पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्नपूर्ती

● स्वप्नपूर्ती ●


आपली पर्स आणि हॅण्ड बॅग सांभाळत चारू विमानात चढली. दारात उभ्या असलेल्या एअर होस्टेसचे प्रसन्न हसू बघून तिचा सगळा प्रवासाचा थकवा उतरला. 

थोड्या वेळाने चारूच्या लक्षात आले की शेजारचे जोडपे मराठीच आहे. मग काय गप्पांचा फड चांगलाच रंगला! पूजा आणि गिरीश दोघेही सातारचे. नुकतेच ४ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. 'कांदे-पोहे विवाह' झाला तरी त्यांचा प्रेमविवाह झाला असणार असेच वाटत होते! गिरीशला लग्नानंतर जर्मनीला प्रोजेक्ट मिळाले होते. आता तो बायकोला, घेऊन जाण्यासाठी खास आला होता. पण काल त्याची मुंबईला जाणारी फ्लाईट चुकता-चुकता वाचली होती. 
**********
त्यांचे बोलणे ऐकून चारूला वाटले की जणू आपलीच कहाणी कोणीतरी आपल्याला सांगत आहे. तीस वर्षांपूर्वी तिच्याही आयुष्यात असेच काहीसे घडले होते. 

सोलापूरसारख्या छोट्या शहरात जन्मलेली आणि वाढलेली ती. जराशी लाजरी बुजरी, स्वप्नाळू, साधी, सरळ, सोज्वळ. आईवडिलांचे स्वप्न होते की तिचे लग्न मुंबईसारख्या मोठ्या शहरात व्हावे. पण तिला मात्र मुंबई नकोशी वाटायची. तिथला गोंगाट, वेगवान जीवन, झगमगाट, पार्ट्या, हे काही तिला आवडायचे नाही. आपण बरे, आपली पुस्तके बरी अशी ती होती. घर-मंदिरे-मैत्रिणी एवढेच तिचे विश्व होते. त्याच्या बाहेरचे जग तिने बघितलेच नव्हते. परिस्थिती आणि वडिलांचा धाक याला कारणीभूत होते.

आणि काही ध्यानी-मनी नसताना मुंबईचे हे स्थळ सांगून आले. ते बघायला येणार म्हटल्यावर चारू एकदम दडपून गेली. आई सांगेल तशी कळसुत्री बाहुलीप्रमाणे वागत होती. आपले ते रूप आठवून चारू मनोमन स्वतःला हसली! "कोण होतीस तू, काय झालीस तू!" 
**********
ती भूतकाळात जाऊन येईपर्यंत शेजारचे जोडपे एकमेकांशी डोळ्यात डोळे घालून गप्पा मारण्यात दंग झाले! तिनेही त्यांना दोघांना मोकळीक मिळावी म्हणून डोळे मिटून झोपणे पसंत केले. पण छे! भूतकाळाच्या वाटेवरली सुगंधी फुले डोकावून तिला साद घालत होती. त्यांचा मागोवा घेत ती प्रसन्न मुद्रेने निघाली! 
**********
मुलाकडची मंडळी आली. तिला बाबांनी बाहेर बोलवले. आईने लगेच चहा-पोह्याचा ट्रे तिच्या हातात दिला. मोठ्यांना नमस्कार करून तिने सर्वांना चहा-पोहे दिले, पण ज्याला बघण्याचा कार्यक्रम आखला होता, त्या विनयला बघायची हिंमत मात्र झाली नाही तिची. पदराशी चाळा करत, काही न खातापीता तशीच बसून राहिली. सगळ्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. ती मात्र विचारलेल्या प्रश्नांची मोजकीच उत्तरे देत होती. 

तिचे अवघडलेपण त्याच्या आईच्या लक्षात आले. "त्यांना दोघांना एकट्याने बोलून घेऊ द्या," असे त्याच्या आईने सुचवले. नाईलाजास्तव तिच्या वडिलांनी चारूला घर दाखवायला सांगितली. 

वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून इमाने-इतबारे सगळे घर तिने त्याला दाखवले. कोण कुठे राहत होते, कोणाच्या भिंतीवर काय काय लावले होते, कोणाच्या आवडीच्या कुठल्या वस्तू खोलीत होत्या, इत्यादी सांगत होती. अगदी स्वयंपाकघरसुद्धा दाखवले तिने! तिचा भोळेपणा बघून तो तर अगदी तिच्यावर फिदा झाला होता. चारूचा सगळाच लाजरा-बुजरा कारभार! गच्चीत जाईपर्यंत बोलताना एकदाही तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितले नव्हते.

संध्याकाळच्या गुलाबी आकाशात, कलती सूर्यकिरणे तिच्या गव्हाळ-गोऱ्या कांतीला एक सोनेरी झळाळी देत होती. तिचे लांब सडक केस, गोल चेहरा, काळे टपोरे डोळे, नाजूक जिवणी, आणि ओठांवरचे मंद स्मित हास्य. अतिशय प्रसन्न, शांत, स्थिर भासली ती त्याला.

चेहऱ्यावर रुळणारी तिची एक अल्लड बट बाजूला करण्याचा मोह खूप झाला, पण त्याने तो टाळला. हळूच तिला विचारले, "माझे नाव माहीत आहे तुला?" तिने मानेने होकार दिला.
"मला नाही वाटत बुआ. एकदाही तू माझे नाव घेऊन माझ्याशी बोलली नाहीस."
"असे काय करता? मी तुमच्याशीच तर बोलतेय."
"अच्छा? मग सांग बरं माझं नाव काय आहे?"
"विनय..." कसेबसे चारूने त्याचे नाव घेतले.
त्याच्या मात्र हृदयात असंख्य घंटा वाजल्या! तिच्या मंजुळ आवाजात आपले नाव सारखे ऐकत रहावेसे वाटले त्याला.
"काय म्हणालीस? ऐकू नाही आलं," खोडसाळपणे तो तिला म्हणाला. पण तिला बिचारीला कुठे ते कळले.
सगळा धीर एकवटून थोडा आवाज उंचावून तिने परत त्याचे नाव घेतले. पुन्हा त्याच घंटा वाजल्या त्याच्या हृदयात! त्याने मनोमन देवाचे आभार मानले!

"तू लग्नानंतर मला अशीच हाक मारशील ना...?" हे ओठावर आलेले शब्द त्याने गिळून टाकले. तिला त्याच्याबद्दल काय वाटतेय हे कुठे कळले होते त्याला? ती तर बघतच नव्हती त्याच्याकडे. या विचाराने तो थोडा अस्वस्थ झाला.

"तुझ्यावर लग्नासाठी जबरदस्ती होत नाहीये ना? नाही म्हणजे तुला कसा मुलगा अपेक्षित आहे? मुंबईला यायला तुझी काही हरकत नाही ना?" त्याच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी ती गांगरून गेली. तो आपल्या मनाचा विचार करतोय याचा आनंद मानावा की त्याला मुंबईचा आहे म्हणून नकार द्यावा, हे तिला कळेना. खरे सांगितले तर स्थळ हातचे गेले म्हणून बाबा काय करतील याची प्रचंड भीती वाटली तिला.

तिच्या मनाची चलबिचल जणू वाचली त्याने. "हे बघ काळजी करू नकोस. आपल्यात झालेले बोलणे मी कोणालाही सांगणार नाही. तुझा नकार असेल तर मला तसे स्पष्टपणे सांग. तुझ्या वतीने मी नकार कळवीन; तुला त्याचा काहीही त्रास होऊ देणार नाही. पण मला खरे काय ते सांग. तेवढे जाणून घ्यायचा अधिकार आहे ना माझा?" एकेक शब्द बोलताना विनयच्या हृदयावर जखमा होत होत्या. त्याचा कातर झालेला आवाज तिच्याही हृदयावर जखमा करत गेला.

हतबल होऊन तिचे डोळे डबडबले. तशीच हिम्मत करून तिने त्याच्याकडे बघितले. तर त्याचेही डोळे डबडबले होते. चर्रर्र झाले तिच्या हृदयात. आपल्या न बोलण्याने आपण किती त्याला दुखावले हे जाणवले तिला.

"तसे नाही हो...मला लग्नासाठी कोणी जबरदस्ती करत नाहीये...पण...पण...मला मुंबईची खूप भीती वाटते." अपराधी वाटल्यामुळे तिने पटकन नजर झुकवली.

त्याला मात्र आनंद झाला. "अरेच्या! एवढेच ना? अगं मी असताना तू कशाला काळजी करतेस? तुला सगळे शिकवीन मी, मग तर झाले? आणि काही दिवसांनी तू एकटी सगळीकडे हिंडायला फिरायला लागशील! अगदी परदेशातसुद्धा एकटी जाण्याची हिंमत करशील!"
**********

"किती अचूक ओळखले होते त्यांनी तेव्हाच मला!" चारू मनात बोलली. भूतकाळाच्या रुळावरील गाडी वर्तमानाच्या स्टेशनवर डोकावली होती! पण लगेच पुन्हा तिचा प्रवास सुरू झाला! 
**********

विनयचे ते बोलणे ऐकून चारूने पटकन नजर उचलून त्याच्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यातला आनंद, तिच्या होकाराची अपेक्षा, भविष्याची स्वप्ने तरळताना तिला दिसले. नकळतपणे तिनेही हसून अनुमोदन दिले. 

त्याने हळूच तिच्याजवळ जाऊन विचारले, "आता हरकत नाही ना माझ्याशी लग्न करायला?" हे ऐकून चारू लाजून चूर झाली नसती तरच नवल होते. तिच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यामुळे विनय मनोमन सुखावला. "तुझा होकार माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट आहे!" चारूला यावर काय बोलावे कळेना. लाजून तिने आपला चेहराच हातात लपवला!

तितक्यात तिच्या बाबांची हाक ऐकू आली आणि चारूने खाली धूम ठोकली! जाता जाता दरवाज्यात क्षणभर थांबून विनयकडे बघितले तर तो स्मितहास्य करत तिच्याकडेच बघत होता. ती हसून खाली पळाली ते थेट स्वयंपाकघरात जाऊन आईला मिठीच मारली! तिच्या मनातले आईने लगेच ओळखले!

इकडे विनयने येऊन आईबाबांना खुणेने होकार कळवला. दोघेही उभयता आधीच चारूवर खुश होते. आता विनयकडून पण हिरवा कंदील आल्याने त्यांनी लग्न ठरवूनच जायचे ठरवले. 

थोडी इकडची तिकडची बोलणी झाल्यावर विनयच्या वडिलांनी त्यांची पसंती कळवली आणि लवकरात लवकर शुभ मुहूर्त काढण्यास सांगितला. त्यांना असे वाटले की चारूचे वडील या प्रस्तावावर आनंदाने होकार देतील. पण झाले भलतेच. त्यांनी, "विचार करून कळवतो," असे सांगितले. विनयला आणि त्याच्या आईबाबांना किंचित धक्का बसला, पण त्यांच्या मताचा आदर करीत ते तिथून निघाले. 

निघाले खरे पण विनयला वाटले जणू काळे ढग त्यांच्यासमोर आले. त्याने कसाबसा दुसऱ्या दिवशीपर्यंत दम काढला. मग न राहवून त्याने चारूला कॉल केला. पण वडिलांच्या धाकाने तिने उचलला नाही. काय झाले असेल हे काही कळेना. त्याचा जीव टांगणीला लागला. 

झाले असे होते की चारूच्या बाबांना इतक्या लगेच होकाराची अपेक्षा नव्हती. त्यामुळे नक्कीच काहीतरी घोळ आहे असे त्यांना वाटले. त्यांनी आपल्या मित्राकरवी चौकशी केली आणि सगळी शहानिशा करून दोन दिवसांनी होकार कळवला. कारण मात्र सांगितले की नातेवाईकांशी सल्ला-मसलत केल्याशिवाय ते होकार कळवू शकत नव्हते. त्यानंतर निर्विघ्नपणे विनय आणि चारूचा यथासांग विवाह पार पडला. 
**********
लग्नानंतरची तीन वर्षे जणू मधुचंद्राचा काळ सुरूच होता. काही दिवसात सासऱ्यांची निवृत्ती झाल्यावर सासू-सासरे या प्रेमी युगुलाकडे घर-संसार स्वाधीन करून गावी फार्महाऊसवर जाऊन शेती व संबंधित उद्योगधंद्यात रमले. सणावाराला चारू आणि विनय गावी जात तर वाढदिवसाला आई-बाबा मुंबईला येत. 

विनय आणि चारू प्रेमात आकंठ बुडाले असताना तीन वर्षांनंतर विनयला अमेरिकेत प्रोजेक्ट मिळाले. त्याला चारूला सोबत घेऊन जायचे होते, पण चारू जाण्यास तयार नव्हती. देश सोडून इतक्या दूर अमेरिकेत आपले आईवडील, सासूसासरे, नातलग सगळ्यांना सोडून राहणे तिला अजिबात पसंत नव्हते. शिवाय चारूचे मास्टर्स संपत आले होते व नंतर तिला पी.एच.डी.साठी जायची इच्छा होती. एव्हाना विनयच्या प्रोत्साहन देण्यामुळे चारू आपले मत त्याला मोकळेपणाने सांगू लागली होती. 

सगळ्यांनी यथासांग चर्चा करून ठरवले की विनयचे प्रोजेक्ट होईपर्यंत सासूसासरे आणि आईबाबा आळीपाळीने येऊन चारूसोबत राहतील. 

विनय गेल्यावर खूप दिवस चारू रोज रडत रात्र काढायची. तिकडे विनयची स्थिती पण काही वेगळी नव्हती. दुरावा त्यालाही सहन होत नव्हता, पण तो चारूला फोनवर आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असे. चारूचे मास्टर्स होईपर्यंत विनयला समजले की अमेरिकेत संशोधनाच्या खूप संधी आहेत. शिवाय त्याला वाटले तसे एका वर्षात त्याचे प्रोजेक्ट संपणार नसल्याने मग चारूला अमेरिकेत आणायचे त्याने ठरवले. सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींनाही तेच योग्य वाटले. 

चारू एकीकडे नवऱ्यासोबत रहायला मिळणार म्हणून आनंदी होती, तर दुसरीकडे सगळ्यांना सोडून इतक्या दूर अमेरिकेत जायचे म्हणून दुःखी होती. तिची स्थिती विनय जाणून होता. निघायच्या दोन दिवस आधी त्याने तिला सरप्राइज द्यायचे ठरवले. 

त्याने तिला सांगितले, "माझा एक मित्र अमेरिकेहून येतोय. त्याला घ्यायला विमानतळावर जा. तो आपल्या घरी दोन दिवस राहील." दोन दिवसांनंतर तर चारूचे अमेरिकेचे तिकीट होते. त्यामुळे तिने तो मित्र यायच्या आधी सगळी तयारी करून ठेवली, म्हणजे त्याच्या पाहुणचारात काही कमी रहायला नको. विनयच्या मित्राच्या आवडीचे पदार्थ पण विनयला विचारून तिने केले. तिला बिचारीला कुठे कळले होते की विनय स्वतःचीच फर्माईश पूरी करून घेणार होता!

पण महामार्गावर अपघातामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम झाल्याने विनयचे जवळजवळ विमान चुकले होते. पण या प्रेमी जीवांचे नशीब बलवत्तर म्हणून अखेरीस त्याला विमान मिळाले!

ठरल्या दिवशी विमानतळावर गेल्यावर, विनयला बाहेर येताना बघून, चारूच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गुलाब घेऊन, शाहरुखसारखे हात फैलावून, हसत येणाऱ्या विनयच्या मिठीत, ती धावतच शिरली. दोघांनाही अश्रू अनावर झाले. शेजारी असणाऱ्या लोकांनी या जोडप्याच्या मिलनाचे टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. "कित्ती फिल्मी होते ना ते!" सगळे आठवून मनापासून चारू हसली. 
**********
ते मात्र पूजाने टिपले. "काय झाले हो काकू? का हसलात? काही आठवले का?"

डोळे उघडून प्रसन्न हसून चारू उत्तरली, "तुम्हा दोघांकडे बघून आमची लव्ह स्टोरी आठवली गं!"

"आम्हालाही सांगा ना काकू!" दोघेही एकदम बोलले!

"हो हो का नाही?" असे म्हणून चारूने आत्तापर्यंत आठवले ते सर्व कथन केले.

"ऑ! काका कित्ती रोमँटिक आहेत ना!" पूजा न राहवून बोलली. "नाही म्हणजे, त्या काळी विमानाची तिकिटे पण खूप महाग असतील ना? आणि सुट्ट्या मिळवणे पण अवघड असेल बहुतेक."

"हो तर! कसे काय ह्यांनी सगळे जमवले कोण जाणे? फारसे कुठे जायचे नाहीत. चार मित्रांसोबत अडचणीत राहिले. कुठेही वायफळ खर्च नाही. एकच स्वप्न होते त्यांचे: मला थोडे दिवस तरी अमेरिकेत न्यायचे! आणि बघा, ध्यानीमनी नसताना आम्ही आता अमेरिकेचे नागरिक झालो आहोत!"

"अय्या हो?!! काकूss इती पूजा, पुढे काय काय घडले सांगा ना? आम्हाला तुमचा हा प्रवास ऐकायचा आहे. आणि आत्ता तुम्ही भारतात कशासाठी आला होतात तेही सांगा बरं का!" 

"झालं असं की..." चारू त्यांची पुढील प्रेम कहाणी सांगू लागली.
**********
विनयला घरी बघून सगळेच प्रचंड आनंदी झाले. त्याच्या आईबाबांना तर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले. दोन दिवस त्याच्या आईने तीन त्रिकाळ त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले. बरोबर न्यायला सुके पदार्थसुद्धा करून दिले. चारूची आई थोडीच मागे राहणार होती! त्यांनीही भरपूर पदार्थ करून आणले! दोन दिवसात पोट फाटेल की काय इतके विनयने खाल्ले! 

राजा-राणी सगळ्यांचा निरोप घेऊन अमेरिकेला आले आणि पुन्हा संसार थाटला. सुरवातीला तिथल्या जीवनपद्धती समजायला त्रास झाला, पण हळूहळू विनय तिला सगळे शिकवत गेला आणि तिनेही मनापासून सगळे शिकून घेतले. वर्षभर त्यांच्याकडे गाडी नव्हती. कधी मित्रांसोबत तर कधी पायी जाऊन ते सामान आणायचे. त्रास व्यायचा, पण एकमेकांच्या सहवासात ते आनंदाने सहन करायचे.

यथावकाश चारूचा विद्यार्थी व्हिसा करवून तिने पीएचडी मिळवली. या दरम्यान घर, संसार आणि अभ्यास यांची कसरत करताना, विनयने एक आदर्श पतीची भूमिका बजावली. स्वयंपाक असो वा घरकाम, अभ्यास असो वा गाडी शिकण्याचे काम, सगळ्यात तो तिला मदत करत होता आणि सोबतच स्वावलंबनाचे धडे देत होता. संशोधनासाठी हळूहळू चारू एकटी जाऊ लागली आणि एकूणच तिचा आत्मविश्वास वाढला. या सगळ्याचा परिपाक म्हणजे चारूची पीएचडी पाच वर्षात संपली आणि तिला अमेरिकेतील एका प्रख्यात संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली.

त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितले नाही. दर वर्षी एकदा तरी भारतात येत असत. गावी जाऊन आईबाबांसोबत वेळ घालवत, शेतीच्या कामाचे योग्य व्यवस्थापन होत आहे ना त्याकडे बघत. सोलापूरला जाऊन चारूच्या माहेरीसुद्धा लक्ष पुरवत. मात्र दोघांचेही आईवडील शेवटपर्यंत, आपली माती, आपली माणसे सोडून अमेरिकेला एकदासुद्धा आले नाहीत याची खंत दोघांनाही होती.

इतर आई-बाबा नातवंडांसाठी का होईना परदेशी जातात, पण हे सुख विनय आणि चारूच्या नशिबात नव्हते. दोनदा नैसर्गिकरीत्या गर्भपात झाल्यानंतर विनयने निक्षून सांगितले की आपण एकतर मुले दत्तक घेऊया नाहीतर आपण दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत. पण त्यावेळी चारूला, आपण आई होण्यास सक्षम आहोत, असे अजिबात वाटत नव्हते. तिची मानसिक स्थिती खूप नाजूक असल्याने विनयनेसुद्धा तो विषय काढणे टाळले आणि घरातल्या इतरांनीही. 

असा समजूतदार साथीदार आणि घरचे असणे हे चारू तिचे भाग्यच समजत होती. पण आपली कूस उजवली नाही याचे दुःख मात्र तिला बराच काळ सतावत राहिले. मग विनयने तिला हळूहळू मुलांच्या अनाथाश्रमात स्वयंसेवा करण्यास उद्युक्त केले. दोघेही दर शनिवारी दुपारी चार तास तिकडे घालवू लागले. आपण एक दोन नव्हे तर अनेक मुलांची आई बनू शकलो याचे समाधान चारूला मिळाले आणि हळूहळू तिचे दुःख कमी झाले.
**********

आयुष्यातले चढ उतार असे सुरूच होते. विनयला काही दिवस नोकरी नव्हती, तेव्हा चारूच्याच नोकरीवर त्यांचा संसार चालला. ते दिवस कठीण असले तरी नेहमीप्रमाणे विनय मात्र अधूनमधून तिला मस्त रोमँटिक सरप्राइज देत असायचा.

कधी तिच्या डब्यात एखादी छोटीशी चिठ्ठी ठेवत असे, तर कधी एखादे गुलाबाचे फूल. कधी तिचा ड्रेस इस्त्री करून ठेवायचा, तर कधी खोलीत एखादी मस्त सुगंधी मेणबत्ती लावायचा. कधी ती खूपच दमली तर तिचे पाय दाबत तिला झोपवायचा, तर कधी तिच्यासाठी तिचा आवडता प्रसादाचा शिरा, नाहीतर जिलबी करायचा. त्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला नोकरी नसल्याने बाहेर ते जाणार नव्हते तर बागेतल्या फुलांनी सजवून कँडल लाईट डिनरचे मस्त सरप्राइज दिले तिला! जेवायला बीटरूट घालून गुलाबी केलेला तिचा आवडता शिरा! त्याच्या प्रेमाच्या उबदार स्पर्शात चारू सगळा थकवा, सगळे कष्ट विसरून जायची!

त्याच दरम्यान चारूला तिच्या कॅन्सर संशोधनाबद्दल पुरस्कार मिळाला आणि त्याचे सगळे श्रेय चारूने तिचा पती, विनय याला दिले. त्याचप्रमाणे सासू-सासरे आणि आई-वडील यांच्या आशीर्वादानेच हे घडले हेही सांगायला ती विसरली नाही. 

काही काळाने विनयला नोकरी लागली आणि त्यांची संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली. चारूची संशोधनातील घोडदौड सुरूच होती. काही काळानंतर तिच्या संशोधन संस्थेने आणि भारतातील अग्रगण्य कॅन्सर संशोधन संस्थेने एकत्रित काम करण्याचा करार केला. हा करार होण्यात चारूचा सिंहाचा वाटा होता. आपण मिळवलेले ज्ञान आपल्या देशाच्या उपयोगी पडावे हा त्यामागचा उद्देश होता.

दोघांचेही आईवडील वृध्द होत असल्याने तब्येतीच्या तक्रारी उद्भवू लागल्या. तिने आणि विनयने मग मायदेशी परतायचे ठरवले. काळ पुढे सरकत राहिला. एकेक करून दोघांच्याही आईवडिलांचे निधन झाले. सगळ्यांच्या आजारपणात शेवटपर्यंत विनय आणि चारू सेवा करायला हजर होते याचे त्यांना समाधान होते. 
**********
आता विनय आणि चारू दोघेही पन्नाशी पार करून गेले होते. विनयने भारतात शेती उत्पादने निर्यातीचा, स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. उभयतांनी त्यांच्या शहरातील घराजवळ एक अनाथाश्रम बांधला. कॅन्सर संशोधन, त्यानिमित्त होणारे परदेश दौरे सांभाळून तिथे चारू जातीने लक्ष घालत असे. 
**********

हा सगळा चारूचा जीवन प्रवास, पूजा आणि गिरीश मन लावून ऐकत होते. 
"काकू, तुम्ही दोघेही ग्रेट आहात! आम्ही पुढल्या वेळी भारतात तुम्हा दोघांना भेटायला नक्की येऊ!" 

"हो हो अवश्य या. आणि राहायलाच या बरं का. आमच्या शेतावर पण जाऊन राहू आपण. ह्यांना तर खूप आनंद होईल." चारूने आनंदाने त्यांना सांगितले.

"पण काकू, तुम्ही तुमच्या ह्यांना सोडून आज एकट्याच निघाला आहात? कोणता पुरस्कार वगैरे स्वीकारायला निघालात की काय?" हसत हसत गिरीशने विचारले. 

"अगदी बरोब्बर ओळखलेस बघ!" चारूने हसत त्याला दुजोरा दिला.

"अय्या हो?!! खरंच?" पूजाला वाटले काकू आपली गंमतच करत आहेत.

"अगं खरंच! आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार स्वीकारायला जात आहे. माझ्या मुलीचा, उर्मीचा उद्या पदवीदान समारंभ आहे! तिला बेस्ट स्टूडेंटचा पुरस्कार मिळतोय! तिची इच्छा आहे की पुरस्कार आमच्या दोघांसोबत स्वीकारावा!" चारू साश्रू नयनांनी बोलली.

"मी समजले नाही काकू...तुमची मुलगी....?" अडखळत पूजाने विचारले.

हसून चारू म्हणाली, "अगं हो, आमच्या आश्रमातील सगळी मुले आणि मुली आमचीच मुले-मुली मानतो आम्ही. त्यामुळे माझा मुलगा, माझी मुलगी असेच तोंडात येते बघ! आणि हो, तिकडे तुमचे काका पण भेटणार आहेत मला. (डोळे मिचकावत चारू म्हणाली!) कालच पोचले आहेत तिकडे. मला काही महत्त्वाची कामे होती, ती उरकून आज जात आहे मी. त्या मुंबईला घाबरणाऱ्या चारूकडून या एकट्या आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या चारूपर्यंत पोचले, ती केवळ यांच्यामुळे..."सद्गदित होत चारू म्हणाली.

"अरे वाह! मग काकू, आम्ही नक्की येऊ तुम्हाला भेटायला. तुमचा पत्ता आणि तिथला फोन नंबर आधी द्या बघू," लगबगीने गिरीश म्हणाला.
**********

गप्पाटप्पा करत जर्मनीचे फ्रँकफर्ट विमानतळ कधी आले, हे लक्षातच आले नाही. बॅगा घेऊन तिघेही बाहेर आले तेव्हा चारूला तिची वाट बघत असलेला विनय दिसला. आजही पहिली भेट असल्यासारखा गुलाबाचे एक फूल घेऊन लेकीसोबत तिची वाट बघत होता. तिला गुलाब देऊन त्याने तिला मिठी मारली. या वयातही चारू एकदम लाजली आणि मग नजरेनेच दटावले त्याला. लेकीला कडकडून मिठी मारली आणि तिचा चेहरा गोंजारत तिचा पापा घेतला. मग पूजा आणि गिरीशची ओळख करून दिल्यावर, दुसऱ्या दिवशी भेटायचे ठरवून आपापल्या ठिकाणी ते निघाले. 

गाडीत बसल्यावर चारू लाजत हळूच त्याला म्हणाली, "काय हे? काल तर आपण एकत्र होतो. आज काय लगेच गुलाब दिलात इकडे? तुम्ही पण ना...!" 

"अच्छा? काल भेटलो म्हणून काय झाले? इतक्या वर्षांचा विमानतळावर पडलेला पायंडा मोडायचा? आणि तुझे नवीन मित्र मैत्रीण होते म्हणून आज एवढी लाजलीस ना? हां हां? खरं सांग..." तिला चिडवत विनय म्हणाला.

"इश्श, तुमचं आपलं काहीतरीच!" गोरीमोरी होत चारू म्हणाली.

तेवढ्यात उर्मीने उद्याच्या तयारीचा विषय काढल्याने त्यांचे बोलणे अर्धवट राहिले. दुसऱ्या दिवशी पदवीदान समारंभ नेटक्या पद्धतीने पार पडला. चारू आणि विनयसोबत उर्मिने आपले पारितोषिक आणि पदवीपत्र स्वीकारले. आपल्या मित्र मैत्रिणींसमोर आईबाबांचे कौतुक करताना ती थकत नव्हती. चारू आणि विनयला धन्यधन्य वाटले अगदी!

त्यानंतर दिवसभर तिघेही आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघत होते. संध्याकाळी उर्मी तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीला गेली. विनय-चारू हॉटेलवर परत आले. आल्यावर दोघेही फ्रेश झाले. मग विनयने चारूला डोळे मिटायला सांगितले. नेहमीप्रमाणे आढेवढे घेऊन शेवटी चारूने डोळे बंद केले, तर तिच्या हातात त्याने अबोली रंगाची साडी ठेवली. ती बघून चमकून चारूने त्याच्याकडे बघितले.

"अशी काय बघतेस? पहिल्यांदा तुला याच साडीत बघितले होते. आठवतंय का?" मिश्कीलपणे तो म्हणाला.
"इश्श, ते कसे काय विसरेन?" लाजत चारू म्हणाली.
"मग माझ्यासाठी काय आणलेस?" विनयने विचारले.

चारूने उशाखालून एक सुंदर एम्ब्रोईडरी केलेला रुमाल काढला. त्यावर विनयचे सुबक अक्षरात तिने नाव लिहिले होते. आणि एक सुंदर नक्षीकाम केलेला बदाम होता, ज्यात दोघांचे नाव लिहिले होते.

"३० वर्षांपूर्वी तुमचे नाव माझ्या हृदयावर रेखाटले आणि माझे तुमच्या हृदयावर. कधी बोलले नाही, पण पहिल्या भेटीतच तुम्ही माझे मन जिंकले होते. आज त्याच प्रीतीची साक्ष तुम्हाला देत आहे." 

"तेच क्षण आपण आज पुन्हा जगुयात!" 

"इथे कसे शक्य आहे?" चारूने न समजून विचारले.

"तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग झाले तर, डोळे मिटून चल माझ्यासोबत!"

चारू काहीही न विचारता डोळे बंद करून, त्याचा हात पकडून त्याच्यासोबत निघाली.

डोळे उघडले तर समोर काय आश्चर्य! उर्मीच्या घराच्या वरच्या गच्चीत विनयने जणू ताऱ्यांचे नंदनवन फुलवले होते! 

कँपसाठी वापरतात तसा एक तंबू उभारला होता. त्यात पाल्मच्या व फुलझाडांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. झाडांभोवती छोट्या दिव्यांच्या माळा.
मध्येच एक गोल टेबल व दोन खुर्च्या. त्यावर एका झगमगत्या व्हासमध्ये गुलाबाच्या फुलांचा गुच्छ . सुंगंधी मेणबत्त्या लावून अगदी रोमँटिक वातावरण तयार केले होते.

विनयचे सरप्राइज बघून चारू एकदम खुश झाली! विनयने तिचा हात हातात घेऊन, सिनेमातल्यासारखी तिची एक मस्त गिरकी घेतली. त्यानंतर तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केले.

"त्या दिवशीच हे करायचे होते, पण नाही जमले." अंगठी तिच्यासमोर धरून विनयने विचारले, "चारू, जन्मोजन्मी अशीच सोबत करशील?" 
तशी पाणावलेल्या डोळ्यांनी चारू, "तुम्ही न विचारताही मी कायम तुमच्यासोबतच असणार!" असे म्हणून तिने तिचा डावा हात पुढे केला आणि विनयने तिला अंगठी घातली आणि तिची आवडती जिलबी तिला दिली, स्वतःच्या हाताने बनवलेली! "आणि एकदा त्या दिवशी हाक मारलीस तशी नावाने हाक मार ना!"  
"चला, काहीतरीच तुमचं...!"

अशा तऱ्हेने तीस वर्षांनी विनय चारूच्या प्रेम कहाणीची सेकंड इनिंग सुरू झाली! त्यांच्या आनंदात तुमचेही तोंड जिलबीने गोड होऊ द्या! 

©️तनुजा प्रधान, अमेरिका.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू