पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वटपौर्णिमा

आज वटपौर्णिमा! 
सकाळ पासून वटाची पूजा करतांनाचे कितीतरी फोटो अपलोड झाले सोशल मीडियावर! 

आजकाल कोणताही सण आला की दोन गोष्टी सुरु होतात. पहिली गोष्ट, व्हाट्सऍप पर असंख्य मेसेजेस आणि दुसरी तरुणांकडून या सर्व अतार्किक, जुनाट, फालतू परंपरा आहेत अशा चर्चा! 
आणि मग दोन्ही विचारांची सांगड घालत माझे विचारचक्र सुरू होते! 

माझ्या मते वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरा, पिढ्यानपिढ्या हस्तांतरित झालेले संस्कार यामागे काही तरी तर्क असेल! उगाच का आपल्या पूर्वजांनी हे संस्कार जपले? काही तर कारण असेल की या परंपरा अखंड सुरू आहेत! 

प्रत्येक सणा मागे एक कथा असते, "वटपौर्णिमा" या सणाची सत्यवान-सावित्रीची कथा आपण सर्व जाणून आहोतच.. (आणि ज्यांना नाही माहिती ते गूगल करू शकतात) 
तर… कथा सांगता सांगता तिचे मूळ रूप बदलले असेल यात शंका नाही कारण सांगणारा कथेची रोचकता वाढवण्यासाठी त्यात काही जोडतो, काही वगळतो.. हे अगदी स्वाभाविक आहे. 

पण.. मी या कथेतून फक्त 3 "फैक्ट" घेऊन विचार केला 1. ज्येष्ठ महिना होता 2. सत्यवान जंगलात काम करत होता 3. सावित्री विदुषी होती, तिने यमासोबत वादविवाद केला होता. 

तर ज्येष्ठ महिन्यातील एवढ्या प्रचंड उन्हाळ्यात सत्यवानाची तब्येत बिघडली, सावित्री अतिशय हुशार होती आणि तिला वडाचे महत्त्व व गुण माहिती असतील म्हणून तिने लगेच आपल्या पतीला वडाच्याच झाडाखाली आणले आणि वडाच्या झाडाच्या शीतलतेने, भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने सत्यवान शुद्धीवर आला! 
यात न विश्वास करण्यासारखे व अवैज्ञानिक काय आहे ? 

आता प्रश्न हा की बाकी स्त्रिया का बरं झाडाला पुजतात? तर कथा ही एकच प्रसिद्ध झाली पण परिस्थिती तर सर्वांची एकसारखी होती! शेतात किंवा अजून कुठे घाम गाळणारे, प्रचंड उन्हात राबणारे, दिवसभर मेहनत करणारे आणि घटकाभर झाडाखाली विसावा घेणारे आपले पूर्वज आणि त्यांना सावली देणारे, प्राणवायू देणारे हे वृक्ष! त्यांचे उपकार नको का मानायला? 
हो आता कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण भावना तर त्याच आहे!

ज्या गोष्टीचा आपण आदर करतो, ज्या वस्तू वर आपले प्रेम असते त्याची आपण काळजी घेतो, ती वस्तू जपून ठेवतो, त्याचे नुकसान करत नाही! 
एक छोटे उदाहरण द्यायचे झाले तर आजकाल पाळीव प्राणी बऱ्याच घरात असतात, यू नो डॉगी, कॅट, बर्ड्स… त्यांना अगदी घरातल्या सदस्या सारखी वागणूक दिली जाते, त्याच्या साठी भावना निर्माण होतात, त्यांना काही ही झाले की जीव कासावीस होतो… तर जसे प्राणी प्रिय असल्याने आपण त्यांची काळजी घेतो तसेच आपले पूर्वज झाडांचा आदर करायचे, त्यांना पुजायचे व त्यांची काळजी घ्यायचे आणि तेच संस्कार त्यांनी पुढच्या पिढीला दिले! मग त्यात आपल्याला मागासलेले, अतार्किक, अवैज्ञानिक काय आणि का दिसावे? 

आता प्रश्न असा की आपण कुठे घाम गाळतोय? आपण तर ए. सी. मध्ये बसलो आहे, मग आपण का झाडाची पूजा करायची? 
तर मी माझ्या अल्पमतीने विचार केला आणि मला जे सुचले,समजले त्याप्रमाणे मला असे वाटते की ज्येष्ठ महिन्यात प्रचंड गर्मी असते आणि त्यातून ही पौर्णिमेला ब्लडप्रेशर, मेंटल डिसऑर्डर वगैरेचे पेशंट जास्त अस्वस्थ होतात या मागे वैज्ञानिक कारणे आहेत, तर काय हरकत आहे एखाद्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जाऊन भरपूर ऑक्सिजन फुफ्फुसात भरून घेतली तर? वडाच्या झाडाला "ऑक्सिजन फैक्ट्री" असे म्हणतात, आणि हे झाड रात्री सुद्धा ऑक्सिजन देते. शिवाय हे वृक्ष एवढे पसरलेले असते की आसपासचे वातावरण ठंड राहाते! 
शिवाय रोजच त्या एसी कूलरची "आर्टिफिशियल" हवा खाण्यापेक्षा छान "नेचरल" हवा खाल्ली तर नुकसान नक्कीच नाही! 

गर्मीच्या दिवसात पाचन तंत्र बिघडलेले असते, म्हणून एक दिवस पोटाला आराम! 
थंडगार ताक प्या , फळे, खा… 
मला तरी यात काहीही "टाईम वेस्ट" आणि जुनाट वगैरे वाटत नाही… 
हो आता वडाच्या फांद्या तोडून घरी आणून त्याची पूजा करणारे, पोटभर गरिष्ट पदार्थ खाऊन "आमचा दोन्ही वेळचा उपास आहे" म्हणणारे, किंवा भर उन्हाळ्यात पाणी न पिता कडक उपवास करणारे… यांना सल्ला देणे व्यर्थ आहे!

चला, लेख लिहिता लिहिता रात्रीचे दिड वाजले आहेत, खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र खूप सुंदर दिसतोय! रातराणीचा सुगंध दरवळतोय… 
अहाहा! किती सुंदर आहे हा निसर्ग, या निसर्गाला जपण्यासाठी, आपण जे काही करू शकतो ते वाद न घालता करायला हवे! मला तरी असे वाटते..... 
5 जून ला जागतिक पर्यावरण दिन असतो, सुरुवात 3 तारखेपासूनच करूया! 
झाडे पुजू या, झाडांवर प्रेम करू या, झाडे जगवू या… .. आणि निसर्गासाठी कृतज्ञता व्यक्त करू या! कारण निसर्ग हाच परमेश्वर आहे! 
स्त्री शक्तीला वटपौर्णिमेच्या अखंड शुभेच्छा! 





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू