पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझे बाबा!

          माझे बाबा!

 

          तीर्थरूप बाबा,

          शि.सा. न.

      तुम्हाला आश्चर्य वाटत असणार की, इतके वर्षांनंतर तुमची आठवण कशी झाली? बाबा, तुमची आठवण येणार नाही असे कसे होईल? प्रसंगानुरूप आठवण येतेच. मी असे म्हणणार नाही की, तुम्ही गेल्यापासून एक क्षण असा गेला नाही की, तुमची आठवण आली नाही. सुरूवातीचे काही महिने, वर्षे मात्र हमखास आठवण यायची. परंतु नंतर मी माझ्या संसार चक्रात असा अडकून पडलो ना की, तुमची येणारी आठवण ही कधीकधी आतच दाबावी लागायची. ते साहजिकच आहे ना, बाबा? हं, एक मात्र नक्की आणि अभिमानाने सांगतो, खरवड ता. कळमनुरी येथून माझी बदली भाटेगाव ता. कळमनुरी येथे झाली त्यावेळी आई म्हणाली की, काय योग आहे, तुझ्या बाबांनी भाटेगाव येथील शाळा पहिल्यांदा सुरू केली आणि आज तू त्या शाळेवर जात आहेस. ते ऐकून मलाही खूप आनंद झाला. हजर होण्यासाठी भाटेगाव येथील प्राथमिक शाळेत गेलो तेंव्हा ती एक शिक्षकी चौथीपर्यंत शाळा होती. पदभार स्वीकारताना अगोदर शाळेचे सुरुवातीचे प्रवेश निर्गम रजिस्टर हातात घेतले. जीर्ण झालेले  ते रजिस्टर उघडले. पहिल्या पानावर सुंदर, वळणदार अक्षरात लहिले होते, 'प्रवेश निर्गम प्रा. शा. भाटेगाव. मु. अ. सूर्यकांतराव नागोराव पांडे....' ते अक्षर आणि ते नाव पाहून मला एक फार मोठा ठेवा गवसला. मी भक्तीभावाने त्या नावावर डोके टेकवले. माझ्याकडे आश्चर्याने पाहणाऱ्या शिक्षकांस म्हणालो,' या शाळेची स्थापना माझ्या बाबांच्या हस्ते झाली आहे.' त्यानंतर कामानिमित्त ते रजिस्टर काढावे लागायचे त्या त्या वेळी तुमच्या अक्षरातील नोंदी पाहताना खूप आनंद होत असे, तुमची आठवण येत असे.

     बाबा, तसे पाहिले तर तुमचे जीवन अल्पायुषी. वयाची पन्नाशी गाठली न गाठली की तुम्हाला हे जग सोडावे लागले. मी त्यावेळेस जेमतेम तेरा चौदा वर्षांचा...नववीत शिकणारा. माझे तर सोडा परंतु तुमचेही एक स्वप्न होते, तुम्हाला मी इंजिनिअर, डॉक्टर किंवा बँकेत नोकरी करावी असे वाटत होते. परंतु तुमच्या इतर स्वप्नांप्रमाणे हेही स्वप्न अपूर्ण राहिले. असो. मलाही मग दहावीनंतर डी. एड. करून शिक्षकी पेशा स्विकारावा लागला कारण तोही तुमचाच आशीर्वाद होता. तुम्ही अचानक गेलात आणि सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली, जो भेटेल तो 'बाबाच्या जागी नोकरी कर' असाच सल्ला देत असत. अनुकंपा म्हणून ती जागा मला मिळाली असे असले तरी तुमची जागा मी कसा काय घेऊ शकणार असे मला उगीचच वाटायचे कारण आईवडील हे ईश्वरस्वरूप असतात. ईश्वराची जागा कधी कुणी घेऊ शकेल का? बाबा, लहानपणापासून तुमचे माझ्यावर आणि माझे तुमच्यावर अतोनात प्रेम होते. पण, खरे सांगू का, नोकरी लागायच्या आधी अनेकदा मला तुमचा रागही यायचा. विशेषतः जेव्हा एखादे दिवशी घरात चूल पेटायची नाही. कुणी उधार द्यायचे नाही. त्यावेळी वाटे, बाबांनी असे का केले असेल? आम्हाला उपाशी ठेऊन का बरे सोडून गेले असतील? त्यातच ताई लग्नाची. तिच्या लग्नाचा विषय निघाला ना की, वाटायचे बाबा असे निष्ठुर का बरे झाले असावेत? बरे, तुमचा स्वभाव तसा शांत, संयमी. तुम्हाला राग येतच नसे पण एकदा का राग आला की, तो व्यक्त करण्याची तुमची पद्धती वेगळीच असायची, कुणाला रागवायचे नाही, कुणावर ओरडायचे नाही. पण दोन दोन दिवस कुणाला बोलायचे नाही की, अन्नाचा कण खायचा नाही. असा होता तुमचा विलक्षण राग. तुमच्या रागाचे प्रसंग आई नेहमी सांगायची. एकदा तुम्हाला आजोबा काही कारणांमुळे रागावले म्हणे. त्यामुळे तुम्हाला राग आला. तुम्ही कुणालाही अगदी बायकोलाही काहीही न सांगता घर सोडून निघून गेलात. घरातील सारी मंडळी परेशान होती. एक दिवस...दोन दिवस...तीन दिवस झाले. तुमचा काहीही पत्ता नव्हता. आई एक सारखी रडत होती. आठवे दिवशी तुमचे पत्र आले.तुम्ही लिहिले होते, 'औरंगाबाद येथे पोलिसात भरती झालो आहे. दोन महिन्यात गावी येऊन सौभाग्यवतीला घेऊन येतो.' दोन महिन्यांनी तुम्ही घरी आलात परंतु तुम्हाला आजोबांनी परत जाऊ दिलेच नाही..

     नंतर तुम्ही शिक्षक झालात. अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी करीत असताना एकदा तुमच्या शाळेवर शिक्षण विस्तार अधिकारी आले. का कोण जाणे पण ते तुमच्यावर रागावले. तुम्हालाही खूप राग आला. रागारागाने तुम्ही शाळेच्या किल्ल्या साहेबांच्या अंगावर फेकल्या आणि तडक घरी निघून आलात. सायंकाळी ते साहेब आपल्या घरी आले. तुम्हाला समजावून सांगितले आणि किल्ल्या देऊन निघून गेले.

     बालपणीच्या काही आठवणी मी आजही ह्रदयाच्या एका कोपऱ्यात.... देव्हाऱ्यात देवाला जपून ठेवावे तशा जपून ठेवल्या आहेत. तुम्ही मला मार दिला असे मात्र फार कमी वेळा घडले आहे. एकदा आईच्या मावस भावाच्या मुलाच्या लग्नासाठी आपण सारे उमरखेड येथे गेलो होतो. सकाळी लग्न लागले. मी इतर मुलांसोबत खेळताना पाहुण्यांकडे दिवसभर कामासाठी ठेवलेल्या एका सायकल रिक्षेत बसलो. रिक्षावालाही रिकामाच होता. तो माझी सारी माहिती विचारत असताना त्याला कुणीतरी काम सांगितले. मी रिक्षेत बसलेला होतो. त्याने 'येतोस का?' असे विचारताच मी तत्काळ होकार दिला. कुणाला काहीही न सांगता मी 'पाळी होते' या आनंदात त्याच्यासोबत गेलो. परंतु मध्येच रिक्षा पंक्चर झाल्यामुळे आम्हाला बराच उशीर झाला. तिकडे मांडवात एकच गोंधळ उडाला. मी कुणाला काहीही न सांगता गेल्यामुळे आणि नवीन शहरात एकटे फिरावे असे माझे वय नसल्यामुळे सारे परेशान झाले होते. आईने रडायला सुरुवात केली. वातावरण एकदम गंभीर झाले. बऱ्याच वेळानंतर आमची रिक्षा कार्यालयाच्या परिसरात आली. उशीर होतोय म्हणून मी घाबरलो होतोच त्यात भूकही लागली होती. दुरूनच तुम्ही अस्वस्थपणे फेऱ्या मारत असल्याचे मला दिसले. शेजारी आई रडवेला चेहरा करून उभी होती.मला काय वाटले कुणास ठाऊक पण रिक्षा थांबण्याची वाट न पाहताच मी उडी मारली आणि धावतच तुमच्याकडे निघालो. मला पाहताच तुमचा चेहरा आनंदाने फुलला. मी जवळ येताच तुम्ही मला उचलून कवेत घेतले तो क्षण इतक्या वर्षांनीही आठवणीत आहे. दुसरे कुणाचे वडील असते तर त्यांनी फोडून काढले असते. दोन दिवस उपाशी ठेवले असते पण तुम्ही चकार शब्दानेही दुखावले नाही.

     बाबा, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतल्याची जाणीव आहे. हिंगोली येथून साधारण दहा किलोमीटरवर असणाऱ्या पिंपळखुंटा या गावी तुम्ही शिक्षक होतात. आम्हा बहीण-भावाचे शिक्षण चांगल्या शाळेत व्हावे यासाठी तुम्ही तेवढे अंतर दररोज पायी जाणे-येणे करायचे. तुमचा दिवस सकाळी चार वाजता सुरू होत असे. सकाळी उठल्यापासून  तुम्ही भुपाळ्या, अभंग, भक्तीगीतं म्हणताना देवपूजा आटोपून शाळेत जात असत. पावसाळ्यात मात्र खूप मजा यायची. खूप पाऊस झाला की रस्त्यातल्या एका ओढ्याला पूर आला की तुम्हाला शाळेत जाता यायचे नाही. तुम्ही घरी असलात की मग खूप मजा यायची. तशा पावसाळी वातावरणात तुम्हाला आवडतात म्हणून आई गरमागरम भज्यांचा बेत करायची. मग आमचीही मज्जाच मज्जा!

बाबा, तुमचा स्वभाव तसा भोळा. आई तर कधी रागाने, कधी गमतीने तुम्हाला भोळा सांभ असेच म्हणायची. तुम्ही कुणावरही पटकन विश्वास ठेवत असत. याच कारणामुळे आपली नंबर एकची शेती गेली आणि एक खरबाड जमीन आपल्याच लोकांनी तुमच्या पदरात टाकली. या गोष्टीचे आईला दुःखही होते, रागही होता. पण बाबा, खरे सांगू का, तो तसा न पिकणारा तुकडा तुम्ही घेऊन ठेवला होतात म्हणून मला नोकरी लागताच पाच-सहा महिन्यातच तो विकून ताईचे लग्न तरी करता आले. चांगली शेती विकून घेतलेला तो निकृष्ट तुकडा माझ्या मदतीला नसता तर कदाचित नोकरीच्या सुरुवातीच्या काळात मला कर्जबाजारी व्हावे लागले असते आणि कदाचित ताईचे लग्न अजून लांबले असते. असो. जे देवाच्या मनात असते तेच घडते हेच खरे.

      तुम्ही तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून आमच्यावर चांगले चांगले संस्कार केले आहेत. शाळेत तेवढे लांब चालत जाऊन आले तरी सायंकाळी तुमची बाहेर एक चक्कर ठरलेली असे. अनेकदा मी तुमच्यासोबत असे. बाहेर निघालो की, तुमचे भेटणाऱ्या व्यक्तिशी अभिवादन सुरू होत असे. या गोष्टीचे मला भारी अप्रूप वाटे. अनेकदा माझ्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक भेटायचे. त्यांच्याशीही तुमचे नमस्काराचे आदानप्रदान होत असे. ते पाहून मला नवल वाटायचे. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो की, माझ्या मित्रांना तो प्रसंग मोठ्या अभिमानाने सांगत असे. काही वेळा तुम्ही घरी नसलात की मला बाजारात जावे लागे. त्यावेळी रस्त्याने शिक्षक किंवा मुख्याध्यापक भेटले की, मी स्वतःच्या नकळत त्यांना नमस्कार करू लागलो. तेही कौतुकाने मला प्रत्युत्तर देत असत. ते पाहून माझा आनंद गगनात मावायचा नाही. एकदा आमचे मुख्याध्यापक आमच्या वर्गात आले असताना त्यांनी 'तुमच्या वर्गातील नागेश बाहेर भेटला की  नमस्कार करतो.' हे सांगितले. ते ऐकून सारा वर्ग माझ्याकडे पाहू लागताच मला संकोचल्याप्रमाणे झाले. मन मात्र आत्यंतिक आनंदाने भरून आले. त्यादिवशी तुम्ही सायंकाळी घरी आलात की, तुमच्या गळ्यात पडून सारा वृत्तान्त सांगितला आणि तुम्ही पाठ थोपटून दिलेली शाबासकी आजही आठवते.

     बाबा, मी शिकत असताना गाईड, शिकवणी हे प्रकार नुकतेच सुरू झाले होते. कॉपी प्रकरणानेही बाळसे धरले होते. मी आठव्या वर्गात शिकत होतो. वार्षिक परीक्षा सुरू होत्या. माझ्या मागच्या बाकावर माझ्या वर्गातील एका मित्राने गाईडचे एक पान फाडून आणले होते. योगायोगाने तो प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला होता. त्याने ते उत्तर लिहिले आणि त्या प्रश्नाचे उत्तर येते का असे मला विचारले. मी येत नाही असे सांगताच त्याने तो कागद माझ्याकडे फेकला. कागद समोर पडताच मी अक्षरशः घामाने चिंब झालो. कॉपी हा प्रकार माहितीच नव्हता. काय करावे ते सुचत नव्हते. शेवटी तो कागद उत्तरपत्रिकेच्याखाली लपवला. हात थरथर कापत होते. कसेतरी इकडेतिकडे बघत दोनतीन शब्द लिहिले आणि गार्डींगला असणारे शिक्षक माझ्याजवळ येताच मला देवच आठवले. तोंडातून शब्द फुटत नव्हता. शेवटी त्या सरांनी मी लपवलेला कागद स्वतःच काढून घेतला आणि म्हणाले, 'नागेश, हे तुझे काम नाही आणि तुला जमणार ही नाही.' ते एवढेच म्हणाले परंतु मला खूप वाईट वाटले. डोळ्यातून पाणी येऊ लागले. बाबा, ते शिक्षक आपल्या शेजारी राहायचे. त्याच सायंकाळी त्यांची आणि तुमची भेट झाली. त्यांनी सारे काही तुम्हाला सांगितले. त्यादिवशी तुमचा राग काय आहे ते मला समजले. 'कॉपी करतोस?' एवढेच शब्द उच्चारत तुम्ही जो एक रट्टा मला लगावलात तो आठवला की, आज साठाव्या वर्षीही अंगावर शहारे येतात. पण नंतर आयुष्यात स्वतः कधी कॉपी केली नाही आणि माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही करु दिली नाही. डी. एड्ला प्रवेश घेतला. दुसरा पर्याय नव्हता. तिथेही कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी करत करत शिकू लागलो. प्रथम वर्षाची परीक्षा चालू होती. इंग्रजी अध्यापन या विषयीची प्रश्नपत्रिका समोर होती. त्यामध्ये पाठ कसा काढावा हा प्रश्न होता. त्याचे उत्तर वर्गात कुणालाही येत नव्हते. पन्नास गुणापैकी बहुतेक पंधरा गुणांचा तो प्रश्न होता. त्या प्रश्नावर मी खूप सराव केल्याचे माझ्या मित्रांना आणि प्राध्यापकांना माहिती होते. सर माझ्याजवळ आले. त्यांनी माझी उत्तरपत्रिका पाहिली. मी तो प्रश्न यशस्वीपणे सोडवल्याचे पाहून मला शाबासकी देत निघून गेले. जातांना शेजाऱ्यास दाखव एवढेच खुणावून निघून गेले. माझ्या त्या उत्तराची नक्कल अवघ्या वर्गाने केली. बाबा, त्यावेळी मला प्रकर्षाने तुमची आठवण आली.

     बाबा, एक गोष्ट तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय की, ज्या भाटेगावच्या शाळेचे तुम्ही पहिले शिक्षक होता त्या शाळेत मी शिक्षक म्हणून गेलो तेव्हा ती शाळा चौथीपर्यंत आणि एक शिक्षकी होती. तुमचा आशीर्वाद आणि तेथील गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे मी ती शाळा सातव्या इयत्तेपर्यंत करू शकलो. तालुक्यातील एक उत्कृष्ट शाळा म्हणून नावारुपाला आणू शकलो. तुमचा आशीर्वाद आणि केलेल्या कामाचे चीज म्हणून राज्य सरकारचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार मला मिळाला.

        डोंगरकडा येथील शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून हजर झालो.  योगायोग असा की, डोंगरकड्याच्या प्राथमिक शाळेत तुम्ही शिक्षक म्हणून काम केले होते. तुम्ही त्या शाळेवर असताना माझा जन्म झाला होता. त्या शाळेत काम करताना तुम्ही काम केलेल्या शाळेत आणि माझ्या जन्मगावच्या शाळेत काम करतोय हा दुहेरी आनंद होत असे.तुम्हाला ओळखत असलेले नागरिक आणि तुमचे काही विद्यार्थी भेट झाली की, आवर्जून तुमची आठवण काढायचे त्यामुळे आनंद वाटायचा. भाटेगाव आणि डोंगरकडा या दोन्ही शाळेत काम करताना खूप आनंद होत असे. कदाचित एक अदृश्य शक्ती तुमच्या आठवणींच्या रुपाने मला मदत करीत होती, स्फूर्ती देत होती, प्रोत्साहित करीत होती. तिथेही सर्वांच्या मदतीने खूप काम करता आले. सर्व शिक्षा अभियानात डोंगरकड्याची शाळा तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाची मानकरी ठरली.

     बाबा, तुम्ही असतानाच्या आपल्या घरी झालेले शेवटचे महालक्ष्मी पूजन कायम आठवणीत आहे. तुम्ही आजारी होता, खूप थकवा आला होता. घरी महालक्ष्मीचे आगमन झाले होते. नेहमीप्रमाणे सकाळची महालक्ष्मींची पूजा आई करीत होती. आपण सारे ते पाहात असताना अचानक आईच्या पातळाच्या पदराने पेट घेतला. आम्हाला कुणालाही काहीही कळत नव्हते. तुम्ही ओरडलात, 'अग, लक्ष कुठे आहे? पदर पेटलाय...' आईने झटकन ती आग शांत केली परंतु आईला कसली तरी जाणीव झाली. नंतर दोन तीन दिवस तिच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते. बाबा, दोन महिन्यातच आईची शंका खरी ठरली. तिला लागलेली धाकधूक प्रत्यक्षात उतरली. तुम्ही आम्हा सर्वांना कायमचे सोडून निघून गेलात. बाबा, आपल्याकडे दहाव्याच्या संस्काराला विशेष महत्त्व आहे. माझी मौंज झाली नसल्यामुळे तुमच्या काकांनी सारे विधी केले. तुमचे दहाव्याचे संस्कार आटोपून आजोबा घरी परतताच कुणीतरी विचारले, 'काय झाले? कावळा पिंडाला पटकन शिवला ना? काही कबूल करावे लागले का?' त्यावर आजोबा म्हणाले, 'काही नाही. सारे शांतपणे झाले. ' त्यावर आई म्हणाली, ' जिवंतपणी त्यांची काही इच्छा आकांक्षा नव्हती. मरण पावल्यावर काय इच्छा ठेवतील?'

         अशा प्रत्येक वेळी मग तो प्रसंग कौटुंबिक असो की, शाळेचा असो तुमची आठवण येत असते. तुमचे संस्कार, तुमचे आचारविचार आजपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ही जपण्याचा प्रयत्न करीत राहील. कितीही लिहिले तरी तुमच्या आठवणी मी शब्दबद्ध करू शकणार नाही. म्हणून थांबतो....

              ००००

          तुमचाच,

  नागेश सू. शेवाळकर, पुणे 

  (९४२३१३९०७१)


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू