पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाग 1

गौतमी ने मनाशी पक्कं ठरवून गेल्या आठवड्यापासून चालणाऱ्या विचार चक्राला विराम दिला आणि पुढच्या वाटचाली साठी योजना तयार करू लागली. तेवढ्यात तिचा मोबाईल घणघणला,बघितले तर वैष्णवी होती. काही क्षण विचार करून तिने आत्मविश्वासाने फोन घेतला- हॅलो, हां वैष्णवी बोल. 

वैष्णवी-अगं मी काय बोलू ? तुझा निर्णय झाला का ?काही आशा आहे का? आता नाही गं अजून सोसवत , धीर सुटत चाललाय माझा.

गौतमी - हो माझा निर्णय झाला आहे , करूया आपण प्रयत्न पण आजचा दिवस अजून दे मला आणि हो जमल्यास भेटायला ये थोडा वेळ.

वैष्णवी- हो हो नक्की. तू सांग कधी येऊ ते? बरं तुला काही हवंय का ?

गौतमी- नक्की काय ते इतक्यात सांगता येणार नाही पण हां तुझी साथ मात्र भक्कम हवी बरं ?

वैष्णवी- अगं हो ती तर आहेच. चल भेटू या,येतेच मी. फोन बंद करून गौतमी ने  सायलेंट मोड वर टाकला आणि वैष्णवी च्या समस्येवर विचार करता करता तिला 20/22 वर्षांपूर्वी चे दिवस आठवले. त्यावेळी गौतमी ने नवीनच योग ची पदवी घेऊन वर्ग घेण्यास सुरुवात केली होती. तिला खूप छान प्रतिसाद मिळून 3/4 वर्षातच ह्या क्षेत्रात तिचा चांगला जम बसला होता. तिने मोठ्ठा  हॉल  घेऊन व्यावसायिक रितीने नियमित योग चे वर्ग, प्रशिक्षण, चिकित्सा, परामर्श असं सर्व सुरू केलं आणि तिची दिनचर्या अगदी व्यस्त झाली .  योग मुळे लोकांना लाभणारे आरोग्य आणि आनंद बघून ती अंतरी समाधानी होत होती. आर्थिक प्रगती तर होत होतीच पण हे समाधान तिच्यासाठी अत्यंत मौल्यवान होतं.


   त्याचवेळी अनेक "अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली" लोकं चहूंकडे योग शिबिरं,ध्यान शिबिरं, विपश्यना शिबिरं,कुंडलिनी जागरणची शिबिरं 7 ते 15 दिवसांत पारंगत करण्याचे आश्वासनं देऊन खूप फी घेऊन निर्धास्तपणे चालवत होती. भोळी -भाबडी माणसं अश्या जाहिरातींच्या नादी लागून मागचा पुढचा विचार न करता अनावश्यक  फी भरून ह्या शिबिरांना गर्दी करत होती. शिबिराच्या मोठ्या गर्दीत घाई-घाई ने बरंच काही शिकून घेण्याच्या नादात लोकांना अर्धवट ज्ञान मिळत होतं. कुणी काही प्रश्न विचारले तरी " शिबिराच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे व पुढील मार्गदर्शन मिळेल" असं सांगून वेळ निभावून नेली जात असे.  शेवटच्या दिवशी काही थातुरमातुर उत्तरे देऊन खूप गाजावाजा करून समापन समारोह पार पडे. शिबिरं संपल्यावर अनेकांना अनेक प्रकार चे त्रास उद्भवत होते पण ह्या त्रासांवर उपचार करायला किंवा उपाय सांगायला कुणीही जवाबदार व्यक्ती उपलब्ध नसे.  त्यामुळे आपापसात बोलून, चर्चा करून वेळप्रसंगी डॉक्टर कडे जाऊन कसे बसे बरे होऊन जात.  ह्या सर्व चर्चा तिच्या नियमित वर्गात येणाऱ्या लोकांकडून तिला कळत असे पण कोणाच्या ही लक्षात येत नसे की हे त्रास कशामुळे होत आहेत आणि उघडपणे बोलायचं धाडस ही कुणी करत नव्हते.  अश्या परिस्थितीत गौतमीला लोकांची मदत करावी असे मनापासून वाटे पण प्रत्यक्षात कुणी समोर न आल्याने आणि स्वतः च्या व्यस्ततेमुळे तिनेही जास्त लक्ष दिले नव्हते आणि हळूहळू सर्व मागे पडत गेले.

 वैष्णवी, तिची जिवलग मैत्रीण एका जीवघेण्या समस्येचा सामना करत होती .  तिचा पति आलोक एका विचित्र आजाराला बळी पडला होता. अचानक त्याला पित्ताचा खूपच त्रास होऊ लागला,नंतर  हातापायांची,डोळ्यांची जळजळ जाणवू लागली, पुढे सर्वांगाची आग होऊन लाही लाही होऊ लागली. हळूहळू त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आणि सर्वच हाताबाहेर गेलं. ह्या सर्व त्रासांमुळे  त्याची नोकरी पण गेली. त्याला असा दुहेरी मार बसत होता. अनेक डॉक्टरांचे उपचार, मानसोपचारतज्ञांचा  सल्ला घेऊन ही कुठलेही उपाय लागू पडत नव्हते. शेवटी "अवसाद " म्हणून औषधोपचार सुरू झाला आणि दिवसातला अधिकाधिक वेळ त्याला झोपवून ठेवण्यात येत होते. तरीही जाग आल्यावर त्याला सांभाळणे कठीण होत असे. कधी कधी तो अनामिक भीतीने भयाक्रांत  होऊन ओरडायचा, पळत सुटायचा असं सर्व सुरू होतं. 

जवळ जवळ महिनाभर आधी गौतमी ने सहज वैष्णवी ला फोन केला होता आणि "कशी आहेस गं "? विचारल्या बरोबर वैष्णवी ने हे सर्व काही सांगितले ते ऐकून गौतमी स्तब्ध झाली होती. तेव्हां पासून ती रोज वैष्णवी शी बोलत होती, तिला धीर देत होती आणि गोष्टींच्या ओघात हे कधी,कसं सुरु झालं ? कोण कोणते उपचार करून झाले? अशी सर्व माहिती ही घेत होती. 


अश्यातच तिला एक धागा सापडला आणि त्यांनतर ती त्याला भेटायला तिच्या घरी गेली. घरी गेल्यावर तिला सर्व चित्र स्पष्ट झालं आणि तिची खात्री पटली की तिचा संशय बरोबर आहे.   तिने वैष्णवी ला आपलं मत सांगितलं पण त्यावर उपाय काय ? आणि उपचार करणार कोण ? मग वैष्णवी तिच्या मागेच लागली की "हे आता तूच कर" गौतमी ने तिच्या कडून काही वेळ मागून घेतला.   गेला पूर्ण आठवडा ती ह्यावर विचार करत होती आणि शेवटी आपल्या मैत्रिणी ला मदत करण्याचे ठरवून आज तिने वैष्णवी ला होकार कळवला होता. 

ह्या विचार चक्रातून भानावर येऊन ती पटापट कामाला लागली.   तिला कुठली ही चूक होऊ द्यायची नव्हती. आपलं सगळं शिक्षण, अनुभव आणि आतापर्यंत संपादित सर्व ज्ञान पणाला लावून आलोक ला पूर्ववत करून मैत्रिणीला आनंदी बघायचं होतं. आतापर्यंत तिने अनेक व्याधीग्रस्त लोकांना आसनं,प्राणायाम,ध्यान,ओंकार साधना, योगनिद्रा,ऍक्युप्रेशर,रेकी ह्या सर्वांच्या सहाय्याने आनंदी केलं होतं पण त्या सर्वांची कारणे निराळी होती व हे प्रकरण वेगळंच होतं.त्या सर्वांची कारणं बाह्य प्रकाराची होती पण ह्याचं कारण आंतरिक होतं. म्हणजे आपणंच लावलेल्या दिव्याने आपल्याच घराला आग लागावी असं झालं होतं .  आता मात्र तिच्या सर्व अनुभवांची जणू काही परीक्षाच  होती. सगळी कडून निराश झालेल्या वैष्णवीच्या मुखावर आनंद बघण्याचं समाधान तिला हवं होतं. सर्व बाजूंनी विचार करून ती एक एक तपशील डायरीत नोंदवून घेत होती कारण तिला प्रत्येक पाऊल फार सांभाळून उचलायला हवं होतं. मनोमन शारदे ला नमन करून तिने आपली योजना आखली. तिने स्वतः लक्ष्य निर्धारित केलं की एक ते तीन महिने प्रयत्न करायचे अर्थात पहिल्या महिन्यांनंतर काही प्रगती होताना दिसत असली, तरंच तीन महिने पर्यंत प्रयोग चालू ठेवायचा. तिने प्रथम 10 दिवसांच्या योजने ची एक एक बारीक तपशील लिहून घेतली तेवढयात वैष्णवी आलीच.

गौतमी ने तिला सर्वप्रथम त्यांच्या खोलीत लागलेले चित्र काढून त्याजागी आलोकचा  त्याच्या मुली सोबत खेळतानाचा किंवा साधा हसरा फोटो आणि एक पूर्ण परिवाराचा म्हणजे आई,आलोक,तू आणि सौम्या असे समोरच्या भिंतीवर लावायला सांगितले. "त्याच्या आहारात दूध पाणी,फळांचा रस,ताक,लिंबू सरबत,कोकम सरबत,बेलफळाचं  सरबत,सोलकढी,नारळपाणी, ताजी फळं आणि गायीचं तूप आवर्जून असलेच पाहिजे. तुम्ही तिघींनी त्याला काय झालं ? कसं वाटतंय ? काय होतंय ? काही होतंय का ? असले प्रश्न अजिबात विचारायचे नाही. काळजी घ्यायची पण व्यवहार सहज आणि चेहरे आनंदी ठेवून. तुमच्या कडे पाहून त्याला चांगलं वाटायला पाहिजे.  मग पुढे आपण बोलूच आणि हो, त्याची औषधं आहे तशीच सुरू ठेव.  वैष्णवी आपल्याला खूप धीराने घ्यावे लागेल हा एक प्रयोगच आहे आपण एक महिना बघू प्रयत्न करून ".वैष्णवी म्हणाली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू सांगशील तसेच सर्व मी करेन. 

 घरी जाताना वैष्णवी फळं, नारळ इत्यादी साहित्य घेऊन गेली आणि रात्री पासूनच ती तयारी ला लागली. आलोक ला जेवण ,औषधं, दूध पाणी देऊन झोपवून ती आता फोटो धुंडाळू लागली. दोन फोटो वेगळे काढून तिने सासूबाई आणि मुलीला सर्व काही सविस्तर समजावून सांगितले आणि सौम्या ला ते फोटो भिंतीवर लावायला सांगून तिघींच्या जेवणाची तयारी करू लागली. सौम्या ने बाबा ला बरं वाटेल ह्या आशेने आणि उत्साहाने दोन्ही फोटो छान फ्रेम केले आणि आईला दाखवले तिने लगेच दोन्हीचे फोटो गौतमी ला पाठवले तेव्हा ती म्हणाली "तुमच्या पारिवारिक फोटो ला थोड्या सौम्य, शांत वाटणाऱ्या रंगाची फ्रेम कर, दुसरी चटक रंगाची आहे ती असुदे".

जेवणं उरकून दोन्ही फोटो भिंतीवर लाऊन तिघी झोपी गेल्या. अचानक रात्री आलोकचा आवाज ऐकून वैष्णवी उठली. आई आणि सौम्या पण हादरून उठल्या. आलोक दोन्ही गुढघ्यांमध्ये डोकं खुपसून थरथरत होता आणि किंकाळ्या मारत होता लगेच वैष्णवी ने मोठा लाईट सुरू केला तेवढ्यात आई येऊन "अरे काय झालं”? विचारणार पण वैष्णवी ने डोळ्यांनी खूण करून त्यांना शांत रहायला सांगितले मग त्या आलोक जवळ बसून त्याच्या पाठीवरून, डोक्यावरून मायेने हात फिरवू लागल्या आणि सौम्या गुणगुणु लागली"गब्बर सिंग ये कहके गया जो डर गया वो मर गया" वैष्णवी ने त्याला गार पाणी प्यायला दिले, हळूच त्याला लेटवले आणि गौतमी ने सांगितल्याप्रमाणे त्याच्या पायाच्या तळव्यांना हलक्या हाताने एरंडीचं तेल चोळू लागली. थोड्या वेळात आलोक झोपी गेला. 

सकाळी त्याने डोळे उघडले आणि समोरचे फोटो बघून तो न्याहाळत बसला. तेवढ्यात सौम्या हसत आली"अरे बाबा तू उठलास ? अग आई मस्त चहा ठेव,बाबा ब्रश करून येतोय" आणि तिथेच आवरा आवर करत गात होती "एक अंधेरा लाख सितारे ,एक निराशा लाख सहारे,सबसे बडी सौगात है जीवन, नादां है जो जीवन से हारे ". भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे बघत हळूच आलोक उठला, त्याने ब्रश करायला घेतला आणि सौम्याच्या गोड आवाजातलं गाणं ऐकत ब्रश करून बाहेर येऊन बसला. वैष्णवी चहा-बिस्किटं  घेऊन आली. आई पण आली सर्वांनी सोबत चहा घेतला आणि आनंदाने दिवसाची सुरुवात झाली.  तिघी आलोक वर बारीक नजर ठेवून आपल्या वागण्या, बोलण्यात प्रयत्न पूर्वक सहजता आणि हसरेपणा आणून त्याची काळजी घेत होत्या.  थोड्या वेळात थकवा जाणवतो म्हणून आणि औषधे घेतल्या मुळे आलोक झोपला.

वैष्णवी ने फोन करून सर्व काही गौतमी ला सांगितले तिला विश्वास वाटू लागला की हा प्रयोग यशस्वी होणार मनोमन तिने शारदेला वंदन केले.  एका आठवड्यातंच आलोक च्या वागण्यात फरक जाणवू लागला. त्याची सतत भेदरलेली नजर आता सामान्य होत होती. आता गौतमी ने सौम्या ला हिरवळ असलेले, पाण्याचा झरा असलेले असे निसर्ग रम्य चित्र खोलीत लावायला सांगितले तसेच आलोकच्या पलंगावरची  चादर,परदे, घालायचे कपडे सर्व पांढरे,आकाशी निळे किंवा हलक्या हिरव्या रंगाचे असावे आणि जमल्यास तुम्ही तिघी पण गडद-भडक रंग सध्या वापरू नका शक्यतो हलका गुलाबी, पिवळा, निळा,हिरवा असे शांत भासणारे रंग घाला.   रोजच सकाळी सौम्या आपल्या गोड आवाजात कधी"तुम आशा विश्वास हमारे,तुम धरती आकाश हमारे" तर कधी" गगन सदन तेजोमय, तिमिर हरून दे प्रकाश देई अभय" असे मनोबल वाढवणारे गाणे गात असे आणि दिवसाची सुरुवात आनंदी होत असे.  तसेच गौतमी ने आलोकच्या आईला सुचवले की "तुम्ही रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून जे काही स्तोत्रं म्हणता ते आता मनातल्या मनात न म्हणता मधुर आवाजात पण थोडं मोठ्या ने म्हणत जा,विशेष करून भीमरूपी आणि रामरक्षा. जमल्यास आलोकला सोबत घेऊन सर्व मिळून म्हणत जा ".

हे सर्व होता होता एक महिना झाला होता आणि आलोक च्या वागण्यात बराच फरक पडला होता, त्यामुळे गौतमी चा आत्मविश्वास वाढला आणि त्या तिघी पण आश्वस्त झाल्या. आता गौतमी ने सौम्या ला सरस्वतीचं चित्र काढायला सांगितले ज्यात तिच्या हातातील "वीणा" आणि जवळ "मोर" हे दोन्ही उठून दिसतील. शुभ्र कमळावर बसलेली,शुभ्र वस्त्र धारण केलेली शान्त, सौम्य,हसऱ्या शारदेचं सुंदर चित्र आणि तेही लाडक्या लेकीने काढलेलं असल्याने आलोकला खूपच आवडलं तो टक लावून बघत असे. अजून ही अधून मधून त्याला भीतीने कापरं सुटत असे पण थोड्याच वेळात तो शांत होऊन झोपून जात असे. 

3/4 दिवसांनी गौतमी वैष्णवी च्या घरी आली. त्यावेळी आलोक पुढच्या खोलीत सर्वां सोबत बसला होता. तिने आपल्याला काहीच माहिती नाही अश्या पद्धतीने सर्वांशी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता तिने आलोकला 30 मिनिटे घरातल्या घरात चालायला तयार केलं. आता त्याचा शारीरिक व्यायाम होऊ लागला त्यामुळे झोप व जेवण सामान्य होऊ लागले. वैष्णवी कडून रोज आलोकची माहिती मिळत होती. त्याचं 30 मिनिटे चालणं नियमितपणे होत होतं.  आता दोन महिने झाले होते आलोक बऱ्यापैकी स्थिरावला होता. "आता एक दिवशी तू आलोकला घेऊन माझ्या केंद्रात ये" असं गौतमी ने सुचवलं, त्याप्रमाणे वैष्णवी त्याला घेऊन गेली.

 

            केंद्रात गेल्यावर आलोक सोबत काय घडले पाहूया पुढच्या भागात. 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू