पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आपत्ती की इष्टापत्ती

आपत्ती की इष्टापत्ती


" सानिका, तुझ्या बहिणीचा, सुखदाचा फोन होता पण मी उचलेपर्यंत कट झाला गं !" असे म्हणत सानिकाच्या सासूबाईंनी, वैशालीने, तिच्या हाती फोन दिला.
     "अरे ! तुम्ही कशाला आणला ? अंशू किंवा संयूजवळ पाठवून दिला असता ना !" सानिकाने ओशाळून म्हणताच वैशाली म्हणाली,
     " अगं त्यात काय झालं ? तूही ऑनलाईन कामच करत आहेस ना ! मुलंही आजोबांबरोबर टी. व्ही. वर रामायण पाहत आहेत. दूरदर्शनवर रामायण, महाभारत दाखवतायेत हे मात्र खरंच खूप छान हं ! मुलांना पौराणिक कथाही माहिती होतात शिवाय आजोबा भरीस आणखी चार गोष्टी सांगतात. त्यांचा वेळ मजेत जातो आणि कथा कथनाची हौसही भागते आजोबांची. एरवी मीच सापडते त्यांच्या कचाट्यात." स्वतःच्याच विनोदावर हसत, वैशाली सानिकाच्या खोलीचे दार बंद करुन बाहेर पडली.
     त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सानू विचार करु लागली, " किती विचार करतात आई सर्वांचा." तेवढ्यात पुन्हा सुखदाचा फोन आला.
     " हा सखी बोल ! कशी आहेस ?" सानूने विचारताच, सुखदाचा ज्वालामुखी उसळला,
     " कशी आहेस म्हणून काय विचारतेस ? या लॉकडाऊनने माझी त्रेधातिरपीट उडवली आहे. मंडई बंद, वाणसामान बेताचे उरले आहे, वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली दीपेश सारखा लैपटॉपवर आणि मुलांना तर काय ! पिज्जा, छोले भटुरे, केक....रोज नवी फर्माइश. वातूळ पदार्थ खाऊन पोट बिघडतंय आणि वजन वाढतंय ते वेगळंच. कामवाली बाई नाही. वैताग आलाय नुसता." सुखदाच्या तक्रारी ऐकून सानू म्हणाली,
     " अगं, पण दीपेशला मदत करायला का सांगत नाहीस ? सगळे नवरे घरकामात मदत करतात  आजकाल."
     " नको गं बाई ! त्याची मदत म्हणजे काम कमी आणि पसारा जास्त ! ते निस्तरताना नाकी नऊ येतात माझ्या. बरं तू कशी आहेस ? होळीसाठी म्हणून गेलीस आणि चांगलीच सापडलीस तू वैशालीकाकूंच्या तावडीत. त्यांचे सोवळे-ओवळे, काटकसरीपणा, कामाचा आवर....तुझं तर पिट्टंच पडत असेल अगदी. आय रियली फील सॉरी फॉर यू सानू ! आता लॉकडाऊन उठल्याशिवाय तुम्ही चौघे इकडे येऊही शकत नाही. इकडेही कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. चल काळजी घे. ठेवते फोन."
     सुखदाने फोन ठेवला आणि सानूचे विचारचक्र चालू झाले. होळीसाठी इंदूरला यायची तिची अजिबात इच्छा नव्हती. ऑफिसमध्ये वर्कलोड खूप वाढला आहे या सबबीखाली ती यायचे टाळत होती. तिची आणि शशांकची बरीच वादावादी झाली पण शशांक हट्टाला पेटल्याने तिचा नाईलाज झाला होता. शशांकने पुण्यात नोकरी धरल्यापासून, गेले पाच वर्षांत,  तिला स्वतंत्र संसार करण्याची सवय झाली होती त्यामुळे सासरी जाणे, तिला बंधन वाटायचे. सासू म्हणजे सारख्या सूचना ही व्याख्या मनात घर करुन होतीच.
     " होळीला गेलो की गुडी पाडवा करुनच यायचे नाहीतर मी एकटाच जातो." ही शशांकची अट होती. मोठ्या अनिच्छेने सानू इंदौरला आली आणि कोरोनाच्या आक्रमणामुळे लॉकडाऊन होऊन त्यांचा मुक्काम चांगलाच वाढला. जसजसा या अदृश्य शत्रूचा फास आवळू लागला तसतसे सानूला वाटू लागले, ईश्वरानेच इंदूरला यायची बुद्धी दिली. मुलांना आज्जी- आजोबांचा दीर्घ सहवास मिळाला. रोज नव-नवीन गोष्टी ऐकत दोघेही आज्जी-आजोबांजवळच झोपायचे. सानू आणि शशी घरुन ऑफिसची कामं करायची. बरेच दिवसांनी त्यांना एकमेकांसाठीही वेळ देता येत होता. वैशालीला तर कुटुंब बरोबर राहात असल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. वर्षभराचे धान्य, कडधान्ये, डाळी, धूवून वाळवून ठेवलेले होतेच शिवाय लोणची, कुरडया, पापड, उपवासाचे पापड, कीस, सांडगे, सरबत, मुरब्बे.....कामाचा केवढा उरक होता वैशालीस ! एरवी वैशालीच्या या कामास रिकामपणाचे उद्योग म्हणणाऱ्या सानूचे मत आणि मनपरिवर्तन होत होते. त्यांच्या दूरदर्शितेचा फायदा दिसू लागला होता. गेले महिनाभरात भाजीवाला फिरकला नव्हता पण आज काय शिजवावे हा प्रश्नही कधी उभा राहिला नव्हता. फ्रिजमध्ये फ्रोजन केलेले मटार, सुकवून ठेवलेली मेथी-पुदीन्याची पाने, घरच्या आंब्याचा आमपाक... मुलांची तर चंगळच चालली होती.
     " चला जेवायला, पानं घेतली आहेत." बाबांनी हाक मारताच सानू लगबगीने उठली.
     " अरे व्वा ! आज्जी आज जेवणात नुडल्स केलेस तू आमच्यासाठी ! डोळे विस्फारीत अंशू म्हणाला, तशी डोळे मिचकावित आज्जी बोलली,
     " हो, पण हे देशी नुडल्स आहेत हं ! ह्याला कुरडयाची भाजी म्हणतात. चला आधी हात जोडून प्रार्थना म्हणा बरं सर्वांनी,
वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जिवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।
     डोळे बंद करुन प्रार्थना म्हणणाऱ्या त्या मनोहर बालमूर्तींना पाहून शशी आणि सानिका गालातल्या गालात हसू लागले.
     " आई ! ह्या बुंदीच्या रायत्यासाठी बुंदी कुठून आणलीस ? शशीच्या प्रश्नाचे उत्तर देत सानू म्हणाली,
     " अरे, आईंनी घरीच पाडली बुंदी. आज बुंदीचे लाडूही मिळणार आहेत !"
     " अरे वा ! कमाल आहे आईची !" म्हणत सर्वांनी भोजनावर यथेच्छ ताव मारला. सानिकाने झटपट स्वयंपाकघर आवरले आणि सर्वजण वामकुक्षी घ्यायला आपापल्या खोलीत गेले.
     "चलो, बच्चों का दुध-बोर्नविटा और बड़ों की चाय हाजिर है...." शशीच्या आरोळीने सर्वांना जाग आली. चहा प्यायल्यावर शशी म्हणाला,
     " आई, अंशुचे केस खूप वाढलेत. कटिंग करुन टाकतो मीच."
     " ए, ही काय वेळ आहे कटिंगची ? पुन्हा स्नान करावे लागेल. उद्या सकाळी करा." वैशाली असे म्हणाली खरे पण लगेचच चपापून तिने सानूकडे पाहिले. त्यांच्या बोलण्याकडे आपले लक्ष नाही असे दाखवत सानू बेडरुममध्ये गेली पण तिलाही तो प्रसंग आठवला. अशीच एकदा ती पार्लरमधून आल्यानंतर, तिने आंघोळ केली नव्हती म्हणून वैशाली नाराज झाली होती तेव्हा शशी आईला म्हटला होता,
     " आई, तू उगाच आपले नियम तिच्यावर लादत जावू नकोस. तुला स्वच्छतेचा मिनिया आहे. वॉशरुममधून आलो की पाय धुवून या, स्वयंपाकघरात स्लीपर्स घालून येऊ नका, ऑफिसमधून कितीही दमून आलो तरी आधी हात-पाय धूवा, जेवताना टी.व्ही. पाहू नका, मोबाईल चाळू नका....तू आपल्यापुरते हे सर्व पाळत जा नं ! तुला प्रत्येक बाबतीत लक्ष घालायलाच हवे का ?"
     एरवी शशी असा कधीच बोलत नसे. आताशा त्याच्या अशा बोलण्याने वैशालीचे मन खूप दुखायचे पण ती सदानंदांना यात पडू द्यायची नाही. आपलेच चुकत असेल, उगाच वाद वाढवून, घरातली शांतता भंग होऊ नये म्हणून तिने, डोळ्यावर कातडे चढवून, सोयीस्करपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. शशी व सानिका ऑफिसला गेले की तिचा सर्व वेळ घर नीट-नेटके करण्यात, सखूकडून कामे करुन घेण्यात व सायंकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीत जायचा. अंशूल व संयुक्ताच्या जन्मानंतर तर दिवस पाखरासारखे भूर्रकन् उडून गेले. बोलता-बोलता अंशू सहा वर्षांचा व संयू चार वर्षांची झाली आणि अचानक शशी नवीन नोकरीच्या निमित्ताने पत्नी व मुलांबरोबर पुण्याला गेला. गौरी-गणपती, दिवाळीसारख्या सणानिमित्ताने त्यांचे येणे व्हायचे. वैशाली व सदानंद अधून-मधून जायचे. घराचा खालचा हिस्सा सुधा-माधव चिटणीस दंपत्तीस, भाड्याने दिला होता. त्यांच्या मुलाचे व सूनेचे वास्तव्य अमेरिकेत होते. दोन्ही कुटुंबाची छान गट्टी जमली होती शिवाय वैशाली व सदानंद बाहेरगावी गेले की त्यांना घराची व बागेची काळजी नसायची.
     " आई, आम्ही मुलांना घेऊन जरा टेरेसवर फिरुन येतो गं !"   शशीच्या वाक्याने वैशालीच्या विचारांची साखळी तुटली.
     शशी, सानू व मुलांसोबत गच्चीवर गेला. मोकळ्या हवेत फिरताना त्यांची नजर सभोवती फिरु लागली. लॉकडाऊनमुळे प्रदूषणमुक्त झालेले निरभ्र आकाश, मधूनच येणारी सुखद वाऱ्याची मंद-मंद झुळूुक ! सगळं वातावरण कसं स्वच्छ आणि शुद्ध वाटत होतं.
     " सानू, मला वाटते लॉकडाऊन संपल्यावरही सरकारने महिन्यातून एकदा तरी जनता कर्फ्यू लावावा म्हणजे वाहनांची रेलचेल कमी होऊन प्रदूषण कमी होईल. तसेच तंबाखू आणि गुटक्यावरही प्रतिबंध लावला पाहिजे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावून, सरकारने एका दृष्टीने समाजावर उपकारच केला आहे. संसर्गजन्य रोगाचा मोठा प्रसारक असणारा, हा किळसवाणा प्रकार खरंच थांबलाच पाहिजे."
     " अगदी बरोबर शशी ! असं वाटतंय, इतकी वर्षे भगीरथ प्रयास करुन जे साध्य झाले नाही ते या लॉकडाऊनमुळे साधत आहे." सानूनेही आपली सहमती दर्शवली.
     " सानू, बाबांनी बाग किती छान फुलवली आहे बघ. खूप कष्ट घेतात ते बागेसाठी. किती प्रकारची फुलझाडे लावली आहेत." शशी कौतुकाने म्हणताच सानिका अगदी उत्साहाने बोलली,
     " हो ना ! खालती किचन गार्डनमध्ये तर भाज्यांचे इतके प्रकार लावले आहेत की ताज्या भाज्या तोडा आणि शिजवा. शशी, मी खरंच आई - बाबांना ओळखण्यात चुकले. विनाकारण पूर्वग्रह ठेवून वागले. आता खूप वाईट वाटतंय." गहिवरल्या सानिकाला शशीने प्रेमाने जवळ घेताच संयू ओरडली,
     " मम्मी-डैडा, सोशल डिस्टटींग प्लीज." तिच्या उदगाराने गच्चीवर एकच हशा पिकला.
     " अंशू, संयू, खाली या रे ! शुभं करोती म्हणायची वेळ झाली." आज्जीने हाळी देताच दोघांनी खाली धूम ठोकली.
     " आपल्याला, मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. इथे पहा, रोज शुभं करोती, रामरक्षाच नाही तर अथर्वशीर्षही तोंडपाठ झाले आहे मुलांना. आई-बाबा किती छान शिकवतात मुलांना." बोलताना सानिकाचा उर भरुन आला. शशीने तिला जवळ घेताच, त्याच्या खांद्यावर मान टेकवत ती म्हणाली, आय अॅम रियली फिलींग व्हेरी सॉरी शशी पण मला खरंच खूप अपराध्यासारखं वाटतंय रे ! लग्नानंतर सात वर्ष मी इथे राहिले. आई-बाबा आज जसे वागतात तितक्याच प्रेमाने तेव्हाही वागायचे. ऑफिसला निघाले की माझ्या हातात तयार टिफीन ठेवायच्या आई. माझी मम्मी तर म्हणायची सुद्धा की तुझ्या सासूने अति लाड करुन डोक्यावर घेतले आहे तुला. मी उगाचच आकस ठेवला मनात. सखीचा स्वतंत्र संसार पाहून, हेवा वाटायचा मला म्हणूनच मी तुला भरीस पाडलं. आईंना अन्न वाया घालवलेलं आवडायचं नाही. बाबांना वाटायचं, आपण वेळेवर झोपावे, वेळेवर उठावे. आपण खोलीत नसतानाही पंखा, वीज चालू असली किंवा स्नान झाल्यावर गिझर बंद केला नाही की त्यांना राग यायचा. केवळ माझा मूड जाऊ नये म्हणून तू माझी बाजू घेऊन त्यांच्याशी वाद घालायचास पण आता स्वतंत्र संसार करताना, हे सगळं पटतंय."
     " हो, खरंय ! प्रेम करवायला जशी आई लागते ना ! हक्काने भांडायला पण तीच सापडते कारण तिची ममता रागा-लोभापलीकडे असते. पण आपण घर सोडून गेलो हे एका अर्थाने छानच झाले. आपल्याला जबाबदारीची जाणीव झाली, आपल्या माणसांची किंमत कळली. आता हेच पहा, अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपण इथे आहोत , इट इज ए ब्लेसिंग इन डिजगाइज. बरं चल खाली, आईला कैऱ्या हव्या आहेत ना, आंब्याची डाळ करण्यासाठी ! वाट पाहत असेल ती." म्हणत शशीने झाडाच्या कैऱ्या तोडल्या आणि दोघे खाली उतरले. मुले आज्जीबरोबर प्रार्थना म्हणत होती,
" हे ईश्वरा संपूर्ण विश्वावर तुझी कृपादृष्टी राहू दे. विश्वाचे संकट लौकर दूर कर.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥
ॐ शांतिः शांतिः शांति: "
     " मुलांचा मधुर स्वर ऐकून कान तृप्त झाले हो ! किती पवित्र वाटतंय वातावरण !" माधवकाका आणि सुधाकाकू घरात प्रवेश करताक्षणीच वदले.  त्यांना नमस्कार करुन शशीने विचारले,
     "काय म्हणतोय लॉकडाऊन काका ?"
     " आम्हा पेंन्शनरांना काय रे ! आम्ही असेच आयसोलेशनमध्ये असतो नेहमी. काय सदानंदराव !" खो-खो हसत काका म्हणाले. शशीचा गोरामोरा चेहरा पाहून वैशाली पटकन् बोलली,
     " आंब्याची डाळ आणि पन्हे केले आहे भाऊजीे. खाऊनच जायचे बरं का !"
     " वा ! आज काय चैत्रगौरीचे हळदी-कुंकू का ! मग काय करंज्यांचाही बेत असेल. वहिनींसारख्या अन्नपूर्णेच्या हातच्या प्रसादाचा अव्हेर कसा करु आम्ही ?"
     " तसं समजा हवं तर !" म्हणत वैशाली सुधाकाकूंबरोबर  स्वयंपाकघरात गेली.
     " कशाला एवढा घाट घालता वहिनी ! आधीच कमी कामे असतात का ? आताशा सखूबाईचीही मदत नाही."
     " नाही हो वहिनी ! एकटी कसली ? सानिका ऑफिसचे काम करुनही, जमेल तेवढी मदत करत असते." वैशाली सानूचे कौतुक करत म्हणाली.
     इकडे पुरुष मंडळींच्या गप्पा रंगात आल्या. विषय कोरोनायोद्धांवर येऊन ठेपला. शशी म्हणाला,
     " काही अपवाद सोडले तर लॉकडाऊन बऱ्यापैकी चालला आहे."
     " पण पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार यांना मारहाण करणे म्हणजे अमानवीयता आहे. आपले घरदार आणि कुटुंबीयांना सोडून, मानवतेचे हे पुजारी प्राण पणाला लावून सेवा करत आहेत आणि त्यांच्याशी असा कृतघ्नतेचा व्यवहार ? त्यांचा काय स्वार्थ आहे यात ? सोशल डिस्टंटींग पाळा, आजार लपवू नका, शक्यतो घराबाहेर पडू नका, गावाकडे पलायन करु नका, हेच सांगत आहेत ना !  संशयित रुग्णांना, इलाजासाठीच विनवणी करणाऱ्यांनी जर हात वर केले तर कोण वाली आहे यांचा ! मंदिर सोडून देवाने त्यांच्या देहात प्रवेश केला आहे, त्याची काही चाड आहे का यांना ? सदानंद खवळून बोलले.
     " खरं आहे तुमचं ! काठीचीच भाषा समजते यांना. पोलीस आणि दवाखानेच नाहीतर बैंका, विद्युत व पाणी-पुरवठा विभाग,औषधांची दुकाने इत्यादी आवश्यक सेवाकर्मचाऱ्यांचेही आभार मानले पाहिजे. काका असे म्हणताच शशीने विचारले,
     " पण बाबा, किती दिवस चालणार असं ? आर्थिकदृष्ट्या किती मागे गेलो आपण ! सरकार तरी कुठपर्यंत पोसणार कामगारांना ?"
     " सद्या तरी जीव वाचवणे, पहिली गरज आहे. सरकार आपल्या परीने खूप काम करत आहेच शिवाय रतनजी टाटांसारखे अनेक दानवीर, परोपकारी संस्था व मंदिरांचे खजिनेही मदत करत आहेच ना ! थोडीफार आबाळ होत असेल तर समजून घेतले पाहिजे. तीस - पस्तीस कोटी जनसंख्यावाल्या अमेरिका, युरोपसारख्या विकसित देशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे या विपत्तीमुळे. सीमित साधनांसह, एकशे तीस कोटी भारतीय जनतेला लॉकडाऊन करायला लावणे, फार धाडसी पाऊल आहे. दीर्घकाळ चालणारी लढाई आहे ही. लॉकडाऊन उठल्यावरही जीवनपद्धतीत बराच बदल होणार आहे शशी, एवढ्यात धीर सोडून नाही चालणार." बाबांचे उत्तर ऐकून काका म्हणाले,
     " विस्तारवादी नीतिचा घातक परिणाम, संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. आपत्तीच्या वेशात ही विपत्ती बरंच काही शिकवून गेली आहे. स्वच्छतेचे महत्व, अन्न- धान्याचा काटकसरीने वापर, अनाठायी खर्च, अनिश्चित भविष्याची नको तेवढी योजना.... बरंच काही ! आर्थिकदृष्टया ताकतवर होण्यासाठी आता भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल. दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे सोडावे लागेल. तुमच्यासारख्या तरुण-तरुणींना जोमाने काम करावे लागेल. काकांच्या बोलण्यास मध्येच आडकाठी घालत शशी म्हणाला,
     " काका, पण आमच्या मुला-बाळांना अजून फुलायचं आहे. भीतीच्या टांगत्या तलवारीखाली असे किती दिवस लटकणार ?"
     " अरे, होईल हळूहळू सर्व सुरळीत. एकदा कोरोना विषाणूची लस तयार झाली की मार्ग निघेलच. तोपर्यंत कळ सोसावीच लागणार व सरकारने सांगीतलेल्या सूचना पाळूनच जीवन जगावे लागणार. पूर्वीच्या काळी प्लेग,  कांजण्यांसारखा संसर्गजन्य रोग झाला की रुग्णास विलगीकरणात ठेवले जायचेच ना ! हा रोग त्यापेक्षा दीर्घकाळ चालणारा आहे असं समजायचं. या प्रसंगावरुन धडा घेऊन, माणसाच्या जीवनाने सकारात्मक वळण घेतले तर संधीचे सोने झाले म्हणता येईल. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम, अनुलोम-विलोमसारखे हलके व्यायाम नियमित करत रहा. आपले आयुर्वेद सांगते त्याप्रमाणे सात्विक आहार, आले-लसूण-काळी मिरी- तुळशीचे चाटण, हळदीचे दुध व गरमच पाणी पिणे हे उपाय चालू ठेवा जेणेकरुन सर्दी-खोकल्यापासून बचाव होईल." काका समजुतीच्या स्वरात बोलले.
     इकडे स्वयंपाक घरात वैशाली व सुधाकाकूंचेही बोलणे जोरावर होते. काकू म्हणाल्या,
     " वहिनी, आपली भारतीय संस्कृतीच खरी शास्त्रशुद्ध आहे. विदेशी लोकांसारखी गळाभेट न घेता, हात जोडून नमस्कार करण्याच्या आपल्या पद्धतीचे आता सगळे स्वागत करत आहेत. मृत्यूनंतर अग्नीदाह संस्काराची आपली परंपराही किती पर्यावरणाला पूरक व संसर्गजन्य रोग टाळणारी आहे. परदेशात मृतदेह गाडण्यासही जागा उरली नाही म्हणतात, शिवाय त्यामुळे रोग पसरण्याची शक्यताही वाढते."
     " अगदी खरं ! मृत्यूनंतर आपण तेरा दिवस सुतक पाळतो, बाळंतीणीच्या खोलीत बाहेरच्या व्यक्तीस सव्वा महिना प्रवेश करु देत नाही, मासिक पाळीतही सोवळे पाळतो, या सर्वामागे विटाळापेक्षा, संसर्गापासून वाचणे व स्वच्छता पाळणे हेच धोरण असते. या कोरोनाने आपल्या लोकांना, आपल्याच परंपरेची नव्याने ओळख करवून दिली आहे."  काकूंच्या मतास दुजोरा देत वैशाली बोलली."
     " पण काही म्हणा वहिनी, चालत्या गाडीला अचानक खीळ बसावी अशी पूर्ण विश्वाची गती थांबून गेली आहे. क्रिकेटच्या सामन्यात इतक्या धावा झाल्या, इतके आऊट झाले, पाहत होतो टी.व्ही.वर. आता इतक्यांना बाधा झाली, इतके मृत्यूमुखी पडले ऐकून-ऐकून जीव घाबरायला होतो.  मी तर बातम्या ऐकणेच कमी केले आहे आता." भला-मोठा उसासा सोडत सुधाकाकू बोलल्या.
     तेवढ्यात खालून कुणाच्या हाका ऐकू आल्या. सर्वजण लगबगीने बाल्कनीकडे धावले, पाहतात तर शेजारचा संजू बोलावत होता.
     " काका, मी मेडिकल शॉपमध्ये चाललो आहे, पप्पांची औषधे आणायला. तुमची फाईल द्या. तुमची पण घेऊन येतो."
     " मी येऊ का बरोबर ?" शशीने विचारताच तो म्हणाला,
     " नको रे ! मी मेडिकल फाईल घेऊन चाललो आहे. मला नाही अडवणार. दोस्ती झालीय आपली पोलिसांशी "
     शशी विचार करु लागला, पोलिसांना पाषाणह्यदयी समजणाऱ्या, त्यांना अनाठायी घाबरणाऱ्या लोकांना त्यांच्या स्वभावाचा एक उज्ज्वल पैलूही पाहायला मिळाला आहे. परिस्थिति माणसाचं चरित्र बनवते म्हणतात ते खरे आहे. ज्या संजाला आणि त्याच्या गैंगला सगळे वाया गेलेला समजायचे, तोच संजू आता  कॉलनीच्या मदतीला धावतो. पोलिसांना चहा, खाण्याचा डबा नेऊन देतो. गरीब वस्तीत जाऊन अन्नवाटपात मदत करतो. कॉलनीतील लोकांकडून आर्थिक मदत घेऊन त्याने हजारो मास्क बनवून झोपडपट्टयांमध्ये वाटले. कधी-कधी पांढरपेशांपेक्षा ही साधी-सरळ माणसेच मानवतेची उच्च पातळी गाठतात.
     " शशी, संजूला थोडं थांबायला सांग, तो वस्तीकडे निघाला असेल तर सखूबाईंचा दोन महिन्यांचा पगार देऊन ये म्हणावं, आपला आणि सुधावहिनींचा. तिची पैशांची आबाळ होत असेल. हातावर पोट बिचाऱ्यांचं !" वैशालीला उठताना पाहून सानिका म्हणाली,
     " थांबा आई, मला पण सखूताईंसाठी काही रुपये द्यायचे आहेत. मीच घेऊन येते." म्हणत सानिका आपल्या खोलीत गेली. जाता-जाता तिच्या डोक्यात एक विचार चमकून गेला, एरवी कामवाली आली नाही तर, आपण तिला किती बोल लावतो मग कारण कितीही गंभीर असो. आता समजतंय, तिला हीच कामं अनेक घरात करावी लागतात. आपण आपल्या घरातील कामं करताना थकून जातो. यांना किती कष्ट करावे लागत असतील !
     सानिकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वैशाली कौतुकाने पाहू लागली. तिच्या वागण्यातील सुखद बदल त्यांनाही सुखावत होता.
     लॉकडाऊनचा काळ संपत आला. काही आवश्यक कारखाने उघडण्यात आले. शशीचे ऑफिस औषधांशी निगडीत असल्याने त्याला बोलावण्यात आले. सानिकाला घरुनच काम करायचा निर्देेश होता आणि मुलांच्या शाळेच्या सुट्टयाही वाढल्या होत्या पण शशीला एकट्याला जावू द्यायला सानिका तयार नव्हती आणि मुलांपासूनही ती दूर राहू शकत नव्हती. शेवटी चौघांचे जाणे निश्चित झाले. वैशालीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. सानिकालाही राहून-राहून गहिवर येत होता. या दोन महिन्यात जो लळा व आपुलकीची भावना दाटून आली होती, ती शब्दातीत होती. वैशाली एकीकडे, मुलांसाठी लाडू, चिवडा, शंकरपाळे करत जात होती तर दुसरीकडे सूचनांची यादी चालू होती,
     " मुलांची व स्वतःची काळजी घ्या. मास्कचा वापर करा. सर्दी-खोकला झाला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाहेर खाऊ-पिऊ नका. मॉलमध्ये जाऊ नका. गरम पाणी पित रहा. वारंवार साबणाने हात धूवा. भाजीपाला, व्हिनेगर व मीठ-सोड्याच्या पाण्याने धूवा."
     " आई-बाबा, आम्ही कारनेच जात आहोत. तुम्हीही चला ना !  म्हणजे आम्हालाही काळजी राहणार नाही. घराकडे व बागेकडे काका-काकू लक्ष देतील असं म्हणाले आहेत. बोलता-बोलता शशी हळवा झाला. त्याच्या पाठीवर थोपटत बाबा म्हणले,
     " सगळे थोडे स्थिर-स्थावर झाल्यावर येऊ आम्ही. आमची मुळीच काळजी करु नकोस आणि साठ पार लोकांनी सद्या प्रवास टाळलेला बरा. इथे एका दृष्टीने क्वारंटीनच आहोत आम्ही."
     अंशू आणि संयूला तर समजावता-समजावता नाकी नऊ आले. जायची वेळ येऊन ठेपली. कारमध्ये सामान ठेवण्याकरता शशी आणि सदानंद खाली उतरले आणि सानिका वैशालीला घट्ट बिलगली. गंगा-यमुनेचा पूर ओसरेना.
     " आई ! मी माझ्या भावना शब्दात प्रगट करु शकत नाही पण या लॉकडाऊनने ह्यदयाचे लॉक मात्र उघडून दिले. वातावरणातील प्रदूषणाबरोबर मनाचं मळभही दूर झालं. मला मनापासून तुमची व बाबांची क्षमा मागायची आहे. कळत-नकळत अनेक चुका झाल्या माझ्याकडून पण आय प्रॉमिस आता असं होणार नाही. कोरोनाने जगाचे खूप नुकसान केले पण अनेक कुटुंबे जोडलीही असतील."
     " वेडी आहेस की काय तू सानिका ! कुटुंब म्हटले की थोडेफार समज-गैरसमज होणारच. पण तो एवढा मोठा गुन्हा नाही की त्याला क्षमा नसावी. काही चुका आमच्याकडून पण झाल्या असतील. तू उगीच मनाला लावून घेऊ नकोस. रोज एक व्हिडिओ कॉल कर म्हणजे भेटल्याचे समाधान होते. पूस बघू डोळे, माझी शहाणी लेक ती !"
     सानिकाची मिठी हलकेच सैल करुन वैशालीने डोळ्यांच्या कडा टिपल्या. शशीने हाक मारताच, दोघी खाली उतरल्या. आई-बाबांना सर्वांनी नमस्कार केला. शशीने कार सुरु केली आणि कार दृष्टीआड होईपर्यंत सगळे एकमेकांना बाय् करत राहिले. सदानंदांच्या  मनात एक प्रश्न उभा राहिला,
      " या कोरोनाला आपत्ती म्हणावे की इष्टापत्ती, ज्याने सामाजिकदृष्ट्या देहदूरी बनवली पण मनाचे पूल सांधून, धुसर पायवाटेचे रुपांतर पक्क्या  वाटेत केले."
-----------------------------------------------------------

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू