पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्याय 1

पंडित च्या ऑफिस मध्ये पंडितला ला आज farewell पार्टी होती. सगळे जण भरभरून बोलत होते. त्याला कारणही तसंच होतं. पंडित, वर पासून खालपर्यंत लोकप्रिय होता. कामात अत्यंत हुशार, आणि कर्तव्य दक्ष होता. कोणालाही मदत करायला सदा सर्वदा तयार. तो ऑफिस मध्ये कितीही थांबायला कायमच तयार असायचा. मृदुभाषी आणि प्रेमळ. या त्यांच्या गुणांमुळे तो सर्वांनाच हवा असायचा. त्यांच्या कंपनी ने VRS जाहीर केली तेंव्हा पंडित ने लगेच फॉर्म भरून टाकला. त्याचा साहेब तर वेडाच झाला. त्यांनी तऱ्हे तऱ्हेने पंडितची समजूत काढायचा प्रयत्न केला पण पंडित आपल्या निर्णयावर ठाम होता. सर्वांनीच त्याला खोदून खोदून कारण विचारलं पण तो म्हणाला की योग्य वेळी सांगेन. आज सगळे त्यांच्या बोलण्याची वाट पाहात होते. सर्वांनीच आपल्या भाषणात त्याला विनंती केली की त्यानी आज तरी कारण सांगाव म्हणून. 

सरते शेवटी पंडित बोलायला उठला. 

“मला तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं की ते वर्णन करायला माझ्या जवळ शब्दच नाहीत. मी फार काही बोलणार नाही कारण बराच उशीर झाला आहे आणि जेवण वाट पहात आहे.” 

“जेवणाचं सोड रे, आम्ही रात्रभर वाट पाहायला तयार आहोत. तू आम्हाला सोडून का चालला आहेस ते सांग. आम्हाला तुझा निर्णय तसाही मान्य नाहीये. त्यामुळे कारणही तसंच जोरदार असलं पाहिजे.” कोणी तरी मध्येच उठून बोललं. 

“सांगतो, सांगतो. आज माझं वय ४५ आहे. इतकी वर्ष काहीही हातचं न राखता सर्व कामं केलीत. तुमच्या बरोबर काम करतांना आनंद वाटायचा. आता माझ्या जवळ बऱ्यापैकी पैसा साठला आहे आणि कंपनी ने VRS चा पैसा पण दिला आहे. त्यामुळे मी आता फार वर्षांपासून जोपासलेलं माझं एक स्वप्न आहे, ते पूर्ण करणार आहे. मी आता भारत भ्रमण करणार आहे. मला आता नुसतं फिरायचं आहे.” पंडित थोडा थांबला. पानी प्यायला आणि पुढे सुरवात केली. 

“तुम्हाला नेहमीच प्रश्न पडायचा ना, की मी लग्न का करत नाही ? तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी मला मुली पण सुचवल्या होत्या पण याच कारणांसाठी मी लग्न पण केलं नाही. कुटुंब नाही, कबिला नाही त्यामुळे जबाबदाऱ्या पण नाहीत. आता मी निवांत पणे जशी हवी, तशी भटकंती करू शकतो आणि अनेक अमोल अनुभव गोळा करू शकतो. एकटाच असल्यामुळे मागे कोणी काळजी करणारं पण नाही. बस. हे एकच कारण आहे. हे सर्व करण्यासाठी मी योग्य वेळेची वाट पहाट होतो ती संधि मला VRS ने दिली. एवढंच. तुम्हा कोणालाच मी विसरू शकणार नाही. सगळ्यांनी माझ्यावर जे निरपेक्ष प्रेम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद.” पंडिटणी आपलं भाषण संपवलं. आणि तो बसला.  

हॉल मध्ये शांतता पसरली होती. टाळ्या वाजवण्याचं कोणालाच भान नव्हतं. सर्व अगदी स्तब्द झाले होते. साहेबच प्रथम भानावर आले आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली आणि मग अख्खा हाल दणाणून गेला.

आठ दिवसांनी त्याचा जवळचा खास मित्र अरविंद त्याला भेटायला आला. म्हणाला की तो नसल्यामुळे ऑफिस ची रयाच गेली आहे आणि काम करायला मजा येत नाहीये. मग बोलता बोलता त्यांनी विचारलं की “तुझ्या प्लॅनिंग प्रमाणे केंव्हा निघणार आहेस प्रवासाला ?”

“आखणीच करतोय अजून आठ पंधरा दिवस तरी लागतील. मग निघेन. असाही विचार करतोय की फक्त पहिल्या प्रवासा बद्दल ठरवून निघाव बाकी जसं मनाला येईल तसा प्रवास करावा.” पंडितनी खुलासा केला.  

“मग कुठून सुरवात ?” – अरविंद.

“तोच विचार करतोय. पण अजून काही ठरत नाहीये. सगळ्याच ठिकाणी प्रथम जावसं वाटतंय” पंडितनी आपली अडचण सांगितली.  

“मी काही सुचवलं तर तुला आवडेल का ?” – अरविंद. 

“अरे तू माझा जिवा भावाचा मित्र, मग तुला अशी परवानगीची आवश्यकता कधी पासून भासायला लागली ? सुचव काय आहे तुझ्या मनात ते.” – पंडित.

“मला अस वाटतंय की सुरवात देवदर्शनापासून करावी. या साठी नर्मदा परिक्रमा हा उत्तम मार्ग आहे.” – अरविन्द.  

“अरे मला तीर्थ यात्रेला आत्ताच जायचे नाही. आत्ता काही वर्ष मी नुसता भटकणार आहे. आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि तू हे काय सांगतो आहेस ?” पंडितनी कुरकुर केली. 

“हे बघ बसने परिक्रमा केलीस तर फक्त १५-२० दिवस लागतात. नंतर तू हवं तिथे जा. पण आयुष्याची नवी सुरवात करतांना तू हे करावस अस मला वाटतं. नर्मदा ही प्रवाही आहे आणि तू प्रवासाला निघणार आहेस. पुढच्या संपूर्ण प्रवासात तुझ्या बरोबर नर्मदा देवी असली तर तुझ्यावर संकट येणार नाही आणि सर्व निर्विघ्न पार पडेल असा माझा विश्वास आहे म्हणून म्हंटलं.” – अरविंदनी समजावलं.

पंडित विचार करत होता. त्याचा या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण फक्त पंधरा दिवसांचाच प्रश्न होता, त्यांनी परिक्रमा करायचं ठरवलं. आणि तसं अरविंद ला सांगितलं. तो ही खुश झाला. 

नंतरच्या दहा दिवसांत पंडित ने नर्मदा टूर चं बूकिंग केलं आणि आता तो ओंकारेश्वराला निघाला होता. तिथूनच परिक्रमा सुरू होणार होती. तिथे तो एका लॉज मध्ये उतरला. संध्याकाळी जेवणाच्या वेळी त्याच्या शेजारी एक माणूस येऊन बसला. गोरा पण, दणकट देहयष्टीचा पन्नाशीच्या वयाचा, पांढरा नेहरू शर्ट आणि पायजमा असा पेहराव. प्रथमदर्शनीच छाप पडावी असा प्रसन्न चेहरा.

“नमस्कार, मी इथे बसलं तर चालेल ना ?” – गृहस्थ. 

पंडित ने मान हलवली. तो माणूस हसला. “देव दर्शनाला आलात ? त्यांनी विचारलं.” 

“नाही मी परिक्रमेला चाललो आहे.” – पंडित.  

“बस ने ?” - गृहस्थ. 

“हो. उद्या निघणार आहे.” – पंडित.  

“मी पण परिक्रमा करायला चाललो आहे. पण मी पायी जाणार आहे.” – गृहस्थ.  

“पायी खूपच कठीण असते म्हणतात. वरतून सात आठ महीने लागतात अस ऐकलं आहे, मग बस ने का नाही ? चोर दरवडे पण पडतात म्हणे.” पंडितने शंका काढली.  

“मी पण हेच ऐकलं आहे. पण नुसतं जगण्याला काय अर्थ आहे ? ते तर पशू पक्षी पण जगतात. अनुभव समृद्ध जीवन जगायचं असेल तर पायीच परिक्रमा करावी अस माझ्या गुरूंनी सांगितलं म्हणून पायी जाणार. अनुभव घेणार.” – गृहस्थ.  

“काय करता तुम्ही ?” – पंडित आता चौकशीच्या मूड मधे आला होता. 

“मी पौरोहित्य करतो. वयाची चौदा वर्षे मी शृंगेरीला होतो. आता कोल्हापूरला असतो.” – गृहस्थ.  

“बापरे, काय सांगटाय ? अहो मी नावाचाच पंडित आहे तुम्ही खरोखर पंडित आहात. नाव काय तुमचं ?” – पंडित. 

“मी कुलकर्णी. पण सगळे मला पुरोहित म्हणूनच ओळखतात. तुम्ही ?” 

“मी पण कुलकर्णीच” – पंडित. 

“पण आत्ता तर तुम्ही म्हणाला की तुम्ही पंडित ?” – पुरोहित. 

“माझं नाव पंडित.”  

“असं आहे होय !” – पुरोहित. 

“एवढा मोठा निश्चय तुम्ही केला आहे, परिक्रमेची वाट माहीत आहे ?” – पंडित. 

“होय. बरीच चौकशी केली आणि आता मार्ग तोंड पाठच झाला आहे. दिवसभरात किती चालायचं, कुठे मुक्काम करायचा कुठे काय सोई आहेत सगळं आखून झालं आहे. साधारण पांच ते सहा महीने लागतील परत ओंकारेश्वर ला यायला.” – पुरोहित म्हणाला.  

“कोण कोण आहेत बरोबर ?” पंडितनी विचारलं.

“मी एकटाच. तुम्ही येता ?” पुरोहितचा प्रतिप्रश्न.

“नाहीतरी मी भटकंती करायलाच निघालो आहे, तेंव्हा विचार करतोय की काय हरकत आहे पायी परिक्रमा करायला ? हा ही अनुभव घेऊन पाहावा.” पंडित म्हणाला.

“अरे वा ! मग तर छानच होईल मला पण कंपनी मिळेल.” पुरोहित म्हणाला. त्याला आनंद झालेला दिसत होता. “बोलता, बोलता वाट कशी सरेल ते कळायचं पण नाही. परत अडचणीच्या काळात कोणी बरोबर आहे याचाच दिलासा असतो. विचार करा आणि सांगा.” 

 

क्रमश: .........

दिलीप भिडे पुणे 

मो :9284623729 

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू