पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मधु इथे अन चंद्र तिथे

दोन वाजून तीस मिनिट होताच, सर्वांनी हातातले काम बंद केले. हात धुवून सर्वजण जेवणाच्या टेबलापाशी आले.

 

'स्नेहा, चल लंच ब्रेक झाला आहे'. मंदारने फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या स्नेहाला आवाज दिला.

 

'तुम्ही बसा मी आलेच' स्नेहा उत्तरली.

 

 एका एनजीओमध्ये, समुपदेशक म्हणून काम करत असलेल्या तिचे आताशा हल्ली  असेच चालू होते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोनवर आर्ग्युमेंट करत असायची. कोणाशी करायची, काय करायची हे मात्र कोणालाच कळायचे नाही. थोडेसे लांब जाऊनच हे चाललेलं असायचं. लंच ब्रेक झाल्यावर, मित्र-मैत्रिणींनी जेवायला बोलावले तरी लवकर जायची नाही. सर्वांनी सुरू केल्यावर दहा एक मिनिटांनी ती यायची. आणि मग लंचच्या लिमिटेड वेळेत खाऊन घ्यायची. खाण्यातही तिचे फारसे लक्ष नसायचे. विचारले तर हसून टाळून द्यायची.ऑफिसच्या सहकाऱ्यांना सुद्धा प्रश्न पडायचा एवढा वेळ ही फोनवर कोणाशी बोलते? म्हणजे तसं जास्तच सर्वांच्या नजरेत येत होतं.आपापसात बरीच चर्चा रंगायची. पण रोजच हे दृश्य नजरेला पडायचे. त्यामुळे नक्कीच काहीतरी सिरीयस प्रॉब्लेम आहे असे सर्वांना वाटू लागले होते.

 

              पण शेवटी कुणकुण लागलीच.  तिच्याच सेक्शन मधल्या मंदारला कळले कि ती फोनवर एका मुलाशी बोलते आहे. पण मग काय बोलते? या उत्सुकतेपोटी अजूनच रिसर्च झाले. आडून आडून ऐकणे झाले.आणि मग कळले की, लहानपासूनचा तिचा बॉयफ्रेंड विराज, याच्या ती प्रेमात पडली होती नव्हे  होतीच. तब्बल तेरा वर्षापासून.जो तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता.आणि त्याला मनवण्याचे तिचे प्रयत्न सुरू होते. पण मग अशी का वेळ आली?असे रोज ती त्याला काय सांगत होती? त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं का?आनंद तर तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. उलट काळजीचा सूर उमटलेला दिसायचा. ऑफिसमधील उत्सुकता  अशी उगीचच ताणली जायची.

 

                      स्नेहा आणि विराज, एकाच गावात, एकाच गल्लीत, एकाच शाळेत, लहानाचे मोठे झाले. आणि त्यांचा समाजही एकच असल्यामुळे, मैत्रीच्या नात्यांमध्ये अजूनच स्पष्टता आली होती. त्यामुळे घरचे पण निर्धास्त असायचे. त्यांच्या एकत्र खेळण्याला कधीही विरोध झाला नाही. लहानपणीच्या निरागस भावना  हळूहळू संपत होत्या, एक वेगळीच भावना त्यांच्यामध्ये मूळ धरू लागली होती. शाळेतून आल्यावर खेळण्याच्या निमित्ताने भेटणे किंवा अभ्यासाच्या निमित्ताने, न चुकता चालू असायचे. सुट्टीत किंवा कधी कुठे गावाला जाण्याचा प्रसंग आला तर दोघांनाही एकमेकांशिवाय करमायचे नाही. तो मला आवडतो किंवा ती मला आवडते, या मतापर्यंत दोघेही कन्फर्म होते.  दहावीनंतर विराजचे कुटुंबीय त्यांच्या गावी शिफ्ट झाले.

 

                  स्नेहा सावळी असली तरी नाकीडोळी, सुंदर होती. गुबगुबीत गाल ,कुरळे केस, गोड आवाज प्रथमदर्शनी कोणावरही तिची छान छाप पडायची. विराज डबल हाडाचा, गोरापान, उत्तम बांध्याचा होता. स्नेहाची आई सरकारी नोकर होती. स्नेहाला वडील नव्हते. भाऊ तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. स्नेहाची घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. स्वतःचे घर, अवतीभवती सर्व नातेवाईक मंडळी, आईकडची आणि वडिलांकडची ही. त्यामुळे स्नेहाला वडील नसले तरी, नकळत घराचे कर्तेपण कधी काकाकडे तर कधी मामाकडे असायचे. कोणतीही गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय घरामध्ये होत नसे.त्यामुळे वडिलांची कमी कधी तिला जाणवली नाही. ते पण अतिशय प्रेमाने स्नेहाच्या कुटुंबीयांना सांभाळत होते. त्यामुळे मामाचा शब्द तर प्रमाण असायचा. त्याच्या शब्दापुढे जायची दोघाही बहीण भावांची हिंमत व्हायची नाही. या उलट विराजच्या घरची परिस्थिती होती. विराज घरात मोठा होता. त्याच्या पाठी दोन भाऊ व एक बहीण होती. घरची परिस्थिती उत्तम म्हणता येत नसली तरी, कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. त्याच्या वडिलांची नोकरी जेमतेम असल्यामुळे, खर्चाची कोणतीही गोष्ट विचार केल्याशिवाय शक्य नसायची. नकळत विराजची जबाबदारी वाढत होती. मोठेपणाच्या जाणिवेने, अजूनच हतबल होत होती. घरात खाणारी तोंडे जास्त होती. म्हणूनच उच्च शिक्षणापेक्षा पैसा मिळवण्याची गरज त्याला जास्त वाटत होती. म्हणूनच आवश्यक ती माहिती गोळा करून, मोबाईलचे शॉप उघडण्याचा विचार त्याने वडिलांना सांगितला. पण प्रश्न भांडवलाचा होता. विराज तसा खटपटी, मेहनती होता. कामापुरती पैशाची अरेंजमेंट करून एक छोटे मोबाईलचे शॉप त्याने आपल्या गावात सुरू केले होते.

 

             इकडे  दहावीची परीक्षा  उत्तम मार्काने पास झाल्यावर बारावी पर्यंत सायन्स करून स्नेहाने एम एस डब्ल्यू कॉलेजला प्रवेश घेतला. आता तर विराज आणि तिच्या नात्यांमध्ये एक परीपक्वता अशी आली होती. त्यांच्यातला दुरावा अजूनच जवळीक वाढवत होता. रोज चॅटिंग केल्याशिवाय दिवस पार पडत नसे.नकळत आता दोघांच्याही मनाने  प्रेमाच्या  नाजूक बंधनाची ग्वाही दिली होती. पण विराजला नेहमीच स्नेहाच्या घरची भीती वाटत आली होती. तिचे स्टॅंडर्ड, घरची परिस्थिती, तिचे विचार कायमच त्याला मोठे वाटत आले होते. आपण तिच्या योग्यतेचे नाही, असेच त्याला वाटायचे.  यामुळेच तो हल्ली हल्ली, स्नेहाला टाळायचा प्रयत्न करायचा. काहीतरी कामाचे कारण सांगून, तिच्या भावनांना  आवर घालायचा. स्नेहाच्या लक्षात ही गोष्ट आली होती पण तिचे मन मानायला तयार नव्हते. विराज आपल्याला टाळतो ही कल्पनाच तिला सहन होणारी नव्हती. म्हणून तर सतत फोन करून, त्याच्याशी बोलण्यासाठी ती धडपडत होती. टाळण्याचे कारण विचारायची.

 

             पण शेवटी खूप विचारल्यावर विराजने आपल्या मनातील भीती तिच्यासमोर व्यक्त केली. स्नेहा तर हादरूनच गेली होती. पण त्याच्या प्रेमाचं गारुड तिच्या मनावर होतं. ती अशा गोष्टींपुढे थोडीच हार मानणार होती. लहानपासूनच्या आठवणी, एकमेकांचा सहवास , एकमेकात गुंतलेलं मन या सर्व गोष्टींची सतत त्याला जाणीव करून द्यायची. 'मी तुझ्याशिवाय कोणाचाच विचार करणार नाही, एवढी तेरा वर्ष मी कोणासाठी थांबले? हे तिचे निग्रहाचे बोल ऐकून सरतेशेवटी त्याचा अस्पष्ट नकार, स्पष्ट होकारापर्यंत येऊन पोहोचला. आणि प्रेमाचे हे दिव्य कसेही पार करायचेच, यावर ठाम राहिला. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते या सत्याने.

 

             स्नेहाची तगमग आता शांत झाली होती. एक दीर्घ उसासा तिने सोडला होता.हवेहवेसे पण निसटून जाणारे सुख तिने विराजच्या रूपात परत मिळवले होते. एक दिव्य तर पार पडले होते.पण आता पुढे काय? घरी कसे सांगायचे, घरचे हो म्हणतील की नाही, कसे रिऍक्ट होतील? मनात खूप गोंधळ सुरू झाला. तोपर्यंत स्नेहाच्या घरी मामांनी स्नेहासाठी वरसंशोधन सुरू केले होते. दोन एक स्थळांना नकार देऊन तिने हिंमत करून एकदा हा विषय मामांसमोर काढला. परंतु मामानी साफ दुर्लक्ष केले. दुसऱ्या वेळेस तिने आईला ही गोष्ट सांगितली. पण आईने चक्क नकार दिला. याच्यापेक्षाही अजून चांगले स्थळ पाहू असे कारण सांगितले. कारण विराज, त्याचे कुटुंबीय, त्याची आर्थिक परिस्थिती आई चांगलीच ओळखून होती. स्नेहाचा संयम हळूहळू सुटत होता. आई होकार देईल  का नाही अशी तिला आता धास्ती वाटत होती. असे पळून जाणे तिच्या मनाला बिलकुल पटत नव्हते.  जे होईल ते सर्वांच्या आशीर्वादाने व्हावे असेच तिला मनोमन वाटायचे. आणि मुख्य म्हणजे आईवरचे निरतिशय प्रेम. कारण वडिलांच्या पश्चात आईच सर्वकाही होती. त्यामुळे तिला असे अंधारात ठेवून असा निर्णय तिला घ्यायचा नव्हता. सांगूनही काहीच उपयोग होत नाही, हे पाहून तिच्या मनाची चलबिचल अजूनच वाढली होती. 

 

               इकडे विराजची  बिझनेसमध्ये प्रगती होत होती. दुकानाचा व्याप वाढत होता. आता दुकानात चार-पाच मुलांना पण कामावर ठेवले होते. आत्ता कुठे त्याच्या जीवनाची दिशा ठरली होती. जीवनात काहीतरी मिळवल्याचे समाधान होते. आर्थिक प्राप्ती उत्तम होत होती. म्हणूनच लग्नासारखा नाजूक विषय  हाताळायला तो आता रिलॅक्स झाला होता.  आता निसर्ग नियमाप्रमाणे विवाहसुलभ भावना त्याला गप्प बसू देत नव्हती. लग्न कधी करायचे? या एकाच प्रश्नाचे उत्तर तो स्नेहाकडे सतत मागायचा. एव्हाना स्नेहा पण आता एम एस डब्ल्यू होऊन एका एनजीओ मध्ये जॉबला लागली होती. आता मात्र स्नेहाची कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली होती. घरचे सांगूनही ऐकत नव्हते, आणि विराज तर त्याच्या जागेवर बरोबरच होता. एका बाजूला आई तर दुसऱ्या बाजूला विराज होता. तिला दोन्हीही गोष्टी हव्या होत्या. शेवटी विराजने चिडून तिला आठ दिवसांची मुदत दिली. ती विराजला पण आता थांबवू शकत नव्हती. मोठ्या मिनतवारीने तिने त्याला तयार केले होते. विचार करता करता तिने एक धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले. लगेच मोबाईलवर बोटे फिरली.

 

हॅलो विराज

बोलतोय, बोल. हां पण घरचं काही एक कारण मी ऐकून घेणार नाही. तो चिडूनच बोलला.

अरे, त्यासाठीच मी फोन केला आहे.

अरे वा घरचे तयार झाले? आनंदाच्या सुरात त्याने विचारले.

नाही. पण आपण लग्न करू.

पण कसं? अधीरतेने त्याने विचारले.

 

स्नेहाने तिच्या डोक्यातील सगळी आयडिया विराजला सांगितली. त्याला पटली पण होती आणि नाही पण. म्हणजे लग्न तर होणार होते पण त्याचा आनंद घेता येणार नव्हता. कारण स्नेहाच्या घरचे वातावरण पाहता, त्यांच्या कलाकलाने घेणेच योग्य वाटत होते. कारण स्नेहाचा मामा म्हणजे दुसरा जमदग्नीचा अवतार होता. रागाच्या भरात त्याने काहीही केले असते. आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे ती, लग्नासाठी तयार होते आहे, विराजच्या दृष्टीने  खूप मोठी जमेची बाजू होती. म्हणून विराज या गोष्टीला तयार झाला. आता आपल्या घरी  हे सर्व सांगायला हवे, या विचाराने तो गडबडला.

पण आई-बाबा नाही म्हणणार नाहीत याची त्याला खात्री होती. कारण आई-बाबांचा विराज वर असलेला विश्वास, आणि स्नेहाच्या घरचे वातावरण त्यांनी पण जवळून अनुभवले होते. आणि मग तयारी सुरू झाली.

 

 

                त्या दिवशी सर्वकाही ठरल्याप्रमाणे स्नेहा नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच ऑफिसमध्ये आली. आता ऑफिसमध्येही तिचे प्रेमप्रकरण , त्यातील अडचणी सर्वांना माहीत झाल्या होत्या. मोठ्या मॅडम त्यादिवशी सुट्टीवर होत्या. म्हणून थोडेसे टेन्शन कमी होते. तिने जवळच्या मैत्रिणीला आपल्या प्लॅनविषयी सांगितले. तिचे गाव ते विराजचे गाव यामध्ये पाचतासाचे अंतर होते. आई व भाऊ ऑफिसला गेल्यानंतर, ती सर्व तयारीनेच निघाली होती. हे सर्व करताना या कानाचे त्या कानाला कळणार नाही एवढी खबरदारी मात्र तिने जरूर घेतली होती. इमर्जन्सी मध्ये वेगळा फोन, एक्स्ट्रा पैसे सर्व काही अरेंज केले होते.घरचे कोणी विचारायला आले तर, सांगायचे की मिटींगला गेली आहे. आणि मॅडमने विचारले तर सांगायचे की तिच्या घरच्या प्रॉब्लेममुळे ती ऑफिसला आज आली नाही. दहा पंधरा मिनिटात मैत्रिणीला सर्व सांगून ऑफिसमधून  निघून तडक बस स्टैंडवर गेली. बसमधे बसली. तिकडे विराज आणि त्याच्या घरच्यांनी लग्नाची सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती. अगदी तिच्या लग्नाच्या साड्या ते  तिच्या ब्युटीशियन पर्यंत. विराज आणि त्याच्या घरचे तिचीच वाट पाहत होते. पोहोचल्याबरोबर तयारी करून तीन एक तासात, लग्नाचा विधी वैदिक पद्धतीने अतिशय छान, पार पडला होता. फोटोसेशन झाले. दोघांच्याही आयुष्यात हा क्षण परत येणार नव्हता. फार मोठा बडे जाव नसला तरी, अपूर्व समाधान नक्कीच होते.तीच हुरहुर, आतुरता दोघांच्याही चेहऱ्यावर जाणवत होती.स्नेहा कुमारीकेची सौभाग्यवती झाली होती. एकीकडे विराजशी लग्न झाल्याचा आनंद तर दुसरीकडे आईला न सांगता आयुष्यातला एवढा मोठा निर्णय तिने घेतला याचे दुःख होते. 'नांदा सौख्यभरे' आशीर्वाद द्यायला आज तिची आई उपस्थित नव्हती. तिला खूप गहिवरून आले.जेवण वगैरे करून , साजशृंगार उतरवून, कामापुरते छोटे मंगळसूत्र गळ्यात ठेवून ती ठरल्याप्रमाणे परतीच्या बसमध्ये बसली. अनेक भावनांचे गाठोडे मागे ठेवून. विराजच्या डोळ्यातील आतुरता पाहूनही दृष्टीआड करून.  विचित्र परिस्थितीत, जड अंतकरणाने विराजचा, त्याच्या घरच्यांचा निरोप घेतला. आणि बस सुरू झाली . वेळेवर घरी पोहोचणे सुद्धा तेवढेच गरजेचे होते. अजूनही आईचे मन  वळवून , तिचा आशीर्वाद घेऊ असे तिला वाटत होते. कारण हा धक्का आई सहन करू शकणार नाही, याची तिला खात्री होती. शेवटी नाव पण चांगल्या संस्काराचे निघणार होते. समाजाची पण भीती होतीच. आणि विराजही आता थोड्याफार प्रमाणात शांत राहील. या जाणिवेने तिला हायसे वाटले.

 

               पण असे तरी किती दिवस चालणार होते? मधु इथे आणि चंद्र तिथे, अशी अवस्था विराजला सहन होत नव्हती. मधुचंद्रासाठी जाण्याचा विराजचा तगादा सुरू झाला. आता तर स्नेहा काहीच बोलू शकत नव्हती.तिलाही त्याच्या सहवासाची ओढ लागली होती. तिच्या अथक प्रयत्नांना शेवटपर्यंत यश आलेच नाही. आणि तिला ते पाऊल उचलावेच लागले. जे ती आजपर्यंत टाळत आली होती.मॅडमना आधीच सांगितल्याप्रमाणे, तिने सर्विसचा राजीनामा दिला होता. आणि आईच्या नावे एक चिठ्ठी लिहून, ती विराजबरोबर

संसार थाटायला आईच्या आशीर्वादाशिवायच निघाली. मनात अपराधीपणाची भावना होतीच.तिची प्रामाणिक इच्छा शेवटी हरली होती. 

 

                   ऑफिसमधून आल्यावर स्नेहाची चिट्ठी आईने पाहिली मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मुलगी अशी कशी वागू शकते? विचाराने तिचे डोके दुखायला  लागले. असेही कोणत्याच आई-वडिलांना  असे वाटत नाही.घरात अकांडतांडव झाले. आरोप प्रत्यारोप झाले.तशातच तिचे बीपी हाय झाले. त्यामुळे ऍडमिट करावे लागले. चार दिवसानंतर जेव्हा आई घरी आली, तेव्हा स्नेहा समोर  नव्हती.घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात तिच्या आठवणी होत्या. किती सेवा करायची, सगळं घर सांभाळायची, हे आठवून आईला रडायला आले.शांतपणे विचार करता करता तिला एक एक गोष्टी उलगडत गेल्या. तिने आपल्याला सांगितले होते पण आपणच तिच्या मनाचा विचार केला नाही. नाही, माझी मुलगी वाईट नाही, मीच तिला समजून घेताना कमी पडले ही जाणीव होऊन आईच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या मनाविरुद्ध, लग्न लावून दिले असते तर ती सुखी राहिली असती का?किती स्वप्न पाहिले होते मुलीच्या लग्नाच्या बाबतीत, पण ते शेवटी स्वप्नच राहिले. शेवटी जन्मदात्री आईच होती. भावाला व मुलाला समजावून सांगितले. घटना तर घडून गेली होती .थोडेसे वादळ शांत झाल्यावर, आईनेच  न राहवून स्नेहाला फोन केला.

आणि मग काय आनंदी आनंद गडे. आनंदाश्रू वाहत होते दोन्हीकडून.

 

सौ उल्का कुलकर्णी ✍️ नाशिक 

            

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू