पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्याय 1

"बाबा, गल्लीत नको घेऊ हा गाडी. तिथे रस्त्याचे काम चाललंय तरीही सगळे पॅरेंट्स शाळेच्या गेटपर्यंत गाड्या आणतात आणि उगीचच गर्दी करतात. परत जातांना ट्रॅफिकमधे अडकशील आणि हो उद्या दुपारच्या पॅरेंट्स मीटींगचे लक्षात आहे ना? आजच ऑफिसमध्ये तशी ॲरेंजमेंट करुन ठेव हा. विसरु नकोस प्लीज." 


"हो, आहे ग लक्षात माझ्या. मी येणार आहेच पण उद्या तुझ्या दहावीसाठीच्या सब्जेक्ट सिलेक्शनची मीटींग आहे ना मग अपर्णाही असायला हवी तिथे. तिला आठवण केलीस का?"


" कमॉन बाबा. आई ?? आणि पॅरेंट्स मीटींगला?? तिला कुठे वेळ आहे ह्या सगळ्यासाठी ?? ती आणि तिचा रिसर्च एवढंच तर जग आहे तिचं. तसंही ती आली काय आणि न आली काय मला काहीच फरक पडत नाही. तेव्हा जाऊ दे." 


"तनु, आईला असं नाही बोलू बेटा. ती किती बिझी असते माहितीये ना तुला?


"बाबा मला ना कमाल वाटते तुझी. तू थकत कसा नाहीस रे? आईला तिच्या कामांतून फुरसत नाही आणि तुला मला समजावण्यातून. Please dont try to convince me. आणि तसंही बाबा मला काही आईसारखी डॉक्टरेट घेऊन सायंटीस्ट वगैरे व्हायचे नाहीये. मला माझ्या माणसांबरोबर वेळ घालवण्याची मुभा देणारं सर्वसामान्य लोकांसारखं साधंच आयुष्य जगायचंय. अगदी माझ्या वर्गातल्या त्या प्राचीची आई आहे ना, फक्त प्राचीला आणि घराला सांभाळणारी, तशी आई झाले तरी चालेल मला. त्यामुळे माझे सब्जेक्ट्स ठरलेले आहेत जे तुला माहितच आहेत. So its not a big deal for us. तेव्हा प्लीज थांबव ही माझ्या आणि आईमधली मध्यस्थी आता." असं म्हणून तनवी गाडीतून उतरुन चालायलाही लागली. तिला सोडून राजेशने ऑफिसकडे गाडी वळवली. पण त्याचे मन मात्र तनवीने वापरलेल्या मध्यस्थी ह्या शब्दाभोवती फिरत राहिले.


राजेश आईवडलांचा एकुलता एक लेक. पण त्याच्या दृष्टीने तो फक्त मम्माज बॉय होता. वडीलांना त्याच्या आयुष्यात असले तरी मनात मात्र अजिबात स्थान नव्हते. वडील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले. त्यात भावंडांत सगळ्यात मोठे. त्यामुळे मिळेल ते काम करत करत जसे जमेल तसे स्वतःचे आणि मग पाठच्या भावंडांचे आधी शिक्षण व मग नोकऱ्या, संसार हे सगळे सावरण्यातच गुंतलेले. लहानपणापासून फक्त कष्ट आणि कष्ट करत आलेले. आईवडलांना जपणारे. त्यांच्यासह आपल्या सगळ्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावता उंचावता स्वतःचे जगणे विसरलेले. त्यांना शाळेत शिक्षिका असलेली आणि त्यांच्या इतकीच सतत कष्ट उपसायला तयार असलेली बायको मिळाली जिने आपल्या नवऱ्याचे भावंडांवरचे प्रेम समजून घेऊन स्वतःच्या संसाराची आणि राजेशची पूर्ण जबाबदारी उचलली आणि निभावलीही. एवढी समजूतदार आणि कर्तृत्ववान बायको मिळाल्याने वडलांनीही मग निश्चिंत मनाने राजेशला तिच्याकडे सोपवले आणि स्वतःला कामाला जुंपून घेतले. खूप पैसा आणि नाव कमावलं पण आपल्या मुलाच्या मनात काही ते आजतागायत शिरु शकले नाहीत. राजेशसाठी वडील फक्त घरातले एक मेंबर आणि आई मात्र त्याची सब कुछ. त्याचा अभ्यास, खेळ, आवडीनिवडी, छंद, मित्र मैत्रीणींची गुपितं सगळं सगळं फक्त आईजवळ. वडलांशी कधीच मोकळेपणाने काही बोलणे नाही आणि कसलेच बंध नाहीत. वडलांबद्दल त्याच्या मनात जी अढी लहानपणी बसली होती ती आज इतक्या वर्षांनंतरही तशीच होती. आई त्याला खूप समजवायची. बाबा तुझ्यापासून मनाने लांब आहेत असं तुला जरी वाटत असलं तरीही तुला वाटतय ते खरं नाही. त्यांचाही तुझ्यावर माझ्याइतकाच जीव आहे. तेव्हा त्यांना थोडं समजून घे. ती बाबांनाही सारखं सांगायची की आता तरी तुम्ही राजेशला वेळ द्या, त्याच्याशी मोकळेपणाने बोला.  पण आईने दोघांना एकत्र आणायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांची मनं काही जुळली नाहीत ती नाहीतच. शेवटी निराश होऊन आई म्हणायची की इतकी शिखरं सर केली मी आयुष्यात पण तुमच्यात मध्यस्थी करुन तुमचे नाते सावरायला मात्र काही मला जमले नाही. घरात सगळं व्यवस्थित असलं तरी ही एक खंत आईच्या मनात कायम राहाणार ह्याची राजेशला खात्री होती. त्याच्या दृष्टीने त्यांच्या विस्कटलेल्या नात्यासाठी सर्वस्वी फक्त बाबा जबाबदार होते. 


आज तनवी अगदी सहज म्हणाली असली तरी राजेश मात्र तिने उच्चारलेल्या मध्यस्थी ह्या शब्दाने अस्वस्थ झाला. जी व्यथा  आईची आहे तिच आपल्याही वाट्याला येणार की काय ह्या विचाराने तो हादरला. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू