पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवणीतली होळी

आठवणीतली होळी


आपल्याला व आपल्या परिवाराला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज तुम्हाला माझ्या लहानपणच्या होळीच्या दिवसाच्या काही आठवणी सांगणार आहे. आठवणीतली होळी!

होळी आली की पुरणपोळी आली आणि पुरणपोळी आली की आईची आठवण आलीच म्हणून समजा! माझ्या आईची पुरणपोळी तर जगात भारी! एक नंबर! 

तिच्या पुरणपोळीची चव अशी घट्ट फिट्ट बसली आहे ना डोक्यात की दुसरी कुठलीही पुरणपोळी त्याच्यासमोर तग धरुन राहूच शकत नाही. मऊ, लुसलुशीत, सोनेरी रंगाची असायची तिची पुरणपोळी. जायफळाचा खमंग वास! घरच्या कढवलेल्या तुपाची सोनेरी धार त्या गरमागरम टम्म फुगलेल्या पुरणपोळीवर! अहाहा! स्वर्ग सुख! 

तुम्हाला माहितीये, तिचे पुरण अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत पसरलेले असायचे! कुठेही कडा जाड नाहीत. कुठेही फुटणे नाही किंवा गोडीत वर खाली असणे नाही. इंग्रजीत म्हणतात ना तसे, "She had perfected the art of Puranpoli!" मुळातच ती सुगरण, त्यात पुरणपोळीची तर ती गुरू होती! आईला पुरणपोळी लाटताना बघणे was like art in motion! माफ करा, थोडे इंग्रजी शब्द वापरले, कारण त्याच शब्दांत माझी भावना मी यथार्थपणे व्यक्त करू शकते.

आई गेल्यानंतर मी खाते पुरणपोळ्या नाही असे नाही. पण तिच्या पुरणपोळीची सर कोणालाच नाही. कित्येक जणांच्या पोळीत पुरण, चटणीसारखे तोंडी लावायला घातले आहे की काय, अशी शंका यावी इतके कमी असते. नाहीतर इतके अधिक भारतात की ते पोळीतून फुटून बाहेर येते! कोणाचे पुरण अगदीच कोरडे कोरडे पीठपीठ असते, तर कोणाच्या पुरणात न वाटली गेलेली डाळ तशीच दाताखाली येते. असो. पुरण करणे ही सोपी गोष्ट नाही आणि पुरणपोळी करणे तर त्याहून नाही. 

आईची एक सवय होती. नेहमी काहीही काम करताना ती ते काम चांगले कसे करावे याच्या अगदी सहज नकळतपणे टिप्स देत असायची. आणि मी पक्की आईचे शेपूट! एक अभ्यास, अंघोळ आणि शाळा किंवा कॉलेज सोडले तर अखंड तिच्या मागे मागे असायची. अशीच तिच्याकडून मी खूप गोष्टी शिकले. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ती कायम काम करता-करताच शिकवायची. 

मुलांकडून कामे करून घ्यायचे कसब तिला छान जमले होते. आम्हाला काम करायला सांगायचे पण थोडेसेच. जेणेकरून आम्ही स्वावलंबी व्हावे, पण कामाचा तिटकारा बसू नये. आम्ही आळशी मुले नव्हतो, ह्यामुळे तिला नक्कीच मदत झाली असणार, हे सांगणे नको!

पुरणपोळीच्या बाबतीत मात्र असे घडले नाही. मला ती खूप क्लिष्ट वाटायची आणि हे शिकण्यात आपला अभ्यासाचा मौल्यवान वेळ जाईल अशी मला भीती होती. त्यामुळे दर वर्षी मी ते शिकणे पुढे ढकलत गेले. ती मात्र मला म्हणायची की अगं शिकून घे. वेळ लागतो पुरणपोळीवर हात बसायला. पण मी तिचे बोलणे मनावर घेतले नाही. 

एकदा ती मला म्हणाली की मी काही तुझ्या सासरी येणार नाहीये पुरणपोळी करायला. तिथे तुलाच करावी लागेल! त्यावर मी गमतीने म्हणाले होते की तू करायला नाही आलीस तर मी येईन तुझ्याकडे खायला! हेहेहे! तेव्हा कुठे माहीत होते पुढे काय ताटात वाढून ठेवले आहे?

असो. पण दर वर्षी कॅलेंडरवर होळी बघितली की मला पेटवलेली होळी आठवत नाही, तर आईची पुरणपोळी आठवते. आईला माझ्या झाडे प्रचंड प्रिय. त्यामुळे होळी पेटवणे तिला आवडायचे नाही. वाळलेल्या लाकडातही किडे, पक्षी जगतात असे ती म्हणायची. आणि प्रदूषण होते म्हणून वडिलांनाही नाही आवडायचे होळी पेटविणे. त्यामुळे होळी पेटवणे हा प्रकार आमच्या घरी व्हायचा नाही. शिवाय वडिलांना थंडाई अजिबात आवडायची नाही, त्यामुळे तुमचा विश्वास बसणार नाही, पण लग्न होईपर्यंत मी थंडाई चाखलीसुद्धा नव्हती! त्या काळात आतासारखी इतकी बंडखोर मुले नसायची हो! घरी जे वडीलधारे सांगतील ते ऐकण्याची पद्धत होती. त्याच संस्कारात आम्हीही वाढलो. 

बाकी पुरणपोळी दे दबाव म्हणून खायचो आणि मग जो जायफळाचा परिणाम व्हायला लागायचा की आईचे आवरून झाकपाक करेपर्यंत, आम्ही आजोबा आणि नात घराचे वातावरण झोपण्यासाठी मस्त तयार करायचो. सगळे पडदे झाकून, पंखे लावून, हॉलमध्ये सतरंज्या घालून समस्त कुटुंब चांगले दीड दोन तास ताणून द्यायचे! मग आई उठून सगळ्यांना मस्त आल्याचा चहा करून उठवायची! 

घरी होळी जाळत नसलो तरी संध्याकाळी न चुकता शुभंकरोतीच्या वेळी सर्व पापांचा नाश होऊ दे, विश्वातील वाईट शक्तींचा नाश होऊ दे अशी प्रार्थना करायचो. अशी आमची होळी साजरी व्हायची! 

होळीच्या याच आठवणींवर लिहिलेली एक कविता तुमच्यासमोर सादर करत आहे. शीर्षक आहे, होळी रे होळी.

● होळी रे होळी ●

अरे होळी रे होळी पुरणाची पोळी
अशुभाला जाळून आणूयात गोडी 

होळीला आईचीच पुरणाची पोळी
हातची चव तिच्या जगातच भारी

सोबत असायचे कढवलेले घरचे तूप
पोळीवर प्रेमाने आई घालायची खूप 

नको म्हटले तरी आई खूप काही करायची
खाऊन इतके दुपारची झोप ना आवरायची

चटणी, कोशिंबीरीसोबत आमटी कटाची
अळूवड्या, कुरवड्या नि भाजी बटाट्याची

सोबतीला असायचे पापड नि लोणचे कैरीचे
पण भाव वधारायचे तेव्हा पुरणाच्या पोळीचे

आईच्या हातची पुरणपोळी निव्वळ स्वर्गसुख
अजून काही खायला कोणाला नसायची भूक

डोळ्यांवर व्हायचा नंतर अंमल निद्रेचा 
होळीला दुपारी व्हायचा कार्यक्रम झोपेचा

पाहुनी आनंद चेहऱ्यावरी आमुच्या
समाधानाची लकेर नजरेत आईच्या

आमचे पोट भरले की आईचे भरायचे
आईसारखे मन कुणाचे न सापडायचे

आज तिची पुरणपोळी लख्ख आठवते
तिच्या हातची चव अजून मनी रेंगाळते

तिचे हसणे, असणे, मायेने हात फिरवणे
नंतर नाही मिळाले प्रेमाने खाऊ घालणे

खरी गोडी पुरणपोळीची आईच्या प्रेमाने वाढते 
होळीला आईची पुरणपोळी म्हणून तर आठवते 

©️ तनुजा प्रधान, अमेरिका.
tanujaapradhan3@gmail.com

==================================
या लेख व कवितेचे व्हिडिओ अभिवाचन माझ्या यूट्यूब चॅनल, "भावसृजन" (Search words- @Bhavsrujan) यावर आहे.

=======================================

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू