटा दीर, धाकटी जाऊ, नवरा आणि स्वत:चे चार चार जावई इतका पसारा होताच.. ‘लोक काय म्हणतील, शिवाय मुलींच्या सासरकडची मंडळी काय म्हणतील..”  

 

हा प्रश्न म्हणजे विश्वयुद्धापेक्षाही मोठ्ठा प्रश्न होता तिच्यासाठी.... आम्ही सर्वांनीच म्हणजे आजीच्या मुलींनी, नातवंडांनी तिची समजून काढायचा खूप प्रयत्न केला, आजोबाना मस्का लावला..”आजोबा, शिकू दे ना आजीला.. तुम्ही इतके शिकलात, तिला ही वाटत होतच की शिकावस.... आता तिला जरा वेळ काढता येईल स्वत:साठी..” एक ना हजार वेळा मस्कापॉलिशी करून आजोबांचा होकार मिळवला.... त्यांची एकच अट होती, “मला सकाळ संध्याकाळ जेवायला गरम गरम वाढलं पाहिजे तुमच्या आजीने.. बाकी ती काहीही करूंदे, माझी काहीही आडकाठी नाही..,, आणि हो तिने गुण पण उत्तमच मिळवायला हवेत.. उगीच काठावर उत्तीर्ण झालेली चालणार नाही..” आजोबा शक्य तितका कठोरपणा आणण्याचा प्रयत्न करत होते आजीसमोर.. पण आम्हाला मुलांना माहिती होत, आजोबांना नक्कीच आवडल असत त्यांच्या पत्नीने ह्या वयात घराबाहेर पडून शिक्षण घेण....

 

आजीने शिकायला आजोबांचा होकार मिळालेला ऐकून बाकीच्यांना विचारण्याच्या प्रश्नच नव्हता.. लगेच आजीच्या चारही मुली, चारही जावई आणि आजोबा आतल्या खोलीत गेले, आणि दार ओढून घेतलं.. खलबतखाना होता ना ती खोली म्हणजे..

 

साधारण अर्धा पाऊण तास चर्चा करून झाल्यावर आतून आलेल्या लोकांच्या सेनापतीने म्हणजे माझ्या बाबांनी आजीसमोर एक प्रस्ताव ठेवला, “काकू ऐका.. तुम्हाला मनापासून शिकायच तर आहे, पण घरी शिकवणी लावायची नाहीये.... हयातून तुम्हाला कदाचित असं म्हणायच असेल, की तुम्ही शिकता आहात ते लोकांना म्हणजे समाजाला समजायला नको, बरोबर ना..”…….ह्यावर माझ्या आजीच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले, तिने मानेनेच हो म्हटल, आणि पुढे ऐकू लागली..

 

“हां, तर ह्यावर आम्ही उपाय शोधून काढलाय, बघा तुम्हाला पडतो का ते.. तुम्ही दुपारी काही तास जाता ना बाहेर रोज, विणकाम, शिवणकाम शिकवायला.. त्याच हिंद महिला समाजात पद्धतशीर तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे हिंदीचा.... म्हणजे तुम्ही जशा दुपारची जेवणं झाली की काही तास जाता, आणि संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत परत येता, तसंच तुम्ही जायच, पण आता हिंदी शिकायला जायचं.. काहीही शिकवायला जायच नाही.. चालेल तुम्हाला? आणि हो, एकदा का अभ्यासक्रम सुरू झाला की त्यात खंड पडलेला आम्हाला कुणालाच चालणार नाही.. रविवार सोडून रोज दुपारी एक ते साडेपाचपर्यंत तुम्ही हिंदी शिकायला जायच.. ते ही येणाऱ्या सोमवार पासून.. कारण सासरेबुवा तुमच्या तिन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमाची फी सकाळीच भरून आलेत.. आणि लोकं काय बोलतील त्याकडे तुम्ही लक्ष द्यायच नाही.. लोकांना तोंड आणि कान त्याचसाठी आहेत, चुगल्या करण आणि पुढे सरकवण.. तुम्ही मात्र तुमचे कान पुढचे तीन वर्ष बंद करून ठेवायचे.. ” हे ऐकून बरेच दिवसांनी आम्ही सगळेच आनंदी झालो होतो, आजीच्या तर चेहेर्‍यावर एकाच वेळेला हसू आणि अश्रु दोन्ही होते..

 

ते बघून आजोबा पुढे होऊन म्हणाले, ‘चला सगळे, पळा इथून, आणि ऐकलं का सौभाग्यवती, आता शाळेत जायची तयारी करायला हवी..”

 

“अय्या आजी शाळेत जाणार, मग तिला नवीन युनिफॉर्म आणायला हवा ना, आणि नवीन पुस्तकं, सॉक्स, शूज..... आजोबा चला आपण शॉपिंग करूया..” आजी आजोबांच सगळ्यात लहान नातवंड भलतच चार्ज झालं होत, शॉपिंग भयंकर आवडत असे त्याला..

 

त्यांची बडबड ऐकून आजी वैतागली, “नाही हां, मला नको ते तोकडे फ्रॉक, आणि अजून काही.. मी नऊवारी साडीतच जाणार आहे आणि पायात नेहमीच्या चपलाच घालणार आहे..” आजीच्या आवाजात ठामपणा नव्हता, ती नकार देत तर होती, पण बोलताना तिची नजर तिथे जमलेल्या सगळ्यात प्रौढ चेहऱ्यांवरून फिरत होती.. आणि तीच पुटपुटण सुरू होत, “शिकायला मिळतंय ते खूप आहे, मी लहान लहान कपडे अजिबात नाही घालणार.. नाहीतर मला नको ते शिक्षण..”

 

तिचा तो आविर्भाव बघून तिथे असलेले सगळेच हसू लागले, “अग काकू, तुला कुणी नाही सांगत आहे तोकडे कपडे घालायला, आणि नवीन पुस्तकं ही नकोत, कारण हिंद महिला समाजाचा स्वत:चा वेगळा अभ्यासक्रम आहे, आणि तो सरकारमान्य आहे.. ज्या वयस्कर गृहिणीना घर सांभाळून पुढे शिकायची इच्छा आहे अशाच बायकांसाठी हा कोर्स मुद्दाम बनवला गेला आहे, आणि काकू तू ह्या कोर्सच्या मदतीने फक्त हिंदीच नव्हे, तर इंग्रजी भाषा सुद्धा शिकू शकशील....”

 

मावशीच वाक्य संपायच्या आताच आजोबा म्हणाले, “नकोsss, इंग्रजी भाषा नको, हिंदी शिक आधी.. त्यानंतर बघूया पुढे..”.. असं म्हणून ते नेहेमीप्रमाणे तरातरा निघून गेले.. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत सगळेच हसू लागले..

 

ठरल्याप्रमाणे आजीचा अभ्यासक्रम सुरू झाला, आणि आम्ही मुलं सुद्धा शाळेत रमलो...... आजीचं शिक्षण अगदी गुपचुप सुरू होत, कुणाला कधीच कसलाच त्रास झाला नाही, घरी सगळे सण समारंभ सुरळीत पार पडत होते, आम्ही मुलं सुट्ट्या लागल्या की आजोळी येऊन धुमाकूळ घालत होतो, त्यात आजी आजोबा अगदी मनापासून समरस होत होते, आमचे कुठलेही हट्ट पुरे करण्यात, किंवा लाड करण्यात आजी कधीच कमी पडली नाही, कधी रात्री अपरात्री अभ्यास करताना दिसली नाही, कधी तिच्या पुस्तकांचा पसारा दिसला नाही, कधी ‘मी बघा कसा अभ्यास करते’ ह्याचा साधा उल्लेखही नाही.. प्रत्येक वर्षी आंब्याच्या गढी रचल्या गेल्या, ताजी लोणची घातली गेली, मुरंबा, साखरंबा, आंब्या फणसाची साठ घातली गेली, फणसांची सांदणं केली गेली, गरे काढून वाटले गेले.... शिवाय सकाळ संध्याकाळ ताज जेवण, कधी नवनवीन खायचे पदार्थ बनवले गेले, ह्या सगळ्यात आजी तिचा वेगळा अभ्यास करतेय हे ही आम्ही विसरून जायचो.. कधी दिसलीच नाही ती अभ्यास करताना..

 

तीन वर्ष कधी पूर्ण झाली समजलंच नाही, आमच्या वार्षिक परीक्षांच्या तारखा समजल्या आणि नेमकी त्याच वेळेला आजीचीही वार्षिक परीक्षा आहे हे आमच्या कानावर पडल.. आम्हाला वाटलं आमचे पेपर खूप आहेत, पण नाही, आजीचेही तब्बल सहा पेपर होते...... ते ही तिच्यासाठी स्नातक परीक्षेचे.. आजी खूप टेंशनमध्ये दिसत होती... तीच टेंशन कमी करण्यासाठी मी तिला सांगितलं, “आजी, तू शहाणी आहेस ना, मग घाबरू नकोस, तुझ्या अभ्यासावर विश्वास ठेव, देवाचं नाव घे आणि सगळे प्रश्न नीट लिही.. पेपर लिहून झाला की एकदा संपूर्ण वाचून घे.... जर तू ह्या तुझ्या परीक्षेत छान मार्क मिळवलेस ना तर I promise, मी आईला सांगीन, आपल्याला फिरायला घेऊन जायला..... फक्त तू, मी आणि आई.. बाकी कुण्णी कुण्णी नाही....”.. हे तिला सांगणारी मी नववीची परीक्षा देणार होते....... आई बाबा जसे आम्हाला सांगायचे, तेच मी पुढे केलं..

 

आमच्या सगळ्यांच्या परीक्षा झाल्या....पुढचे काही दिवस तरी आम्ही बिनधास्त मजा करणार होतो.... आजी तर तिची परीक्षा झाली आहे हे विसरून गेली होती.... अखेरीस मे महिना अर्धा संपला, आणि एक अनोळखी गृहस्थ दारात येऊन उभा राहिला.. आम्ही मुलं त्याला सामोरी गेलो, “कोण तुम्ही? काय काम आहे?”

 

“जी मै विज्या से मिलना चहाता हूं..”

 

“इथे कुणी विज्या नाही रहात, चुकीच्या पत्यावर आलात तुम्ही..”

 

“मै रिजल्ट लेकर आया हूं, विज्या से मिलना है.. “ त्यांच्या तोंडून रिजल्ट घेऊन आलोय हे ऐकून आम्ही घाबरलो, कारण रिजल्ट आला, म्हणजे संध्याकाळी झोडपणी नक्की.... आम्ही त्यांना थांबायला सांगून, आत पळालो.. थोड्यावेळाने पदराला हात पुसत आजी बाहेर आली, आणि समोर आलेल्या व्यक्तिकडे बघून आनंदली, म्हणाले, “अरे गुरुजी, तुम्ही बाहेर का उभे, या आत या..” ते व्यक्तिमत्व आत येऊन बसल, आणि आम्ही स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून बाहेर काय सुरू आहे त्याचा अंदाज घेऊ लागलो.... बराच वेळाने आम्हाला समजलं की ते आजीचे गुरुजी होते, आणि आजी तिच्या परीक्षेत उत्तमरित्या पास झाली होती, त्याचीच खबर आणली होती त्यांनी.... आजी तिचा रिजल्ट बघून खूप आनंदी झाली, आणि तो रिजल्ट आपला नाही हे समजल्यावर आम्ही निश्वास सोडला.. त्या दिवशी सगळेच जण आजीच भरभरून कौतुक करत होते..

 

आजीने तिच्या भाषेत हिंदीची डिग्री मिळवली होती.... माझ्या आईने प्रॉमीस केल्यानुसार आम्हा तिघांची टिकिट काढली, काशी, अलाहाबाद, हरिद्वार, ऋषिकेश, गया.. अशी वेगवेगळी तीर्थस्थानं फिरवणारी सहल आईने बूक केली.. आजीने यातलं ह्या आधी काहीच बघितलं नव्हत.... आम्ही स्थानिक टुअर तर्फे जाणार होतो, त्यांनीच आमची वाराणसी एक्सप्रेसची टिकिट बूक केली होती....

 

आम्ही सगळे तेव्हाच्या व्हिटी स्टेशनवर गोळा झालो खरे, पण आजीला भीती वाटू लागली होती.. तिला कारण विचारल्यावर म्हणाली, “मला हिंदीत नीट बोलता येत नाही ना, तुटकं फुटक हिंदी येत मला....”

 

त्यावर आम्ही म्हणालो, “आजी तुला हिंदी समजत ना, लिहू शकतेस, वाचू शकतेस.... मग घाबरतेस कशाला, मुळात अनेक हिंदी आणि मराठी शब्दोच्चार सारखेच आहेत.... तू बोल बिनधास्त.... अगदीच चुकलीस तर आम्ही सांगू तुला.. घाबरून राहिलीस तर कायमची भीती बसेल.. बोल तू..”

 

आम्ही सगळे ट्रेनमध्ये चढलो, ठरलेल्या जागी येऊन बसलो.. आजी आधी बाचकत होती, पण हळू हळू मोकळी झाली.... उत्तर भारतात तसंही मराठी समजत नाही बऱ्याच लोकांना त्यामुळे तिला बोलायच असेल तर हिंदीतच बोलण गरजेच होत..

 

आमची सुरवात काशीपासून झाली, आम्ही पूजा करायला गेलो तेव्हा मणिकर्णिका घाटावर नेमका कुणाचा तरी मृतदेह एका हातरिक्षात डोक्यापासून पायापर्यंत पांढरा कपडा गुंडाळून रश्शीने उभा बांधून ठेवलेला दिसला.. आम्ही सवयीने त्या मृतदेहाला नमस्कार केला, आणि आजूबाजूला त्याच कुणी आहे का ते बघू लागलो.. साधारण अर्ध्या तासांनी त्या मृतदेहाची माणस निवांतपणे चालत त्याच्याजवळ जाताना दिसली, माझी आजी त्या लोकांच्या समोर उभी राहिली, आणि काही समजायच्या आत म्हणाली, “तो तुमरा माणूस है ना.. बिच्चारा मरने के बाद भी खडा रह कर वाट देख रहा है तुम सबकी..” नशीब त्यानंतर लगेच तिथून निघालो, नाहीतर फटकेच पडले असते..

 

त्यानंतर एक एक तीर्थस्थान फिरताना आम्ही हरिद्वारला पोहोचलो....... हरिद्वारचं महत्व म्हणजे हर की पौरी, गंगेची प्रेक्षणीय आरती, शिव पार्वतीच लग्न झालं ते देऊळ आणि उंचावर असलेली मनसा देवी.... त्यावेळी मनसा देवीला जाण्यासाठी रोप-वे बनला होता.... येण्यासाठी मात्र नव्हता.... साधारण दोन किमी किंवा ७७५ पायऱ्या उतरून यावे लागे....

 

देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी आमच्या मातामही तयार झाल्या, इस्त्रीची नऊवारी साडी नेसून, मॅचिंग ब्लाऊज, काचेच्या बांगड्या, अंबाडा, त्यावर फुलांची वेणी घालून माझी आजी एकदम तय्यार.... टुअर गाइड जसा रस्ता दाखवत होता तसे आम्ही जात होतो.. तो आम्हाला वर घेऊन जाणाऱ्या रोप-वे स्टेशन जवळ घेऊन गेला.... एका पाळण्यात चार माणस बसायची जागा होती, एका पाळण्यात आम्ही तिघी बसलो.... हळू हळू पाळणा वर जाऊ लागला.. आजीसाठी सगळ्याच गोष्टी नवीन होत्या.... दहा मिनिटांत आम्ही अप्पर स्टेशनला पोहोचलो.. रांगेतून शिस्तीत दर्शन झालं, तिथल्या पद्धतीप्रमाणे देवीला बांगड्या, कुंकू, चुनरी, घरी बनवलेले मावा पेढे  वगैरे असलेल ताट आजीने देवीच्या पायावर ठेवलं आणि प्रसाद म्हणून मिळालेले चणे फुटाणे, पेढे, कुंकू, चुनरी, बांगड्या अस सगळं हातात घेऊन आम्ही तो गड उतरू लागलो.... मनसा देवीच दर्शन घेऊन पायऱ्या असलेल्या जागी पोहोचायच्या आधी एक विलक्षण वळण आहे, आणि तिथे काही विलक्षण अनुभव येतात, झाडावर असलेले प्राणी कुणाच्याही नकळत झाडावरून उड्या मारतात, घाबरवतात, अंगावर धावून येतात.. सहाजिकच त्या हल्ल्याने माणूस घाबरतो..

 

आम्ही असेच उतरून येत होतो, देवळातून मिळालेले सर्व प्रकारचे प्रसाद आजीच्या हातात होते.. आजी हातातले प्रसाद आणि डाव्या खांद्यावरचा पदर सावरीत उतरत्या रस्त्याच्या अंदाज घेत खाली बघून चालत होती.. तितक्यात त्या रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांवरच अंगावर झाडावरून अचानक लाल तोंडाच्या माकडानी उड्या मारल्या.. काळ्याकभिन्न रंगांची, अंगावर मोठाले राठ केस असलेली, लाल भडक डोळे असलेली माकड, फिस्कारत चित्रविचित्र आवाज करत आमच्या हातातले प्रसाद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागली..... आमच्या पुढे असणाऱ्या काही जणांनी हातातले फुटाणे रस्त्यावर टाकले, ते उचलून घेत ती माकड दोन पायावर उभी होऊन आमच्या अंगावर चालून येऊ लागली.. हुप्प हुप्प असे घाबरवणारे आवाज काढत ३-४ माकडं आजीच्या अंगावर धावून गेली.. ते बघून आम्ही खरंच घाबरलो होतो..

 

त्या माकडांना येताना बघून आजीने तिच्या हातातले प्रसाद माझ्या हातात दिले, ते घेण्यासाठी त्यातल्या एका माकडाने त्याचा काळपट हात माझ्या दिशेने केला.. त्या माकडाकडे एक क्षण रोखून बघत आजीनी तिच्या पायातली चप्पल काढली, आणि ती हातात घेऊन समोरच्या माकडाच्या तोंडावर मारत बोलायला लागली, “माकडतोंड्या, तेरे को काय लगा रे.. हम तेरे को ओळखेगा  नहीं? माकडका चेहेरा लगाया हुवा जीवंत माणूस है ना तूम,.. तुमको बिलकुल लाज नाही वाटता ना ऐसा गंदा काम करके, वो खरेखुरे माकड को भी तेरेसे जास्ती अक्कल रहेंगा, हनुमान का रूप लेकर चोरी करता है तुम कुत्र्या, तेरेको क्या लगा ऐसा नऊवारी साडी पहन कर आया तो एकदम बावळट होगी मै, नऊवारी नेसणेवाली औरत को येडी समझा तुम, ये साडी महाराष्ट्रची शान है समजा, इस वस्त्रका मस्करी करता है तुम, उधरच थांबो, तुमने तेरा चेहेरा रंग लगाकर लाल किया ना.. अभी वो चेहेरा मै असली मे लाल करती है.... ऐसा मार मार कर तेरा थोबाडा सुजायेगी ना मै, घर पर जाकर देखेगा तो तेरा आरसा भी फुट जायेगा....”

 

आजी हातात चप्पल घेऊन त्या लाल तोंडवाल्या माणसाच्या मागे धावत होती.. तितक्यात कुठून तरी तिच्यावर काठी मारली गेली.... काठीचा मार तर चुकला, पण आता खाली पडलेली काठी उचलून, आजीने बाजूच्या झाडांवर लपून बसलेल्या सगळ्या माकडरूपी माणसांवर हल्ला चढवला..”मेल्यानो, माझ्या अंगावर काठी फेकता काय, उतरो, आधी खाली उतरो तूम सब, आत्ता लगेच उतरो खाली, नाही तर देखो मै चढेगी झाडपर, और उधर आकर जोरजोरसे तुडवेगी सब जणोंको.. वाट्या काय रे तुमको, मै एकदम नाक के सामने चलनेवाली बाई रहेगी, मै तुमसे जास्ती अक्कलवाली हूं, समझा..  उतरो खाली सगळे, लगेच उतरो, नाही उतरना है, अखिरका पुछ रही हूं, उतरो वरना दगड गिरायगी मै सब पर.... “ आजी खाली वाकून दगड उचलणारच, तितक्यात तिथे खालून येणार्‍या पोलीसांच्या शिट्या ऐकू येऊ लागल्या

 

आजी तर सुसाट बोलतच सुटली होती, इतका वेळ शांत बसलेल्या आम्हाला आता मात्र हसू दाबणं कठीण होत.... आणि आम्ही सगळेच खो खो हसायला लागलो..

 

आजी एकदम #पुष्पा स्टाइल मध्ये म्हणाली होती, “फ्लॉवर समझा क्या.... फायर है मै..”

 

त्यानंतर आम्ही अनेकदा गेलो आहोत आम्ही मनसा देवीच्या दर्शनाला, पण हा अनुभव विसरण निव्वळ अशक्यच..       

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू