पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जुनं ते सोनं

             'आढावा' साठी एखादे आवडलेले पुस्तक, एखाद्या चित्रपटा बद्दल विचार करतानाच माझ्या डोक्यात ही दोन सुंदर गाणी आली. व मी मग त्या गाण्यांचाच आढावा घेण्याचे ठरवले. 

              हिंदी चित्रपट सृष्टीतील ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा काळ म्हणजे सुवर्ण काळच होता. त्या वेळेस चे गायक, गीतकार आणि संगीतकार, हे कले साठी स्वतः ला पूर्णपणे झोकून देऊन काम करत असत. त्या वेळी काही ही टेकनॉलॉजी नसतानाही भारतीय वाद्यांवर संगीत वाजवून अतिशय सुंदर गाणी तयार होत होती. 

              पहिले गाणे म्हणजे १९६४ साली आलेला चित्रपट 'चित्रलेखा'. मीना कुमारी, अशोक कुमार व प्रदीप कुमार यांच्या अभिनयाने नटलेला. व गाणी तर खूपच सुंदर. गीतकार साहिरजी, संगीतकार रोशनजी, तर गायक रफी साहेब. एका पेक्षा एक कलाकार. तिघांनी मिळून या गाण्याला अजरामर करून टाकले आहे. गाणे आहे - "मन रे तू काहे ना धीर धरे". अहाहा.......काय ते शब्द. एक एक शब्दात गूढ अर्थ. गाण्याचा सार असा आहे कि जीवनातल्या उतार - चढावाला  विसरून पुढे चालत रहावे, त्यात अडकून राहू नाही. जी गोष्ट आज आहे, ती उद्या नसणार. तिच्या मोहात पडून दुःख करण्यापेक्षा त्याला आत्मसात करून पुढची वाटचाल करायलाच हवी. तरच तुम्ही जीवन सहजपणे जगू शकता. मोह,माया सर्वांची बंधने तोडून जगायला शिका.असा भाव या गाण्यात दिसून येतो.  साहिरजींनी इतक्या सुंदर शब्दांची सांगड घातली आहे कि आजही ते गाणे ऐकत रहावेसे वाटते. लहान असताना ही गाणी ऐकली कि आवडत होतीच. थोडे वयात आल्यावर त्यातील शब्दांचे अर्थ व संगीतातली गोडी कळू लागली. आणि आता त्या शब्दांचा खोल अर्थ कळायला लागल्यावर तर फारच आवडतात. जूनी गाणी जितकी ऐकतो, तितका त्यांचा अर्थ कळतो. व संगीतातला रस उकलत जातो. वयाच्या अनुभवातून त्याचे प्रगल्भ अर्थ कळू लागतात. 

             दुसरे गाणे 'हम दोनो' चित्रपटातले. यात देव आनंद, साधना व नंदा यांचा अप्रतिम अभिनय. या चित्रपटातले गाणे म्हणजे रफी साहेबांनी म्हटलेले, साहिरजींनी लिहिलेले आणि जयदेवजींनी संगीतबद्ध केलेले. "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया". वाह..... तिघेही आपापल्या क्षेत्रातले हीरेच होते. एकाहून एक सरस. काय ते सुंदर शब्द. एक एक शब्दात आयुष्य कसे जगावे ह्याची शिकवण. खरंच आयुष्य या गाण्याप्रमाणे जगलो तर कितीही संकटं आली तरी सहजपणे ती पार करू शकतो. 

                  "बर्बादियों का सोग मनाना फजूल था,

                   बर्बादियों का जश्न मनाता चला गया"

आयुष्यातल्या अडचणींचा 'शोक' करत बसण्यापेक्षा त्याचा 'जश्न', महोत्सव करत पुढे जात राहायचं. जे मिळालं त्यात आनंद मानून त्यालाच भाग्य समजून त्याचा स्वीकार करायचा. तर 'जिंदगी' खूप सहज आणि सोपी होऊन जाईल. जीवन जगता जगता आम्हाला इतक्या तटस्थ पणाने जगता आले पाहिजे कि सुख आणि दुःख दोन्ही ला एकाच दृष्टिने पाहता आले पाहिजे. हे सगळे करणे सोपे नाही, पण केले तर आयुष्य खूप सुंदर आणि सहज होईल. 

               गाणे ऐकताना लक्षात येते ते म्हणजे खरं तर हे गाणे साहिरजींचे, पण त्याला जयदेवजींनी संगीताचा साज चढवला आणि रफीजींनी त्यावर अप्रतिमतेचा कळस चढवला. जीवनातले आंबट गोड़ अनुभव आल्यानंतर त्या शब्दांमधले खरे मर्म समजू लागते. आणि आम्ही आणखीन त्या गाण्याच्या प्रेमात पडत जातो. सुरवातीला तर चांगला गायक म्हणून, सुंदर संगीत म्हणून ऐकतो. पण जेंव्हा त्या शब्दांना समजून ऐकतो तेंव्हा त्या गाण्याचा एक वेगळाच अर्थ समोर येतो. ते शब्द थेट मनाला जाऊन भिडतात. आणि ऐकता ऐकता एकदमच 'जिंदगी' च गूढ रहस्यच उलगडल्या सारखे वाटते. खरंच पुन्हा एकदा त्या वेळ च्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू