पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

१. वाल्या

रात्रीची वेळ. किर्रर्रर्र अंधार होता, रातकिड्यांच्या आवाजाशिवाय कोणाचाही आवाज येत नव्हता. आकाश सुद्धा मेघांनी व्यापल्या गेले होते. तीरकमठा घेऊन वाल्या तामसा नदीजवळ असलेल्या घनदाट अरण्यात लपून बसला होता. कधी कोणी प्रवासी येतो आणि त्याला आपण लुबाडतो याची वाट वाल्या बघत होता. त्याचे लक्ष पूर्णपणे पायवाटेवर होते. तेवढ्यात तिथून एक मुनीवर नारायणाचा जप करीत जात होते. वाल्याला आपले सावज सापडले. वाल्याने त्यांच्यावर बाण रोखला आणि तो म्हणाला,

'गोसावी, चल मुकाट्याने तुझ्याजवळ जे आहे ते इथे टाक. नाही टाकलंस तर तुझी हत्या करून तुझ्याकडून हिरावून नेईल.'

'बाबा, मी तपस्वी. माझी हत्या करूनही तुला माझ्याकडून तंबोरी, छाटी आणि चिपळ्या यांच्याव्यतिरिक्त काय मिळणार? तुला हे उपयोगाचे असेल तर सांग.', तपस्वी हसून म्हणाले.

वाल्या निरुत्तर झाला. मुनीवर पुढे बोलू लागले,

'दरोडे का घालतोस? किती लोकांना ठार मारले?'

वाल्याला आजवर असे प्रश्न कोणीच केले नव्हते. वाल्या उत्तरला,

'माझा बाप तुझ्यासारखाच ब्राम्हण. सुमती त्याचे नाव. देवभक्त होता. अनेक वर्ष तो आणि माझी आई निपुत्रिक होते. त्याने शेवटी उग्र तपस्या केली आणि त्यात प्राप्त झालेल्या आशिर्वादातून माझा जन्म झाला. माझे नाव त्यांनी 'वाल्या' असे ठेवले. भिक्षुकीतून मात्र आमच्या घराचे पोट भरेना. जेव्हा घरी दारिद्र्य, तेव्हा मला जन्माला घालण्याचा अट्टाहास तरी बापाने का केला, मला कधीच कळलं नाही. या अरण्यात अनेक कोळी लोकांची वस्ती आहे. ते सुद्धा आपल्या कुटुंबाचे पोट भरायला समर्थ आहेत, हे बघून मी त्यांच्या संगतीत राहू लागलो. ब्राम्हणाच्या पोटी जन्माला आलेलो मी कोळी झालो. इथून अनेक प्रवासी जातात, अनेकांकडे धन सुद्धा असते. त्यात थोडे मी माझ्या आनंदासाठी लुबाडायला लागलो. समाजाच्या लेखी ते पाप असले तरीही मला त्यात काहीही गैर वाटत नाही. माझे आई-बाप मात्र मला नेहेमी बोलत. माझा बाप म्हणे, मी मेल्यानंतर नरकात जाईल. म्हटलं जाऊदेत. जिवंतपणी नरक भोगण्यापेक्षा मेल्यानंतर भोगेल. एक दिवस माझे आई-बाप दोघेही वारले. आता मला बोलणारे पण कोणी उरले नाही. म्हणून मी आता दरोडे जोरावर धरले. एका कोळीणीसोबत संसार पण थाटला. चार मुलं झाली. दरोडे घालून मी मात्र त्यांना सुखात ठेवले आहे.'

'दरोडे घालताना तू किती लोकांना मारलेस वाल्या?'

'माझ्या घरी रांजण आहेत. मी एक माणूस मारला की एक खडा त्यात टाकतो. आजवर सात रांजण खड्यांनी भरलेत.'

'नारायण, नारायण! म्हणजे तुझ्या माथ्यावर किती पाप भरलेत, याचा तुला अंदाज आहे? यमलोकात तुला उकळत्या तेलात टाकून देतील!'

आज वाल्या पहिल्यांदा घाबरला. त्याने विचारले,

'माझ्या पत्नीला आणि मुलांना पण ही शिक्षा मिळेल?'

'त्यांना का बुवा? हत्या तू केल्या, दरोडे तू घातलेस. मग पापाचे भागीदार ते का होतील?'

'पण त्यातून प्राप्त झालेले धन, धनापासून मिळालेले सुख, यांचा उपभोग तर ते घेतात!'

'तर काय झालं? हवं तर घरी जा. त्यांना विचार, सुखात वाटेकरी झाले तर पापात सुद्धा ते भागीदार व्हायला तयार आहेत का? माझ्याकडे उत्तर घेऊन ये. मी तुझी वाट बघेन.'

वाल्या तसाच पळत घरी गेला. पत्नी, मुलं झोपली होती. वाल्याने त्यांना उठवले. त्याची पत्नी उठली. तिला वाल्यासोबत लुटीचा ऐवज दिसला नाही. तिने विचारले,

'आज लवकर घरी आलात, तेही लूट न आणता?'

'मला अरण्यात एक मुनीवर भेटले. त्यांनी मला समजावलं. आजवर अनेक पाप माझ्या हातून घडले आणि त्याची शिक्षा मला नरकात मिळेल. पण तुम्ही सुद्धा त्या पापातून मिळणाऱ्या धनाचा उपभोग घेतला. तर तुम्ही या पापात वाटेकरी व्हाल?'

'आम्ही? आम्ही का होऊ? मुळीच नाही!'

'सुखात वाटेकरी झालात, मग पापात का नाही?'

'कारण आपल्या कुटुंबाला सुख देणं हे तुमचं कर्तव्य आहे. ते कसं देता, हा मार्ग तुमचा तुम्ही निवडायचा होता. तुम्ही पापाचा मार्ग निवडला, पण आम्ही नाही. त्यामुळे तुमच्या पापात आमचा कुठलाही वाटा नाही!'

वाल्याला धक्का बसला. आपण काय करून बसलो या विचारात त्याला वैराग्य आले. त्याने अंगणात असलेले दगडांनी भरलेले सगळे रांजण फोडून टाकले आणि लगेच अरण्यात गेला. त्याने मुनींच्या पायावर डोकं ठेवलं आणि विनवणी करू लागला,

'महाराज, मला या पापाचे प्रायश्चित्त घेण्याचा मार्ग सांगा!'

'वाल्या, पापकर्माचा तुला पश्चात्ताप होतो आहे. तुझ्या डोळ्यातून त्यामुळेच अश्रू निघतात आहेत. यांनीच तुझे पाप धुवून निघेल. तू 'राम, राम' असा रामनामाचा जप कर. मी परत येईपर्यंत जप बंद करू नकोस. यातच तुझे प्रायश्चित्त आहे.', इतके बोलून मुनी निघून गेले.

वाल्याने एका जागी मांडी घातली आणि रामचंद्रांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी करून तो रामनामाचा जप करू लागला. पण अडाणी वाल्या 'राम, राम' म्हणायला जाई आणि 'मरा, मरा' असे उद्गार निघे. तो अस्वस्थ झाला. पण त्याने जप सोडला नाही. हळूहळू मात्र तो रामनामात तल्लीन झाला, प्रभू चिंतनात तन्मय झाला.

बारा वर्षे लोटली. मुनी बारा वर्षांनी परतले, तेव्हा त्यांना रामनामाचा जप करणारा वाल्या तिथेच सापडला. वाल्याच्या भोवती मुंग्यांनी वारूळ बांधले होते. पण वाल्या जपात रममाण झाला होता. मुनींना समाधान वाटले. त्यांनी वाल्याच्या शरीरावरचे वारूळ अलगदपणे दूर केले. वाल्याचा संपूर्ण कायापालट झाला होता. शरीरावर तेज आले होते. मुनींनी वाल्याला समाधीतून जागे केले. वाल्या जागा झाला आणि त्यानी मुनींच्या चरणावर डोके ठेवले. वाल्या म्हणाला,

'क्षमा करा, मी आधी आपणाला ओळखू शकलो नाही नारदमुनी! आपण माझा उद्धार केलात!'

वाल्याला आशीर्वाद देत नारदमुनी म्हणाले,'

'हा सारा श्रीरामनामाचा महिमा आहे. जो रामाचे नाव घेईल, त्याचा उद्धारच होईल! आज तुझ्याभोवती मुंग्यांचे वारूळ, म्हणजे वाल्मिक होते. यामुळे तुला यापुढे संसार 'वाल्मिकी' या नावानी ओळखेल!'

आशीर्वाद देऊन नारदमुनी आकाशमार्गाने स्वर्गलोकाकडे निघून गेले. 

वाल्या कोळ्याचा मात्र रामनामाच्या जपाने उद्धार होऊन 'वाल्मिकी' झाला होता…

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू