पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नगर वाचन मंदिर

नगर वाचन मंदिर 


साधारण आठव्या वर्गात होतो तेंव्हा पासून आमच्या घरासमोर असलेल्या नगर वाचन मंदिरात जायची सवय लागली. कशी लागली ते आठवत नाही. सकाळी आठच्या सुमारास नगर वाचन मंदिर म्हणजे लायब्ररी उघडत असे. तळमजल्यावर अमरचन्द्र सभागृहात खुला वाचन कक्ष तर पहिल्या मजल्यावर ग्रंथ संपदा असलेले दालन होते. मी आठ कधी वाजतील व हे मन्दिर कधी उघडेल याची आतुरतेने वाट पहात असे. 


सुरवातीला चांदोबा, चंपक चाचा चौधरी अशा पुस्तकांनी सुरवात झाली अन् कधी वाचनाच व्यसन लागलं कळलंच नाही. 

त्यावेळी आमच्या गावात वर्तमान पत्र पहाटेच्या बसने आठ वाजता येत असे. आणि नगर वाचन मंदिरात काम करणारा चंदु बातमी पत्रांचा ढिग घेऊन येत असे. मराठा, केसरी, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, फ्रिप्रेस जनरल ही मुम्बई पुणे येथुन प्रकाशित होणारी तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी प्रकाशित गांवकरी, जनशक्ती, बातमीदार इ. यांच्यावर आम्ही तुटून पडत होतो. चंदु वर्तमान पत्रांच ओझे घेऊन येताना दिसला की आमचा चेहरा खुलायचा व एखाद्या दिवशी सुट्टी असली वा काही कारणाने एसटी आली नाही तर तो रिकाम्या हाताने परतताना दिसला की चुकचुकल्या सारखं वाटतं असे.

जसजसे वय वाढले तसतसे वाचनाची आवड बदलत गेली. वरच्या वर्गात गेल्यावर आम्ही चांदोबा वरुन झुंजार, काळापहाड इ. वर आलो. आता बाबुराव अर्नाळकर, कर्नल रंजीत यांचे लेखन आवडु लागले होते. एका नंतर एक आवृत्त्या निघाल्या की हातात पडताच फडशा पाडला जायचा. त्यावेळी स्पायडर मॅन, बॅटमॅन यांचं मराठीत आगमन व्हायचं होतं. बाबुराव अर्नाळकर यांच्या झुंजार, काळापहाड ह्या गुप्त हेरांच्या कथा वाचुन थरार व अंगावर काटा उभा राहयचा. किती पुस्तक वाचून काढली माहीत नाही पण कदाचित सर्व संच कचाकचा वाचले असतील.

कॉलेजात पाउल पडले आणि चव बदलली. रहस्य कथा सोडून कादंबरीत मन रमायला लागले. फडके,माटे इ यांच्या कादंबऱ्या आस्वाद घेत असु. त्याचबरोबर वर्तमानपत्रातील खेळांची रकाने वाचुन रोमांच अनुभवत होतो. गावस्कर माझा आवडता खेळाडु. त्यानी विविध सामन्यात केलेल्या धावांची नोन्द एका वहीत करायचो. गावस्करच्या तंत्रशुद्ध खेळ आकर्षित करायचा.  

एकेदिवशी पु. ल. हाती लागले आणि कथा कादंबरी यातील चव गेली. मलेशिया थायलंड, सिंगापूर,बाली, सुमात्रा बेटावरील सृष्टी सौंदर्याने नटलेल्या ह्या भुभागाचं वर्णन पुलंच्या शब्दात पुर्वरंग मध्ये वाचलं आणि प्रत्यक्षात हे सगळे देश बघितले तरी हा आनंद मिळणार नाही इतका त्यांच्या शब्द दर्शनाने झाला. 

व्यक्ती आणि वल्ली हे माझं सर्वात आवडतं पुस्तक कितीवेळा वाचलं होतं सांगणं कठीण आहे. अपुर्वाई, असामी असामी, बटाट्याची चाळ आणि इतर अनेक पुल वाङमय कोळुन प्यालो.

माझी बरीच मित्र मंडळी हिंडण्यात, खेळण्यात वेळ घालवायचे मला मात्र सकाळी ४ व संध्याकाळी ४ तास ह्या वाचन मन्दिरात घालवुन कमी पडायचे.

शामची आई, धडपडणारी मुलें इ. साने गुरुजी यांची पुस्तके वाचून किती रडलो असेल आता आठवत नाही.

ह्याच ठिकाणी अत्रे, पुलं, गोनीदा, दमामिरासदार आदि मान्यवर शब्दांचे चौकार-षटकार ठोकणाऱ्या लेखकांना पुस्तक रुपाने भेटत असे. रणजित देसाई यांच्या 'श्रीमान योगी' ने शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापा ऐकवल्या तर त्यांच्या 'स्वामी' ने थोरले माधवराव पेशवे यांची चरीत्र गंगा वाचुन मन दिपुन गेले. शिवाजी सावंत यांच्या 'मृत्युंजय' मधुन महाभारतातील कर्णाचा जिवनाचे अनोखे पैलू अनुभवलं.

रोझेस इन डिसेंबर, कर्हेचे पानी, सत्याचे प्रयोग इ. आत्मचरित्र वाचताना पुढील आयुष्यासाठी दिशा मिळाली असेल. 

ह्याच नगर वाचन मंदिरात होणारी व्याख्यान माला ही एक अमृत रुपी शब्द ज्ञान प्राशनाचा अभूतपूर्व

असा काळ असायचा. व्याख्यान रात्री ९ वाजता सुरू होणार आहे हे माहित असूनही ८ वाजता पहिल्या दोन ओळीत नंबर लावून बसायचे आणि मनसोक्त आनंद लुटण्यासाठी प्रयत्नशील असायचो. 

ग्रंथपाल हा त्या हजारोंच्या संख्येने असलेल्या ग्रंथाचा मालक सर्वात भाग्यवान वाटत होता व परमेश्वराला एकच मागणं मागायचो की कुठल्यातरी ग्रंथालयात ग्रंथपाल होवून ज्ञानसागरात यथेच्छ पोहुन शब्द अमृतानुभव घेऊ दे. नाना प्रकारचे विविध ग्रंथ, ज्ञानेश्वरांचे शब्द
"आणि ग्रंथोपजिविये । विशेषी लोकी इये । दृष्टादृष्टविजये । होआवे जी।' आठवुन जातात.



४० वर्षा नंतर पुन्हा एकदा नगर वाचन मंदिरात जाण्याचा योग आला म्हटलं तर वाचनाची ओढ तेथे घेऊन गेली. त्याकाळी प्रशस्त असलेली वास्तु आज चहुबाजूंनी लहान लहान दुकानांनी वेढल्यामुळे संकुचित झालेली वाटत होती. जुनी बाके अन् त्यावर अजून तग धरून असलेली आयुष्याच्या संध्याछायेत आपल्या सुर्यास्ताची वाट पाहत वर्तमान पत्रांत काही क्षण घालवतांना नजरेत पडली. वर्तमान पत्र, मासिके, साप्ताहिके, पाक्षिक इ यांचा ढिग व वाचन विरांची गर्दी नव्हती. होती फक्त वार्धक्याने डोळ्यांवर चष्मा लावलेला तुरळकच वाचकवर्ग व अस्ताकडे वाटचाल करणारी वर्तमान पत्रे. बाहेर तरुणाई आजच्या फेसबुक व्हाटस अप, व स्मार्ट फोनच्या दुनियेत गुंग दिसली. तरुण पिढी ग्रंथ वाचनापासुन दुरावत चालली आहे असं म्हणायला मन जरी धजावत नव्हते तरी मनात धाकधूक वाटयला लागली होती. असो कालाय तस्मै नमः

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू