पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वसंत पंचमी

 

"बाबा आज आपल्याकडे संक्रांतीचे हळदीकुंकू आहे" चार वर्षाचा चिंटू खूप उत्साहात सांगत होता.

मी नलिनीकडे बघितले. काल रात्री फुललेला वसंत अजूनही तिच्या काळ्याभोर डोळ्यात आणि गुलाबी लाजण्यात दिसत होता. 

"आज पुन्हा गजरा आणावा लागेल, कालचा चुरगळला आहे पूर्ण" मी तिच्या कानात कुजबुजलो.

ती, लाजत मंद स्मित करत,नुसते मानेने "हो" म्हणून पटकन स्वयंपाकघरात पळाली.

"बाबा आपण पण आईला दागिने घालू का हलव्याचे?"इति चिंटू. 

मला हसूच आले.

आमचा चिंटू दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या हळदीकुंकाला जात होता तिथे त्याने दागिने पाहिले होते. आणि त्याच्या मते दागिने हा भाग आहे हळदीकुंकूचा.

त्याने तसे म्हणाता बरोबर माझ्या डोक्यातही तेच चक्र सुरू झाले, कारण, झाले असे होते की आमचे लग्न वसंत पंचमीचे. आदल्या वर्षी पंचमीला लग्न झाले आणि आम्ही दोघेही प्रेमात पक्के निघालो त्यामुळे आमचे प्रेमबीज लवकरच अंकुरित झाले आणि पुढच्या संक्रांतीच्या अगोदरच दहा जानेवारीला तर चिंटूपण आमच्या सोबत होता. मग काय! 

राहिले नलिनीचे हलव्याचे दागिने...

पुढचे तीन वर्ष आम्ही बोरन्हाण करत होतो आणि ह्या वेळेसपण त्याचे बोरन्हाण नक्कीच होते, पण आज त्याच्या डोक्यात "आईच्या दागिन्यानी" घर केले होते. आणि खर सांगूतर मलापण तिला त्या दागिन्यात पहायचे होते.

तशी आज वसंत पंचमी होतीच. म्हणूनच नलिनीने सकाळीच चिंटू कडून सरस्वती पूजा करवून घेतली. आता नलिनी स्वयंपाकघरात तिळाच्या वड्या करण्यात लागली होती. मी मनातच ठरवले आज तिच्याकरता दागिने आणायचेच. मी समोरच्या आजींकडे गेलो, त्यांनी सांगितलेल्या बाईंकडून  काही निवडक दागिने जसे मंगळसूत्र, ठुशी,बांगड्या , कुड्या आणि अंगठी घेऊन आलो आणि लपवून ठेवले. 

नलिनीला विचारले,"कुठली साडी नेसणार आहेस?"

"पिवळी,आज वसंत पंचमी आहे ना." ती म्हणाली.

"नको काळी नेस, संक्रांतीचे हळदीकुंकू आहे ना!"

"अहो पण..!"

"मला तू काळ्या साडीत फार आवडतेस"मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत शेवटचे अस्त्र वापरले.

"बरं" निशाणा बरोबर लागला होता.

संध्याकाळी तिने काळीच साडी नेसली.

पांच वाजता पासून बायका येणार होत्या. मी चारच्या सुमारास तिचा गजरा आणि इतर बायकांना द्यायला फुले घेऊन आलो. तो पर्यंत तिने बाकी सगळी तयारी लावून ठेवली होती. 

पाऊणे पांच झाले तसे मी तिला आणलेले दागिने घालण्याची विनंती केली.

ती लाजत म्हणाली,"अहो मी काय नवी नवरी आहे हे घालायला?"

"नाही लोकांच्या मते नाही..पण माझ्या करता नेहमीच असणार नवी नवरीअसणार." मी खट्याळपणाने तिला म्हणालो.

"आई घालगं मला तुझा फोटो काढायचा आहे." तेवढ्यात चिंटू माझा मोबाईल हातात घेऊन तिला म्हणू लागला.

थोड्या नन्नानंतर तिने घातले ते दागिने!

"किती सुंदर दिसते आहेस आई तू" चिंटू लगेच म्हणाला. तिने माझ्या कडे पाहिले,"खरंच" म्हणत मी नुसता डोळा मारला.

ती गोड लाजली..नेमकी चिंटूने तेव्हाच फोटो काढला. 

मग मी चिंटूला विचारले ,"आई सोबत माझा काढशील का फोटो?"

तो लगेच तयार झाला.

मी नलीनीला जवळ घेत त्याला फोटो काढायला सांगितले. नलिनी माझ्या स्पर्शात असलेला भाव समजत होती, म्हणून खट्याळ हसत होती.

तेवढ्यात शेजारच्या आजी आल्या त्यांना पाहून नलिनी दागिने काढू लागली. पण त्या लगेच म्हणल्या,"अग राहू दे छान दिसत आहेत. नवऱ्याने एवढ्या प्रेमाने आणले आहेत, घालून रहा."

आजींना नाही कसं म्हणायचं  म्हणून नलिनी दागिने तसेच घालून राहिली. हळदी कुंकू पूर्ण झाले.

रात्री ती दागिने काढायला लागली..मी तिच्या जवळ जाऊन हळूच म्हटले "आता नाही. मी काढेन ते चिंटू झोपल्यावर"

तिने चिंटूला जेवण भरवले आणि झोपवले.

मग "माझी नलू"  माझ्या जवळ आली मी तिला न्याहळत बेधुंद झालो होतो. तेवढ्यात तिने चुटकी वाजवून विचारले,"हरवला काय?" 

"हो ग! तू खूप सुंदर दिसते आहेस." तिला जवळ खेचले, तीपण माझा दिवसभराचा उपास तोडायला पंचपक्वांनासह तयारच होती.

आम्ही एकमेकात बुडून गेलो. बहुतेक गेल्या पांच वर्षांमधला एकही वेलेंटाईन एवढा सुंदर नव्हता गेला, जेवढी ही वसंत पंचमी गेली.

आणि बरोबर अठरा दिवसांनी वेलेंटाईन डे होता..तिला माझा रोमँटिक स्वभाव माहित होता पण तिला काहीतरी होत होते. सकाळी मी तिला गुलाब आणि बदाम आकाराची आंगठी भेट दिली. ते घेऊन ती गेली.. ती जरा गोंधळलेली दिसत होती.

मी चिंटूला शाळेत सोडून आल्यावर, तिला विचारू का नाही ह्या विचारात असतानाच  गोंधळलेली नलू माझ्या जवळ आली,"अहो मला वाटतय.....काहीतरी गडबड आहे"

"काय गडबड?"

"अहो ..ते मी..आज.."तिला समस्या शब्दात सांगता येत नव्हती.

"बैस इथे.शांत हो आणि सांग काय गडबड आहे? मी कधी तुला ओरडतो का ,अशी का घाबरते आहेस?" मी विचारले.

"अहो माझी पाळी चुकली आहे" तिने खाली पाहतच उत्तर दिले.

"काय?"मी आनंदाने ओरडलोच. ती माझ्याकडे विचीत्र बघू लागली.

"अहो.."ती काहीतरी बोलणार एवढ्यात मी तिच्या ओठांवर ओठ ठेऊन बोलूच दिले नाही.

तिने मला जबरदस्ती बाजूला सारले..पण मी तिला जवळ घेतले आणि सांगितले,"आपल्या चिंटू करता बहिण पाहिजेच की" 

ती आनंदाने हो म्हणाली. दुपारी चिंटूला सांगितले ,"तुझ्याकरता बहिण आणणार आहोत" मग काय.. त्याने अगदी सहज विचारले,"मग आता आईला फुलांचे दागिने करायचे का?"  मी नलिनीच्या डोळ्यात पाहत म्हटले "करुया की"

ती लाजत म्हणाली," इश्श ते नको हो.."

सौ. अनला बापट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू