पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गणपती मुलाखत

गणपती मुलाखत

रविवार ची संध्याकाळ. बाहेर पावसाने थैमान घातले होते त्यामुळे कुठे बाहेर जाता येईल अशी शक्यताच नव्हती.
संध्याकाळी वेळ जात नव्हता,राणीसाहेब स्वयंपाकघरात होत्या आणि बंडू आणि गोटु गृहकार्य करण्यात लागले होते..मला खूप दिवसाने रिमोट हातात घ्यायची संधी मिळाली होती. माझ्या मेंदूने म्हटले "चला बापट टीव्ही वर काय येत आहे तेच पाहूया".
मी टीव्ही लावला अनेक चॅनल वर राऊंड मारून मग ठरवणार की काय बघायचे ते, पण त्या आधीच आमच्या गृहमंत्रीनी आतून ओरडुन ऑर्डर दिली,"ते पिक्चरचे चॅनल लावून नका, गोटू अभ्यास करतोय त्याचे लक्ष तिकडे जाईल."
झालं मग काय बघायचे.."बातम्या लावू?"मी पण ओरडुन विचारले.
"नको! नुसते राजकारण आणि गुन्हेगारी ह्या शिवाय काय असते त्यात?" गृहमंत्री पुन्हा नकार घंटा वाजवत होत्या.
"मग काय बघू त्या सासू सूनांच्या भांडणात मला रस नाही जरापण" मी थोड्या कुरकुरणाऱ्या आवाजात म्हटले.
खरंतर आतापर्यंत मला कळले होते की नुसता रिमोट हातात आला म्हणजे आपल्याला कंट्रोल मिळाला असे नसते. आपल्याला आपल्या मनासारखे करता यायला धाडस लागते, जे माझ्यात मुळीच नव्हते
असो, "आता उरल्या आहेत किती चॅनल?" असे बडबडत मी चॅनल सर्फिंग करू लागलो..त्यात एका ठिकाणी गणपती बाप्पाची मुलाखत दाखवत होते.बहुतेक कुठल्या तरी शाळेचा कार्यक्रम असावा.
त्या कार्यक्रमात मुलाखत घेणारी बाई बनलेली मुलगी असेल सातवी आठवीतली. म्हणजे माझ्या मुलांच्याच वयाची. म्हणून मला कौतुक वाटले आणि मी ठरवले तोच कार्यक्रम बघायचा म्हणून
पुढे जसे टिव्ही वर पाहिले तसे ..
रिपोर्टर : मी संजना बाम कश्यप. आज घेऊन आले आहे तुमच्या करता एक विशेष अतिथी...मीडिया मधल्या सर्व चॅनल पैकी सर्वात पहिले पहा कलतकवर..एक मोठ्या आणि प्रसिद्ध हस्तीची मुलाखत..फक्त आणि फक्त कलतकवर, माझ्या सोबत!
कोण आहे तो विशेष अतिथी? जाणून घ्यायला टी व्ही सोडून जाऊ नका आम्ही येतो थोड्याच मिनिटात बस एक छोटीसी विश्रांती नंतर..
(त्यानंतर तिने एक फिरकी मारली आणि निरमा ची पूर्ण जाहिरात बोलून गेली, नंतर फिरकी घेऊन पुन्हा संजना झाली )
रिपोर्टर: तर तुम्ही पाहत होता संजना बरोबर कलतक. बोलवूया आपल्या आजच्या सेलिब्रिटींना.. टाळ्यांसह स्वागत करूया आजचे आपले चीफ गेस्ट "गणपतिजींचे"
(आणि मी कल्पना करत होतो की एक गब्बु मुलगा येईल तर त्या ऐवजी आले एक बारीकसे असे गणपती. त्या कार्यक्रमात बसलेल्या सगळ्यांनाच हसू यायला लागले हे बारीक गणपती बघून.)
रिपोर्टर: या या गणपती जी..बसा..नमस्कार.
गणेशजी: नमस्कार संजना जी
रिपोर्टर : अरे वा तुम्हाला माझे नाव पण माहीत आहे? 
गणेशजी : अहो त्यात काय मोठे? तुमच्या हा सेलिब्रिटी चा कार्यक्रम प्रसिद्धच आहेना, 
(मागे तोंड प्रेक्षकांकडे करत म्हणाले)म्हणून तर आलो इथे, आजकाल मार्केटिंग का जमाना है भाई.
रिपोर्टर: पण बाप्पा आता पर्यंत आम्ही जितके गणपती बघितले ते सगळे लंबोदर असायचे गज कर्ण असायचे पण तुम्ही तर...
गणपती : त्याचे असे आहे ना संजना मॅडम..माझ्या ह्या बारीक असण्याकरता सरकार जबाबदार आहे.
रिपोर्टर: सरकार? ती कशी काय बुवा?
गणपती: आधी माझे भक्त येताना माझ्या करता भरपूर फळे,नारळ मिठाई आणि हो भरपूर मोदक घेऊन यायचे पण आता ह्या वाढलेल्या महागाईत कोणाला एकदोन फारफार तर पांच मोदक...ह्यावर जास्त परवडत नाही हो लोकांना आजकाल..आणि आम्हीतर भक्त देणार तेवढेच खाणार..
रिपोर्टर : असं म्हणजे देवांना पण नडते तर महागाई.
गणपती : मग काय तर..लोकांना म्हणावे त्या देखाव्यात करता ना खर्च, तो देखव्या पेक्षा अन्नदानात करा म्हणजे माझे पण पोट भरेल आणि मला पण आनंद मिळेल.
रिपोर्टर : आपल्या गणपती बाप्पा सोबत अश्याच गप्पा चालू राहणार आहेत. तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त कलतक..
(आता दोन मुली बाहेर येतात आणि संतूर ची जाहिरात करून जातात)
रिपोर्टर : चला ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूया आपल्या स्पेशल सेलिब्रिटीकडे,म्हणजे आपल्या गण्याकडे.
गणपती : अहो हे काय? मी गणपती वरून गण्या कधी झालो?
रिपोर्टर : अहो तुम्हीच ब्रेक मध्ये म्हणाला ना मला गण्या म्हटलेले फार आवडते म्हणून.
गणपती : हो हो पण ते तुम्ही नाही हो,माझ्या आईने म्हणजे देवी पार्वतीने मला गण्या म्हटलेले फार आवडते. तुम्ही मला गणपतीचं म्हणा..तुमच्या नवऱ्याला कोणीही कुठेही असे छोट्या नावाने बोलावले तर आवडेल तुम्हाला? नाहीना मग..माझ्या रिद्धी सिद्धिंना पण नाही आवडत ते..
रिपोर्टर : आता काही रॅपिड फायर प्रश्न.
गणपती..अहो तुम्ही फायर म्हणाला आणि मला अनालासुर आठवला...त्याला मारल्यावर काय आग आग झालेली शरीराची सांगू...हे तर बरं झालं त्या दुर्वा कामी आल्या नाहीतर..विसरूच शकत नाही मी..म्हणून फायर नको..हळू हळूच विचारा बरे
रिपोर्टर : गणपतींशी चर्चा आता रंगात आली आहे आणि आता ते जलद प्रश्नांना उत्तरे देणार आहेत पण त्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
(एक मुलगा येतो आणि अमुल दूध ची जाहिरात करून जातो)
रिपोर्टर : चला तर मग ब्रेक नंतर सुरू होतोय गणपतींवर जलद प्रश्नाचा मारा..
रिपोर्टर :कोण प्रिय रिद्धी की सिद्धी 
गणपती : मोदक
रिपोर्टर : आईचा लाडका कोण गणेश की कार्तिकेय
गणपती :(जोरात हसत) जो समोर असेल तो..कार्तिकेय सारखा बाहेर असतो म्हणून मी.
रिपोर्टर : गणेशोत्सवात काय नाही आवडत? देखाव की कार्यक्रम?
गणपती : जोर जोरात वाजणारी डी.जे.वरची गाणी.
रिपोर्टर : प्रश्नाचा हा मारा असाच चालू राहणार आहे त्या आधी..
गणपती : पुन्हा अहो तुम्ही माझी मुलाखत दाखवता आहात की जाहिराती? असे वाटते आहे की जाहिरातींमधून मधे मधे माझी मुलाकात दाखवली जाते आहे.
रिपोर्टर : अहो त्याचे काय आहे हे सगळे प्रोग्राम चे स्पॉन्सर आहेत ना म्हणून दाखवावी लागते त्यांची जाहिरात. आणि खरे तर तुमच्या प्रोग्रमला फार कमी स्पॉन्सर मिळत होते कारण तुम्ही आता आउटडेटेड झाला आहात.
गणपती : काय मी आउटडेटेड झालो आहे?
रिपोर्टर : नाही म्हणजे तसे नाही पण आजकाल कृष्णाचे जास्त चाहक आहेत हो..कारण त्याला बघा काय काय करता येते..मुख्य म्हणजे कितीतरी गर्ल्स वेड्या असतात त्याच्या मागे.
गणपती : हो ना बऱ्याच असतात..पण माझे चाहते ही काही कमी नाही हो..जवळ जवळ सगळे विद्यार्थी बघा..माझ्या जवळच येतात हो परीक्षेत चांगले मार्क मिळू द्या म्हणून विनंती करायला.
रिपोर्टर : हो हे आहे मात्र..पण असे का? 
गणपती : कारण माझ्या कडे माऊस आहे ना!
रिपोर्टर : अरे हो की, म्हणजे माऊसच्या मदतीने तुम्ही करवता का पास मुलांना?
गणपती : ते माझे सिक्रेट आहे.
रिपोर्टर : बरं माऊस वरून एक आठवले..तुम्ही उंदिरालाच का आपले वाहन निवडले..तो इवलासा जीव..आणि तुम्ही...
गणपती : अहो मॅडम.. शहरात पार्किंगची किती मोठी समस्या आहे..मग मोठे वाहन घेऊन भ्रमण करणे शक्य नाही. उंदीर कुठेही पार्क करता येतो..आणि नाहीच मिळाली जागा तर त्याला बरोबर घेऊन आत पण जाता येते. 
दुसरे आणि महत्वाचे..तो माझ्या करता जासूसीचे काम पण करतो बरका..
रिपोर्टर : (गणपती जवळ तोंड करून हळूच)आता तरी ब्रेक घ्यावाच लागेल बरका नाहीतर माझे वर्षभराच्या मेकअपचे पैसे मला द्यावे लागतील बरे.(मोठ्याने)
तर घेऊया क्षणभराची विश्रांती.
(एक मुलगी येऊन लॅक्मे ची जाहिरात करून जाते)
रिपोर्टर : तर ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे तुमचे गणपतिजी.बरं..मला सांगा तुमच्या बद्दल काही तक्रारी आहेत की तुम्ही सगळ्यांना मदत नाही करत.
गणपती : कोणाला नाही केली मी मदत?
रिपोर्टर : अहो, पहा उत्तराखंड मधे वादळ आले कोकणा मधे वादळ आले ..कितीतरी लोकं बुडाले, दगावले..तुम्ही नाही केली त्यांना मदत.
गणपती : अच्छा तर अशी तक्रार आहे तर..पण मॅडम तुम्ही एक सांगा..मी एकदाच नाही केली मदत तर तुम्ही बोंबलताय..पण तुम्ही सगळे दार वर्षी मला बँडबाज्यासह बुडवून येता तेव्हा..तेव्हा तुम्हाला माझा पुळका येतो का? मग कधी तरी मी ही नाही केली तर एवढा राग कशाला?
मॅडम तुम्ही मला एवढे प्रश्न विचारता आहात तर एक मी तुम्हाला विचारू का?
रिपोर्टर : विचारा की
गणपती : सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला?
रिपोर्टर : टिळकांनी
गणपती : अहो तो पेशव्यांनी सुरू केला होता आणि नंतर टिळकांनी गावोगावी पसरवला.
( कानाला हात लाऊन) अरे मला आईच्या पाऊलांचा आवाज ऐकू येत आहे...मी निघतो आता इथून नाहीतर पुन्हा घेऊन जाईल स्वर्गात..मला अजून इथे फिरून मजा करायची आहे ...मी जातो... अच्छा..
(म्हणत गणपती बाहेर निघून गेले.)
हा कार्यक्रम पाहून मी पण विचारात पडतो आणि पुढच्या येणाऱ्या गणेशोत्सवात काय नाही करायचे त्याचा विचार करायला लागलो.
©सौ. अनला बापट
राजकोट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू