पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पंढरीची वारी संपूर्ण माहिती

❀ पंढरीची वारी ❀


पावसाळा अन् आषाढ जवळ आला की सगळ्यांना वारीचे वेध लागायला लागतात. पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांची वर्षभर जपलेली शिदोरी! ती आता विठ्ठलाच्या समोर जाऊन उघडायची वेळ समीप आल्याने सगळेच आनंदी होतात, आणि त्याने दिलेला प्रसाद वर्षभर त्या भोळ्या भक्तांना तारण्यासाठी पुरेसा असतो!

*वारी म्हणजे काय?*

पंढरपूरचे दैवत विठ्ठल याच्या उपासना पद्धतीत वारीचा समावेश आहे. वर्षातून एकदा विठ्ठलाचे दर्शन व्हावे हा उद्देश! वारी ही सामूहिक उपासना पद्धत आहे.

"आषाढीची वारी" म्हणजे वारकरी संप्रदायाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय. "वारकरी संप्रदाय" म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. हे सर्व निस्सीम विठ्ठल भक्त असतात. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक प्रचंड संख्येने सहभागी होतात.

वारीमध्ये विविध गावातून सगळे मिळून कीर्तन करत, भजन, अभंग, भारूड, गवळण गात, नाचत- खेळत पंढरपूरकडे जातात. जो वारकऱ्यांचा समूह वारीमध्ये सामील होतो त्याला दिंडी म्हणतात. त्यांच्या हाती ध्वज, पताका, टाळ, पखवाज, मृदुंग, तुळशी वृंदावन, कळशी, इत्यादी असतात. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारकरी सामील होतो. वारीमध्ये अनेक ठिकाणाहून दिंड्या सामील होतात.
वारीला सूचना देणारा एक दिंडी प्रमुख असतो.

संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव, तपोनिधी संत नारायण महाराज देहूकर यांना "पालखी सोहळा जनक" मानतात.

सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीला चंद्रभागा नदीच्या काठी भेटतात. तिथे पोचल्यावर नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय," तसेच "जय जय रामकृष्ण हरी" या जयघोषात पंढरपूर दुमदुमून जाते. एकादशीच्या दिवशी एका खास रथातून विठ्ठल रुख्मिणी मूर्तींची श्री राधाराणीसह मिरवणूक काढली जाते.

*वारीचा इतिहास*

पंढरपूरची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे; परंतु पंढरपूरच्या वारीला एक हजार वर्षांची परंपरा आहे. 
ज्ञानदेव, तुकाराम यांच्या काळापासून ती अधिक प्रसिद्ध झाली. ज्ञानेश्वरांचे वडीलही वारीला जात असत असा संत वाङ्मयात उल्लेख आहे. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या दिंडीला सुमारे ८०० वर्ष झाली आहेत.
पंढरीच्या वारीची परंपरा तुकाराम महराजांच्या घरात पिढ्यान् पिढ्या चालू होती. विश्वंभरबाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष नित्यनेमाने पंढरीची वारी करीत.

*वारीचे प्रकार*
वारीचे चार प्रकार आहेत. यात आषाढी वारी प्रमुख असून, कार्तिकी वारी, माघी वारी, चैत्र वारी अशाही वाऱ्या आहेत.

चैत्र वारी - चैत्र शुद्ध एकादशी म्हणजे कामदा एकादशी दिवशी वर्षातील पहिली वारी पंढरपुरी येते. हिंदू  दिनदर्शिकेचा पहिला महिना म्हणून वारकरी मोठ्या संख्येने विठ्ठल दर्शनाला जातात.

कार्तिकी वारी - कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देव उत्थापिनी एकादशीला पांडुरंग झोपेतून उठतो अशी श्रद्धा आहे. म्हणून त्याच्या दर्शनाला भाविक जातात. या उत्सवाचा भाग म्हणून चंद्रभागेच्या काठी भजन कीर्तनात रात्रभर जागरण केले जाते.

माघी वारी - माघ शुद्ध किंवा जया एकादशीला वारकरी पंढरपुरी जमतात. त्यावेळी अतिशय भक्तिमय वातावरणात विठ्ठल दर्शनासाठी भक्तांची गर्दी पहायला मिळते.

आषाढी वारी - वर्षातील ही सगळ्यात मोठी वारी होय. आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

असे मानतात की आषाढी किंवा देवशयनी एकादशीला विठ्ठलाची निद्रा सुरू होते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो. या काळात भक्त जास्तीत जास्त वेळ विठ्ठल भक्तीत घालवतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले असते.

*वारीत तुळशीचे महत्त्व*

वारकरी जितके विठ्ठल रखुमाईला मानतात तितकेच तुळशी आईला मानतात. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ असतेच. पंढरीच्या वारीला जाताना अनेक स्त्रियांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असतेच. तुळस ही हरिप्रिया, कृष्णसखी असल्याने ती पांडुरंगालाही प्रिय आहे, कारण तो विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे महिला वारकरी विठ्ठल भेटीला तुळशी वृंदावन घेऊन जातात. जिथे स्वतःचे ओझे सांभाळणे कठीण तिथे मैलोनमैल चालत डोईवर ते वृंदावन सांभाळत नेतात.

*पालखी सोहळा*

पंढरीची ‘पायी वारी’ आणि वारीचा ‘पालखी सोहळा’ हे दोन वेगळे भाग आहेत. पूर्वी वारकरी हे अभंग व भजन म्हणत-म्हणत पायी आपल्या गावाहून पंढरपुरी जात.

तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबारायांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ‘ज्ञानोबा तुकाराम’ असे भजन करीत आषाढी एकादशीला पंढरपुरी जाण्याची परंपरा सुरू केली. पालखी परंपरेचे मूळ इथे आहे. हा संयुक्त पालखीचा सोहळा १६८० पासून सुरू झाला.

पण पुढे १८३५ पासून हैबतबाबा आरफळकर यांनी माउलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. हैबतबाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार होते. त्यामुळे राजे-रजवाडे, सरदारांशी त्यांचे उत्तम संबंध होते. त्यांनी या पालखी सोहळ्यासाठी काही संस्थानिकांकडून हत्ती, घोडे मागविले. तंबू, सामान वाहण्यासाठी बैलगाड्या, नैवेद्यासाठी सेवेकरी हा सारा लवाजमा मागवला.

जरीपटका घेतलेला एक स्वारीचा घोडा, माउलींच्या स्वारीसाठी दुसरा घोडा, पालखीचा नगारा, त्यामागे काही दिंड्या, मध्यभागी रथात माउलींची पालखी आणि पालखीच्या मागे चाललेल्या शेकडो दिंड्या अशा वैभवात हा सोहळा सुरू झाला. गोवागावच्या दिंड्या त्यात सहभागी झाल्या.

म्हणून पालखी सोहळ्यावर, विशेषतः रिंगणावर मराठेशाही लष्करी छाप जाणवते. घोड्यांची दौड, चोपदरांचा सहभाग, कर्णा वाजवून पालखी निघण्याची सूचना यातून हे दिसते. हैबत बाबा यांनी आळंदीची पालखी वेगळी केली तेव्हा ही प्रथा सुरू झाली. त्यांना शितोळे व ग्वाल्हेरच्या शिंदेंनी या सोहळ्यासाठी मदत केली. 

*वारीचा प्रवास घडतो कसा?* 

ज्येष्ठ वद्य सप्तमीला, देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते. ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अर्थात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते. 

महाराष्ट्र, कर्नाटक येथून अनेक ठिकाणांहून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. "ग्यानबा तुकाराम" चा अखंड गजर व विठ्ठलाचा नामघोष वारकऱ्यांच्या मुखात सुरू असतो. 

ज्ञानेशर महाराजांच्या पालखीच्या पुढे अश्व असतो. अनेक दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून सहभागी होतात. परंपरागत दिंड्यांना अनुक्रमांक देण्यात येतात. मानाच्या दिंड्यांचे क्रमांक ठरलेले असतात. 

दिंडीत वीणा वाजविणाऱ्यास महत्त्वाचे स्थान असते. त्यांना "विणेकरी" असे म्हणतात. 

श्री माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाची ठिकाणे म्हणजे आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, म्हाळशिरस, वेळापूर, बंडी शेगाव, वाखरी व पंढरपूर. यामध्ये आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड, हे दोनच टप्पे मोठे असतात. त्यानंतर पुढे, रोज अंदाजे अठरा ते वीस किलोमीटरचा प्रवास, ही वारकरी मंडळी पायी करत असतात. 
मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात. ती ठिकाणे जवळ येताना, संध्याकाळी माऊलींचा हरिपाठ म्हणण्याची प्रथा आहे. हरिपाठ झाल्यावर दिंडीतलेच कोणीतरी अभ्यासू एखाद्या ओवीवर तासाभराचे प्रवचन करतात. 

माऊलींच्या पालखी तळावर मानाच्या कीर्तनाचा कार्यक्रम होतो. कीर्तनाची सुरूवात रुपाच्या अभंगाने अर्थात *रुप पाहता लोचनी* ह्या माऊलींच्या अभंगाने होत असते. 

मुक्कामाला पोहोचल्यावर दिंडीतल्या अन्नपूर्णेच्या रुपातल्या माताभगिनी स्वयंपाकाला लागून सर्व मंडळींना पोटभर जेवूखाऊ घालतात. 

दिवसभर चालून, अभंग गाऊन, भजन करून थकलेले वारकरी, छोटे मोठे तंबू ठोकून गाढ झोपी जातात. पहाटे तीनच्या ब्राह्मी मुहूर्तावर उठतात. दिडेक तासात सगळ्यांच्या आंघोळी आटोपून पहाटे काकडा भजन होते. नंतर श्रींना पवमान अभिषेक करून भाविकांना दर्शन दिले जाते. 

अश्व माऊलींचे दर्शन करतात व चालायला सुरुवात होते. साधारण दोन तासाने अर्धा तास विसावा असतो. नंतर दुपारचा नैवेद्य व पुन्हा विसावा असतो. मार्गात वारकरी फुगड्यादेखील खेळतात. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी आरती होऊन प्रवास पूर्ण होतो. नंतर पालखी तळावर मानाचे कीर्तन होते. रात्री जागर भजन होऊन पुन्हा पहाटे काकडा भजन. 

दिंडीतले वारकरी रोज सुमारे २५ किलोमीटरचे अंतर चालतात. दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो. तेथे त्या गावातील कुटुंबे या वारकऱ्यांच्या चहा-नाश्ता व जेवणाची सोय करतात. वारकऱ्यांची सोय करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करणे, असा त्यांचा भक्तिभाव आहे. वारीत गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नसतो. वारी केल्याने अहंकार गळून पडतो असा समज आहे. 

*रिंगण* 

रिंगण म्हणजे पालखी सोहळ्यातील महत्त्वाचे आकर्षण. रिंगण म्हणजे वर्तुळ. तो एक प्रकारचा खेळ असतो. भाविकांच्या संख्येनुसार रिंगणासाठी मोठी मोकळी जागा शोधतात. 

*गोल रिंगण - यात मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवताली पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. रिंगण उभारणाऱ्या चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण ठराविक गावातच होत असते. 

उदा.:अश्वरिंगण इंदापूरात होते. यात आधी पताका किंवा झेंडेकऱ्यांचे रिंगण, तुळशीधारक महिलांचे रिंगण, विणेकरींचे रिंगण व नंतर मानाच्या माऊलींच्या अश्वाचे रिंगण असा कार्यक्रम साधारणतः असतो. 

रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. पालखी सोहळ्यात दोन अश्व सहभागी असतात. एका अश्वावर जरी-पटका घेतलेला स्वार असतो. दुसरा अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरूवून, चोपदार त्यांत अश्व मोकळा सोडतात. अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. यावेळेस भाविक "माउली माउली" असा गाजर करतात. अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो . 

*उभे रिंगण - यात दिंड्या वर्तुळाकार उभ्या न राहता, पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात, आणि या मधून अश्व दौडतो. 

*बकरी रिंगण – संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे अथवा बकरी रिंगणसुद्धा असते. पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात. ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. पालखी सोहळ्यात अशा प्रकारे विविध समाजातील लोक सहभागी होतात. 

*उडीचा खेळ* 

रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो. 

हे खेळ होताना बाजूने टाळ व भजन सुरूच असते. यामध्ये मध्यभागी पालखी ठेवतात. कडेने पाकळ्यांप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात. वेगवेगळ्या ठेक्यांवर "ज्ञानोबा तुकाराम" हे भजन करतात. या वर्तुळाच्या कडेने पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात. पाऊस पडून चिखल झाला असला तरीही हा खेळ खेळून वारकरी याचा आनंद लुटतात. 


लोणंद-तरडगावमध्ये पहिले उभे रिंगण असते. बंडी शेगाव येथे उभे रिंगण असते. सदाशिव नगर, ठाकुरबाबा, म्हाळशिरस, वाखरी येथे गोल रिंगण होते. 

पायीवारीच्या प्रवासात जी गावे लागतात, त्या गावातली प्रतिष्ठीत मंडळी दिंड्यांच्या स्वागताला व आदरातिथ्याला सज्ज असतात. वेळेनुसार चहा, न्याहारी अथवा जेवणाचाही बेत आखलेला असतो. ज्यांच्या फळांच्या बागा असतात, ती मंडळी, वारकऱ्यांना फळे वाटतात. गावातली इतर कुटुंबेही वारीच्या मार्गावर येऊन, त्यांच्या क्षमतेनुसार करून आणलेला स्वयंपाक वाटत असतात. अनेक संस्था ह्यामध्ये सहभागी होऊन कुणी बिस्कीटचे पुडे, कुणी केळी, कुणी पिठलं-भाकरी, कुणी शुद्ध पाण्याच्या बाटल्या, सरबते इत्यादी नानाविध पदार्थ वाटून, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान पावतात. 

*वारीचे आधुनिक स्वरूप* 

पारंपरिक पद्धतीने वारी जात असताना आळंदी येथे निर्मलवारी आणि हरितवारी असे समाजाभिमुख कार्यक्रम अवलंबले जातात. आता वारी आधुनिक ॲप वर आली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून केले जाणारे वारी व्यवस्थापन व नियोजन, आणि वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती मिळावी, यासाठी हे मोबाईल ॲप विकसीत करण्यात आले आहे. वारकऱ्यांसाठी खास एस्टी बस सेवा उपलब्ध करून देण्यात येते. ठिकठिकाणी जेवणाची सोय आणि मेडिकल कॅम्पस उभारले जातात. 

***********************************
धन्यवाद! 
विठ्ठलचरणी माझा नमस्कार!
बोला...
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, 
श्री ज्ञानदेव तुकाराम, 
पंढरीनाथ महाराज की जय! 

||जय जय राम कृष्ण हरी||


संकलन - तनुजा प्रधान, अमेरिका.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू