निरोप घेतांना ....
-बी अलर्ट - हे सदर म्हणजे माझ्या कार्याचाच एक भाग आहे,असे समजून मी हे लेखन करत राहिले.
आपण सर्व उदंड प्रतिसाद देत माझ्या लेखणीचे बळ झालात.. याकरता आपणा सर्वांचे आभार मानायलाच हवेत.आज हा शेवटचा म्हणजे निरोपाचा लेख लिहिताना अक्षरश: मन भरून आलेले आहे .मला स्वतःला मुलगी नाही परंतु सर्व मुली माझ्या.. हे जेव्हा मानले आणि जाणले..तेंव्हा ..
आज मुलींच्या जगण्यातल्या पडझडीनी अस्वस्थ झाले आणि या वाटेवर कार्यरत राहिले. या सदरा अंतर्गत सर्वसाधारणपणे मुलींच्या जगण्यातले जे काही अनुभव.. प्रसंग मी जवळून अनुभवले.. बघितले.. पाहिले.. उध्वस्तता बघितली त्या उध्वस्ततेला मांडण्याचा प्रयास केला आणि समस्त वाचक मायबापांनी या माझ्या लेखनाला अक्षरशः उचलून धरले .हातचे जराही न राखून मला जी मांडणी करता आली... ती मी केली.. तरी सुटलेल्या काही गोष्टी आज जाता जाता नक्की सांगेन की ..माझ्या लेकींनों मला हे सांगायचे की.. आज तू सर्व क्षेत्र आपल्या प्रतिभेने काबीज केलेले आहे. 'बंद दारा मागे मूळमूळ रडत बसणारी स्त्री ' हे चित्र तू केव्हाच मागे टाकून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावलेला आहे.मागून येणाऱ्या प्रत्येक मुलीकडून आपल्याला हीच अपेक्षा आहे, परंतु या ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच या वाटेवर येणाऱ्या अनेक संकटांमध्ये मुलगी होरपळून जाते आणि आपल्या गुणांची लेक आपल्या ध्येयापर्यंत पोचण्याआधीच संपून जाते, हे चित्र जास्त विदारक आहे ..जे प्रामुख्याने पुढे येत आहे. याकरता मुलींना सावध करणे नितांत गरजेचे आहे. असे मला वाटते म्हणून मी या वाटेवर एक हाती ध्वज घेऊन कुठेही न थांबण्याच्या निर्धाराने "पोरी जरा जपून" सांगत निघालेली आहे. तुला आलेल्या प्रसंगाला कणखरपणे सामोरे जाऊन त्याच्याशी दोन हात करायचे आहे .यामध्ये या वाटेवर चालताना अनेक धोके नक्कीच आहेत .सर्वात पहिला धोका कोणीतरीआपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला ते जाळ ओळखता आलं पाहिजे .. खरा कृष्ण मिळायला खूप नशीब लागतं..
प्रेमाच्या उदात्त संकल्पनेमध्ये अडकविण्याचा तो केवळ एक डाव असतो. तो डाव मुलींना वेळीच ओळखता यावा याकरिता म्हणायचे आहे.. " बी अलर्ट"
या मार्गावरचे धोके ओळखता आले पाहिजे.समोरच्याचा उद्देश केवळ तुझा देह उपभोग हाच असतो.
कधी कधी तिला देहविक्री व्यवसायात नेऊन विकले जाते. कधी तिच्या अवयवांची विक्री केली जाते. कधी तिच्या देहाची इतरांसोबत अवहेलना केली जाते. याशिवाय आरोग्याच्या पातळीवर शरीराची होणारीपडझड नितांत भयंकर असते. सायबर क्राईमच्या वाटेवर कितीतरी गुन्हे घडून जातात.समाजामध्ये बदनामी होते ती वेगळी ...
समाजात बदनामी होणे आणि या सर्वांचा परिणाम होऊन पुढच्या जगण्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होणे असे प्रश्न पावलोपावली जगणे कठीण करून टाकतात .चांगल्या घरच्या मुलींचे ऑडिओ व्हिडिओ बनवून त्या कुटुंबाला उध्वस्त करण्याचे प्रयास होतात.. एक ना अनेक भानगडी होतात.. भावाच्या हातून अनेकदा गुन्हा घडतो मग त्या कोर्ट कचेरया अनेक दिवस पर्यंत चालतात यामुळे समाजामध्ये बदनामी होते. यात केवळ मुलीचेच जगणे उध्वस्त होत नाही तर अवघे कुटुंब या जाळ्यामध्ये उध्वस्त होते .एक ना अनेक.. वाईटच परिणाम भोगावे लागतात.... या सगळ्या वाटा सोप्या व्हाव्या... नेट.. इंटरनेटच्या जगामध्ये त्याचा मुक्त आनंद घेत केवळ आनंदीच राहावे याकरता -बी अलर्ट- म्हणणे नितांत गरजेचे आहे.
प्रत्येकच वेळेला मुलगी चुकीची असते किंवा मुलगा चुकीचा असतो असे नाही तर ते संदर्भ आणि ती परिस्थिती चुकीची असते त्यावेळेला आज आपण नेमकं कोणत्या वलयात उभा आहोत.. हे तरुणाईला ओळखता आले पाहिजे. मुलींप्रमाणे मुलांच्याही जगण्यामध्ये अनेक धोके आहेत .एक तरुणाईला व्यसनांच्या गर्दीमध्ये ओढने, त्यांच्याकडून गुन्हेगारी घडवून आणणे, अवैध कामे करायला भाग पाडणे, कुठल्यातरी चक्रव्युहा मध्ये अडकवणे. अनेकदा शहरात शिकायला गेलेल्या मुलांना मुलींच्याही चुकीच्या जाळ्यात ओढले जाते.. नको त्या गोष्टी त्यांच्याकडून घडल्यानंतर मुलांवरही आत्महत्येचे प्रसंग आलेले आहेत. मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे सायबर क्राईम मध्ये अडकणे आले आहे .असे अनेक धोके आहेत..ज्यामुळे फक्त तरुणाईला च नाही तर समस्त जनतेला मोबाईल वापरताना दक्षता घ्या असे सांगणे आवश्यक वाटते.अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणून पावलोपावली सर्वांनी दक्ष राहणे नितांत गरजेचे आहे.
या सदरांतर्गत लिहिलेल्या अनेक लेखादरम्यान अनेक वेगवेगळ्या घटनांमधून सावधतेचा इशारा मी दिलेला आहे. माझ्याकडून जेवढ़ी मांडणी करता आली ती नक्कीच मी शंभर टक्के केलेली आहे.तरीसुद्धा मुलींच्या बाबतीत मी जास्त जागरूक आहे.परंतु इतकेही काही हाता बाहेर चाललेले नाही ..वेळीच धोका लक्षात आला तर त्यातून बाहेर पडण्याचे ही अनेक उपाय आहेत ..त्यांचा मात्र या स्मार्टफोनच्या सहाय्याने उपयोग करून घेणे हे महत्त्वाचे आहे.
मुलींना सांगेन बेटा..... सुनसान वाटेवरून जाताना एखाद्या वेळेला कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असे लक्षात आले तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा योग्य वापर करा 1091, 1098 या नंबरला डायल करा. शहरात असाल तर पाच किलोमीटरच्या परिसरात निर्भया पथक,दामिनी पथक ,भरोसा सेल या महिला पोलीस अधिकारी असलेल्या अडचणींचा ताफा गाडी फिरत असते पाच मिनिटात तुमच्या लोकेशन वर येईल. रेल्वेचा प्रवास करत असाल..काही धोका होण्याबाबत शंका मनात आली तर
182 हा रेल्वेचा टोल फ्री नंबर आहे.. तुम्ही डायल करा पाच मिनिटात तुमच्या लोकेशनवर रेल्वे पोलीस उपस्थित होऊन तुम्हाला हवी ती मदत मिळेल. याही पलीकडे तुम्ही ट्रॅव्हल्स ने प्रवास करत असाल किंवा अन्य कोणत्या प्रवासात असाल तर त्यावेळीही घेण्याच्या दक्षता मी माझ्या लेखांमधून मांडलेल्या आहेत. प्रवासामध्ये असाल आपल्याजवळ सेफ्टी पिन चा उपयोग करा.आपल्या बॅगमध्ये सातत्याने मिरची पावडरची पुडी किंवा बाजारात मिळणारे मेडिसिन स्प्रे ठेवा .योग्यवेळी त्याचा उपयोग करा .आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत आहे..कोणी त्रास देत आहे
.. लक्षात येताच आपला आवाज वापरा..ओरडा... आजूबाजूच्या जनतेला त्याची माहिती द्या.. कोणीतरी तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही... कारण आता काही कृष्ण प्रत्येक वेळेला तुझी मदत करायला येणार नाही ..तुझी सुरक्षा तुलाच करायची आहे. पोलीस यंत्रणा, कायदा ,गुरुजन, आई-वडील, भाऊ हे सगळे सज्जडपणे तुझ्या पाठीशी उभे असताना उगाच घाबरत बसण्याचे कारण उरलेले नाही... परंतु होतं काय मुलगी स्वतः चुकीच्या मार्गावर जाते.. ते तिलाही कळते ..मी अशा प्रकारे चुकले..
तर मला आता सारेच रागावतील म्हणून ती पुन्हा एकदा चिखलाच्या गर्तेत फसत जाते..त्यावेळेला माझ्या लेकीला मला आवर्जून सांगायचे आहे.. एक गुन्हा तर सर्वांनाच माफ आहे... तेव्हा झालेल्या चुकांमधून बाहेर येण्यासाठी आपल्या सुरक्षा उपायां चा जरूर वापर कर ..आपल्या सभोवताल निर्माण झालेला धोका ओळखून सुरक्षा उपा...यांचा योग्य वापर कर...
आज निरोप घेताना या वळणावर मी पुन्हा एवढेच म्हणेन ..बी अलर्ट ...
तूर्तास आपला निरोप घेत आहे.. पुन्हा भेटूच कधी.. आयुष्याच्या पुढच्या वळणावर...तूर्तास मी आपला घेते आहे निरोप....!
प्रा.विजया मारोतकर ,
नागपूर.
मोब :8329587600