पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक गोड संक्रांत

एक गोड संक्रांत

      अग काळी साडी कशाला ? तुला माहितीयेना आपल्यात चालत नाही- तो

माहितीये पण संक्रांतीला काळ्या रंगाचीच कपडे आवर्जून घालतात..सगळ्या परंपरा पाळायच्या मग ही का नको आणि कोणताच रंग शुभ अशुभ नसतो...तस पाहिलं तर चेहऱ्याचा,केसांचा काळा रंग अशुभच म्हणाव लागेल नाही का😀--ती

    घ्या मॅडम तुम्हाला हवी तशी साडी..तुझ्यासमोर बोलण्यात कोण जिंकेल का--तो

    पहिल्या संक्रांतीला घेतलेल्या साडीवरून हात फिरवत आज तिला दोघांतला संवाद आठवत होता. आज पाच वर्षे झाली तिच्या लग्नाला पण तो प्रसंग आताच घडल्यासारखा तिला वाटत होता.पहिली संक्रांत धुमधडाक्यात साजरी करण्यात तो तिच्या सोबत होता...त्यानंतरच्या प्रत्येक संक्रांतीला मात्र तो प्रत्यक्ष सोबत नसूनही अप्रत्यक्ष मात्र तिच्या भोवती असायचा.

तो सैन्यदलात बॉर्डर वर देशाचं रक्षण करायचा आणि ही इथे त्याच्या कुटुंबासोबत समाजाचीही सेवा करायची.

     शाळेपासून दोघे एकत्र..मैत्रीची सुरुवात संक्रांतीला तिळगुळ देण्यापासूनच झाली...तिळगूळाच्या गोडव्याने प्रेम फुललं आणि मुरत गेलं ते आज पर्यंत नात्यातला गोडवा अगदी तसाच टिकून आहे. म्हणून संक्रांतीचा सण दोघांच्या अगदी जवळचा. वर्षातला या तरी सणाला तो सोबत असावं असं तिला खूप वाटत पण सर्वात आधी देशसेवेलाच प्राधान्य.

     संक्रांतीदिवशी ती नेहमीच काळी साडी नेसून, चंद्रकोर लावून,गजरा माळून,नाकात नथ घालून नटून थटून हळदीकुंकुला जायला तयार व्हायची. पण इतर चारचौघींसारखं हळदीकुंकु करणं आणि वाण देणं तिला मान्य नसायचं. तिचं हळदीकुंक म्हणजे तिळगुळ समारंभ..सर्व स्तरातील स्त्रियांचा सन्मान. ती आणि तिच्या मैत्रिणी जमतील तेवढे पैसे गोळा करून त्याच्या उपयुक्त वस्तू, पुस्तकं घेऊन वारांगना आणि त्यांच्या मुलांना भेट म्हणून द्यायच्या. वारांगणांच्या पुनर्वसनासोबतच त्यांच्या मुलांनाही योग्य शिक्षण मिळवून देण्यासाठी ती एका संस्थेसोबत काम करत होती. समाजापासून वंचित  असणाऱ्या स्त्रियांना ती शक्यतोपरी मूळ प्रवाहात आणण्याचं महत्वाचं काम करायची.

तिच्या या कामात धोका होताच आणि मेहनतही...पण या कामात तिला त्याचा पाठिंबा आणि सहकार्य नेहमी सोबत असल्यामुळे ती खूप आत्मविश्वासाने, यशस्वीपणे हे काम करायची. सोबत तिचा परिवारही तिला हवी ती मदत करायला तत्पर असायचा.

      मला नेहमीच अप्रूप वाटतं तिचं... त्याच्यापासून महीनो न महीने लांब राहून स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलीची आणि परिवाराची जबाबदारी ती अगदी लिलया पार पाडते सोबत तिच्या कामातही स्वतःचे शंभर टक्के देते शिवाय सदा प्रसन्न आणि हसतमुख चेहरा. विचारलं एकदा तिला की एवढा दुरावा दोघांतला कधी त्रासदायक नाही का ग ठरत?? भांडण तंटा होतो की नाही?? यावर ती हसतच म्हणाली भांडण,तंटा,रुसवा,फुगवा सगळं काही होत ग आमच्यातही पण कधी कधी भांडल्यानंतर दुसऱ्यांदा फोन येईपर्यंतचा काळ इतका लोटून गेलेला असतो की झालेलं भांडणच विसरून गेलेलो असतो आम्ही..या दुराव्याने तर आमच्यातील प्रेमाची ओढ वाढत जाते आणि शरीराने दोघे दूर आहोत पण मनाने नेहमीच एकमेकांच्या जवळच. किती संकटे आली तरी हृदयातला वसंत दोघांनीही जपलाय. ती बोलत होती ते अगदी मनापासून आणि त्याच्यावरच नितांत प्रेम तिच्या डोळ्यात नेहमीच झळकायचं.

     यावर्षीही ती काळ्या रंगाची भरजरी मोरनक्षी असलेली पैठणी त्यावर मोत्यांचे दागिने घालून तयार होत होती...तेवढ्यात दाराची बेल वाजते...दार उघडून बघते तर लाल रंगाच्या गुलाबांचा पुष्पगुच्छ आणि एका हिरव्या पानात मोगऱ्याचा गजरा ठेवलेला..ती आजूबाजूला डोकावून बघते पण कोणीच नसतं..दरवाजा लावून विचार करत आत जाते तोवर पुन्हा बेल वाजते..आता तरी कळेल नक्की कोण म्हणून ती दरवाजा उघडते..समोर ठेवलेलं ग्रिटींग इकडे तिकडे पाहत उचलून उघडते..सुंदरशी कविता त्यात लिहिलेली दिसते --

        शब्द तू चाल मी,सूर तू ताल मी

        तू छेडिल्या तारांतील गीत मी

         निःशब्द तू भावना मी

         हास्य तू किनार मी

         तुझ्या डोळ्यातील अव्यक्त प्रेम मी

          श्वास तू गंध मी,ध्यास तू मन मी

          तुझ्या ह्रदयातील स्पंदने मी

           साथ तू सोबत मी,तुझ्यासवे पूर्ण मी

           तुझ्याविना अपूर्णच मी....

कविता वाचून आणि अक्षरावरून तिची खात्री पटते की त्यानेच हे पाठवलंय... पण तोच आज सोबत असता तर..असा विचार करतच ती समोर बघते आणि चक्क त्याला समोर बघून चकितच होते. आपण स्वप्नच बघतोय की काय या भीतीने ती स्वतःलाच एक चिमटा काढते..क्षणातच कळत की हे स्वप्न नसून सत्य आहे..ज्याची प्रत्येक संक्रांतीला आतुरतेने वाट बघते तो आज डोळ्यासमोर उभा आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी ती त्याला मिठी मारते. आज आठ महिन्यांनंतर ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसावतात. सौंदर्याने नटलेली ती त्याच्या येण्याने गालावरची लाली अजूनच गहिरी होते. तिच्या प्रेमात हरवलेला तोही तिला मिठीत घेत म्हणतो,

          तुझ्या हसण्यात माझं जगणं

          तुझं हळुवार माझ्यात विसावण

           क्षणात वाटत जग इथंच थांबावं

           हातात हात गुंफूनी

           सुखाच्या पायघड्यांवर तू न मी चालावं

       ती भान हरपून त्याच्यात विसावलेली. आज खऱ्या अर्थाने तिची संक्रांत गोड झाली.

                                          ©सरिता सावंत भोसले




  

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू