पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मेरावाला ग्रे



लघुकथा


मेरावाला ग्रे 


ऑफिसच्या whats app गृपवर नवरात्रीच्या रंगांची चर्चा सुरु होती. म्हणजे हा गृप बनवलाच फक्त रंगांसाठी होता. अनेक पावसाळे पाहिलेल्या ग्रे केसांच्या सुधाताईंपासून अगदी मागच्याच महिन्यात जॉईन केलेल्या गुलाबी गालांच्या चुलबुल्या मीतापर्यंत सगळ्या वयोगटातल्या बायका ह्या गृपमध्ये होत्या. पण प्रत्येकीचा नवरात्रीसाठीचा उत्साह मात्र सारखाच होता. उद्याच्या ग्रे रंगांसाठी सगळ्यांची तयारी चालू होती. 

एक सायली सोडून बाकीच्यांसाठी हा ग्रे थोडा ऑफबीटच होता. कोणी आजीची,  कोणी आईची तर कोणी सासूबाईंची साडी शोधत होत्या. पण सायलीकडे मात्र भरपूर ऑप्शन्स होते. कारण ग्रे, बॉटलग्रीन, ऑफव्हाईट, ब्लॅक ॲंड व्हाईट हेच सायलीचे मनापासून आवडते रंग होते. कसले ग तुझे हे वयस्क लोकांसारखे चॉईस ! जरा चांगले उठून दिसणारे रंग वापर की म्हणून सायलीला आईची बोलणीही खायला लागायची आणि मैत्रीणीही चिडवायच्या. पण तरीही  दुकानात गेल्यावर सायलीची नजर ह्याच रंगांभोवती भिरभिरायची आणि बाकी रंग आपसूकच पुढल्या वेळेसाठी म्हणून बाजूला व्हायचे. आजही गृपवर सायलीला सगळ्याजणी तू आमच्याही साठी घरुन ड्रेसेस घेऊन ये कारण तुझे कपाट ग्रे कलरनेच भरलेले असेल म्हणून चिडवत होत्या.

मग ग्रे रंगाच्या ट्रॅकवर धावणारी  गप्पांची गाडी हळूहळू नेहमी पिंक, मरुन, ग्रीन अशा पुरुषांमधे फारसे कॉमन नसलेल्या पण फ्रेश कलरचे शर्ट घालणाऱ्या राजनवर म्हणजे ऑफिसमधल्या मोस्ट एलिजिबल बॅचलरवर आली. हॅंडसम, उंच, गोरापान आणि हसतमुख राजन सगळ्याच मुलींचा वीक पॉईंट होता.  पण राजन कोणालाच भाव द्यायचा नाही. कदाचित त्याचमुळे राजन ऑफिसमधल्या गर्ल्स आणि बायकांचाही जिव्हाळ्याचा विषय होता. 

सायलीलाही मनातून राजन आवडत होताच पण तिची आणि त्याची जोडी तिच्या स्वप्नातही जुळायची नाही. ऑफिसमधे इतक्या एकापेक्षा एक छान आणि टीपटॉप राहाणाऱ्या पऱ्या असतांना तो कशाला माझ्या न रंगवलेल्या चेहऱ्याकडे बघतोय? मी तर त्याच्या खिजगणतीतही नसणार. उगीचच सुधा मॅडमना वाटतं की त्याचं माझ्याकडे लक्ष असतं म्हणून. जाऊ दे त्यांच्या बोलण्यात येऊन विनाकारण खुश होण्यात काही अर्थ नाही. मी बरी आणि मेरेवाले कलर्स बरे. असा विचार करत सायली झोपली.

सकाळी उठल्यावर आज काहीतरी वेगळं करावं म्हणून  सायलीने मागच्या दिवाळीत आईला गिफ्ट केलेली ग्रे बेस व गुलाबी काठाची सॉफ्ट सिल्कची साडी निवडली. नाजूक एम्ब्रॉयडरी केलेला डीझायनर ब्लाऊज, त्यावर हातावर पदर येईल अशी नेसलेली ग्रे सिल्क, गुलाबी खडे असलेला मोत्याचे दागिने, खड्यामोत्यांची टिकली, मोकळे सोडलेले केस आणि हलकासा मेकअप करुन सजलेली सायली आज खूपच सुंदर दिसत होती. नेहमीपेक्षा थोडे हटके तयार झालेली सायली स्वतःला आरशात बघतांना स्वतःवरच खुश झाली. बाकी कोणी  बघो वा ना बघो, मी मला आवडले ना मग झालं तर असा विचार करुन तिने मनात डोकावलेल्या  राजनला पळवून लावले व ती ऑफिससाठी निघाली. 

ऑफिसमधे शिरतेय तर दारातच तिला समोर राजन दिसला जो भान हरपून तिच्याकडेच पाहात राहिला. तो अचानक असा  समोर आल्याने सायली गोंधळली पण  राजन मात्र एकटक तिच्याकडे बघत graceful असं त्याच्याही नकळत मोठ्याने म्हणाला. त्याने दिलेली ही कॉम्प्लिमेंट सायलीने लाजून स्विकारली आणि काही न बोलताच दोघांमधे कुछ कुछच नाही तर आखों आखोंमे बरंच कुछ झाले. सायली लाजेने चूर होत आत शिरली. तिच्या पाठोपाठ आलेल्या सुधा मॅडम ग्रे फॉर ग्रेसफुल म्हणत हसायला लागल्या आणि राजन भानावर आला. मॅडमनी मग आत येत 'देखो में ना कहती थी' वाला लुक सायलीला दिला.

सायलीची अवस्था तर एकदम नाचोवाली झाली होती. फक्त ऑफिसमधे असल्याने तिने स्वतःला आवरले. राजनच्या मनातले भाव ओठांवर आणणाऱ्या ह्या सायलीवाल्या ग्रेवर  आज प्रेमाच्या गुलाबी रंगाची छटा चढली आणि सायली अजूनच त्याच्या प्रेमात बुडाली. 


©® धनश्री दाबके

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू