पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाग ५

*भाग पाचवा*

 

          संसाराच्या जबाबदारीचं ओझं मुलांच्या खांद्यावर देऊन जीजी आता भक्ती मार्गाला लागली होती.कधीही न शिकलेली जिजी एवढे अभंग कसे पाठांतर करू शकते ? हे कोडं सर्वांच्या समोर होतं. जिजीचा राग आणि हट्ट जणूकाही कुठेतरी पळून गेल्यासारखा झाला होता. जिजी एकदम शांत बसून राहायची.कधी तिची शांतता खूप काही बोलून जायची पण कधी तिला काय म्हणायचं तेच कधी कोणाला कळले नाही. वयानुसार तिचे हात पाय हलू लागले होते मान सुद्धा हालू लागली होती त्यामुळे शरीराने नव्हे तर मनानेसुद्धा ती खचू लागली होती . मुलांची लग्न झाल्यामुळे तिचे जरब कमी झाली होती. तिचा दरारा कमी झाला होता. आयाळ काढलेल्या सिंहासारखी तिची अवस्था झाली होती. जिजी कोलमडून पडली होती.

 

           एके दिवशी शेतात फिरायला गेलेली जिजे वाटेतच चक्कर येऊन पडली. कराडला क्षीरसागर डॉक्टरांकडे तिला ऍडमिट करण्यात आले.'जिजीला बरे नाही आणि ती झोपली ' असं कधीच झाल नव्हतं पण आज मात्र छातीत दुखतय उलटी होते म्हणून तिला सलाईन ऑक्सिजन सगळं काही चालू होत. सलग दहा दिवस जिजी क्षीरसागर डॉक्टरांकडे राहिली. गावची यात्रा म्हणून तिने डॉक्टरला ही घरी सोडायला लावले.

 

          जिजी घरी आली ती एका जागी बसून राहिली तिच्या सेवेला सगळे घरदार तयार झाले .पहावत नव्हते ,कधी एका जागी न बसलेली जिजी आज एका ठिकाणी बसून आहे याचे तिचे तिलाच वाईट वाटत होते . गावची यात्रा असल्यामुळे सात ही मुलं एकत्र आलेली पाहून जिजीला खूप आनंद झाला. रात्रभर तिने सर्वांशी मनसोक्त गप्पा मारल्या जणू काही ते क्षण ती आपल्या मनात साठवून ठेवत होती .जिजीमध्ये एक नवीन उत्साह संचारला होता

 

        सर्वजण गप्पात रंगले होते इतक्यात जिजी अंथरुणावर कोसळली तिला दवाखान्यात हलवण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस तुटल्यामुळे जिजी कोमात गेली होती.

 

           आयुष्यभर मानाने जीवन जगलेली जिजी आज अंथरुणावर पडलेली पाहून मन भरून येत होतं. तिला अश्या अवस्थेत कधीच कोणी बघितलं नव्हतं. सर्व मुलांबरोबर नातवंडं ,भावंडं सर्वजण गोळा झाले . दवाखान्यात व्हेंटिलेटरवर पडलेल्या जिजी कडे पाहून अनेक प्रश्न मनात येत होते . काय हे तिचे आयुष्य ? हसण्या खेळण्याच्या वयातच संसाराचं ओझं तिच्या कोवळ्या खांद्यावर का यावं?आपल्याच वयाच्या मुलींचं मातृत्व तिच्या वाट्याला का यावं? का तारुण्यातच तिच्या नशिबात असं वैधव्य यावं? का तिने संपूर्ण संसाराचा हा गाडा ओढण्यात झिजून जावं? कधी तिच्या वाट्याला स्वतःचा असा एखादा आनंदाचा क्षण आला होता का? तिने आपल्या मुलांवर भरभरून प्रेम केलं पण खरोखरच त्यांच्याकडून तिला तितकेच प्रेम मिळाले असेल का? तिच्याबद्दलच्या भीतीचे रूपांतर कधीच प्रेमात करता आलं नसतं का ? आज अशा निस्तेज पडलेल्या जिजीकडे पाहिले तेव्हा तिचा पंच्याऐंशीवर्षाचा प्रवास असा नजरेसमोरून जाताना सर्वांच्याच डोळ्यातून पाणी येत होते . दिवस मावळतीला आला होता. सर्वत्र उदासीनता जाणवत होती. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती . सगळेच दवाखान्याच्या व्हरांड्यात रेंगाळत होते. डॉक्टरांची धावपळ चालू होती पण जिजी मात्र या सर्वांच्या पलीकडे पोहोचल्यासारखी निस्तेज पडून होती संपूर्ण दिवस प्रयत्न करून सुद्धा डॉक्टरांच्या हातात यश येत नव्हतं शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि बोलून गेले ,"आय एम सॉरी ,आम्ही त्यांना वाचवु नाही शकलो". हे ऐकताच सर्वांनी टाहो फोडला "जिजी, तू आम्हाला सोडून गेलीस".

 

 

 

 

*सौ. विजया संजय शिंदे*

 

*विरार*

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू