पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गोकर्ण महाबळेश्वर यात्रा

गोकर्ण महाबळेश्वर यात्रा...

भाग 1. 21 आणि 22 जानेवारी 2023

     योग जुळून आले अन् सद्गुरू कृपा झाली की सगळचं जुळून येतं असे म्हणतात. मग तो योग कुठलाही असो. असेच गोकर्ण महाबळेश्वरला ध्यानी मनी नसताना जाण्याचा योग आला.आम्ही घरातलेच सगळे दिर जाऊ, नणंद जावई गोकर्ण महाबळेश्वर दर्शनास जायला निघालो. मध्ये कोविड -19 मुळे सगळेच ठप्प झाले होते. मी स्वतः आधी आई वडिलांबरोबर जाऊन आले होते. पण त्याला आता बरीच म्हणजे जवळपास 35वर्षे झाली. खूप बदल झाले, माझ्यात आणि शंभू महादेवाच्या मंदिरात पण. असो.

     जवळपास 16-17 तासांचा प्रवास करून आम्ही गोकर्ण रोड च्या स्टेशनवर उतरलो. अगदी साधे फरशी सुद्धा नसलेले छोटेसे रेल्वे स्थानक. स्थानकाच्या बाहेर आल्यावर तेथे ग्रामीण भागात आल्यासारखे वाटले. झाडाच्या पारावर यात्रेकरू बसलेले, जिकडे नजर जाईल तिकडे नारळी पोफळीची दाट झाडी अन् नारळाच्या झावळीच्या सावलीत छोटेसे ऑटो स्टँड. ऑटो मधून आम्ही जात असताना दुतर्फा दाट झाडी, आणि वळणावळणाची वाट मागे टाकत हॉटेल ओम इंटरनॅशनल या हॉटेल मध्ये डेरेदाखल झालो. शांत परिसर कुठे गोंगाट नाही, प्रत्येक जण आपल्याच कामात मशगुल असलेले गाव. 

     गोकर्ण महाबळेश्वर येथे भगवान शिवाचे आत्मलिंग आहे. राक्षसांचा राजा रावण याची आई कैकसी शिवभक्त होती. ती रोज वाळूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असे. शिवभक्त रावणाच्या हे लक्षात आले की रोज नवे शिवलिंग बनवावे लागते आहे. रावण जसा शिवभक्त होता तसाच मातृभक्त पण. होता. त्याने शिवाची घोर तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या पाहून शिवशंकर प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. रावणाने आईसाठी त्यांचे आत्मलिंग मागितले. भोळासांबच लगेच स्वतःचे आत्मलिंग काढून रावणाला दिले. आणि अट घातली की कुठे मध्ये ठेवले हे आत्मलिंग तर तिथेच स्थापित होईल. जिथे हे आत्मलिंग असेल ते स्थान कैलास होईल. आत्मलिंग रावणाला मिळाले. तो आनंदात निघाला. इकडे सगळे देव घाबरले.रावण हा महापराक्रमी होता पण मुळातच दृष्ट वृत्तीचा होता. सगळे देव श्री विष्णू कडे गेले. घडलेली सगळी हकीकत ऐकून श्रीविष्णू नी हे कार्य पार पाडायला श्रीगणेशाला पाचारण केले. बाप्पा निघाले बाल गुराख्याचे रुप घेऊन रावणाच्या मार्गावर. श्रीविष्णू नी आपले सुदर्शन चक्र सूर्याच्या समोर धरले त्यामुळे रावणाला वाटले सूर्यास्त झाला आहे. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याला सायंसंध्या करायची होती पण आत्मलिंग खाली ठेवायचे नाही अशा द्विधा मनस्थितीत काय करावे कळेना. समोर एक बाल गुराखी दिसला. त्याला रावणाने विनंती केली. गुरख्याने मान्य केले. पण लवकर या सायंसंध्या करून,मी खूप लहान आहे आणि हे आत्मलिंग खूपच जड आहे. मी तीन आवाज द्यायच्या आत या. रावणाने लगेच आत्मलिंग बाल गुरख्या जवळ दिले आणि तो संध्या करायला गेला. इकडे गुराख्याने पटापट तीन वेळा आवाज दिला अन् लिंग खाली ठेवून दिले. रावण तिकडून नको ठेऊ सांगत होता तरी त्याचा काही फायदा झाला नाही. रावण धावत येऊन ते लिंग उचलू लागला पण हालेना. इकडे आपले काम झाले म्हणून सर्व देवांनी गणपतीवर पुष्पवृष्टी केली. हे पाहून रावणाच्या लक्षात आला सगळा प्रकार. चिडून त्याने गणपतीच्या डोक्यावर गदा प्रहार केला. आत्मलिंग गदा गदा हलविले नि उचलायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा आकार गाईच्या कानासारखा झाला. त्यामुळे गोकर्ण आणि महाबलाढ्य रावणाने ते गदा गदा हलविले म्हणून महाबळेश्वर असे हे गोकर्ण महाबळेश्वर. यांच्या दर्शनाने सर्व पापनिष्कृती होते असे याचे महत्व आहे. मानव जन्मात एकदा तरी याचे दर्शन घ्यावे. कलियुगातील दत्ताचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ येथे तीन वर्षे राहिले होते. येथे ईश्वराचे हे रूप पाहून अष्टसत्विक भाव जागृत होतात. पूर्वजांच्या भाग्याने आणि सद्गुरू कृपेने असे दर्शन मला लाभले.

     संध्याकाळी येथील गणपती मंदिरात दर्शन घेतले. अप्रतिम मूर्ती, मंदिर ही सुंदर. रावणाने गदाप्रहार केल्याची खूण बाप्पाच्या डोक्यावर दिसते. भक्तवत्सल कृपनिधी काय कसे आणि कुठे दृष्टांत देऊन आपली लीला दाखवतात हे त्यांचेच त्यांना ठावे...

 

क्रमशः

रसिका राजीव हिंगे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू