पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कृतघ्न

कृतघ्न आहेत ते सारे 

बेईमान आहेत ते सारे 

जे म्हणतात --

हे स्वातंत्र्य मिळाले अहिंसेने !

हे स्वातंत्र्य मिळाले शांततेने !

रक्ताचा थेंबही न सांडता !!

मी त्यांना विचारतो ---

मंगल पांडेच्या मंगल हस्ते आरंभलेल्या 

सत्तावनच्या यज्ञातील आहुती 

काय रुधिराच्या नव्हत्या ?

इंग्रजांच्या नाकात दम आणणाऱ्या 

वासुदेव बळवन्तांच्या धमन्यातून 

काय पाणी वाहत होते ?

जगाच्याही इतिहासात तोड नसलेल्या 

चाफेकर बंधूंच्या बलिदानाला तुम्ही विसरलात ? 

होय ! होय, तुम्ही विसरलात 

मदनलाल धीन्ग्राच्या गुरूला ,

सुभाषचंद्रांनाही स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणाऱ्या 

क्रांतिकारकांच्या सम्राटाला -

स्वातंत्र्य-वीर सावरकरांनाही तुम्ही विसरलात !

आझाद ,भगतसिंग , राजगुरू,

अश्फाक , खुदिराम , सूर्यसेन ,

कान्हेरे. पिंगळे , सुखदेव ,

हरदयाळ , रासबिहारी, खानखोजे,

आणि हज्जारो हज्जारो क्रांतीवीर 

ज्यांनी स्वातंत्र्याची पहाट दाखविण्यासाठी तुम्हाला

कवटाळले फाशीचे दोर ,

त्यांची नावे घेतांना 

तुमच्या जिव्हांना विटाळ होता काय ?

मग नका उच्चारू ती नावे 

(कारण ती उच्चारण्याचीही तुमची लायकी नाही )

पण लक्षत ठेवा ---

म्हातारीने कोंबडं दडवल , म्हणून, 

सूर्य उगवायचा थांबत नाही !

आणि ---

स्वातंत्र्याचा खरा इतिहास 

दडवण्याचा प्रयत्न केलात ,

तर, ---

इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही !

इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही !

 

                   कवी-- अनिल शेंडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू