पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाग ३

*भाग तीन*

 

          देश स्वतंत्र झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला जिजीने जमिनीची खाते फोड करून घेतली. तरीही थोडी फार जमीन हातातून गेलीच पण तरीही जिजी खचली नाही. तिचे आयुष्य जणू खडतर प्रवास होता. खाचखळग्यातून वाट काढताना आणि आपला मानमरातब जपताना ती थकून जात असे. वडोली या गावात माझी जिजी म्हणजे एक मानकरी होती तिच्या परवानगी शिवाय पानही हालत नसे.

 

         मोठ्या तिन्ही मुलींची लग्ने तिने मामा असतानाच थाटामाटात लावून दिली.आपल्या बरोबर त्यांच्या बाळंतपणात तिने त्यांची खूप काळजी घेतली. समवयस्क असल्यामुळे या चौघींमध्ये आई मुली पेक्षा मैत्रीचे नाते जास्त जवळचे होते नवी आई अगोदरच आवडत होती पण आपल्यासाठी तिची धडपड पाहून त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल आदर दुणावला होता.वडीलांच्या जाण्याने सर्व जण पोरके झाले. आतापर्यंत खंबीरपणे उभी असलेली जिजी पूर्ण पणे कोसळली. जिजीची ही अवस्था पाहून फायदा घेणाऱ्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली त्यावेळी मात्र ती पुन्हा पेटून उठली. संसाराची सारी सुत्रे तिने आपल्या हातात घेतली. तीन मुली आपल्या सासरी सुखी होत्या . माहेरपणाला आल्यानंतर भावंडांचे खूप लाड करायच्या. मुले आता मोठी होऊ लागली होती त्यांच्या शिक्षणासाठी तिने त्यांना कोल्हापूर या विद्येच्या माहेरघरी ठेवले. घरात नोकर चाकरांची कमी नव्हती पण सर्वाना सांभाळत असताना तिची तारांबळ उडायची. खरंच एवढे मोठे आव्हान सांभाळणारी जिजी ज्यावेळी माहेरी यायची तेंव्हा आई आणि दोन्ही काकींच्या तोंडाला कुलूप लागायचं आपल्याच घरी त्याघाबरत असायच्या. जिजीच्या दरबारी चूकीला माफी नसायची. आम्हां मुलांची मात्र खूप मजा असायची. पण जिजीचा राग कधी तरी अनावर झाला की ,"मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिली", म्हणून आबा आणि तात्यांशी भांडायची तेंव्हा दोघेही शांत का बसायचे? आम्हाला काही हे कळायचे नाही ती अशी का भांडते.भांडण झाले की जोतिबाच्या देवळात नाही तर आडावर रुसून बसायची मग मात्र कमळा म्हणजे माझी आजी तिला समजवताना ती म्हणेल ते मान्य करायची.

 

            जिजीच्या घरी जायचे म्हणजे काय मजा असायची. धनधान्यांनी खचाखच भरलेले घर डोळ्यात भरायचे उसाबरोबर तूर, मका ,हरभरा, ज्वारी, तसेच इतर कडधान्य तिच्या वाड्याच्या पडवीत नेहमी पोत्यापोत्यानी रचलेले असायचे. व्यापारी जेंव्हा धान्य खरेदी करण्यासाठी येत तेंव्हा काट्याजवळ सुध्दा तिच उभी असायची पण तिच्या डोक्यावरील पदर कधीच घसरला नाही .उंची ईरकल नेसलेली गोरीपान जिजी नेहमीच करारी दिसायची.त्यामुळे फसवणूक होण्याची भीती जरासुद्धा नसायची. कधीच न शिकलेल्या जिजीचा हिशोब इतका पक्का कसा ? हा प्रश्न कोणालाही पडायचा. एकंदरीत सारेच व्यवस्थित चालू होते .

 

 

 

 

क्रमशः

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू