पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खरा आनंद

खरा आनंद

 

गुड मॉर्निंग...... गुड मॉर्निंग......  अश्या गोड  आवाजातल्या अलार्म ने  राधाला  5.30 ला उठवले. ज्या देवाने तिला उठवले त्या देवाला उठल्यावर आधी तिने प्रेमाने हातात घेतले आणि अगदी डोळे भरुन प्रेमाने  ती  त्याने दिलेली सगळी माहिती उपयोगी असल्यासारखी त्या आभासी चक्रव्यूहात अडकत गेली. एवढी माहिती कुठून येते, कोण कुणाला पाठवते, एकच माहिती किती जण पाठवते, त्यामुळे वैतागून गेली असली तरी त्या मृगजळाची तिला ओढ लागली होती आणि त्याच्या मागे धावत जाण तिला आवडू  लागले होते. 

तेवढयात 6.30  वाजले,  चिनुला  उठवायचा अलार्म  झाला, तेव्हा तिला तो मोह सोडून चिनुला उठवावेच  लागले. आजची  टीप लहान मुलांना कसे उठवायचे,  कसे स्वावलंबी बनवावे,  यावर असल्याने तिने त्याप्रमाणे चिनुला उठवण्याचा निरर्थक प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, त्याला अजिबात जाग आली नाही. मग तिने तिच्या प्रेमळ उबदार स्पर्शाने त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवून एक प्रेमळ हाक मारताच चिनु ने तिला मिठी मारली आणि त्या खऱ्याखुऱ्या स्पर्शाने राधा आभासी जगातून बाहेर आली,  आणि मग तिची धावपळ सुरू झाली.  

आज मृगजळात तिने  लहान मुलांना डब्यात देण्या जोगे बरेच पदार्थ बघितले होते.  कुठला पदार्थ चिनु खाईल,  आणि आपल्याला करता येईल या विचारात असताना, चिनुनेच तो प्रश्न सोडविला. तो म्हणाला  ‘आई आज मला गोड शिरा केळ घालून करून दे तुझ्या हातचा शिरा मा‍झ्या सगळ्या मित्रांना आणि मॅडम  ना तर खूप आवडतो. ती एकदम खुष झाली.  शिर्‍याच्या वासा आणि रंग बघून चिनुच्या डोळ्यातला खराखुरा आनंद तिला खूप काही देऊन गेला. 

आता पुढची कामं करायची जबाबदारी चिनुच्या बाबाची. जसे त्याला आंघोळ घालुन,  तयार करणे आणी बस स्टॉप वर सोडविणे. चिनुला तयार करवतांना  बाबा पण  मॉर्निंग वॉक ला जाण्याची तयारी करीत असे. बाबाची त्याला काहिही शिकवायची एक वेगळी स्टाइल होती. तो हे कर,  ते कर न सांगता  ‘तुला हे करायला जमेल का बघ’ असे बोलल्याने, सहाजिकच माणुस प्रत्येक गोष्ट करुन बघतो, आणि ती गोष्ट आपोआप तो अगदी सहजपणे करायला लागतो. तसे चिनु पण शाळेचा  ड्रेस  बुट घालायला शिकला,  हे कोणाला कळले पण नाही.  आता पटकन तयार होऊन चिनुच  घाई  करायचा.  बाबा लवकर   आवर,  नाहीतर बस चुकली तर तुला शाळेपर्यंत यावे लागेल.  खरेतर बस स्टॉप जवळ होता पण बाबाने त्याला  इतर मुलांसारखी स्कूटरवरून सोडायची सवय लावली नव्हती. बाबा त्याला रोज सायकल ने सोडायचा. त्याला सोडुन बाबा सायकल वर एक राऊंड  मारायचा हेच चिनु ला समजल्यावर तो पण घरातून पंधरा मिनिट लवकर निघून ‘बाबा मला पण  राऊंड   मार’ असा हट्ट करू लागला.   हा हट्ट  चांगला असल्याने बाबा पण तो मनापासून पुरवत असे.  घरातून निघाल्यावर ते आधी गणपती मंदिरात जात, तिथे  एक  मोठे वडाचे झाड होते. त्यावर बसणार्‍या पक्ष्यांची सकाळची लगबग बघायला दोघांना खूप आवडायचे. पक्ष्यांची किलबिल मंदिरातील आरतीचा आवाज, सूर्याची कोवळी किरणे हे त्या दोघांना भरभरून  एनर्जी देत असे,  बाबाला हेच तर चिनुला  सांगायचे  असे  की निसर्गाने आपल्याला किती आणि काय काय नाही दिले?  बाबा त्याला बऱ्याच वेळा  तिथेच स्वच्छतेचे, शिस्तीचे धडे अगदी एक दोन वाक्यात देत असे जे त्याच्या कायम लक्षात रहायचे.

बाबा  परत  घरी  येईपर्यंत राधाचे थोडे आवरून होई  पण मध्येच  जर परत ती मोबाईल मागे धावली तर तिची ऑफिसाला वेळेत पोहोचण्यासाठी चिडचिड  व्हायची. घरी आल्यावर पण जर तिने त्या आभासी चक्रव्यूहात पाय ठेवला तर चिनु चा अभ्यास, शुभंकरोती  पण बाबाला  घ्यावे लागे. बाबाच्या ( राम ) लक्षात येत होते की राधा ह्या आभासी चक्रव्यूहात चांगलीच अडकलेली आहे; पण तिला स्वतःला च त्यातून  बाहेर पडायचा रस्ता माहीत नव्हता. मग एक दिवस बाबा आणी चिनु ने मिळुन एक प्लान केला. ह्या अनोख्या प्लान मध्ये चिनु ने चांगलीच साथ दिली.

संध्याकाळी  शाळेतून  घरी आल्यावर  त्याने सांगीतले “पुढील आठवड्यात  शाळेत  डॅडी’ज टिफिन विक”  आहे तर बाबा आई चे  डबा  बनवायचे काम  तुला करावे लागेल, आणि  बाबा  तुझी कामे आईला करायची आहे.  बाबांनी मुद्दामच नाराजी दर्शवली. आपल्याला नाही हा राधा सारखे  पटापट कामे करायला जमणार, आणि लवकर उठायला तर अजिबात नाही. आणि माझ्या मॉर्निंग वॉक  चे काय होणार? 

हे ऐकल्यावर राधा मनातून खुश झाली, चालेल मी मग उद्या  7.00 वाजता उठणार,    म्हणजे दीड तास जास्त मी झोपणार. हो,  आता मी तुला  लवकर उठवणार नाही,   पण माझी एक अट  असणार -  तू पण मला बाबा सारखे सायकलीने सोडायचे आणि गणपती बाप्पााचे दर्शन घेतल्याशिवाय मी शाळेत जात नाही, हे पक्के. 

राधा लागलीच तयार झाली कारण तिला बघायचे होते बाबा कसा  टिफिन  बनवतो? लवकर उठणार का?  बाबा राधा सारखा  5.30 ला उठला नाही त्यामुळे ती मनातून विचार करत होती पहिल्याच दिवशी चिनुला डबा मिळणे अशक्य आहे.  बाबा 6.15 ला उठला,  त्याने रात्रीच प्लॅनिंग केल्याने भाज्या कापून ठेवलेल्या होत्या.   तो चिनु ला रोज हेल्दी   नाश्ता देणार होत.   त्याने सगळ्या भाज्या घालून शेवयांचा उपमा नूडल्स म्हणून दिल्याने चिनु  खुश  झाला.   कलरफुल भाज्या,  नूडल्स आणि त्यात थोडेसे पनीर घातल्याने सगळेच खुष.   राधा पण ते बघून खुश झाली आणि एवढ्या उशिरा उठून रामने किती सुंदर उपमा बनवला याचे तिला आश्चर्य वाटले. 

आता राधा खूप वर्षात सायकल  चालवणार  होती.   चिनु  बाळाचे मन वळवण्याचा  तिने  खूप प्रयत्न केला,  “ बाळा, स्कुटी वरून मस्त सोडते, राऊंड  पण मारते, पण सायकल नको. पण बाबांचे आणि चिनुचे आधीच ठरल्याने चिनु बाळाने   सायकलीचा हट्ट सोडला नाही. सायकल  चालवायला  तिला  खुप ऑकवर्ड होत होत.   पण  सायकल चालवताना मिळणारा आनंद पण  ती  लपवू   शकली नाही.  मंदिरात गेल्यावर चिनुने  रोज प्रमाणे पक्ष्यांना दाणे दिले आणि त्यांच्या त्या मंजुळ आवाजाने, आणि  किलबिलाट  ऐकुन  राधा पण प्रभावित झाली. चिनु  ने  आईला सूर्याची कोवळी किरणे दाखवली, वडाच्या झाडाखाली मिळणारा प्राणवायु,  गार वारा मंदिरातील घंटानाद  आ..हा..हा..   ह्या सगळ्यात  राधा   पूर्ण हरवूनच गेली.  मग  चिनुनेच तिला हलवून बस ची  वेळ झाल्याचे सांगितले. घड्याळात बघितल्यावर  ती एकदम भानावर आली.  घरी    आल्यावर  ती  अजुनही  मंदिरात  आणि सायकल वरच   होती.  रोज सकाळी  आपण जे आभासी फोटोज बघतो, ते  ती पुरेपूर  अनुभवून  आली होती.   तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह  तर  राम ला बरेच काही सांगून गेला.  आणि युक्ती कामी येईल असा विश्वास पण वाटु लागला.  संध्याकाळी पण घरी आल्यावर चक्रव्यूहात न अडकता  सकाळी घेतलेल्या अनुभवाबद्दल सांगू लागली.  ती शाळेत कॉलेज ला  लांब पर्यंत कशी सायकल वर  जायची, सायकल  कशी शिकली, वगेरे  किस्से सांगू लागली. आठवड्या भरात राधाने प्रत्यक्ष सगळे वास्तव अनुभवल्याने  ती  खुपच आनंदी होती. मृगजळाच्या मागे न धावता  ते प्रत्यक्ष कसे अनुभवायचे हे शिकली.  

आठवडा संपला - परत  ती  5.30  उठून,   सगळ्यांचा टिफिन  बनवून आता दोघेही चिनुला सायकल वर सोडायला जात.  राधाची चिडचिड पण आता पूर्ण कमी झाली.   राम पण तिला डबा  बनवायला  थोडी  मदत करू लागला.  आता  बस स्टॉप वर या दोघांचे बघून बरेच पालक सायकल वर येत, आणि वेळात वेळ काढुन एक  फेरी पण मारत.  

खरच आभासी चक्रव्यूहात अडकायचे  नसते पण  त्याचा पुरेपूर  वापर आवश्यक गोष्टींसाठी नक्कीच करायला हवा. बर्‍याचश्या कामासाठी त्याचा खूप खूप चांगला उपयोग आहे. आणि मोबाईल  आज काळाची गरज आहे.  त्यामुळे आपली खूप सारी कामे सहज होतात माहिती मिळते संपर्क होतो. अगदी  कल्पवृक्षा   प्रमाणे तो आपल्यासाठी  24×7 हजर  असतो.

पण एवढे मात्र नक्की की “अति तिथे माती” होऊ नये  म्हणजे झाले. 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू