पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अविस्मरणीय प्रवास

एक अविस्मरणीय प्रवास

 

"अहो लवकर आवरा,तुमची बस निघून जाईल नाहीतर." बायकोच्या आवाजाने मिलिंद आवरायला लागला. त्याच्या दोन्ही मुलींनी त्याला त्याच्या एकसष्ठीनिमित्त एका  सिनियर सिटिझन समूह ट्रिपचे तिकीट काढून दिले होते आणि आज त्याला त्याच प्रवासाला निघायचे होते.

त्याच्या बरोबरीच्या दोन-तीन जोडप्यांना सोडून जवळ-जवळ सगळेच सहप्रवासी पण एकटे आणि सिनियर सिटिझनच होते.

"कसे असतील कोण जाणे इतर लोक, तू आली असतीस बरोबर तर बरे झाले असते" तो बायकोला म्हणाला.

"अहो पण ती ट्रीप साठ वर्षापेक्षा वरच्या लोकांची आहे ना..मी तर अजून सत्तावनचीच आहेना ! म्हणून त्यांनी नाही म्हटले.", बायकोनेपण जरा उदास स्वरात म्हटले.

"जाऊदे ,चल आता मला सोडून येते का बसपर्यंत?" मिलिंद तिला म्हणाला.

"हो चला." दोघेही निघाले. दोघेही पवनपुत्र ट्रॅव्हल्सच्या ऑफिसात पोहचले. बस आलेली होती, सहप्रवासी पण बऱ्यापैकी आलेले होते. मिलिंदच्या बायकोने एक दोन सहप्रवश्यांचे फोन नंबर विचारून, लिहून घेतले.चार जण सोडून, जवळ-जवळ सगळे सहप्रवासी आले होते. बस निघायची वेळ 9:30 दिलेली  होती पण 9:35 झाले तरी अजून ते चार  आले नव्हतेच!

त्यांच्या बसमधेच बरोबर जाणारा कंपनीचा मॅनेजर, प्रकाश आता भुणभुणायला करायला लागला होता.

तेवढ्यात एक पन्नाशितला दिसणारा माणूस घाईघाईने आला. मॅनेजरला सॉरी म्हणत तिकीट दाखवले. मॅनेजर जरा रागातच म्हणाला,"अहो किती वेळ?" उशीर होतोय ना."

"अरे माझ्यामुळे उशीर झाला का? सॉरी सॉरी.."बसमधे चढत त्याने सगळ्या सहप्रवाशाची हात जोडून क्षमा मागितली.

सगळ्यांनी त्याला,"चालतय हो" म्हणून माफपण केले.

पण मिलिंदला मात्र तो मुळीच आवडला नव्हता, थोडा आगाऊ वाटला. 

पण नेमका तो मिलिंद जवळच आला, त्याने मिलिंदला विचारले,"मी इथे बसू का,की कोणी येणार आहे स्पेशल इथे?"म्हणत त्याने डोळा मारला.

मिलिंदला फारच विचीत्र वाटले, "बसा बसा. ह्या वयात कोण असणार हो स्पेशल?" असे म्हणत त्याने त्याला बसायला सांगितले.

"मी डीडी पुढचे दहा दिवस आपण एकत्र प्रवास करणार आहोत तर ओळख फार जरुरी आहे, नाहीका?" म्हणत त्याने हात मिळवायला हात पुढे केला. 

"हो ना. मी मिलिंद काळे. रिटायर्ड गणित प्रोफेसर." मिलिंदने आपली ओळख सांगितली.

"तुम्ही सिनियर सिटिझन दिसत नाही ?" मिलिंदने सहज प्रश्न केला.

त्यावर तो मोठ्याने हसत म्हणाला,"अही मी चौसष्ठचा आहे."

एवढ्यात एक पन्नाशीतली बाई बसमधे आत आली. 

तिला पाहून डीडीने चक्क शिट्टीच मारली आणि मिलिंदकडे पाहून म्हणाला,"काय मैंटेनड आहे!चला प्रवासभर एन्टरटेनमेंटची सोय झाली."

त्याचे तसे वागणे मिलिंदला फार विचीत्र वाटत होते, पण गंमत पण वाटत होती.

"काय बाई! किती वेळ? उशीर होतोय कळत नाहीका?" मॅनेजर बाईवर ओरडला.

"काय म्हणालात? बाई...!!!अहो मला बाई नाही म्हणायचे.माझे नाव सुरेखा आहे,समजलं. वाटलं तर रेखा म्हणा पण बाई नाही म्हणायचे. समजल का मॅनेजर?." तीपण तेवढ्याच ठसक्याने म्हणाली.

"सुरेखा! वाह नाव खूपच सुरेख आहे हो तुमचे." डीडीने लगेच जागच्या जागी उठून त्या बाईला म्हटले. मिलिंद त्याच्या त्या आत्मविश्वासावर प्रभावित झाला. मनात म्हणाला,"मला माझ्या बायकोशीपण असे बोलायची हिम्मत नाही आणि हा पठ्ठा पहा."

ती बाईपण लगेच हसतच डीडीला "थँक्यू"  म्हणाली.

तिने तसे म्हणातच डीडीने तिला  स्वतःच्या जवळची  रिकामी असलेली सीट ऑफर केली. 

आता मिलिंदला खूपच अवघडल्यासारखे होत होते, कारण त्या तीन जणांच्या सीटवर आधीच ते दोघे पुरुष होते आणि तिसरी ती येणार म्हणजे..बापरे!

रेखापण लगेच येऊन डीडीजवळ बसली. तेवढ्यात उरलेले दोन प्रवासीपण आले आणि बस निघाली.

रेखा ह्यांच्या जवळच्या सीटवर बसताना डीडीला हसत  पुन्हा  एकदा "धन्यवाद" म्हणाली.

डीडीने हळूच मिलिंदकडे पाहत फार हळू आवाजात, "हसली म्हणजे फसली" म्हटले आणि लगेच सुरेखाला, "मी डीडी तुमचा सहप्रवासी," म्हणत हात मिळवायला हात पुढे केला आणि लगेच म्हणाला,"अर्थातच फक्त पुढच्या दहा दिवसांसाठी"

सुरेखा लगेच त्याला,"यु नॉटी" म्हणत आपला हात त्याच्या हातात दिला.

मिलिंद आवाक होऊन बघतच राहिला!

खरंतर हेच डीडीने त्याच्या बरोबरपण केले होते पण आत्ता मिलिंदला डीडी एकदम रोमँटिक वाटत होता.

डीडीचा हात हातात घेत तिने पण स्वत:चा परिचय दिला,"मी सुरेखा, पण मला सगळे जवळचे रेखाच म्हणतात. मी तशी कोल्हापूरची पण लग्न झाले आणि पुण्यात आले. माझ्या नवऱ्याची आणि माझी, मी बँकेत नोकरीत असताना भेट झाली, प्रेम झाले आणि आम्ही लग्नपण केले. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून,   खरंतर तो रिटायर झाल्यापासून आमची रोजच भांडणं होऊ लागली. मग एक दिवस आम्ही ठरवून वेगळे झालो. आणि आज मी अशी एकटी ट्रीपवर निघाले आहे. तुमच्यासारखे लोक आहेत सोबत, म्हणजे ट्रीप नक्कीच लक्षात राहण्यासारखी होणार दिसते आहे." 

रेखा जरा सरळ मनाची वाटली मिलिंदला.

रेखाने असे म्हणताच डीडीने मिलिंदकडे पाहून हळूच ,"आग दोनो तरफ है" म्हटले आणि डोळा मारला.

त्यानंतर एका ठिकाणी बस थांबली तिथे सर्वांच्या चहा पाण्याची व्यवस्था होती. 

सर्वजण फ्रेश होऊन आले आणि चहा मागवला पण डीडीने एक चहा आणि एक कॉफी मागवली. तेवढ्यात सुरेखापण फ्रेश होऊन आली आणि डीडीने तिच्या समोर तो कॉफीचा कप सरकवला. मिलिंद सगळे पाहत होता, आता ती काय करते हे बघायचे होते. तिने कॉफीचा कप बघताच डीडीला म्हटले,"अय्या तुम्हाला कोणी सांगितले की मी कॉफी घेते म्हणून?"

"मनातली भाषा कळते मला" हसत डीडी उत्तराला,"जोक्स अपार्ट, तुमच्या सारख्या सोफिस्टिकॅटेड बायका जनरली कॉफीच प्रिफर करतात असे अवलोकन आहे माझे."

"एकदम सही" तिने आनंदी होत म्हटले.

"मी तुम्हाला प्रिया म्हटले तर चालेल का?" डीडीने पुन्हा बॉलिंग चालू केली.

"चालेल की, तुमच्या सारख्या हँडसमच्या तोंडून प्रिया ऐकायला मला पण खूप आवडेल." 

'म्हणजे हीची विकेट गेलीच आहे म्हणायचे.' मिलिंद मनातल्या मनात बोलला.

आता तर ते दोघे अगदी जवळचे मित्र मैत्रीण असल्यासारखे वागू लागले होते.

त्यांच्या आवडी-निवडी जवळपास सारख्याच होत्या. दोघांनाही पुस्तकं वाचण्याची आवड होती. दोघेही राजकारणापासून ते साहित्य क्षेत्रापर्यंत सर्व प्रकारच्या चर्चा दिलखुलास करत होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या चर्चेत भाग घ्यायला मिलींदलापण आवडत होते. पण बोलता बोलता त्याच्या लक्षात आले की ते दोघे हळू हळू तुम्ही वरून एकदुसऱ्याला आता तू म्हणायला लागले होते. रात्र झाली तसे एका हॉटेलजवळ बस थांबवण्यात आली.

तिथे रात्री थांबायचे होते आणि सकाळी लवकर तिथून निघायचे होते. 

सगळ्यांनी एक दुसऱ्याला "शुभ रात्री" म्हटले आणि मॅनेजरने सांगितलेल्या खोल्यांमध्ये जाऊन झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळ झाली.

सगळे तयार होऊन बसमधे आले.

एका मंदिरासमोर बस थांबली. तिथे सर्वजण देवाकरता फुले, हार, प्रसाद घेऊन दर्शनाला गेले. सुरेखानेपण सगळे घेतले. पण डीडीने फक्त एक मोगऱ्याचा गजरा घेतला.

दर्शन करून आलेल्या सुरेखाला डी डी म्हणाला,"तुझे देवदर्शन झाले  असेल, तर मी करू का आता देवी दर्शन?"

मिलिंदला त्याच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. पण तेवढ्यात डीडी सुरेखाच्या समोर गुढग्यावर बसून नमस्कार करत होता आणि मग बरोबर आणलेला गजरा त्याने तिला दिला.

"चल नौटंकी" असे म्हणून सुरेखाने हसत त्याच्या हातातून तो गजरा घेतला आणि स्वत:च्या केसात माळला.

मिलिंद मनातच म्हणाला, 'झाली वाटत ह्यांची लव्ह स्टोरी सुरू.'

त्याने बायकोला फोन लावला आणि हळूच "आय लव्ह यू" म्हटले. कधी नव्हे ते नवऱ्याने आपल्याला "आय लव्ह यू "म्हटले त्याचे तिलापण नवलच वाटले.

अनेक ठिकाणं फिरून संध्याकाळी ते पुन्हा हॉटेलवर आले. जेवणं करायला टेबलवर आले आणि सुरेखा म्हणाली,"काल मला झोपच आली नाहीरे. भीतीच वाटत होती कसलीतरी. थोडी-फार झोप लागली तेव्हा भयानक स्वप्न पडले."

"अरे बापरे! मग काय केलेस तू?" उसन्या काळजीने डीडीने विचारलेले कळत होते मिलिंदला.

मी मेनेजरला सांगितले आहे मला वेगळी रूम द्या म्हणून. "हे बघ प्रिया,जर नसली रूम तर तू असं कर आमच्या रूम मध्ये येऊन झोप आणि हा मिलिंद जाईल तुझ्या खोलीत." डीडीने असे सुचवायचं आणि मिलिंद ने त्याला मनातल्या मनात शिवी देत म्हटले,"म्हणजे माझी खाट फिरवायला निघाला की तुम्ही."

"अरे ती एकटी आहे ना ? रात्री काही  झाले तर?" डीडी उगीच काळजीचा आव आणतो आहे पण उद्देश वेगळाच आहे हे कळत होते मिलिंदला. पण आता त्याला सूरेखाच्या मूर्खपणाचा राग येऊ लागला होता.

आणि थोड्या वेळाने मेनेजर येऊन म्हणाला रेखाताई तुमची दुसरी सोय होऊ शकत नाहिये. सॉरी."

डीडीने मिलिंद कडे पाहून डोळा मारला,म्हणजे ह्या नालायकाने त्या मॅनेजरला पटवले आहे नक्की, हे मिलिंदच्या लक्षात आले.

"मग मी तुझ्या सोबतच झोपते डीडी!" सुरेखा लगेच म्हणाली.

"अहो पण लोक काय म्हणतील?" मिलिंद लगेच म्हणाला.

"कोण लोक? कुणाला वेळ तरी आहे का आपल्याकडे पाहायला? अरे तिला भीतीमुळे काही झाले तर? त्याच्या विचार कर मिलिंद." डीडीने त्याला अडकवले.

मिलिंद संतापत सुरेखाच्या खोलीत जाऊन झोपला. पण झोप कुठली लागते त्याला, सतत डोळ्यासमोर ते दोघेच दिसत होते , हळू हळू तिच्याशी शारीरिक जवळीक घेताना डीडी आणि त्याला नॉटी,नॉटी म्हणत त्याच्या बाहुपाशात शिरणारी ती. मिलिंदला काहीवेळाने डोकं शांत झाल्यावर स्वत:चीच लाज वाटली,"शी कुठल्या लेव्हलचा विचार करतोय मी,कदाचित तसे काही झालेपण नसेल."

बहुतेक उशिरा झोपल्यामुळे, सकाळी मॅनेजर आला उठवायला तेव्हाच जाग आली मिलिंदला.

तोपर्यंत बाकीचे सगळे नाष्टा करायला पोहचले होते. मिलिंद तिथे गेला, ह्या दोघांना शोधू लागला. पण दोघेही गायब.

"रात्रीची नशा उतरली नाहीये वाटत ह्यांची" म्हणत तो त्यांच्या खोलीकडे जाऊ लागला. तेवढ्यात मागून डीडीने हाक मारली,"मिलिंद इकडे ये ह्या हॉटेलच्या बागेत बघ किती सुंदर फुले आहेत."

"तुमचा नाष्टा?" त्याने विचारले.

"कधीच झाला. मी लवकर उठतो, रात्री बायकोची स्वप्न बघत नाही बसत" असे म्हणत डीडीने त्याची थट्टा केली.

पण मिलिंद त्याला म्हणाला,"त्याकरता बायको तशी असावी लागते! आणि तुला तर आत्ता तरी बायको नक्कीच आठवत नसणार."

तेवढ्यात डी डी त्याच्या अगदी जवळ येऊन कानात म्हणाला ," थँकयु मिलिंद.. काल तू समजुन घेतलस आम्हाला.खरंच मित्र असावा तर असा. आणि हो खरंच रात्र खूप छान गेली",म्हणत तो डोळा मारत निघून गेला पुढे सुरेखाजवळ.

पुन्हा ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे दिवसभर फिरणे झाले. आज  मिलिंदला वाटत होते की सुरेखा डीडीला अगदी चिकटून चालते आहे. जवळीक वाढलेली दिसत होती. 'बाकीच्या लोकांना नाही दिसत का हे सर्व?',मनातच मिलिंद विचार करत होता.

आता त्या दोघांच्या वाढत्या जवळीकीमुळे त्याला त्यांच्या सोबत जायला अवघडल्यासारखे होत होते म्हणून त्याने दुसऱ्या काही एकट्या आलेल्या पुरुषांकडे मोर्चा वळवला. ते सगळेपण ह्या दोघांचाच विषय चघळत बसले होते. मिलिंदला किळस आली.

"बघता बघता आठ दिवस गेले, आता उद्याचा एक दिवस मग परवा आपण आपापल्या घरी जाणार म्हणून उद्या आपण सर्व एका रिसॉर्ट मधे फक्त एकमेकांशी गप्पा मारू, गेम्स खेळू आणि ह्या ट्रीपच्या चांगल्या आठवणी कॅमेऱ्यात टिपून घेऊ." मॅनेजर संध्याकाळी सगळ्यांना जेवताना म्हणाला."आणि हो उद्या तुम्ही कोणी आजी आजोबा नाहीत, पण तरुणपणातले तुम्ही असाल, वाटले तर तसे ड्रेसिंग करून या."

सगळेच खूप खुश झाले खूप दिवसाने कॉलेज मधे वार्षिक उत्सव असल्यासारखे वाटू लागले सगळेच आप आपल्या परीने काहीतरी करायचा प्रयत्न करू लागले. कोणी गाणे म्हणणार होते कोणी नृत्य कोणी शायरी तर कोणी कथाकथन....

दुसरा दिवस उजाडला, तसा डीडी ह्याच्या खोलीवर आला. 

"मिलिंद मी काय करू रे मला समजतच नाहीये. पण असे काहीतरी करायचे आहे ज्याने प्रिया एकदम खुश होईल. मी तिला प्रपोज करू का?" डीडीने विचारले आणि तो उडालाच

"अरे पण तुझा घटस्फोट  नाही झालाय ना अजून? घरी आहे ना बायको?"

"हो आहे की,पण ती माझी बायको कमी आणि माझ्या मुलांची आई जास्त आहे. मलाही प्रियाच आवडली आहे बायको म्हणून"

"पण तुझ्या बायकोला कळले तर ?" 

"मग तू आहेस की मदतीला. तेव्हा तू संभाळून घ्यायचे.बस ! ठरले माझे आज मी तिला प्रपोज करणार."

म्हणून डीडी खोलीतून निघून गेला. पण मिलिंदच्या मनात चलबिचल सुरू झाली. त्याने आपले पाकीट काढले. त्यात डीडीने दिलेल्या एका कार्डवर मुलाचा नंबर होता, खरंतर त्याने तो काही इमर्जन्सी असेल तर ठेव तुझ्याकडे म्हणून दिलेला.

 "पण आता कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न म्हणजे पण इमर्जन्सीच झाली की", म्हणत त्याने तो नंबर डायल केला समोरून बोलणारा डीडीचा मुलगा होता त्याला मिलिंदने सगळा प्रकार सांगितला आणि आज संध्याकाळच्या कार्यक्रमात डीडी त्या बाईला प्रपोज करणार आहे तेपण सांगितले आणि फोन ठेवला. त्याचे मन शांत झाले, निदान आपण त्या माऊलीपर्यंत मेसेज पोहचवला आहे, आता आपण पापात नाही, असा विचार करून तो नाष्टा करायला गेला.

संध्याकाळी सगळे रिसॉर्टच्या भल्यामोठ्या बागेत एकत्र झाले. एक-एक करून प्रत्येक जण आप आपला कार्यक्रम करत होते. डी डी ने आधीच सांगितले होते,"माझ्या कडून सगळ्यांना एक सरप्राइज आहे म्हणून ते सगळ्यात शेवटी बरं."

हळू हळू करता करता शेवटून दुसरा कार्यक्रम संपला.आणि आता डीडीचा नंबर होता. मिलिंद डीडीच्या मुलाची वाट पाहत होता.

एवढ्यात बहुतेक  डीडीने सांगितले असावे तसे हॉटेलच्या मॅनेजर ने एक मोठे सुशोभित केलेले टेबल आणले त्यावर बरेच दिलाच्या आकाराचे लाल फुगे लावलेले होते. मध्यावर गुलाबांच्या फुलांनी बदाम बनवला होते त्याच्या जवळ एक दिलाच्या आकरचा मोठा केक होता ज्यावर "प्रिया" लिहिलेले होते.ही तयारी पाहून सगळेच एकदुसऱ्याकडे पाहून मिश्कीलपणे हसू लागले.

डीडीने प्रियाला स्टेजवर बोलावले. ती खूप सुंदर साडी नेसून होती आधीच सुंदर दिसणारी ती गुलाबी साडीत आणखीन सुंदर दिसत होती

"दोघांचा जोडा छान दिसतो,नाहीका ?" एक म्हातारा बोलला.

डी डी ने गुढग्यावर बसून तिला ,"प्रिया माझ्याशी लग्न करशील का?"विचारताच प्रिया एकदम लाजली. पण तेवढ्यात एक मुलगा आणि एक मुलगी धावत आले. 

"बहुतेक हाच असावा डीडीचा मुलगा." मनातल्या मनात मिलिंद ने विचार केला."बापरे आता काय होईल?" डीडीला कळले की मी ह्याला कळवले आहे तर?"

ती दोघे डीडी आणि  सुरेखाच्या जवळ जाऊन एकदम ओरडले,"हे काय पप्पा तुम्ही इथे आहात? किती शोधलं आम्ही तुम्हाला." तेवढ्यात त्यांचे लक्ष सुरेखाकडे गेले आणि दोघेही तिच्या जवळ पळाले. मिलिंदला वाटले की आता तर काहीतरी नक्की होणार.

पण हे काय, ही पोरं तर जाऊन सूरेखला मिठी मारली.

मिलिंद बावचळला,"हे काय नवीन?"

तेवढ्यात डीडीने सगळ्यांना आपल्या मुलांचा परिचय करून दिला,"हा माझा मुलगा  निसर्ग डॉक्टर होतोय आणि ही मुलगी वसुधा.वसुधा आर्किटेक्ट होते आहे."

दोघांनी सगळ्यांना नमस्कार केले आणि डीडीच्या हातातून माईक घेत निसर्ग ने विचारले,"इथे मिलिंद कोण आहे?"

ओशाळलेला मिलिंद पुढे आला.

"काका , धन्यवाद,तुम्ही फोन केला त्यामुळे आम्हाला कळले की हे कुठे आहेत नाहीतर आज ह्यांच्या लग्नाचा पंचविसाव्या वाढदिवसाला आम्ही हजर राहू शकलो नसतो.ह्या दोघांनी आम्हाला चॅलेंज केले होते. हे माझे बाबा म्हणजे तुमचे डीडी आणि ही माझी आई प्रिया म्हणजे सुरेखा दोघेही फार खोडकर आहेत. ह्यांनी नक्कीच तुम्हाला पण फार छळले असेल ह्यात मला शंकाच नाही. पण आज त्यांच्या लग्नदिनी आपण त्यांना भरभरून शुभेच्छा द्याव्या ही माझ्या कडून सर्वांना विनंती."

मिलिंद हे सगळे ऐकून चाट पडला. 

'म्हणजे हे दोघे पतिपत्नीच आहेत तर.'त्याने डी डी कडे रागाने पाहिले आणि  डीडीने त्याच्याकडे पाहून डोळा मारला.

सगळ्यांची जेवणं झाली आणि मिलिंद म्हणाला ,"तू मला तुझ्या मुलाचा फोन नंबर म्हणूनच दिला होता ना की मी त्याला इथे बोलवावे."

"हो मग तर तू माझ्या बायकोला माझे प्रेम चाळे सांगण्यावाचून राहणार नाहीस ह्याची खात्री मला दोनच दिवसात झाली होती. पण हा स्पेशल लग्नदिवस सगळ्यांनाच लक्षात राहील नाही का?"

तेवढ्यात प्रिया उर्फ सुरेखा आली," सॉरी मिलिंदजी, आम्ही तुम्हाला थोडे छळले, पण खर सांगा मज्जा आली ना? अहो आयुष्य असेच जगायला पाहिजे हसत खेळत,गंमत करत,करवत. मी पण हे डीडी कडूनच शिकले आहे. आत तुम्ही  वहिनींनापण शिकवा."

मुलांबरोबर डीडी आणि प्रिया गाडीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात त्या दोघांच्या रिकाम्या सीटकडे बघून बघून मिलिंदला त्यांचे वागणे आठवत होते आणि तो एकटाच आपल्या बावळटपणावर हसत होता. आणि आपल्या लग्नाचा वाढ दिवस असाच भन्नाट करायचे स्वप्न पाहू लागला.

©®सौ. अनला बापट

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू