पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वातंत्र्याची कथा ...

स्वातंत्र्यदिनाच्या सर्व सच्या भारतीयांना हार्दिक शुभेच्छा          भारतीय स्वातंत्र्य युद्धाची आणि विशेषतः क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती आणि गौरवगाथा सांगणारी मराठी भाषेतील ही एकमेव कविता .....

~~~~~~~~~~~~~~

 

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची

स्वातंत्र्यास्तव प्राणपणाने लढले जे त्या योद्ध्यांची ॥धृ॥

 

गोरे इंग्रज आले होते भारतात व्यापाराला

वैभव बघुनी इथले सुटले पाणी त्यांच्या तोंडाला

राजे अमुचे भांडत होते देत निमंत्रण वैर्याला

ना ओळखले त्यांनी मुळीही गोर्यांच्या त्या काव्याला

गुलाम झाला देश आमचा सत्ता आली ब्रिटीशांची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥१॥

 

ठिणगी पहिली पडली होती सत्तावनच्या युद्धाने

बलिवेदीची पहिली पूजा बांधिली मंगल पांडेने

नानासाहेब,तात्या टोपे आणि जफरच्या रक्ताने

पेटुन उठले ज्वालाग्राही यज्ञकुंड स्वातंत्र्याचे

चमकुन उठली बिजलीसम तलवार झाशीच्या राणीची 

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥२॥

 

अतिउत्साह नि तंत्राभावी हार जरी झाली अमुची

सत्तावनच्या संग्रामाने झोप उडाली ब्रिटिशांची

पुन्हा न व्हावा देशामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

म्हणून केली गोर्या साहेबाने काँग्रेस स्थापन

करी आर्जवे काँग्रेस राणीस काही सुविधा देण्याची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥३॥

 

समर संपले सत्तावनचे ठिणगी परी ना विझली ती

वासुदेव बळवंत रुपाने पुन्हा पेटुनी उठली ती

रामोश्यांना घेऊन सोबत फौज जमविली फडक्यांनी

कितीक वर्षे झुलत ठेवले इंग्रज गनिमी काव्यांनी

क्रांतिकारक आद्य म्हणूनिया पूजा बांधू या त्यांची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥४॥

 

वासुदेव बळवंतासोबत रत्न मिळाले देशाला

अवघा भारत 'लोकमान्य' नावे ओळखतो त्याला

"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक" ठणकावी तो गोर्यांना

विद्रोहाचा जनक वाटला तो तर शासनकर्त्यांना

क्रांतीकारकां दिशा दाविली त्याने पुढल्या क्रांतीची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥५॥

 

इतिहासा तू थांब जरासा बघ ह्या अनुपम दृश्याला

तीन सहोदर बंधूंनी त्या वरिले हो वधस्तंभाला

चाफेकर बंधू सूड उगविती अत्याचारी अधमांचा

आयर्स्ट आणि रॕण्ड वधी ते आशिष घेऊन टिळकांचा

इतिहासातही तोड नसे मुळि चाफेकर बलिदानाची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥६॥

 

विझली नव्हती आग चितेची चाफेकर त्रिबंधूंची

त्या आगीतून मूर्ति प्रगटली वीर सावरकर यांची

मदनलाल,हरदयाल बापट आणि निरंजन पालांना

वेड लाविले स्वातंत्र्याचे त्याने अगणित युवकांना

'अभिनव-भारत' होई प्रेरणा तरुणा भारत-भक्तीची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥७॥

 

कुलपतीच तो क्रांति-पीठाचा क्रांतीचा तो व्याख्याता

मंडित करुनी क्रांतितत्व तो पुरस्कारि प्रत्याघाता

गुहेत शिरुनी सिंहाच्याही ललकारी तो सिंहाला

देशभक्तीचा परमादर्श झाला तो ह्या राष्ट्राला

कितीक मृत्यू मारुन झाला मृत्युंजय त्या तात्याची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ॥८॥

 

वंग-भंग करताच पेटुनी उठला पुरता बंगाल

बंगालाच्या सवे भडकला अवघा भारतिचा लाल

"वंदे -मातरम "घोष निनादत होता गल्लीबोळात

अणुध्वमांची स्फोट मालिका होति तेधवा जोरात

तरूण आणि तरुणी करिती चढाओढ हौतात्म्याची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||९||

 

विदेशातल्या क्रांतिवीरांनी गदर पार्टी हो निर्मियली

खानखोजे पंडित कान्शिरामांनी ती स्थापियली

हरदयाल लालाजी यांनी शक्ति गदरची वर्धियली

अमेरिका,सिंगापुर,इंग्लंड क्यानडात ती सळसळली

सहस्त्रावधी क्रांतिवीरांच्या अंतर्बाह्य उठावाची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||१०||

 

भगतसिंग आजाद बिस्मिल शचिंद्रनाथ अश्फाकाने

अवघा भारत पेटुन उठला जालियनवाला कांडाने

सोन्ढर्स वधुनी सूड उगविला राजगुरू ह्या वीराने

लंडनचेही तख्त हलविले असेम्ब्लीतल्या स्फोटाने

असेम्ब्लीवरी बॉम्ब फेकुनी नजर वेधली विश्वाची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||११||

 

विश्वची अवघे चकित जाहले चितगावच्या त्या घटनेने

शस्त्रागारा ब्रिटिशांच्या जिंकिले सूर्यसेन दादाने

शहरहि केले काबिज आणी ध्वज विजयाचा फडकविला

लढता लढता साठ विरांनी स्विकारले हौतात्म्याला

सरकार स्थापुनी केलि घोषणा देशाच्या स्वातंत्र्याची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||१२||

 

अंतिम धक्का जबरदस्त तो दिधला सुभाषबाबुंनी

फौज घेउनि स्वये निघाला आजाद-हिंदचा सेनानी

आसमंत भारुनिया गेला" चलो दिल्ली "च्या नार्यांनी

इम्फाल जिंकिले बघता बघता "कदम कदम "च्या तालानी

भारतभूचा कण कण गातो गाथा त्यांच्या शौर्याची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||१३||

 

अभियोग चालला लाल किल्यावर नेताजींच्या वीरांचा

बांधव अपुले दंडित बघता रोष जाहला सेनेचा

कितीक स्थानी बंड करूनी झाले सैनिक विद्रोही

भारतिच्या स्वातंत्र्य पालखीचे ते भोई निर्मोही

ब्रिटिशांनाही आलि कल्पना अपुल्या सर्व विनाशाची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||१४||

 

काँग्रेससुद्धा करीत होती चळवळ ह्या स्वातंत्र्याची

लाल बाल सरदार नेहरू आणि गांधीजी यांची

सभा नि आंदोलने करूनी जागृत केले जनतेला

स्वातंत्र्याची महती त्यांनी समजविली हो रयतेला

युद्धामद्धे स्वातंत्र्याच्या जनतेच्या सहभागाची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||१५||

 

अशाच वेळी घडून आले महायुद्ध ते दुसरे हो

त्यात जिंकले इंग्रज तरी ते झाले पुरते खच्ची हो

सैन्यशक्ति नि अर्थशक्तिही नुरली त्यांच्या जवळी हो

भारतभूच्या स्वातंत्र्याचा म्हणुन घेतला निर्णय हो

स्वीकारोक्ती बघा बंधुनो प्रधान -मंत्री अॕटलीची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||१६||

 

म्हणून म्हणतो....

 

म्हणू नका स्वातंत्र्य मिळाले शांती आणि अहिंसेने

म्हणू नका स्वातंत्र्य मिळाले आर्जव आणि विनंतीने

नव्वद वर्षे संगर करुनी स्वातंत्र्या अम्ही मिळवियले

लाख लाख बलिदान देउनी स्वातंत्र्या अम्ही जिंकियले 

वीरांचा अवमान न व्हावा चाड असू द्या सत्याची

या मित्रांनो कथा सांगतो स्वातंत्र्याच्या युद्धाची ||१७||

 

     कवी -- अनिल शेंडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू