पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला भावलेला कृष्ण

● मला भावलेला कृष्ण ●


आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्णविषयी थोडेसे बोलावेसे वाटले. कृष्ण अनेक रुपात भेटला मला. सगळ्यात आधी देवघरात बालकृष्णाची मूर्ती असते ना, तिच्यात भेटला. मग बालपणीच्या महाभारतातील पुस्तकात कृष्णजन्म, कृष्णलीला ह्यातून भेटला.

मोठे होता होता एक गोष्ट आईने सांगितलेली कायम लक्षात ठेवली. ती म्हणजे, देव आपला सगळ्यात जवळचा मित्र असतो. कितीही मित्र असले तरी देवासारखा सतत आपल्यासोबत राहणारा दुसरा मित्र कोणीही सापडणार नाही. तो एकमेव आहे, ज्याच्यापाशी आपण आपले मन पूर्णपणे रिते करू शकतो. राग, दुःख, आनंद, असूया, प्रेम, माया काहीही असो, त्याला सांगितले की मन अगदी मोकळे होते.

तिची ही गोष्ट लहानपणी विशेष वाटली नाही; परंतु वय वाढले, आई वारली, लग्न झाले तसे तिने सांगितलेली ही गोष्ट किती खरी आहे हे जाणवायला लागले. 

लहानपणापासून कृष्ण हा माझा सगळ्यात लाडका देव कारण तो खूप रिलेटेबल होता. म्हणून तो जास्त जवळचा सखा वाटायला लागला. मग मोठे होता होता राधेचे, मीरेचे निस्सीम प्रेम कळू लागल्यावर कृष्णासारखाच प्रेमी असावा असे वाटू लागले. माझा मुलगा झाल्यावर तर कृष्णविषयी माझ्या मनात मायेचा जणू पाझरच फुटला आणि माझं हे लेकरू म्हणजे कृष्णच आहे, असेही अनेक वेळा वाटून गेले. कृष्ण माझा मुलगाच झाला जणू त्यावेळी.

आता ह्या वयात योगीश्वर कृष्ण मनाला जास्त भावतो. त्याची ही ओळख अलिकडचीच आहे माझ्यासाठी. अभ्यासातून आलेली नव्हे, तर आतून मनातून आलेले ते भाव आहेत. आता तोच योगीश्वर, आपल्याला हात धरून पैलतीरी नेऊन, ह्या जन्म-मृत्यूच्या विळख्यातून सोडवणार, ही मनाला खात्री आहे.

ह्या माझ्या कान्हूल्याला माझा गोड गोड पापा! त्याच माझ्या कृष्ण संख्याला माझी सुहृदपूर्ण मिठी. त्याच माझ्या योगीश्वर कृष्णाला साष्टांग दंडवत! त्याच्या ह्या अनेक रूपांनी, अनेक रंगांच्या छटांनी माझे आयुष्य रंगून गेले आहे. त्याच्या शिवाय माझ्या आयुष्यातील रंग निरर्थक आहेत.

कृष्णा, तूच माझा सखा
तूच माझा प्रेमी
तूच माझा आत्मज
आणि तूच माझा योगी
तुझ्यापासून सुरू झाली
माझी जन्म कहाणी
तुझ्यातच विलीन होऊन
मिळेल जन्मान्तरीची मुक्ती
तुझ्याविना न फुटे
पाझर माझ्या मायेचा
तुझ्याविना न रंगे
आयुष्यातला रंग प्रेमाचा
कृष्णा, तूच माझा सखा
तूच माझा प्रेमी
तूच माझा आत्मज
आणि तूच माझा योगी

©️ तनुजा प्रधान, अमेरिका.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू