पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

#बालदिन : बालपण -एक बदलते चित्र

प्रसंग १ :


"तो असतो कुठे घरी ? सारखं आपलं मित्रांबरोबर! घरातल्यांशी   गप्पा मारायचा कंटाळा येतो त्याला. कर्तव्य केल्यासारखं फक्तं कामापुरतं बोलायचं !"....एक आई, तिच्या मैत्रीणीकडे स्वत:च्या मुलाची तक्रार करत होती.


प्रसंग २ :


"अरे जेवताना तरी हातातला मोबाईल बाजूला ठेव की !"....आई म्हणाली.  पौगंडावस्थेतल्या त्या मुलाच्या कानावरून ते‌ शब्द अलगदपणे निघून गेले. आई‌ काहीतरी बोलतीये‌ हे त्याच्या गावीही नव्हतं.


प्रसंग ३ :


"  कॉलेजमध्ये मॅथस् ला फार बोअर करतो तो टकल्या.  आम्ही तर बसतच नाही त्याच्या लेक्चरला !".... प्राध्यापकांना बिनधास्त टकल्या संबोधून, अरेतुरेच्या भाषेत एक महाविद्यालयीन युवक कोणा मित्राला सांगत होता.


प्रसंग ४ :


परीक्षा सुरू आहे. शिक्षीकेचं लक्ष  नाही हे बघून एक दोघांनी समोरच्याच्या किंवा बाजूच्याच्या उत्तरपत्रिकेत बघून उत्तरं लिहायला सुरुवात केली.


प्रसंग ५ :


आवडणाऱ्या मुलीला प्रपोज केल्यावर‌, तीने नकार दिल्यामुळे डिप्रेशन मध्ये गेलेल्या, आपल्या १६/१७ वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलाला साईकियाट्रीस्ट कडे घेऊन जाताना वडिलांचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते.


सर्व वयाच्या मुलांच्या बाबतीत हे आणि असे बरेच प्रसंग आपल्या आजुबाजूला घडताना आपण बघतो. हल्लीच्या मुलांना मोबाईल म्हणजे जीव की प्राण आहे....एक प्रकारे मोबाईलचं व्यसनच आहे म्हणा ना !  सद्ध्याची तरूण पीढी मोठ्यांचं ऐकत नाही..... बेशिस्त आहे....हट्टी आहे.... मनाविरुद्ध काही झालं की लगेच चिडते, वाद घालते किंवा दुसरं टोक म्हणजे डिप्रेशन मध्ये जाते......एक ना‌ दोन, अशा कितीतरी तक्रारी पालक करताना दिसतात. आता वर दिलेल्या प्रसंगांमध्ये आपण थोडं भूतकाळात डोकावूया....


प्रसंग १ :


बाबागाडीत बाळाला बसवून सोसायटीच्या बागेत आई/बाबा फिरवत आहेत.  फिरण्याच्या या कालावधीत अखंड फोन‌वर बोलणं किंवा इतर‌ काही बघणं चालू आहे.  बाळाला चिऊ काऊ दाखवणं, त्याच्याशी खेळणं वगैरे  संवाद नावालाही नाही.


प्रसंग २ : 


एक आई आपल्या दीड-दोन‌ वर्षांच्या लेकराला भरवतीये. त्याने काहिही नखरे न‌ करता खावं म्हणून तीने मोबाईलवर कार्टून लाऊन त्याच्यासमोर ठेवलाय. आपण काय खातोय....किती खातोय याच्याकडे त्या लेकराचं लक्षही नाही. मोबाईलच्या हलणाऱ्या चित्रांवर त्याचे डोळे खिळून राहीले आहेत. तोंडापाशी आईचा हात आला की तोंड उघडायचं काम लेकरू यांत्रिकपणे करतय. पोट भरेपर्यंत नव्हे, तर आईचं समाधान होईपर्यंत खाणं चालू आहे.


प्रसंग ३ :


शाळेत वर्गामध्ये दंगा करण्यावरून शिक्षीका मुलाला ओरडल्या.  दुसऱ्या दिवशी मुलाचे पालक येऊन शिक्षीकेशी भांडले. मुलाला ओरडायचं नाही,  शिक्षा करायची नाही....नाहीतर मुलाच्या मनावर परिणाम होतो म्हणाले .


प्रसंग ४ :


आई वडील आणि एक सात-आठ‌ वर्षांचा मुलगा गाडीतून चालले आहेत. चौकात लाल सिग्नल लागला आहे.  ट्रॅफिक पोलिस आजुबाजूला नाहीये हे बघून वडीलांनी सिग्नल मोडून गाडी पुढे नेली.


प्रसंग ५ :


घरी दोन एकसारखी दोन खेळणी पडलेली असताना, सात-आठ वर्षांचा मुलगा नवीन महागड्या खेळण्याचा हट्ट धरून बसला. हात पाय पसरून भोकाड पसरलं. "आणूया संध्याकाळी ते खेळणं. त्याशिवाय ऐकणार नाही हा !"....वडीलांनी शरणागती पत्करली.


वर्तमानकाळ आणि भूतकाळ या दोन्हीतील प्रसंगांमध्ये काही संबंध जाणवला का ?


छान आणि वेगवेगळ्या प्रकारचा संवाद ज्या लहान वयात साधता येऊ शकतो, तेंव्हा जर आई-वडील स्वत:च मोबाईलवर चिकटून बसत असतील, तर जरा मोठं झाल्यावर किंवा मुलांचं विश्व वाढल्यावर, मुलं पालकांशी गप्पा  मारण्यापेक्षा मित्रमंडळीतच का नाही रमणार ?


स्वत:ला फार त्रास होऊ नये म्हणून जेवताना दीड दोन वर्षाच्या न कळत्या लेकराच्या हातात मोबाईल ठेवल्यावर, नंतर मोबाईल हा त्याच्या शरीराचाच एक भाग बनला तर त्यात नवल ते काय ?


शिक्षकांचा आदर जर‌ पालकच करत नसतील, तर मुलं का करतील ?


शिक्षा करणारं कोणी आजुबाजूला नसेल तर नियम मोडलेला चालतो, ही शिकवण घरातले मोठेच देत असतील, तर नियम, शिस्त पाळायची असते हे नुसतं शाळेत शिकवून काय उपयोग ?


मुलांचं संगोपन करणे म्हणजे अवाजवी असले तरी त्यांचे सगळे लाड, हट्ट पुरवणे असं जर पालकांना वाटत असेल, तर संयम ठेवणे, अपयश किंवा नकार  पचवणे, या गोष्टी मुलांना शिकवणार कोण ?


नेहमीच पालकांचा दोष असतो असंही नाही. काळानुरूप आलेली अपरिहार्यता असू शकते. कवी संदीप खरेंच्या एका हृदयस्पर्शी कवितेतील ओळी आठवतात....


"दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई...

नीज दाटली डोळ्यांत, तरी घरी कोणी नाही...."


आई वडील दोघेही नोकरी करत असतील तर बहुतेक वेळा "अभ्यास झाला का ? परीक्षा कधी आहे ?" ...एवढ्यावरच संवाद संपतो. त्यामुळे मुलं मनातल्या गोष्टी व्यक्त करायला बाहेरचा आधार शोधतात. हा बाहेरचा आधार कधी मित्रं मैत्रीणी असतात तर कधी इंटरनेट नावाचं मायाजाल. मुलांच्या निरागसतेला हद्दपार करायचं काम हे मायाजाल चोख करतं. ऑनलाईन क्लासेस, सोशल मिडिया ही आता बदलत्या काळाची गरज बनत चालले आहेत.  वाट्टेल ती माहिती, वाट्टेल त्या विकृत स्वरूपात, अगदी फुकट अंगावर कोसळायला लागल्यावर कोवळी मनं वेळेआधीच निब्बर झाली तर त्यात नवल कसलं ?


अशावेळी खरं तर गरज आहे ती म्हणजे अर्थपूर्ण संवादाची आणि जागरूकतेची !  आपल्या मुलाच्या मनात सद्ध्या काय चाललंय, त्याच्या वागण्या-बोलण्यात काही सूक्ष्म का होईना, फरक पडलाय का, त्याचे प्रॉब्लेमस् तो विश्वासाने आपल्याला सांगू शकतोय का.... या आणि अशा कित्येक गोष्टी, मुलं आणि पालक यांत सुसंवाद असेल तरच कळतील. तो सुसंवाद मुल अगदी तान्हं असल्यापासून ठेवला तर पुढे त्यात अडचणी येणार नाहीत.  असं म्हणतात की पालकांनी मुलांचा मित्र व्हावं. पण मला वाटतं की मुलांना मित्र शेकडो मिळतील, पण आई वडील एकच असणार आहेत. त्यामुळे मित्र बनण्याऐवजी, पालकांनी विश्वासू आधारस्तंभ किंवा मार्गदर्शक बनावं. असा वाटाड्या बनावं, जो वाट तर दाखवेल, पण त्याच वाटेने जायचा हट्ट धरणार नाही. जिथे वाट चुकायचीही परवानगी असेल आणि वाट चुकलाच तर नवीन रस्ता शोधण्याची संधीही असेल.


उद्याचे जबाबदार नागरिक आपण तयार करतोय ही पालकांना जाणीव हवी. लहान मूल हे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे आहे. जर त्याचा सुंदर घडा तयार व्हायला हवा असेल तर आपणही कुशल कुंभार व्हायलाच हवं !

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू