पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शुभं करोती कल्याणम्

शुभं करोती कल्याणम्

©ऋचा दीपक कर्पे

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. 

इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा… .. आजच्या काळात खूप असंगत वाटते ना हे सर्व? म्हणजे उंदरांनी सूड काय घेतला, दिवे राज्य सोडून जंगलात काय गेले. . झाडावर बसून गोष्टी काय करत होते.. असं कधी होतं का?? आणि म्हणून काय तर दिव्यांची पूजा करायची! 

हे सर्व काळानुरूप सोडतं घ्यावं. हेच विचार कित्येकदा आपल्या मनात येतात, पण जाऊ द्या, होतंय तोपर्यंत करू…नंतर मुलं करतील की नाही देव जाणे!

आणि तरुण पिढी तर हे सर्व इल्लोजिकल आहे, आधी लोक दिवे वापरत होते, आता आपल्या कडे वीजेचे दिवे आहे, म्हणून ह्या दिव्यांची पूजा करून काय उपयोग, म्हणून मोकळी होते. 

पण खरंच कालबाह्य झाल्या आहेत का ह्या परंपरा?

 इथे आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपले सर्व सणवार प्रतीकात्मक आहेत. 

रक्षाबंधन असो, होळी असो, दसरा असो किंवा संक्रांत असो. प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी "लॉजिक" आहे. 

राखी, रंग, पतंग ही सारी प्रतिके आहेत, विश्वासाची, आनंदाची, उन्नतीची..

दिवा.. म्हणजे प्रकाश, आनंद, सकारात्मकता! 

आषाढ मासापासून पावसाची सुरवात होते. भारत देश एक कृषीप्रधान देश.. आणि शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून.

कधी अती पावसामुळे शेताचे नुकसान होते कधी पाऊस पडतच नाही म्हणून पिकाचे हाल होतात.. 

ह्या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्याच्या घरात, मनात एक नकारात्मकता, काळजीचे वातावरण निर्माण होते. त्या नैराश्याच्या काळोखातून मनाला उभारणी देण्यासाठी ही दीपपूजा. 

आणि शेती काय कुठलाही उद्योग असो, पावसाळ्यात काही समस्या येतातच, कधी नुकसान पण होते… तर अश्या वेळी काय चूक काय बरोबर, कुठला निर्णय कधी घ्यावा, काय टाळावे..योग्य तो निर्णय घेण्यासाठी मनात ज्ञानाची, सद्बुद्धीची वात तेवत राहो, ह्या साठी ही दीपपूजा! 

चातुर्मासात आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते, तब्येतीची काळजी घ्यावी लागते. 

तर अश्या वेळी स्वत:च्या जिभेला ताब्यात ठेवण्यासाठी, खाण्याचा मोह आवरण्यासाठी मनाला नियंत्रित ठेवून दृढ संकल्पाचा उजेड पसरवण्यासाठी ही दीपपूजा… 

आपले पूर्वज साधेसुधे सरळ मनाचे, अज्ञानी होते म्हणून त्यांना लॉजिक देण्याऐवजी अश्या काल्पनिक गोष्टी किंवा कथा सांगून आपल्या पूर्वजांनी ह्या परंपरा जीवंत ठेवल्या. 

की आता चातुर्मास आहे, देव झोपले आहे, आपली काळजी आपणच घ्यायची आहे, म्हणून मनात ज्ञानाची वात उजळत राहिली पाहिजे. अज्ञानाचा, अविचारांचा, संभ्रमाचा, नैराश्याचा अंधार नाहीसा करण्यासाठी ही दीपपूजा! 

आता आपण शिकलेले आहोत, सारासार विचार करू शकतो, तर एखाद्या सणाला कालबाह्य ठरवून त्याला सोडून देण्याऐवजी त्या मागचा हेतू शोधून काढणे जास्त योग्य आहे. 

एक साधे उदाहरण दिले तर आपण जेव्हां मोबाईल किंवा लैपटॉप वर काम करतो आपण "ब्राइटनेस लेवल" सेट करतोच ना?

किंवा ऑफिस मधे "प्रॉपर लाईट अरेंजमेंट" ठेवतोच ना? का… कारण जर योग्य उजेड नसला तर काम करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही आणि एक "डल" वातावरण निर्माण होते. 

तर मनाची "डलनेस" कमी करण्यासाठी ही दीपपूजा! 

आठवतच असेल नं कोरोना काळात पण नैराश्य दूर सारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला दीप प्रज्वलित करण्यासाठी आवाहन केले होते..!

मनाची भीती दूर करण्यासाठी ही दीपपूजा...!

आपली भारतीय संस्कृती प्रचंड सकारात्मकतेचा स्त्रोत आहे. प्रत्येक सण साजरा करण्यामागचा हेतू मनात, जीवनात आनंद व ऊर्जेचा प्रसार करणे आहे. 

आणि आजची तरुण पीढी पण सकारात्मकतेचे, पॉसाटिव्हिटीचे महत्त्व जाणून आहे. योग, ध्यान, मेडिटेशन ह्यावर तरुणांचा विश्वास आहे.

तर आता ही जवाबदारी आपल्यावर आहे की आपला सांस्कृतिक वारसा पुढे कसा न्यायचा, राजा राणीची गोष्ट सांगून की लॉजिकली पटवून देवून… !

 

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |

शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |

शुभमस्तु! जयहिंद! 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू