पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मर्डर मिस्त्री

कफ परेडच्या उच्चभ्रू वस्तीत 'मिस्त्री टॉवर्स'च्या एका पेन्टहाऊस मधून संध्याकाळच्या वेळी 'मेटॅलिका'चे रॉक संगीत ऐकू येत होते. मिस्त्री परिवाराचा एक तरुण वारस, कायझाद, त्या पेन्टहाऊस मध्ये एकटा राहायचा. काही वर्षांपूर्वी त्याचे आई-वडील एका कार अपघातात वारले. बाकी सगळे घरचे मिस्त्री टॉवर्स मध्येच वेगळ्यावेगळ्या फ्लॅटमध्ये राहत. त्यांनी कायझादचा सांभाळ केला. आता कायझाद आपल्या आई-वडिलांच्या घरी एकटा राहायचा. आज रात्री व्यवसायात अग्रेसर असलेल्या मिस्त्री परिवाराची ओबेरॉय हॉटेलमध्ये एक जंगी पार्टी होती. त्याच्यासाठी कायझाद तयार होत होता. शॉवर घेऊन आपल्या वॉक-इन-वॉर्डरोबमध्ये तो आला आणि इस्त्री केलेल्या कपड्यांकडे नजर फिरवत मेटॅलिकाच्या गाण्यावर मान डोलावत कपडे निवडत स्वतःशीच बोलत होता,

'आज पार्टी म्हणजे भरपूर अरबट चरबट खाणे होणार. म्हणूनच आज जरा जिममध्ये कार्डिओ जास्त करून घेतले. उद्या पण करावे लागेल. मल्होत्रा निर्मात्यांचा हा पिक्चर माझ्या आजवरच्या कामानंतर मिळालेली संधी आहे. पण त्यासाठी मला फिट राहणे आवश्यक आहे.', एकटा झाल्यापासून त्याला अशी स्वगत बोलायची सवय लागली होती. आरश्यासमोर येऊन तो आपले बलदंड शरीर बघत होता. कायझाद दिसायला फार देखणा, भरलेली छाती, दंड, पोटावर ऍब्स. गोरापान चेहरा, नेहेमी नीट विंचरलेले दिसणारे केस, क्लीनशेव दाढी, त्याचा रुबाबचं वेगळा होता. श्रीमंत खानदानाचा वारस आणि एक होतकरू नट दोन्ही त्यात दिसून यायचे.

'आज पुन्हा पार्टीमध्ये लोकं येतील, चार प्रश्न करतील. 'अरे कायो, काय रे डिकरा, तुझ्या पप्पांचा सुद्धा घरच्या व्यवसायात मोठा शेअर होता. तू सुद्धा यात उतरले पाहिजे. काय ठेवलं आहे त्या सिनेमा मध्ये? चांगला बिझनेस सांभाळ, चांगली छोकरी पटव आणि शादी बनवून मोठा बिसनेसमॅन हो.' मला काय व्हायचं ते हेच ठरवतील आणि सांगतील. मम्मी-पप्पा असते तर त्यांनी मला प्रोत्साहनच दिलं असतं. पण आता मी पप्पांची जागा घ्यायला हवी, असं सगळ्यांना वाटतं. आहेत की मिस्त्रींचे इतके भाऊ न वारस. मी नाही उतरलो बिझनेसमध्ये तरी काही फरक नाही पडायचा यांना.'

कायझाद असे आज आता काय घडू शकते, ह्याचा फार विचार करी. आश्चर्य म्हणजे बहुतांश वेळा ते तसेच घडे सुद्धा. त्याने एक शुभ्र शर्ट अंगावर चढवला. त्यावर टाय, जॅकेट, ब्लेझर घातले. पॅन्ट ब्लेझरच्या रंगाची होती. भारीतले भारी जोडे घातले, घड्याळ लावले. आपल्या ऑडी गाडीच्या चाव्या घेतल्या आणि कपाटातून मार्लबोरो सिगारेटीचे पाकीट घेतले व कायझाद पार्टीकडे निघाला. तो सिगारेट ओढत नसे, पण जवळ नेहेमी ठेवी. 'आयुष्यात काही विचित्र किंवा थ्रिल्लिंग केलं, तर सिगरेट ओढेल', असं त्यानी ठरवलं होतं म्हणून तो हे पाकीट नेहेमी जवळ ठेवी.

 

पार्कींगमध्ये जाऊन त्याने आपली गाडी काढली. बाहेर वातावरण पावसाळी झाले होते.

'पाऊस पडायच्या आधी पोहोचलो तर बरं होईल. नाही तर मुंबईत मग्गाभर पाऊस पडला तरी ट्रॅफिक जॅम होतो.'

ओबेरॉयकडल्या रस्त्यावर तो लागला. मॅडम कामा रोडकडे जाताना एका सिग्नलवर एक तरुण पण कुबड घेऊन चालणारा माणूस त्याला अनेकदा पैसे मागताना दिसे. आज तो कायझादच्या गाडीजवळ आला आणि काच ठोकावली.

'साहेब, थोडे पैसे देता का? रात्रीच्या पोटापाण्याचे वांधे झाले आहे.'

'मान्य तुला पायाचा त्रास आहे, पण तरुण आहेस तू. काही योग्य काम शोधायचा कधी प्रयत्न केला का? की असाच पैसे मागत असतो नेहेमी?'

'पडेल ते काम करतो साहेब. पण कधी मिळतं, कधी मिळत नाही. मग पोटासाठी पैसे मागण्यावाचून पर्याय उरत नाही. आज तीच गत आली. शिवाय पाऊस पण येईल, म्हणजे आता कुठलेही काम सहजासहजी मिळायची बोंब. दहा-बारा रुपये दिले तर वडापावची सोय होईल, आजचा दिवस निघून जाईल.'

कायझादने शंभराची नोट काढली आणि त्याला दिली. कायझादला धन्यवाद आणि दुआ देत तो तरुण निघून गेला.

 

कायझाद ओबेरॉयला पोहोचला. पार्टी हॉलमध्ये शिरताच त्याला काही ऑंटी लोकांनी घेरले. 'लग्न करून बिझनेस जॉईन का नाही करत?' यावर त्यांचा विशेष भर होता. मिस्त्रींचे अनेक उच्च व्यापारी लोकांसोबत संबंध होते आणि सगळेच तिथे आले होते. सगळेच कायझादला हाच प्रश्न विचारत होते. कायझादनी याचा विचार आधीच करून ठेवला होता, त्यामुळे तो सगळ्यांना ठरवून ठेवलेले उत्तरं देत होता. पण इतकी सुशिक्षित, उच्चभ्रू मंडळी सुद्धा असा साचेबद्ध विचार करतात याची त्याला कीव मात्र नक्कीच येत होती. तेवढ्यात त्याच्या पाठीवर एक थाप पडली. रॉनी तिथे आला होता. रॉनी इराणी कायझादचा शाळेतला मित्र, शिवाय कायझादच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा सुद्धा होता. पण तो कायझादसोबत नेहेमी स्पर्धा करी. शाळेत असताना कायझाद पहिला यायचा तर रॉनी दुसरा. त्यामुळे शक्य तेव्हा रॉनी त्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करी. रॉनी पार्टीत आला आणि लगेच त्याने आपला उदो-उदो सुरु केला,

'अरे कायझाद घेलचोडीया कुठे आहेस? म्हटलं मित्राला लंडनला जायच्या आधी भेटतो की नाही! पप्पांचं तिथलं ऑफिस आता मीच सांभाळणार आहे. बिझनेस क्लास ब्रो!'

'गुड फॉर यु रॉनी! हे घे, ड्रिंक घे एक.', वेटर व्हिस्की घेऊन जात असताना कायझादने दोन ग्लास उचलले आणि एक रॉनीला दिला.

'चिअर्स!'

'अरे वाह, लहानपणचे मित्र भेटले तर! कायझाद डिकरा, हा रॉनी बघ मस्त लंडनला चालला. पहा फॅमिली बिझनेसला जॉईन केला की फिरता येते. आता लवकरच शादी बनवून सेटल होऊन जा रॉनी.', कायझादची काकू मधेच कडमडली.

'हो ऑंटी आता वर्षभर मज्जानी लाईफ एन्जॉय करून सेटल होणार. मम्मी पप्पाला सांगून बी ठेवलाय केटलो फटाकडी छोकरी शोधून ठेवायला. ते बोलले मला सापडली तर अजून सरस. नाही तर आम्ही आहेच. मला बी हेच पाहिजे होतं. ह्या ह्या ह्या..', बोलून रॉनी हसू लागला.

'सु बात छे डिकरा! आमच्या कायझादला बी काई समजाव ना. बिझनेस जॉईन करत नाही, नुसता काय ते लिहीत बसतो, वाचत बसतो, छोटे मोठे नाटक लिहितो, नाटकातून काम करतो. हे आपले जॉब आहे का सांग तू मला.', ऑंटी म्हणाली.

'अहो आता तर तो सिनेमा मध्ये येणारे. मल्होत्रा प्रोडक्शन सोबत कॉन्ट्रॅक्ट झाला आहे त्याचा.', रॉनी बोलून गेला.

'काय?

कायझादचा चेहरा पालटला. सगळे विरोध करणार म्हणून त्याने ही गोष्ट लपवली होती. मुद्दामून रॉनीने ती इथे काढली. मल्होत्राचा मुलगा सुद्धा रॉनीचा मित्र असल्यामुळे त्याला हे समजले होते. रॉनी कायझादकडे पाहून हसत पुटपुटला, 'बघ बरोबर लावली ना तुझी!'

 

कायझादची पुढची सगळी पार्टी सगळ्यांकडून 'तो कसा चुकतो आहे', हे ऐकण्यातच गेली. सिनेमावेड्या आपल्या देशात एका मोठ्या निर्मात्याकडे नायकाची भूमिका मिळते आहे, पण तरीही आपण बिझनेसमध्येच राहावं, का तर घराची प्रतिष्ठा आणि आपल्यात हे कधीच कोणी केलं नाही, करत नाही म्हणून! वडिलांच्या नावाचे शेअर खूप आहेत आणि ते त्यांच्या भावांना मी विकत पण नाही म्हणून! मला माझ्या पप्पांच्या पुण्याईचा सिक्युरिटी म्हणून वापर करण्याचा अधिकारच नाही? हा विचारच कायझादला चीड आणायचा. आज पण तो संतप्त होता. बळेबळेच त्यांनी वेळ घालवला. नीट जेवलासुद्धा नाही. तसाच तो घराकडे निघाला. बरीच रात्र देखील झाली होती आणि मुसळधार पाऊस होता. त्यामुळे त्याचा समुद्राजवळचा रस्ता निर्मनुष्य झाला होता. पोट भरले नसल्यामुळे तो रस्त्यात दिसेल ते खायला शोधत होता. कधी नव्हे तर गाडीत गाणे पण सुरु नव्हते. एरवी अगदी हेल्दी खाणारा कायझाद आता राग आणि भूक यांचे द्वंद्व सुरु असल्यामुळे काहीही खायला तयार होता. तेवढ्यात त्याला एक वडापाववाला दिसला. गाड्यावर दुकानदार मात्र नव्हता. त्याने कार जवळ नेली आणि उतरला. गाड्याच्या मागे दुकानदार आणि मगाशी कायझादने पैसे दिलेला भिकारी दारू पिताना दिसले. पावसाच्या आवाजात त्यांचे कायझादकडे लक्षच गेले नाही. कायझाद मात्र उभा राहून, भिजत सगळे ऐकत होता. तो भिकारी बोलत होता,

'काय दादा, तो श्रीमंताचा पोरगा, कोणी पण येडा बनवू शकतो त्याला. नजर ठेऊन असतो मी अश्यांवर. याचा बापही तसाच, हा पण तसाच. याच्या बापाकडून पण लंगड्याचं नाटक करून लय पैशे उकळले. आज पोरामुळे नारंगीची व्यवस्था झाली बघा. बाप न बेटा, दोघे पण येडे..', एवढं बोलून तो मोठ्याने हसू लागला.

'बाप न बेटा, दोघे पण येडे..', कायझादच्या डोक्यात हे वाक्य फिरायला लागले. कुटुंबातले सगळे पण आधी नेहेमी म्हणायचे, 'कायझादच्या वडलांना कोणी पण गंडवू शकतो.' अचानक त्याच्या जुन्या काळ्या आठवणी जाग्या झाल्या. ज्यांची त्याला नेहेमी उणीव भासते, त्या वडिलांबद्दल ऐकून त्याला संताप अनावर झाला. त्याने वडापावचा गाडा उलटवायला सुरुवात केली. दोघांचे लक्ष कायझादकडे गेले.

'ओ साहेब थांबा, थांबा..' असे तो वडापाववाला ओरडू लागला पण तोवर कायझादने तो गाडा त्यांच्यावर उलटवला देखील होता. वडापाववाला गाड्याखाली अडकला पण तो भिकारी निसटला आणि पळू लागला. कायझाद गाडीत बसून त्याचा पाठलाग करू लागला आणि थोड्याच वेळात कायझादने त्याला उडवले. तो भिकारी कायझादच्या कारवरून उडून पडला. कायझाद गाडीतून उतरला आणि त्याच्याजवळ गेला. तो पूर्ण रक्तबंबाळ झाला होता, त्याला शुद्ध होती पण फार रक्त गेले होते. तो हलू सुद्धा शकत नव्हता.

'लंगड्याला धावताना आज पहिल्यांदा पाहिलं.', बोलून कायझादने खिशातून मार्लबोरो सिगारेट काढली आणि तो ओढू लागला. त्याची पहिली सिगारेट! तो गाडीत बसला. एक डेथ मेटल गाणे सुरु करून त्याने गाडी मागे त्या भिकाऱ्याच्या अंगावर चढवली. शरीराचा चेंदामेंदा होऊन तो भिकारी मेला.

 

कायझाद थोडा पुढे जाऊन थांबला आणि त्याने ती सिगारेट संपवली. सिगारेटीची चव त्याला आवडली होती. एक वेगळेच काही आपल्यात संचारले आहे असे त्याला वाटत होते. रॉनीचा त्याला खूप राग येत होता. प्रत्येक वेळी त्याला पाण्यात पाहणाऱ्या रॉनीने आज पुन्हा एकदा कायझादला अडचणीत टाकले होते. त्याला अजून एका सिगारेटीची तलब सुटली. त्याने गाण्याचा आवाज वाढवला आणि त्याने गाडी रॉनीच्या घराकडे वळवली. एरवी नियम पाळणाऱ्या कायझादने ओव्हरस्पीडींग करत गाडी सरळ रॉनीच्या बिल्डिंगच्या आवारात घातली आणि तो उतरला. पावसामुळे भिजलेला कायझाद जिन्याने वर चढत रॉनीच्या घराकडे जात होता. फायर एक्सिट जवळ त्याने इमरजंसी विंडोची काच फोडली आणि त्यातली कुऱ्हाड घेऊन तो रॉनीकडे आला. त्याने सरळ तो दरवाजा तोडला आणि आत गेला. रॉनी आवाज ऐकून बाहेर आला. कायझादला अश्या रूपात बघून तो जरा दचकलाच. रॉनी मात्र नॉर्मल अवस्थेत नव्हता. त्याच्या हालचाली जरा मंदावल्या होत्या. तो नक्कीच नशेत होता. कायझादपासून तो स्वतःचे रक्षण करण्याच्या अजिबात अवस्थेत नव्हता. कायझादने त्याला मुस्काटात मारली. नशेत असलेला रॉनी दणकून खाली पडला. तो उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना कायझादने त्याच्या पेकाटात लाथ घातली. रॉनी कळवळून पुन्हा खाली पडला. कायझाद आत गेला. बेडरूम मधल्या टी-टेबलवर व्हिस्कीचा अर्धा ग्लास, बाजूला बाटली आणि 'पावडर'च्या रेषा मांडून ठेवल्या होत्या. कायझाद रॉनीला बोलू लागला,

'तुला हजार वेळा म्हटलं होतं रॉनी, माझ्या गोष्टींच्या मध्ये मध्ये करत जाऊ नकोस. पण साला तू नेहेमी नाक खुपसतो. काय बिघडवल रे मी तुझं? तुझ्यापेक्षा नेहेमी पुढे राहिलो हे? की माझ्या मर्जीचं आयुष्य मी निवडलं आणि ते जगतो हे? यु आर जस्ट फकिंग जेलस ऑफ मी! आणि आज मी तुला संपवणार आहे, कायमचा!', असे बोलून कायझादने रॉनीवर कुऱ्हाड फिरवली. रॉनीचे मुंडकेच उडाले! रक्त उडाले. कायझादचा शर्ट रक्ताने माखला. तोंडावर पण रक्ताचे शिंतोडे उडाले. कायझादने कुऱ्हाड बाजूला फेकली. शर्टाच्या बाहीने तोंड पुसले. आतल्या खोलीत जाऊन टी-टेबल समोरच्या खुर्चीत बसून त्याने खिशातून एक कडक नोट बाहेर काढली. नोटेची पुंगळी करून समोरच्या पावडरीची एक रेष नाकात खेचली. व्हिस्कीचा ग्लास संपवला आणि एक सिगारेट पेटवून ती ओढत तो तिथून निघून गेला. तो घरी गेला आणि झाल्या प्रकाराने त्याला एकदम थकल्यासारखे वाटले. क्षीण आल्यामुळे तो तसाच पलंगावर गलांडून झोपी गेला. त्याला गाढ झोप लागली.

 

सकाळी कायझाद जरा उशिरानेच उठला. त्याचे डोके जड झाले होते. उठल्या उठल्या अचानक त्याला आदल्या रात्रीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. अचानक त्याला उमगले की रागाच्या भरात आपण मनुष्यहत्येचे पातक करून बसलो आहे. तो आपल्या खोलीत सैरावैरा फिरू लागला. सकाळच्या अलार्म सोबत सुरु होणारे गाणे सुद्धा त्याने बंद करून रिमोट भिरकावले. सिगारेटीचे पाकीट पण त्यांनी उघडून पाहिले. दोन मर्डर, दोन खुनानंतर प्यायलेल्या दोन सिगारेटी पाकिटातून गायब होत्या. तो आता पुरता हताश झाला होता. त्याने आधी पाणी प्यायले, एक ऍस्पिरिन घेतली आणि चेहरा धुतला. रक्ताचे डाग असलेला शर्ट काढून कचरापेटीत टाकून दिला. लगेच त्यानी मिस्त्रींचे वकील, रुस्तम पेस्तनला फोन केला. आई-वडील गेल्यानंतर पेस्तनकाकांनी कायझादला खूप मानसिक आधार दिला होता. मनोविकार तज्ज्ञ झुबीन फर्निचरवालाकडे सुद्धा ते कायझादला घेऊन गेले होते. कायझाद फक्त झुबीन अंकल आणि पेस्तनकाकांवर विश्वास ठेवायचा. कायझादच्या प्रॉपर्टीच्या लीगल बाबी सुद्धा पेस्तनकाका सांभाळत. त्यामुळे त्याने अजून कोणाकडे काहीही न बोलता सरळ पेस्तनकाकांना फोन लावला. काकांनी फोन उचलला,

'अरे कायझाद डिकरा, गुड मॉर्निंग! कसा आहेस?'

'पेस्तनकाका, इट्स अ व्हेरी बॅड मॉर्निंग!'

'काय झाला? तू असा का बोलतोयस?'

'काका, मी.. मी काल आपल्या रॉनीचा खून केला! कुऱ्हाडीने त्याचे मुंडके उडवले!'

'कायझाद, तू काय बोलतोयस? तुला वेड बीड लागलंय का असं बोलायला?'

'काका, मी रागाच्या भरात करून गेलो! आता काय करू मी!'

'अरे पण ते कसं शक्य आहे? रॉनी मागच्या आठवड्यातच लंडनला गेला. कालच माझी डिकरी आलिया, ती भेटली त्याला. तुम्ही तिघे क्लासमेट होते ना? दोघे पण तुझी आठवण काढत होते. मी स्वतः बोललो विडिओ कॉल वर त्यांच्यासोबत.'

'मग.. मग काल रात्री मी काय केलं? आणि काल तुम्ही पार्टीला का नाही आले?'

'पार्टी? कोणती पार्टी? तुमच्या पार्टीला तर तीन हफ्ते झाले. काल तसाही इतका पाऊस होता, कोणाला घराबाहेर पडणे शक्य नव्हते.'

'मला आठवत नाही आहे काका. मला काहीच सुचत नाही आहे!'

'तू एक काम कर, फ्रेश हो आणि दोन तासात माझ्या ऑफिस मंदी ये. डॉक्टर फर्निचरवालाला पण मी तिथेच बोलावून घेतो.'

'ठीक आहे काका, येतो मी.'

 

कायझाद लगबगीने तयार झाला आणि निघाला. आज त्याचा वेष पण नीट नेटका नव्हता. शर्ट पॅन्टमध्ये इन न करता कायझादला कोणीही पाहिले नव्हते. आज मात्र ते दिसले.

सगळ्यांत आधी तर तो रॉनीच्या अपार्टमेंटकडे गेला. बेल वाजवली. कोणीच दरवाजा उघडत नव्हतं. शेवटी तो खाली आला. खाली रॉनीच्या आईने त्याला बघितले आणि विचारले,

'अरे कायझाद काय रे? इकडे कसा काय आला?'

'ऑंटी, रॉनी?'

'रॉनी तर लंडनला जाऊन हफ्ता होऊन गेला. तो तुला बोलला नाई काय? तेव्हापासून त्याचा अपार्टमेंट बंदच हाय.'

'अच्छा, नाही मला त्याने नाही सांगितले जाताना.'

'ओह अच्छा. चाल डिकरा आमच्या घरी चाल. कॉफी पिवानु.'

'नको ऑंटी, नंतर कधी येतो. पेस्तनकाकांकडे जायचंय.'

'अच्छा ठीक आहे, आउजो.'

 

कायझाद तिथून निघाला. आता त्याला त्या भिकाऱ्याची आणि वडापाववाल्याची शहानिशा करायची होती. तो लगेच तिकडे गेला. वडापाववाला नित्याप्रमाणे आपली विक्री करत होता. भिकारी मात्र कुठेही नव्हता. कालच्या आठवणीनुसार कायझादने वडापाववाल्याला सुद्धा जखमी केले होते, पण जखमा कुठेही दिसत नव्हत्या. हिम्मत करून कायझाद त्याच्याकडे गेला.

'भाऊ, इथे एक लंगडा तरुण इसम होता. तो दिसत नाही कुठे?'

'साहेब, तुम्ही मिस्त्री ना? तुम्हांला ओळखतो मी. तो लंगडा कधीच मेला. तुमच्या बापानेच क्रियाकर्मासाठी पैशे दिले होते. तुम्ही होता की तेव्हा त्यांच्यासोबत. लहान होता, नीटसं आठवत नसेन तुम्हाला.'

'हो कदाचित, आठवत नाही नीट.'

'अहो तो तुमच्या वडिलांना लुटायचा. लंगडा असल्याचं नाटक करून पैशे मागायचा. एकदा त्यांना खूप भूक लागली होती, तेव्हा तुम्हाला घेऊन ते माझ्याकडे आलेले. तेव्हा कोणीतरी त्यांना खरं सांगितलं. नंतर काही दिवसात तो मेला. टॅक्सीने उडवलं त्याला. तेव्हा तुमच्या वडिलांनी पैशे दिले तेव्हा तुम्ही म्हणालात, 'पप्पा हा तुम्हांला फसवायचा, मग याच्यासाठी पैशे का देता?', तेव्हा ते म्हणलेले, 'बेटा, त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळालं. आता तो स्वतः काहीही करू शकत नाही, अश्या वेळी त्याला खुदा कडे पाठवायचं काम आपणच करायचं. तो कसाही असला तरीही.', मला अगदी आठवतात त्यांचे शबूद.'

'भाऊ, चांगली आठवण आणि शिकवण सांगितलीत माझ्या पप्पांची. धन्यवाद. मला तीन वडापाव बांधून द्या.'

 

कायझादने वडापाव घेतले आणि तो निघाला.

कायझाद पेस्तनकाकांच्या ऑफिस मध्ये गेला. त्यांची सेक्रेटरी रोझा तिथे होती, तिनी अभिवादन करून कायझादला पेस्तनकाकांच्या केबिनमध्ये सोडले. कायझाद आत शिरताच पेस्तनकाका म्हणाले,

'अरे कायो बेटा, ये ये. बस. डॉक्टर फर्निचरवाला पण आहेत.'

'डॉक्टर अंकल, पेस्तनकाका, हॅलो. हे घ्या आज असच एका ठिकाणहून वडापाव आणले आहेत.'

'अरे मल्होत्राचा एक सिनेमा हातातून गेला तर लगेच जंक फूड कायो! आणि आज चक्क कायझाद मिस्त्री शर्ट इन करून आला नाही! ठीक आहे कधी कधी चालतं. पण फिट अँड नीट राहा. इट्स गुड.', डॉक्टर म्हणाले.

'सिनेमा गेला?', कायझादने विचारले.

'कायो, डिकरा तुझा काय सुरु आहे. सकाळच्याला मला फोन करून म्हणतो मी रॉनीचा खून केला. रॉनी लंडनला गेला मागेच. तीन हफ्त्या आधीच तुझा सिनेमा रणदीप सिंग कडे गेला. मल्होत्राचं बजेट वाढलं तर त्यानी स्टार बघितला. या इंडस्ट्रीमध्ये होतं असं. पण म्हणून तू ड्रग्स वगरे नाही न सुरु केले?', पेस्तनकाकांनी विचारले.

'नाही काका, नो ड्रग्स. पण मला समजत नाही आहे. माझ्या मते काल मी या वडापाववाल्या जवळ सिग्नल वर भीक मागणाऱ्या तरुणाचा पण गाडीखाली खून केला. पण आज वडापाववाल्याला विचारले तर तो म्हणाला, त्याला मरून तर काही वर्ष होऊन गेले.'

'कोन तो लंगड्याची ऍक्ट करून तुझ्या पप्पांकडून पैसे काढणारा? कायो, हे तुझ्या लहानपणीचं तुला आठवतं आहे. तुझे मम्मी पप्पा ऑफ झाले तेव्हा आपल्या थेरपी मध्ये तू मला हे सांगितलं होतं.', डॉक्टर म्हणाले.

'अंकल मग मला आता हे सगळं असं का आठवतंय?'

'तुझा लहानपणीचा ट्रॉमा आहे डिकरा. तुझ्या मम्मी पप्पा सोबत तुझ्या चांगल्या आठवणी आहेत. आणि ते जाणं तुझी वाईट आठवण. त्यामुळे जेव्हा आयुष्यात काही उथलपुथल होते, तेव्हा तुला तेव्हाचं सगळं वाईट आठवतं. इट्स ओके. आपण एक दोन सेशन करू. तू ठीक होशील. आता तुझा सिनेमा हातातून गेला. तुझं पार्टीनंतर घरच्यांसोबत भांडण झालं. रॉनी सोबत भांडण झालं. त्याचा आलेला तुझा राग निघत नाही आहे. म्हणून तुझ्या मनात ह्या कहाण्या बनतात आहेत.', डॉक्टर म्हणाले.

'समजलो. पार्टी झाली कधी पण? आणि काय भांडण झाले?'

'अरे, तीन हफ्ते झाले पार्टी होऊन. खूप बारिश होती. तुझ्या सिनेमाचं तो घेलचोडीया रॉनी भर पार्टीत बोलला. मग तुझ्या काकांनी मला तुझ्यासोबत ठेवला. मग पार्टी झाल्यावर घरातले सगळे तुला बोलत होते. काय ते डोक्यात घेतलं आहे, सिनेमा, लेखन, दिग्दर्शन. बिझनेसमध्ये तुझ्यासारख्या हुशार ऍडमिनिस्ट्रेशनची गरज असताना तू भलते कामं करतो, हे त्यांना आवडत नाही. यावरूनच बाचाबाची झाली आणि तू पावसात पायी पायी निघून गेला. सकाळीच घरी आला. त्या दिवसानंतर तू कुठे जातो, काय करतो, कधी तरी लेट घरी येतो, कोणाला काई बी माहित नाही.', पेस्तनकाका म्हणाले.

'हो, राग येण्यासारखी गोष्ट नाही का? मान्य गेला असेल एक सिनेमा माझ्या हातातून, पण दुसरी पटकथा त्यांच्याकडे अजून पेंडिंग आहे. अजून तर सुरुवात पण नाही झाली. एका अपयशाने काय स्वप्न सोडून देऊ? मम्मी पप्पा गेले. त्यांनी केलं असतं मला सपोर्ट. त्यांच्या जाण्याने मला किती दुःख झालं. किती खचून गेलो होतो मी. पण झालो, उभा झालो. बाहेर निघालो दुःखातून. तुम्ही मदत केली, फार मदत केली. आणि त्याच्या जोरावर अकॅडेमिकस मध्ये टॉप केलं. मराठी, गुजराती थिएटर सुद्धा केलं. मराठी सिरीयलचे काही एपिसोड लिहिले. पण सगळ्यांना काय दिसतं? एक हातातून गेलेला सिनेमा! आणि घरचा बिझनेस न सांभाळणं! का तर मी शेअर विकत पण नाही त्यांना, आणि सांभाळत पण नाही! ते शेअर माझं सेफ्टी नेट आहे. माझ्या पप्पांची पुण्याई आहे. का विकू मी? मोबदला तर सगळ्यांनाच मिळतो आहे न? आता विकत नाही तर मी तरी त्यांच्या उपयोगात यावं, त्यांच्यासारखं वागावं, हेच घरच्यांच्या मनात आहे. माझे स्वप्न का विकू मी यासाठी?', कायझाद उद्वेगाने बोलत होता.

'कायझाद, डिकरा. ऐक माझं. आपल्याला आयुष्यात प्रत्येकाचं एक काम असतं आणि त्यासाठी आपला जन्म होतो. तू मिस्त्री खानदानात त्यासाठीच जन्माला आला आहेस! त्यांचा राजकुमार आहेस तू. तुझ्यापेक्षा लहान भावंडं पण आता येतील बिझनेस मध्ये. तू त्यांच्यापेक्षा हुशार. तू बिझनेसला जॉईन करणं हेच योग्य आहे.', डॉक्टर म्हणाले.

'डॉक्टर अंकल, तुम्ही पण? मला दोन खून केल्याबद्दल गिल्टी वाटत होतं. त्यातून मी बाहेर निघत नाही तर तुम्ही मला भलत्याच ट्रिप वर पाठवता आहात. मनुष्याला आपल्याला आवडेल ते काम करण्याचा हक्क आहे. हे त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलेल्या माणसातून एक तर क्रांतिकारी निघतो किंवा सैतान! फक इट, मला सिगारेट ओढायची तलब सुटतेय.'

'इट्स ओके. यु आर एन अडल्ट कायझाद. सिगारेट ओढणं इस समटाइम्स फाईन. सवय लागू देऊ नको बस.', डॉक्टर म्हणाले.

'प्रश्न सिगारेटीचा नाही आहे डॉक्टर काका. प्रश्न आहे तो माझं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा. आणि आज मला समजताच नाहीये, काय खरं काय खोटं. मी केलेले खून खरे नाही, मला मिळालेला सिनेमा खरा नाही, माझे तीन आठवडे कसे गेले मला आठवत नाही. ज्यांच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो त्या दोन व्यक्ती सुद्धा आज मला स्वत्त्व हरवून द्यायचा सल्ला देतात. सब झूठ है!'

 

पुढील काही वेळ कायझाद पेस्तनकाकांच्या केबिनमध्येच होता. बाहेर आला तेव्हा रोझा तिच्या डेस्क वर नव्हती. तिथे त्याने एक इन्व्हलोप ठेवले आणि तो घरी निघून गेला. घरी पोचला तेव्हा त्याची कामवाली घर स्वच्छ करत होती. त्याने पिंक फ्लॉइडचे मंद सुथिंग गाणे सुरु स्पीकर वर लावले. कामवालीने कचरापेटीतला त्याचा रक्ताने माखलेला शर्ट बाहेर काढला आणि कायझादला म्हणाली,

'भैय्या, नुसता टोमॅटो सौस शर्ट वर सांडला तर शर्ट फेकायला लागला. मला द्या मी धुवून माझ्या नवऱ्याला देते.'

'नको, तो शर्ट फेकणं ही माझी चूक होती. धुवून मलाच परत कर.'

इतके बोलून तो गॅलरी मध्ये गेला. पेंटहाऊस मधून समोर समुद्राची खाडी दिसत होती. कायझादचा फोन वाजला. पेस्तनकाकांच्या ऑफिस मधून फोन होता.

'हॅलो?'

'कायझाद सर, ऍडव्होकेट पेस्तनची सेक्रेटरी रोझा बोलतेय. भारी रकमेचा, तुम्ही इथे एक चेक सोडून गेला आहात. ते पण 'सेल्फ' लिहिलेला.'

'येस रोझा. माझ्या वडिलांची शिकवण आहे ती.'

'म्हणजे, मला कळलं नाही.'

'असूदेत.', येवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि पाकिटातून दोन सिगारेटी बाहेर काढल्या. अचानक पाऊस सुरु झाला. त्याने दोन्ही सिगारेटी सोबत पेटवल्या आणि ओढू लागला. धूर आणि वाढणारा पाऊस यात समोर दिसणारी खाडी अदृश्य झाली. ते बघत कायझाद पुटपुटत होता,

'ती खाडी आहे न, ती माझ्या आणि सगळ्या मनुष्यांच्या कृत्यांप्रमाणे आहे. कधी दिसते, कधी दिसत नाही. खरंच आहे की नाही, समजत नाही. मनुष्याच्या स्वभावा आणि जीवनाप्रमाणेच. खरा आहे की नाही, उमगतच नाही. कोण कधी कुठे कसा आहे, हे कळतंच नाही. अशाश्वती हेच एक शाश्वत सत्य आहे, एवढंच मात्र खरं आहे.', एवढे बोलून त्यानी पुन्हा दोन्ही सिगारेटी सोबत ओठाला लावल्या आणि मोठ्ठा कश ओढला.. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू