पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्याय 1


भाग-१

*****************************************

"आईईईईईईई....गं!!!...",मनातल्या मनात जोरदार आरडा ओरड झाली आणि अखेर इंजेक्शन देऊन झालं. डोळे सारखे मिचकवत आपल्या डोळ्यात पाणी आलंच नाहीये,असं छबुने भासवलं.आता हळू हळू मुख्य कामाला सुरुवात झाली....


*****************************************


एक दिवसापूर्वी....


घराण्याची आन बान आणि शान असलेल्या एकमेव छबु ताई यांनी काल दुपारपासून काहीच न खाल्ल्या प्यायल्या मुळे काळजीवाहू सरकार असलेल्या आई- बाबांसोबत तातडीची बैठक सुरू झाली. दोन वाक्यांमधल्या प्रदीर्घ वेळानंतर अखेर दाढ दुखीचे कारण पुढे आले.


" काय करू गं आई? मला खाताच येत नाहीये अजिबात", छबु अगदी रडवेली होऊन म्हणाली.


"हम्म...कचाकचा माझ्याशी भांडण्यापेक्षा जरा माझं ऐकलं असतं आधीच तर कालचा गुळपोळीचा घास चुकला नसता", छबु ताईंचे धाकटे चिरंजीव अगदी संधी साधुन बोलले.


"झालं? बोललास? तुझ्याशी बोलतेय तरी का मी? मी माझ्या आईशी बोलतेय. मला हे दुखणं काल सकाळपासून जास्त जाणवायला लागलं ", छबु म्हणाली.


"हुह! हे म्हणजे काय? काय रे बा! तुला साधं नीट बोलता पण येत नाहीये ताई", बिट्टू म्हणाला.


"आई, या बिबट्या ला इथून जायला सांग गं आत्ताच्या आत्ता", छबु संतापली.


"ए बिबट्या नाही. बिट्टू म्हण बिट्टू, कळलं का छबे!", बिट्टू कळ काढत निघून गेला.


इतका वेळ शांत असलेल्या बाबांनी आता मौन सोडत म्हटलं,"छबु काय प्रकार आहे सगळा? तुला अजिबातच खाता येत नाहीये का?"


"होय हो बाबा. अचानक कालपासून ही दाढदुखी जास्तच झालीय. कळ जाते काही खाल्लं तर. जेवलेच नाही मी", छबु म्हणाली.


"....आणि राहिलीस बरी न खातापिता", खुसुखुसु हसत मागून येऊन आजीने चर्चेत सहभाग घेतला.


"काय ग आज्जी! तू पण हस आता मला. बिचारी मी!......आई तू काही बोलणार आहेस की नाही?फोन वर कसली बोलतेस? माझ्याशी बोल आधी", छबु आता दाढदुखीने त्रस्त झालेली.


"मी बोलणार नाहीये आता. आता तुला नेणारे डायरेक्ट डॉक्टरांकडे! खूप झाली नाटकं तुझी. मी डॉक्टर दातेंकडे फोन लावला होता आत्ता. दुपारी बोलावलं आहे. आवरून ठेव", आईने सिक्सर मारला.


" आईईईईईईई.... अगं काय तुझा मुद्दा? डायरेक्ट फोन केलास .मला काही सांगितलं पण नाहीस? मला नाही जायचं डॉक्टरांकडे....अगं जाम भीती वाटते गं मला. मी रोज पेज पिऊन राहीन पण दातांचा डॉक्टर नको", छबु कळकळीने म्हणाली.


"अगं ए, घोडी झालीस एकवीस वर्षांची तरी घाबरतेस कसली? हे असं रडत कुढत राहायचं नाही अजिबात. आणि लोकांना कळलं ना तर आम्हाला आधी बोलतील तुम्ही पण कसं लक्ष घातलं नाहीत असं,गपचूप आई बरोबर जायचं", आता आजीची फलंदाजी सुरू झाली.


"आज्जी... सामान्यपणे आज्या नातींची बाजू घेतात आई बाबांसमोर. तू माझी काही शिल्लक च ठेऊ नकोस हा! हुहह!", छबु चा पचका झाला


" बाजू बिजू भलत्या बाबतीत नाही. अगं असं काय करतेस? अक्ख आयुष्य हे असं दाढ दुखतेय म्हणून काढणार का? मस्त मस्त खायला प्यायला नकोय का तुला?",आजी आमिष द्यायचा प्रयत्न करत होती.


"खाणं हेच जीवन आहे की गं! पण दातांचे डॉक्टर म्हणजे मला बेक्कार भीती वाटते. काय आता आईने नंबर लावला च आहे तर मग...आलीया भोगासी म्हणायचं आता", छबु खरं तर चिंतातुर झालेली.

डॉक्टरांकडे जाणं आता अटळ होतं.


********************************************

".....चला,  झालं का आवरून छबु? निघुया?",आईची हाक आली.


"आई दोन मिनिटं, जरा माझं मास्क मिळत नाहीये ते बघतेय",छबु.


"अगं ते काय आहे दाराच्या कडीला लावलेलं, लाव ना ते",आई.


"ए शी! ते नको. मला रेड कलर च हवंय. आज माझा ड्रेस रेड आहे ना!", छबु चा एकच नारा मॅचिंग शिवाय कसा मिरवणार तोरा?


"कठीण आहे हो तुमच्या छबु चं",बिट्टू म्हणाला.


"तुमची? म्हणजे तुझी कोण नाहीच वाटतं मी? आता ये मागायला पैसे आई नसताना ;मग सांगते",  छबु चा पारा चढलाच.


"छबु, कसली भांडता गं दोघं? चल बाहेर ये लवकर", आईने  सुनावलं.


" आई, तू चालवशील ना गाडी? येताना मी चालवते. आत्ता मला जरा टेन्शन आहे ना", छबु म्हणाली.


"हम्म..माहितेय सगळं मला. बसा मागे तरी नीट म्हणजे झालं.हेल्मेट दे ते इकडे मला", आई म्हणाली.


छबु मनातच म्हणाली ,"हाऊ स्वीट! आईला सगळं माहीतच असतं.असो... देवा वाचव बाबा आता डॉक्टरकडे जातेय".


छबु चे हात गार पडायला लागलेले.मनात विचारांचा काहूर. रस्त्यावरचे आवाज पण मनातल्या विचारांपुढे येत नव्हते.आता काय होईल? छबु ने एकदम दीर्घ श्वास घेतला.  तर्जनी वर मध्यमा ठेऊन ,"होणार! होणार! नीट होणार सगळं",असं म्हणत छबु निघाली.

(क्रमशः)



*****************************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू