पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खुनाला जेव्हा वाचा फुटते !!!

खुनाला जेव्हा वाचा फुटते !!!!

रात्रीचे बारा वाजून गेले तरीपण गावाबाहेर असलेल्या "आपकी पसंद " बियरबारचे दिवे अजून लुकलुकत होते.एक दोघे जण अजुनही तिथेच झिंगत बसलेले होते.. थोडावेळ पर्यंत त्यांना तिथे बसण्याची मुभा होती मग मात्र सरळ त्यांची बारमधुन हकालपट्टी होणार होती, बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाची तमा न बाळगता..
आठ दिवसांपासुन घातलेल्या पावसाच्या थैमानाने जनजीवन विस्कळीत झालेलं होतं.रस्त्यावरची गाड्यांची तुरळक रहदारी सोडली तर बाहेर चिटपाखरूही दिसत नव्हतं.सततच्या पावसामुळे हवेत गारठा वाढला होता. लाईट गेले असल्याने बाहेर संपूर्ण काळोख पसरलेला होता .रातकिड्यांची किरकिर वातावरणात अजुनच भयावहता आणत होती. अशा त्या भयाण वाटणाऱ्या रात्री नागपूर हिंगणा रोडवर एक काळ्या पिवळ्या रंगाची टॅक्सी तुफान वेगाने धावत होती…टॅक्सीत मागच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने आपले डोळे मिटलेले होते. त्याच्या ओठातून काहीतरी पुटपुटल्याचा अस्पष्टसा आवाज येत होता. गंतव्य स्थानी जाण्याची त्याला घाई दिसत होती , कारण ड्रायव्हरने टॅक्सीचा वेग कमी करताच तो वारंवार वेग वाढवण्यास सांगत होता.. वेगाने धावणारी टॅक्सी "आपकी पसंद" बारच्या समोरून थोडं पुढे जाताच ,एका टनक असणाऱ्या वस्तूवरून तिची पुढची चाक उंचावल्या गेली आणि टॅक्सी रस्त्यावर आदळली. टॅक्सीत मागे बसलेली व्यक्ती जोरात उसळली.तिच्या तोंडातून एक शिवी निघून ती व्यक्ती म्हणाली,
"काय रे नीट चालविता येत नाही कां?"
काही न बोलता ड्रायव्हरने टॅक्सीची स्पीड थोडी कमी केली आणि तो मागे वळून रस्त्यावर बघू लागला,
टॅक्सीत बसलेल्या माणसाने आवाज चढवुन त्याला म्हटले,
" अरे काय बघतोयसं? जे असेल ते असू दे ,तू आधी मला पोहचवं.. माझी आई शेवटच्या घटका मोजत आहे.. वाढव टॅक्सीचा वेग !" टॅक्सीवाल्याने टॅक्सीचा वेग वाढवितांना पुन्हा एकदा मागे वळून बघितलं…गाडीच्या मागच्या लाईटच्या प्रकाशात त्याला रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेलं एक मानवी शरीर दिसलं आणि ते दृश्य बघून टॅक्सीचालक घाबरला. त्याने आपल्या टॅक्सीचा वेग आणखीनच वाढविला आणि ती टॅक्सी अंधारात दिसेनाशी झाली.
"आपकी पसंद" बारमध्ये बसलेल्या दोघांना बारचे नोकर धीरज व जगनने बाहेर‌ काढले. सर्वात शेवटी बारला कुलप लावून बारचा मालक शिवराज बाहेर निघाला..
" जग्या अरे पाऊस थांबण्याच लक्षण दिसत नाहीये.. चला मी माझ्या गाडीत सोडतो तुम्हाला तुमच्या घरी "
शिवराजने म्हटल्यावर जगन आणि धिरज शिवराजच्या गाडीत बसले.शिवराजने गाडी स्टार्ट केली.रस्त्यावर थोडं दुर जाताच गाडीच्या हेडलाईट मध्ये समोरचे दृश्य बघून शिवराजने करकचून ब्रेक दाबला.गाडी थांबताच जगन व धीरजची नजर समोरच्या रस्त्यावर गेली आणि गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोरचे दृश्य पाहून तिघांचेही डोळे विस्फारले गेले.ते एकमेकांकडे पाहु लागले.रस्त्याच्या मधोमध कुणीतरी पडलं होतं.
"मालक ट्रकनं उडवलेलं दिसतयं ! मेंदूचा पार चेंदामेंदा झालेला आहे…"
पावसामुळे ते खाली उतरले नाही..शिवराजने गाडीतुनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर फिरवली. जंगलवजा भाग असल्याने वस्ती नव्हतीच. चहुकडे गडद अंधार पसरलेला होता .गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश पसरलेल्या भागात तेवढा ऊजेड होता.समोरच प्रेत मनात भीती निर्माण करत होतं. एकूणच वातावरण गुढ वाटत होतं…त्याने घड्याळाकडे पाहिलं ,रात्रीचा एक वाजत आला होता.
१९९८ चं वर्ष होतं ते! त्यावेळी मोबाईलची सोय नव्हती. ते तिघेही पुन्हा बारमध्ये आले. तिथून शिवराजने पोलीस स्टेशनला फोन लावला.

"हॅलो…" समोरून झोपेतल्या आवाजातले शब्द ऐकु आले
"हॅलो हिंगणा पोलीस स्टेशन का?"
"होय! कोण बोलताय?"
" साहेब इथेहिंगणा रोडवर "आपकी पसंद" बारजवळ रस्त्यावर एक्सीडेंट झाला आहे."
शिवराज व त्याचे सोबती गाडीत बसून पोलिसांची वाट बघू लागले.पावसाचा जोर थोडा कमी झाला होता..
सायरन वाजवत अर्ध्या पाऊण तासात पोलीसांची गाडी स्पॉट वर हजर झाली..
उंच पुरी देहयष्टी,भेदक नजर असलेला पस्तीस छत्तीस वर्षाचा स्मार्ट इन्स्पेक्टर निरंजन खाली उतरला..
"काय रे एवढ्या उशिरा काय करत होते तुम्ही बारमध्ये..?
"साहेब उद्या नवीन माल येणार आहे स्टॉक चेकिंग करत होतो म्हणून वेळ झाला.."
शिवराजने उत्तर दिले.
निरंजन ने बॉडीचे निरीक्षण केले..
"तुमच्यापैकी कोणी ओळखतं याला?"
"नाही साहेब. दुपारी हा माणूस आमच्या बारमध्ये आला होता.. सोबत आणखी कोणीतरी दोघेजण होते. तिघांची खुप बाचाबाची झाली पैशावरून.. याच्या सोबतच्या माणसाने याला खुनाची धमकी दिली होती"
शिवराज ऐवजी जगनने उत्तर दिले.
पंचनामा झाला,सुचना देऊन इन्स्पेक्टर निरंजन निरंजन गाडीत बसले.ऊद्दा पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सगळं कळणार होतं.

************
सकाळी अकरा वाजताच्या सुमारास जगदिश शिवलकर यांच्या घरचा टेलिफोन खणखणला .. नाश्ता करत असलेल्या अनिरुद्धने फोन उचलला.

" हॅलो कोण बोलतंय?

"अनिरुद्ध! मी… मी.. अनुराधा !
अनुराधा फोनवर स्पुंदत स्पुंदत दबक्या आवाजात रडत बोलत होती…
"अरू काय झालं?"
" अनि …आलोक…आलोक… आता या जगात नाही?"
"काय "?
"होय आत्ताच दादा कोणाला तरी सांगत होता, आलोकचा खून झालाय म्हणून…" पण अनुराधाच बोलणं अनिरुद्धने पुर्ण ऐकलेच नाही. त्याच्या हातातून फोनचा रिसिव्हर खाली पडला…
" अनि ऐक ना मला, मला भेटायचे तुला आत्ताच!
‌ "हॅलो हॅलो" अनुराधा बोलत होती पण अनुराधाच बोलणं अनिरुद्धला ऐकुच येत नव्हतं .

***********

अनुराधा! श्रीनिवास कार्लेकरांची धाकटी मुलगी… श्रीनिवास बांधकाम व्यावसायिक होते.. घरची श्रीमंती असल्याने अनुराधा लाडाकोडात वाढलेली होती पण स्वभावाने अतिशय शांत समजदार आणि मृदभाषी होती.. हजार झणीत उठुन दिसणारं सौंदर्य होत तिचं!
अनिरुद्ध !सुखवस्तू कुटुंबातला एकाकी, अबोल, शांत…एक पंचवीस वर्षाचा आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेला तरूण.लहान असतानाच एअरक्रॅश मध्ये आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे आजी आजोबा व काका काकुंच्या छत्रछायेत वाढलेला.अनुराधा व अनिरुद्ध च्या मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं होतं आणि आता ते दोघं लग्न करणार होते..
आलोक! वडील गेल्यानंतर सावत्र आईच्या जाचाला कंटाळून शहरात येऊन छोटी मोठी काम करत शिक्षण घेत असणारा, लेखनाची आवड असणारा शेतकरी कुटुंबातला एक होतकरू तरूण.
कॉलेजमध्ये अनिरुद्ध,आलोक, अनुराधा या तिघांच त्रिकूट प्रसिद्ध होतं पण आज ते त्रिकूट तुटलं होतं…
बाहेर पाऊस कोसळतच होता. गाडी काढून अनिरुद्धने पोलीस स्टेशनचा रस्ता धरला. काकाच्या घरून पोलीस स्टेशनला जायला त्याला दीड तास लागला. तिथे आलोकचा सावत्र प्रभाकर व त्याचा मित्र दिनेश आणि गावचे काही लोक जमलेले त्याला दिसले. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला होता. त्यामध्ये आलोकचा एक्सीडेंट नसून सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान खून झाला असल्याचे नमूद होते..सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता.आलोकचा खून कोणी केला असावा आणि कां?

***********
अनिरुद्ध इन्स्पेक्टर निरंजन समोर जाऊन ऊभा राहीला. "मी आलोकचा मित्र !"
"बोला!"
"काल दुपारी आलोक माझ्याकडे आला होता . कधीच दारूला न शिवणारा, काल त्याने दारू प्यायली होती.. एक लेखक म्हणून त्याला प्रसिद्धी मिळवायची होती आणि त्यासाठी तो प्रयत्नात होता..कादंबरी छापण्यासाठी एका संपादकाच्याही संपर्कात होता.पण संपादकाने त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती.सावत्र भावाकडे जाऊन तो वारंवार पैशाची मागणी करत होता "
इन्स्पेक्टर निरंजनने अनिरूद्धची जबानी नोंदवून घेतली.
पोस्टमार्टम होऊन प्रेत प्रभाकरच्या ताब्यात देण्यात आलं..
"स्वतः मेला तो मेला.. माझ्या भोवती फाशीचा दोर लटकवत ठेऊन गेला…माझ्या बापाने याच्यासाठी जमीनच ठेवली नव्हती अन मला हा पैसे देण्यासाठी जबरदस्ती करत होता… शेवटी गेला ना जीवानिशी!"
प्रभाकरच्या शब्दातला तिरस्कार दिनेशच्या लक्षात येत होता..
स्मशानातुन अनिरुद्ध घरी आला.कालच त्याला नोकरीच अपाॅयमेन्ट लेटर मिळाला होतं.नोकरी मिळाल्याची बातमी तो आलोकला सांगणारच होता. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर निरंजन आणि त्याचे सहकारी अनिरुद्ध च्या घरी पोहोचले. घराची कसून झडती घेण्यात आली. फिंगरप्रिंटसही घेण्यात आले.. अनिरूद्धची आणि आलोकची मैत्री कॉलेज मध्ये, तसेच कॉलेज बाहेरही प्रसिद्ध होती. दोघही जिवलग यार होते.. त्यांच्या मैत्रीमध्ये शंका घेण्यासारखं काहीच नव्हतं.. हेच सर्वांकडून ऐकायला मिळालं होतं…
खुनी सापडला तर ठीक नाहीतर तपास करताना इन्स्पेक्टर निरंजनच्या बुद्धीचा कस लागणार होता..
"साहेब तुम्हाला कोणावर संशय वाटतो?
" पावले ,पुराव्याने सिद्ध कराव्या लागतात सगळ्या गोष्टी!जिथे पुरावा नाही तिथे खुनी संशयाचा फायदा घेऊन सुटू शकतो.
दोन महिन्यांनी अनिरुद्ध व अनुराधा यांच्या लग्नाची भलीमोठी शोभिवंत पत्रिका अनुराधाचा भाऊ प्रथमेशने निरंजनच्या हातात दिली आणि लग्नाला येण्यासाठी आग्रहाचं निमंत्रणही . निरंजन लग्नाला गेला. पण नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावर 'ती' खुशी दिसली नाही जी त्याला अपेक्षित होती.. "कां" हा प्रश्न त्याच्या मनात आला. आलोकचा खूनीअखेर गवसला नाही. काही दिवसांनी आलोकच्या खुनाची फाईल बंद करण्यात आली. इन्स्पेक्टर निरांजनसाठी तो खुन एक रहस्यच राहीलं.. पण त्याला माहीत होतं कधी ना कधी
"खुनाला वाचा फुटते.."

*************

अनिरुद्ध व अनुराधा ने आपल्या मुलीचे नाव दोघांच्या नावावरून "आराध्या" ठेवलं होतं..
आराध्या आता पाच वर्षाची झाली होती. अनिरुद्धने तिला पाचगणीच्या शाळेत घातले.
वर्ष समोर जात होती.आराध्याच्या पंधराव्या वाढदिवसा निमित्त अनिरुद्ध व अनुराधा पाचगणीला गेले तिथे त्यांची भेट इन्स्पेक्टर निरंजनशी झाली.एकमेकांची विचारपूस झाली..
"माझा मुलगा इथे बारावीला आहे त्याला भेटायला आलोय.. ओके.. अनिरुद्ध भेटू पुन्हा..दुनिया गोल आहे !"

*************
दिल्ली ते अंबाला ट्रेन सुटून दहा मिनिटे झाली होती.. आराध्या! एक पंचवीस वर्षाची केतकी रंगाची सुंदर तरुणी… छोटे पण व्यवस्थित सेट केलेले केस.. गालावर खळी.. टोपोरे आणि सुंदर असे डोळे.. कुणाच्याही नजरेत भरावे असे…. आपल्याच मस्तीत आपल्याच आनंदात ती सीटवर बसून होती.. थोड्यावेळाने तिच्याच बाजूला तिच्यापेक्षा आठ दहा वर्षांनी मोठी अशी एक तरुणी येऊन बसली. थोड्यावेळाने त्या तरूणीने एक मराठी डिटेक्टीव्ह कादंबरी हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली. आराध्याच्या चेहऱ्यावर हसु फुललं. तिने त्या तरुणीची ओळख काढण्यासाठी विचारलं..
" मी आराध्या मराठे ! कुठे निघालीस!"
"अंबाला "
"मी पण.. आईबाबांनाभेटायला चालले.."

************

एकदा ट्रेनमध्ये निरंजन ने अनिरुद्ध ला म्हटलं होतं… "दुनिया गोल आहे भेटू पुन्हा" आणि योगायोगाने अनुराधाची मुलगी आराध्याच लग्न निरंजनच्या मुलाशी ठरलं, म्हणण्यापेक्षा प्रेम विवाह जमला.
दुसऱ्या दिवशी अनिरुद्धच्या घरी माजी पोलीस अधीक्षक निरंजन त्यांची धर्मपत्नी, मुलगा ऋत्विक आणि त्यांच्या सोबत एक तरूणी आराध्याला बघायला आले..
"मिस्टर अनिरुद्ध ही माझी भाची इन्स्पेक्टर गार्गी सुलाखे नागपूरलाच असते.. आणि गार्गी हे अनिरुद्ध बरेच वर्ष नागपूरला होते.."
गार्गीला बघून आराध्या खुश झाली होती.
साखरपुड्याची तारीख निश्चित झाली..
"गार्गी साखरपुड्याच्या दिवशी जरा लवकर येशील माझी तयारी करून द्यायला?
आराध्याच्या प्रश्नाला गार्गीने हसून होकार दिला..

***********
"आई कोणती साडी नेसू?"
"आराध्या कपाटभर साड्या पडलेल्या आहेत.जी आवडेल ती नेस मी कामात आहे.."
तेवढ्यात गार्गीने एका शॉलमध्ये गुंडाळलेली शिफॉनची गोल्डन कलर साडी हातात घेतली.. साडी ऊकलत असतांना गार्गीच्या हाताला कागदा सारखं काहीतरी लागलं. सेफ्टी पिनने एक फोटो साडीला पिनअप केलेला होता. तिने तो फोटो काढला आणि बाजूच्या ड्रावर मध्ये टाकला. आराध्या वॉशरूम मध्ये गेली. तेवढ्यात गार्गीने तो फोटो हातात घेतला फोटोवर नजर टाकली. फोटोमध्ये तीन व्यक्ती होत्या. अनुराधा व अनिरूद्धच्या मध्ये एक व्यक्ती होती.‌ त्या व्यक्तीने अनुराधा आणि अनिरूद्धच्या गळ्यात हात टाकलेला होता.त्या व्यक्तीचे टपोरे आकर्षक असे होते. सेम आराध्या सारखा तोंडवळा असलेली ती व्यक्ती दिसत होती.. जणू आराध्या ही त्या व्यक्तीची मुलगी असावीआणि ही बोटातली अंगठी ?सेम अंगठी आराध्याच्या आई आणि बाबांच्या बोटातही आहे. तिचा पोलीसी मेंदू विचार करू लागला..तिने फोटो पर्समध्ये टाकला. आराध्याला साडी नेसवून तयारी करून दिली.. आराध्या खूप सुंदर दिसत होती.
अनुराधा आराध्याने नेसलेल्या साडी कडे बघत होती.
"आराध्या इतकी ठेवणीतली साडी का घातलीस ? नवीन घालायचीस ना!" गोल फिरून तिने आराध्याची साडी चाचपडली.
" काय झालं काकू साडी बरोबर नेसवली ना मी आराध्याला? "
" तसं नाही गं बरेच दिवसाची साडी आहे कुठे छिद्र वगैरे तर नाही ना म्हणून बघत होते." अनुराधाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला गार्गीच्या चाणाक्ष नजरेने टिपला आणि गार्गीला आठवलं एका पंचवीस वर्षां खून झालेल्या व्यक्तीचा फोटो होता तो.. त्याच्या खुन्याचा तपास लागला नव्हता. शेवटी ती फाईल बंद करण्यात आली होती आणि आता इतक्या वर्षानंतर त्या व्यक्तीचा फोटो अचानकपणे गार्गीच्या हाती लागला होता.तिच्या डोक्यात प्रश्नाचा भुंगा गुणगुणायला लागला. तिची नजर अनिरुद्ध, अनुराधाच्या प्रत्येक हालचालीकडे नजर होती. कार्यक्रम सुरू असतानाच अनुराधा लगबगिने आराध्याच्या खोलीकडे निघाली. तिच्या मागोमाग गार्गीही आली. रूम मधल्या साड्या अनुराधा उलट परत करून बघत होती .काहीतरी शोधत असल्यासारखी..
गार्गीने दारातूनच विचारले ,"काकू काय शोधताय?". "काही नाही गं माझी नथ पडली ,ती शोधतेय !".
" ही तर तर नाही ना ?" पर्स मधला फोटो काढून गार्गीने अनुराधा समोर धरला.. अनुराधाने पटकन तिच्या हातातला फोटो घेतला.
"काकू गार्गी तुमचीच मुलगी आहे ना? पण तिचा तोंडवळा या फोटोतल्या मधल्या व्यक्ती सारखा दिसतो?"
तिच्या प्रश्नाने अनुराधा दचकली.
"गार्गी प्लीज प्लीज या फोटोबद्दल आराध्याला काहीही सांगू नकोस पाया पडते मी तुझ्या झाकली मूठ सव्वा लाखाची असते."
अनुराधाने डोळ्यात पाणी आणून गार्गीसमोर हात जोडले.
"काळजी नका करू! यातलं काहीही माहित नाही होणार..". गार्गी खोली बाहेर जाताच अनुराधाने त्या फोटोतील व्यक्तीकडे बघितले, "तू या जगातुन निघून केव्हढी मोठी शिक्षा मला देऊन गेलास.‌. आज आपल्या मुलीच्या लग्नाचा साखरपुडा आहे !".
अनुराधाने झटकन फोटो आपल्या ब्लाऊजमध्ये लपविला.
साखरपुड्याचा कार्यक्रम हसत खेळत आटोपला.. सगळेजण घरी परतले…
******"
रात्री झोपताना आराध्याच्या मनात गोंधळ सुरु होता..खरचं गार्गी म्हणते तसं त्या माणसात आणि माझ्या चेहऱ्यात साम्य दिसते?
मग हे माझे खरे आईबाबा नाही?आज माझ्या जिवनातला आनंदाचा क्षण आणि आजचं मला माझ्या जन्मदात्यांविषयी शंका उपस्थित व्हावी? कोण आहे मी ? कुणाला विचारू माझ्या मनातल्या शंका?. आपण वॉशरूमधून आलो आणि गार्गीच्या हातातल्या फोटोकडे नजर गेली.. गार्गीने फोटो लपविण्याचा प्रयत्न केला पण आपण तिला फोटो दाखवण्याची गळ घातली.' शंकेने माणसाचं मन पोखरल्या जाते असं म्हणतात. रात्रभर ती या कडावरून त्या कडावर तळमळत होती..

*********
घरी गेल्यावर गार्गीने मोबाईल मधला फोटो आपले मामा निरंजनला दाखविला.. " "मामा आराध्या आणि या व्यक्तींमध्ये इतकं साम्य ? अगदी बाप लेक शोभेलसं?"
फोटोकडे बघत निरंजन म्हणाले
"गार्गी विचार करून निर्णय घे .आराध्या या घरची सुन होणार आहे.."
"म्हणजे मामा तुम्हाला माहीत होतं सगळं?"
" मला काहीही माहिती नाही गार्गी , झोप आता.."
आणि निरंजन उठून आपल्या बेडरूममध्ये गेले.

***********
अनिरूद्धने आपले होणारे व्याही रिटायर्ड पोलीस अधीक्षक निरंजनला फोन लावला..
"मला तुमच्याशी थोडं बोलायचंय!"
"मिस्टर अनिरुद्ध माझ्या घरी आज कोणी नाही ,तुम्ही इथेच या एखादा बुद्धिबळाचा डावही टाकू.."

'मिस्टर निरंजन मी प्रेम कविता लिहिणारा प्रेमकवी आहे, बुद्धिबळाचा डाव मला जमत नाही."
"खेळून तर बघा कदाचित बाजी तुमच्या हाती राहील"!

निरंजननी बुद्धिबळाचा डाव मांडला. आणि अनिरुद्धच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागले.
"बोला अनिरुद्ध.. तुम्हाला काही सांगायच होत ?"
दोन मिनिटं अनिरुद्धने डोळे मिटले आणि तो सांगू लागला….
अनिरुद्ध भुतकाळ सांगत असताना ..ती घटना जशीच्या तशी निरंजनच्या डोळ्यासमोरून जात होती..

" त्या रात्री अनिरुद्धच्या स्टडी टेबलवरचा लॅम्प ऑन होता. अनिरुद्ध काहीतरी लिहत बसला होता.. प्रेम कविता नक्कीच नव्हतं, कारण काल अनुराधाने जे सांगितलं ते ऐकून त्याचं मन सुन्न झालं होतं.. प्रेमावरचा विश्वास उडाला होता आणि मैत्रीवरचाही. इतका मोठा विश्वासघात? ते ही ज्या दोघांवर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं त्यांच्याकडूनच? अस्वस्थपणे तो टेबलावर पडलेली वहीची पानं पलटवत होता मधेच ऊठुन खिडकीजवळ गेला. खिडकीच्या गजाला धरून शुन्यात बघत उभा राहिला. त्याला माहीत होतं आलोक नक्की येणार आणि भर पावसात आलोक येत असलेला त्याला दिसला. मनावर शक्यतो संयम ठेवण्याचा प्रयत्न करत त्याने दार उघडले. आलोक झोकांड्या खातच आत आला. त्याने भरपूर ड्रिंक केलं असावं. अनिरुद्धने दार लावलं आणि सोफ्यावर जाऊन बसला. आपले पाय समोरच्या टीपॉवर एकावर एक ठेवले. सिगरेटचा बॉक्स उघडला ..तोंडात सिगरेट ठेऊन ती लायटरने शिलगावली. सिगरेट आपल्या डाव्या हाताच्या बोटात पकडून एक झुरका घेतला.
" ये आलोक तुझीच वाट बघत होतो मी !"
अनिरुद्धच्या थंडपणे केलेल्या स्वागताने आलोकच्या अंगार काटा उभा राहीला.. अनिरुद्ध शांतपणे उठला.. सिगरेट टीपॉय वरच्या ऐश ट्रे मध्ये विझवली आणि किचनकडे वळला.. त्याने फ्रिजर मधला एक टोकदार बर्फाचा तुकडा हातात घेतला आणि आलोकच्या जवळ आला. आलोक त्याच्याकडे बघत होता .त्याला कळेना नेमकं काय करणार आहे अनिरुद्ध.तो थरारून उभा राहिला आणि मागे चालत चालत भिंतीला धडकला… त्याच्या डोळ्यात भीती दाटून राहिली होती.. अनिरुद्ध काहीही करू शकतो हे त्याच्या थंड डोळ्यात बघून आलोकला जाणवत होतं.. पण त्याच्या कंठातून आवाज बाहेर येत नव्हता. अनिरुद्धने आलोकच्या दिशेने पाऊल उचलले.. आता आलोकला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता.. 'त्या क्षणी आपण मोह आवरला असता तर..' पण कृत्य घडून गेलं होतं.. त्याची नशा खाडकन उतरली.तो भीतीने थरथर कापू लागला आणि म्हणाला..
"मला मारू नकोस अनिरुद्ध! जगायचं रे मला. खूप मोठा रहस्यकथा लेखक व्हायचं आहे.. नाव कमवायचे आहे.."
"डोक्याने हुशार आहेस तू !ते तू केव्हाही कमवू शकला असतास पण.. पण तु आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलास !"
"दोस्त दोस्त ना रहा. प्यार प्यार ना रहा जिंदगी हमे तेरा. ऐतबार ना रहा …."
अनिरुद्ध थंडपणे गाणं म्हणत म्हणत एक एक पाऊल टाकत पुढे आला..
" तु असं का केलंस ? अनुराधा माझी होती, फक्त माझीच हे तुलाही माहीत होतं.. आता तु जगण्याच्या लायकीचा उरला नाहीस ,तू जगला तर माझं जगणं असह्य होईल "

"काय केलं मी?"

"उगाच येडं पांघरूण पेडगावला जाऊ नको…
तु असं का केलंस ?

"तो एक अपघात होता. अनि, आपण सगळे मिळून मनालीला फिरायला गेलो..त्या दिवशी सायंकाळी हॉटेल बाहेर तु तुझ्या प्रेम कविता वाचत होतास .. अनुराधा समोरच बसुन होती.. काही वेळाने ती ऊठली आणि हॉटेलकडे जायला निघाली. तुझं लक्ष नव्हतं ,तु तुझ्या कविता वाचण्यात मग्न होतास..चालतांना तिचा तोल जातांना बघुन मी तिच्या मागोमाग निघालो.रूममधे जाताच ती कोसळली..मी तिला उचलून बेडवर ठेवले..ती थंडीने कुडकुडत होती तीच शरीर तापलं होतं..मी तिथेच बसून होतो.. ग्लानीतच तिने डोळे उघडले मला बघून अनिरुद्ध म्हणून हाक मारली आणि माझ्या गळ्यात पडली… तिच्या तोंडातून वाईनच्या वास येत होता..तिने बहुदा मैंत्रिंनीसोबत ड्रिंक केलं होतं..तिने मला घट्ट पकडुन ठेवलं. तिच्याबरोबर मी ही वहावत गेलो. जे घडूनये ते घडलं. मी खोलीबाहेर पडलो.. झालेल्या क्रुत्याचा पश्चाताप होत होता.मी अनुराधाच्या भावाला जाऊन भेटलो. त्याला अनुराधा व माझ्या मध्ये घडलेलं सर्व सांगितलं..पैसै घेऊन मी निघून जायला तयार होतो तरीही त्याने पैसे देण्यास नकार दिला."
त्याचे बोलणं ऐकून अनिरूद्धची तळपायाची शीर मस्तकात जात होती. डोळ्यात खुन‌ संचारला होता.हातातला बर्फ वितळला होता. त्याने पुन्हा फ्रिजर मधला बर्फाचा टोकदार तुकडा आणला. .तुकड्याचे टोक जोरदारपणे आलोकच्या मानेच्या नसेत विशिष्ट ठिकाणी खूपसले. वार बरोबर लागला होता. किंकाळी फोडण्याचा अवधीही आलोकला मिळाला नाही. त्याने डोळे पांढरे केले.. अनिरुद्ध थंड डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होता..त्याच्या हातातला टोकदार बर्फाचा तुकडा आता वितळत चालला होता…खुनाचा पुरावा नष्ट होत होता."

*************

"मिस्टर अनिरुद्ध हुशार आहात तुम्ही! ‌‌ पण एका गोष्टीसाठी तुम्हाला मानावच लागेल. खूप मोठ मन आहे तुमचं !आराध्याला तुम्ही वडिलांच प्रेम दिलं.. तिला बघून तुम्हाला सतत आलोकची आठवण येत असणार..म्हणुन तिला बाहेर पाचगणीला शिकायला ठेवलं आणि आता माझ्या मुलाशी लग्न होऊन ती परदेशी जाणार तुमच्या नजरेच्या दूर.."
अनिरुद्ध मंदपणे हसला.. निरंजन सोप्यावरून उठले आणि थोडा वेळ खिडकी बाहेर पहात अनिरुद्ध जवळ येऊन म्हणाले' "अनिरुद्ध तुम्ही तो खून केलेलाच नव्हता!"
आता आश्चर्यचकित व्हायची पाळी अनिरुद्ध ची होती.. "काय ? कसं शक्य आहे व मी स्वतः मारल त्याला ,त्याचा श्वास बंद झाला होता. गाडीच्या डिकीत प्रेत ठेऊन त्या मुसळधार पावसात मी ते प्रेत रस्त्यावर फेकलं होतं.."
"अनिरुद्ध प्रेताच्या बोटात तुमच्या बोटात असलेल्या अंगठी सारखीच दोन ए कोरलेली अंगठी होती. पण ती अंगठी प्रेताच्या बोटाच्या मापाची नव्हतीच ,कुणीतरी खुश करण्याआधी बोटात घातली होती, बोटावर अंगठीचे वळ नव्हते. !"
" ओ,आय सी !मग ती डेड बॉडी कुणाची होती?"
"शोध घेता आला असता सगळ्या गोष्टींचा आणि तुमच्या मित्राचाही, पण वरून आर्डर आली आणि केस बंद झाली.."
"कोणी करायला लावलं हे सगळं ? कारण?"
"मिस्टर अनिरूद्ध तुमचं व अनुराधाच लग्न होणार होतं..चर्चा व्हायला नको म्हणून अनुराधाचा भाऊ प्रथमेशने हे काम केलं असावं.. पण एक बरं झालं आलोकने तुमच्या शब्दाचा मान ठेवला पुन्हा तो तुमच्या दोघांच्या आयुष्यात आला नाही.रिलॅक्स व्हा.. तुम्ही अपराध केलेला नाही.. "
अनिरुद्ध ने निरंजनचा हात हातात घेतला…
" धन्यवाद मिस्टर निरंजन! इतकं सगळं माहीत असूनही तुम्ही आराध्याचा स्वीकार केलात.!".
"एक प्रश्न अनुत्तरित आहे अनिरूद्ध, सगळं माहित झाल्यावरही तुम्ही अनुराधाशी लग्न का केलतं?"
अनिरुद्ध व निरंजन पुन्हा सोफ्यावर बसले.." "खुनाच्या आदल्या दिवशी मी अनुराधाच्या घरी गेलो होतो. नोकरी मिळाल्याच सांगायला आणि लग्नाची तारीख निश्चित करायला.. पण अनुराधाने जे सांगितलं ते ऐकून मी हादरलो.. ती आलोकच्या बाळाची आई होणार होती."

प्रथमेश येऊन म्हणाला…
"अनिरुद्ध जे घडलं ते आपण बदलू शकत नाही. तू अनुराधाचा स्वीकार कर.. माझ्या ओळखीचे डॉक्टर आहे तिथे गुपचूपपणे अनुराधाच अबाॅर्शन करण्याची सोय करतो.."
अनुराधाचे वडिल म्हणाले ,माझी सर्व प्रतिष्ठा, इज्जत मी तुझ्या पायाशी ठेवतो पण माझ्या अनुराधा स्वीकार कर नाहीतर ती जीव देईल..."
आणि मी लग्नाला तयार झालो.ज्यावेळी माझं आणि अनुराधाच लग्न झालं त्यावेळी अनुराधा दोन महिन्याची प्रेग्नेंट होती. माझ्याशी केलेल्या प्रतारणेची शिक्षा म्हणून मी बाळाच्या जन्माचा प्रस्ताव ठेवला.नावाला पती पत्नी म्हणुन आम्ही सोबत राहायला लागलो. नियतीचा खेळ बघा, आराध्याने बापाचा तोंडवळा घेतला आणि फोटो बघून आज इतक्या वर्षानंतर आराध्याला वडील जिवंत आहे हे कळलं… तिला काय आणि कसं सांगावं कळत नाही "
"अनिरुद्ध ते सगळं तुम्ही माझ्यावर आणि गार्गीवर सोपवा आणि निश्चित रहा.."

**********
भोपाळला हिंदी साहित्य मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मराठीतील प्रसिद्ध कवी 'अनिरुद्ध' प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंदी साहित्यात यशस्वी साहित्यिक म्हणून आपले नाव उमटविणाऱ्या साहित्यिकांना अनिरुद्धच्या हाताने सन्मानित करण्यात येणार होते.कार्यक्रमाला सुरुवात झाली. एका प्रसिद्ध हिंदी रहस्यकथा लेखकाचं नाव अनाउन्स केल्या गेलं…
"मि.अनाम"
आणि सभागृहामधे समोरच्या रांगेत बसलेल्या मान्यवरांच्या साईडला बसलेले 'मिस्टर अनाम ' आपल्या व्हील चेअर मध्ये सरसावून बसले. खुर्चीला असलेलं बटन दाबून ते मंचाकडे निघाले.. त्यांच्या मागे उभा असलेला सेक्रेटरीही त्यांच्या मागोमाग निघाला.व्हीलचेअर स्लोपवरून मंचावर पोहचली..पूरस्कार प्रदान करण्यासाठी उभ्या असलेल्या अनिरुद्धची नजर त्यांच्यावर गेली..पांढरी शुभ्र लुंगी ,पांढरा शर्ट, खांद्यावर पांढरा पंचा.. कपाळावर टिळा, डोक्यावर पांढरे केस, पांढरी व्यवस्थीत सेट केलेली दाढी , उजव्या हाताला उंची घड्याळ, डोळ्यावर गोल्डन फ्रेम असलेला चष्मा, साधारण साठीचे दिसणारे ते गृहस्थ होते. त्यांना व्हीलचेयरवर बघून अनिरुद्धच्या मनात कणव निर्माण झाली.पुरस्कार देताना अनिरुद्धने त्यांचा हात हातात घेतला आणि त्याला तो स्पर्श ओळखीचा वाटला.अनिरूद्धची नजर त्याच्या बोटातल्या अंगठीकडे गेली.सेम अंगठी त्याच्याही बोटात होती. 'मिस्टर अनाम 'ने हळूच धन्यवादाचे शब्द उच्चारले.मिळालेली ट्रॉफी सेक्रेटरीच्या हातात दिली आणि झपाट्याने त्या व्यक्तीने व्हीलचेअर मंचावरून खाली घेतली. आपल्या सेक्रेटरीच्या कानात काहीतरी कुजबुजून ती व्यक्ती बाहेर जाणाऱ्या दरवाजाकडे निघाली.. इतक्या वर्षानंतर झालेला तो स्पर्श आठववून अनिरुद्धच्या चेहऱ्यावर आठ्या‌ ऊमटल्या.तेवढ्यात पुढच्या पुरस्कारासाठी नाव अनाउन्स झाले.
' हं ! म्हणजे हाच आलोक! त्यालाही रहस्यकथा लेखनाची आवड होती.भाषा बदलवली पण शैली ?'
घरी जाऊन त्याने आपले होणारे व्याही रिटायर्ड पोलीस अधीक्षक निरंजनला फोन लावला..
" मि.निरंजन आज कार्यक्रमात तुम्हाला एका केसमध्ये हव्या असलेल्या गुन्हेगाराशी माझी भेट झाली"
"तुम्ही विसरताय मि.अनिरूद्धआता मी रिटायर्ड आहे.
" म्हणून खुन्याला मोकाट सोडायचं?"
" त्याला पकडून तुम्हाला काय मिळणार?
" आराध्याशी तिच्या खऱ्या वडिलांची भेट!"
अनिरुद्ध शांतपणे म्हणाला..
"याचे परिणाम तुम्हाला माहिती आहे मिस्टर अनिरूद्ध?"
"होय! "
"चला भेटुयात तुमच्या मित्राला!"
"चुकताय तुम्ही निरंजन! माझा मित्र म्हणण्याच्या लायकीचा नाहीये तो..आराध्याचा बाप !"
संतापाने पण संयमी शब्दात अनिरुद्ध ‌म्हणाला..
मिस्टर अनामला फोन लावला पण त्यांचा मोबाईल बंद येत होता. आलोक उर्फ अनामचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न झाला. पण त्या कार्यक्रमानंतर रहस्य कथा लेखक मिस्टर अनाम रहस्यमयरित्या गायब झाले‌ होते.
आणि एक दिवस अचानक नागपूर पोलीस स्टेशन मध्ये एक व्यक्ती हजर झाली. त्या व्यक्तीने आपले नाव सांगताच इन्स्पेक्टर गार्गी सुलाखे सावध झाली.. तिने आपल्या बाजूला असलेल्या सब इन्स्पेक्टरला व पोलिसांना त्याला पकडण्याची खून केली पण ती व्यक्ती म्हणाली.." त्याची काही गरज नाही"..
कुठलीच गोष्ट न लपविता त्या व्यक्तीने पंचवीस वर्षांपूर्वी त्याने केलेला गुन्हा इन्स्पेक्टर गार्गी सुलाखे समोर कबूल केला.ती व्यक्ती होती आलोक उर्फ प्रसिद्ध रहस्यकथा लेखक "मिस्टर अनाम"
इन्स्पेक्टर गार्गीने त्यांना विचारले.. तुम्ही चालत आलाय? पण‌ तुम्ही तर भोपाळच्या कार्यक्रमात व्हील चेअरवर आला होतात असं ऐकलं ?"
आलोक म्हणाला, "गेली पंचवीस वर्षे मी रहस्यमय अवस्थेतच काढली "!

***********

कोर्टाच्या रूममध्ये जज, रिटायर पोलीस कमिशनर कमिश्नर निरंजन, अनिरुद्ध, अनुराधा , आराध्या व इन्स्पेक्टर गार्गी सुलाखे बसलेले होते.

" आलोक उर्फ मिस्टर अनाम प्रसिद्ध रहस्य कथा लेखक. आपण आपली बाजु मांडू शकता". …. आलोक ने सांगायला सुरुवात केली.
" खुनाच्या दिवशी मी नशेतच अनिरूद्ध कडे जाऊन माझ्यात व अनुराधामधे घडलेलं सगळं सांगितलं..
त्याच्यासाठी तो एक खूप मोठा धक्का होता.. माझं बोलणं झाल्यावर थंड डोळ्याने त्याने माझ्याकडे बघितलं..तो काही बोलला नाही. मी तिथेच झोपलो. थोड्यावेळाने मानेत काहीतरी खूपसल्यासारखं वाटलं.. नंतर काही आठवत नाही.. पावसाच्या माऱ्याने मला शुद्ध आली..मी रस्त्यावर पडुन होतो.मी ऊठुन बसण्याचा प्रयत्न केला .एखादं वाहन येईल या भितीने मी सरपटतच रस्त्याच्या कडेला पोहचलो. मानेत भयंकर दुखत होत्..मला घडलेलं सर्व आठवलं . माझी नशा खाडकन उतरली..‌. मी माझ्या कृत्याची अनिरुद्ध समोर कबुली दिली होती… अनिरुद्धने रागाच्या भरात असताना मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.पण सुदैवानं मी वाचलो होतो. विचार न करता पाऊल उचलल्याने सर्व बाजूने मी कोंडीत सापडलो होतो. जीवन संपवायच मनात आलं पण हिम्मत होत नव्हती आणि माझ्यातला लेखक जागा झाला..परिस्थितीला कलाटणी देण्याचं मी ठरवलं.. अंग दुखत होतं तरी मी उठलो भर पावसात चालत चालत निघालो.. थोड्या दूर अंतरावर एक लहानस खोपट होत..आत एक माणूस निपचीत पडलेला दिसला.भिकारीअसावा . मी नाकाजवळ हात लावून पाहिलं. त्याचा श्वास चालू होता. बहुतेक दारू प्यायला होता आणि माझ्या मनात शैतान जागा झाला. माझ्या स्वार्थापोटी मी त्याचा बळी द्यायचं ठरवलं…
माझ्याजवळ कुठलं शस्त्र नव्हतं. आणि मला आठवलं अनिरुद्धने माझ्या मानेत बर्फाचा अनुकुची दार तुकडा खूपसला होता. माझ्याच कथेतील आयडिया होती ती .मलाही माझा खुन झाला असल्याचं दाखवायचं होतं .मला मदत न करणाऱ्यांचा सुड घ्यायचा होता मला. मी त्या व्यक्तीला ओढत बारच्या मागच्या बाजूला आलो. एक बारकसं बाभळीच झाड तुटून पडलेलं दिसलं मी त्याचा टोकदार असलेला भाग निशाणा साधून त्या व्यक्तीच्या मानेच्या विशिष्ट भागात खुपसला. बेशुद्ध असलेला तो गतप्राण झाला..बारच्या आडोशाला बराच वेळ मी त्या प्रेताजवळ बसून होतो बार बंद होण्याची वाट बघत.. शेवटी ते प्रेत उचलून रस्त्यावर आणून टाकले. झाडाच्या मागे उभा राहिलो. थोड्यावेळाने एक ट्रक आला आणि प्रेताच्या डोक्यावरून त्याचं चाक गेलं.. माझं काम झालं होतं…आलोकचा खुन करून कुणीतरी त्याला रस्त्यावर फेकलं होतं. मी तिथून रेल्वे स्टेशनवर गेलो जी गाडी समोर होती त्यात बसलो आणि माझा प्रवास सुरू झाला…दुसऱ्या राज्यात पोहोचलो.. तिथे छोटे मोठे काम करायला सुरुवात केली.. पण लिखाणाचा छंद मनाला स्वस्थ बसू देत नव्हता.. एक खोली भाड्याने घेऊन मी तिथे राहायला सुरुवात केली. तिथे जास्तीत जास्त हिंदी भाषा बोलत असल्यामुळे मी हिंदीत लिहायला सुरुवात केली… माझ्या कथा कधी वर्तमानपत्रात ,मासिकात प्रसिद्ध होऊ लागलो.. आणि मी "अनाम" लेखक म्हणून प्रसिद्धीस आलो.कुणाच्याच बाबतीत जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही ,पण माझ्याच लिखाणाने मला आज गुन्हेगार म्हणून पकडून दिलं.. "खुनाला जेव्हा वाचा फुटते" ही पंचवीस वर्षांपूर्वीची माझ्या मनात घोळत असलेली कथा होती. हळूहळू लिहत मी मी ती हिंदीत "जब याद किसी की आती है" या नावाने वाचकांसमोर आणली.. त्या कथेनुसार माझ्या जीवनातही घटना घडत होत्या.. सत्य घटनेवर आधारित असल्यासारखे लेखन झालेलं होतं.. लेखकांनी ही रहस्य कथा डोक्यावर घेतली.. आणि कथेसारखाच शेवटही माझ्या जीवनात घडणार होता.इतकी वर्ष लेखनात गेले. सगळ्या गोष्टी विसरायचा प्रयत्न केला परंतु आता भूतकाळ त्रास देत होता. पुरस्कार प्रदान करण्यास अनिरुद्ध येणार असे समजले. पुन्हा भूतकाळ जागा झाला.. मी अनिरुद्ध विषयी माहिती काढली.. फेसबुकवर अनुराधा ,अनिरुद्ध आणि आराध्याचा फोटो बघितला आणि मला धक्काच बसला. आराध्या सेम माझ्या सारखी दिसत होती.. माझी खात्री पटली आराध्या माझी व अनुराधाची मुलगी आहे. माझ्या मुलीला अनिरुद्धने बापाचं नाव दिलं होतं . तिला भेटण्याची तीव्र इच्छा मनात जाग्रुत झाली. मी पुरस्कार घ्यायला जायचा निर्णय घेतला..मी या जिवंत आहे हे सत्य जगासमोर आणण्याचं ठरवलं. कुठल्याच प्रोग्रामला न जाणारा मी व्हीलचेअर वर बसून अनिरुद्धसमोर गेलो. या जगात माझ्यामुळे जन्माला आलेल्या आराध्याला मला माझी मुलगी म्हणून जवळ घ्यायचं होतं. बस इतकीच कहाणी आहे माझी, जी शिक्षा आहे ती भोगायला तयार आहे मी!"
अरुंधती ,अनिरुद्ध आणि आराध्या सगळे स्तब्धपणे ऐकत होते.. अरुंधतीच्या मनात घालमेल सुरू होती. नऊ महिने गर्भात वाढवलेल्या आराध्याला, याअनाम लेखकापासून झालेली तु माझीच अनौरस मुलगी आहे, हे जगासमोर सांगण्याची तिच्यात हिंमत नव्हती.. तिने एक क्षण अनिरुद्ध कडे बघितले.. पण अनिरुद्धच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नव्हते.

आराध्या जागेवरून उठली. ‌"बाबा! म्हणून तिने आलोकला हाक मारली..
"बाबा तुम्ही प्रसिद्ध लेखक असले तरी एक गुन्हेगार आहात .. एक खुनी आहात.. तुम्ही एक नाही चार जिवाशी खेळालात…स्वतःच जीवन बरबाद केलं आणि माझ्या आईचंही! तुमच्यापेक्षा माझ्या अनिरुद्ध बाबांचा मला अभिमान वाटतो.. सर्व काही माहीत असूनही त्यांनी मला आपल्या सख्ख्या पोरीप्रमाणे वाढवलं, प्रेम दिलं कुठल्याही गोष्टीची कमतरता वाटू दिली नाही.. पण नियतीला माझं सुख बघवलं नाही..त्या एका फोटोने माझ्या मनात संशय निर्माण झाला.. आणि मी माझ्या खऱ्या बाबांच्या शोधात निघाले किती मोठी चूक केली मी! खरचं तुम्ही मला भेटायला नको होतं. माझ्या जीवनाचं रहस्य तुमच्या सोबतच गेलं असतं तर फार बरं झालं असतं.. खुनी बापाची मुलगी म्हणून म्हणवून घ्यायच नाहीय मला ! यापुढे अनुराधा आणि अनिरुद्ध यांची मुलगी म्हणूनच मी समाजात वावरेन!"

आणि ती रडत येऊन अनिरुद्धला जाऊन बिलगली.. अनुराधा जागेवरून उठली. तिने आराध्याला छातीशी कवटाळले आणि तिला खोली बाहेर घेऊन जाऊ लागली मागे वळून न बघता..

समाप्त…

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू