पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कशी असावी यंदाची दिवाळी?

कशी असावी यंदाची दिवाळी?

हा प्रश्न मनात आला आणि पाठोपाठ उत्तर पण आले,लहान असताना असायची तशीच..झांशीची दिवाळी..माझ्या आजी कडली, मोघ्यांच्या वाड्यातील दिवाळी!

एकादशीच्या दिवशी दिवे आणून धुवून वाळवून संध्याकाळी लावणे.

दुपारी आई आजी पपरिया करायच्या तेव्हा मधे मधे लुडबुड करून छोट्या पपरिया करायला छोट्या गोळ्या हक्काने मिळवून घ्यायच्या आणि त्याच्या पपरिया लागल्या गेल्या की होणारा तो आनंद, त्याला काही सीमाच नव्हती!

संध्याकाळी आई आजी बरोबर दिवे लाऊन तुळशी पाशी ठेवणे,दाराजवळ ठेवणे आणि मनातल्या मनात उद्या आणायच्या फटाक्याची यादी गिरवत बसणे..किती सुंदर होते ते सगळे!

दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून बाबांच्या बरोबर फटाक्याच्या दुकानात जाऊन हवे ते फटाखे विकत घेऊन यायचे आणि मग वाड्यातल्या इतर मुलांना उगीचच चिडवणे कारण त्यांचे बाबा त्यांना रात्री आणून द्यायचे तोपर्यंत फक्त माझ्या जवळ फटाके आलेले असायचे..आणि मी एक राजकुमारीच्या ऐटीत सगळ्यांना ते दाखवायचे..नंतर संध्याकाळी त्यांचे आलेले फटाके पाहून आपण खूप काही विसरलो आणायला म्हणून बाबांच्या जवळ रडत जाणे आणि मग त्यांनी समजावून दुसऱ्या दिवशी आणून देतो ह्याचे वचन देणे..खरंच असे वाटते आजही येतील का बाबा मला पुन्हा माझ्या आयुष्याला अधुऱ्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करायला? 

ती धन त्रयोदशी तर विचारूच नका..फटाके फोडायचा पहिला दिवस..घरी नवीन आणलेल्या स्टीलच्या भांड्याची पूजा करायची त्यात धने गूळ ठेऊन. आणि मग त्या धने गूळ चा प्रसाद.. ओहोहो..काय स्वाद होता त्यात..आणि नंतर तुपाचा दिवा आजी तिजोरीवर ठेवायला बाबांना सांगायची पण मला तो ठेवायचा असायचा..मग काय बाबांच्या खांद्यावर चढायचे आणि आपण दिवा ठेवायचे काम करायचे..माझ्या ह्या हट्टावर सगळेच मला रागवायचे..पण बाबा,"बस बिट्टी खांद्यावर,आणि ठेव" म्हणून खाली बसायचे..तेव्हा माहित नव्हते की आपल्या ऊंच करणारे हे खांदे नसताना किती त्रास होतो.आज जाणवतंय की आई होण्यापेक्षा बाबा असणे  किती महत्वाचे आहे.

नंतर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशीला सकाळी अगदी पहाटे तेल उटणे लावून आधी अंघोळ करायची,आणि बाहेर वाजणाऱ्या फटाक्यांनी हात थरथरून पाण्याचा मग खालीच ओतला जायचा. आणि मग..आईच्या हातच्या गरम गरम चकल्या आणि आजीच्या हातचे अनारसे.. गपागप खायचे नुसते..आणि  टम्म भरलेल्या पोटाने आणि मिटत असलेल्या डोळ्याने..आधी आडव्या पडलेल्या बाबांच्या शेजारी जाऊन बसायचे,मग हळूच त्यांच्या रजईत शिरायचे आणि बाबा हळू हळू डोक्यावरून हात फिरवायला सुरू केले की मला मात्र लोटपोटचे मोटू पतलू,चाचा चौधरी सगळे भेटून जायचे हो स्वप्नात!

दिवाळीच्या दिवशी सकाळपासूनच अभ्यंग स्नानापासूनच मजाच मजा असायची..नंतर दुपारच्या जेवणात पुरणपोळी आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजेच्या वेळी मोठ मोठाले फटाके फोडण्यात सगळा वाडा एक व्हायचा तो आनंद वेगळाच होता..

तशी दिवाळी हवी आहे मला..देईल का देव मला पुन्हा एकदा माझ्या आजीच्या हातचे अनारसे,बाबांच्या प्रेमाची ऊब आणि वाड्यातील सगळ्या लोकांच्या कौतुकाच्या थाप?

सौ. अनला बापट

राजकोट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू