पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निसर्गाची शिकवण


निसर्ग आपल्या हालचालीतून मानवाला बरंच काही शिकवत असतो पण माणूस एका वेगळ्याच धुंदीत असल्याने त्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याचे लक्ष जात नाही. आताची मुलांकडे आले असतां इथे fall season बघायला, अनुभवायला मिळाला. भारतात आपण त्याला पतझड / पानगळ म्हणतो तोच पण तरीही खूप वेगळा.
आपल्या कडे थंडी गेल्यावर येतो पतझड आणि मग वसंत पण इथे म्हणजे अमेरिकेत थंडी सुरू होण्यापूर्वी येतो fall कारण पराकोटीच्या गारव्यात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केलेली ही तयारी असते.हा काळ फार थोडा म्हणजे 15 ते 20 दिवसांचा असतो पण ह्या काळात मोठाल्या वृक्षांपासून अगदी लहान फुलझाडांपर्यंत सर्वांची पानं वेगवेगळ्या रंगात नटून एक सुंदर, रम्य वातावरण निर्मिती करतात.जणू येणाऱ्या ऋतूच्या स्वागताला उभी आहेत आणि गळत असलेली पाने आपल्या भोवतालच्या पक्षी, प्राणी,मानवाला निरोप देत असतात की आपण 4/5 महिन्यांनी पुन्हा भेटू . प्रत्येक वृक्ष आपआपल्या स्वभावाप्रमाणे सौम्य-शांत पांढरा,ओजस्वी लाल,उत्साही पिवळा,प्रेमळ-गोड गुलाबी,लाजाळू अबोली,तेजस्वी केशरी,हसरा जांभळा अश्या रंगांनी नटून जातो . हे सर्व मानवाला एक शिकवण पण देत असतात कि जाणं निश्चित आहे पण ते जाणं सहज आणि आनंददायी होऊ शकतं जर त्यासाठी स्वीकार्य भाव ठेवला तर.तसेच मोठ्या संकटाचा किंवा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लहान लहान त्याग करावे लागतात, क्षुद्र स्वार्थ,अहंकार, क्रोध बाजूला सारून एक ध्येय गाठण्यासाठी स्वतःच्या पायावर ठामपणे उभे रहावे लागते आणि अनुकूल परिस्थिती किंवा योग्य संधीची वाट बघावी लागते. ज्यांच्या मुळे वृक्ष सुंदर दिसत होते तेच पानं गळून पडत असताना बुंध्याला नक्कीच अपार वेदना, दुःख होत असतील पण पराकोटीची थंडी सोसण्याची क्षमता त्यांच्यात नाही हे ओळखून तो त्यांचा निरोप घेतो,चार महिने कडाक्याची थंडी,बर्फाचा मारा,पाऊस सर्व सोसून पुन्हा नव्याने बहरतो .एखादं नाजूक झाड आखीव रेखीव बांधा असणाऱ्या नाजूक स्त्री प्रमाणे वाऱ्याच्या झोक्या सोबत नृत्य करत असल्याचा भास देतं तर एखादं उंचच उंच मोठ्ठ झाड आपल्या अभिमानाचे परिणाम म्हणून गळत असलेल्या पानांना तटस्थपणे
बघत असतं , एखादं वृद्ध परिपक्व झाड आपल्या अनंताकडे परतीच्या प्रवासाची तयारी करत सर्व विषयासक्ती सोडून शरणागती पत्करल्या प्रमाणे निर्विकार भासतो, तर एखादी बहरलेली वेल विरहाच्या वेदनेने झाडाला घट्ट मिठी मारून घेतलेली दिसते.
प्रत्येक वयाच्या व्यक्तीला ही पानगळ सुंदर निरोप देत असते. बरं पानगळ झाली तरीही वृक्षांचं सौंदर्य काही कमी होत नाही त्याही अवस्थेत बर्फाची पांढरी शाल पांघरून ते रुबाबदार दिसतात.ताठ मानेने नावीन्य घडवून आणण्यासाठी लागणारे आघात सोसत, अनुभव साठवत मनाची दृढता दर्शवत असतात.बघता बघता दृष्टी जाईल तिथे एक चादर अंथरल्या सारखा पांढरा बर्फ दिसू लागतो आणि सतत चार महिने हे असेच कधी अतिशय थंडी तर कधी सुखावणारं ऊन,कधी पाऊस तर कधी बर्फाचा मारा सर्व आनन्दाने शांतपणे बघत असतात.हळूहळू निसर्ग पुन्हा रूप पालटायला सुरुवात करतो आणि थंडी कमी होते .वृक्ष नव्याने बहरण्याची तयारी करतात . वाऱ्या सोबत नृत्य करत स्वतः वर जमलेला बर्फ झाडून घेतात, सूर्याच्या किरणांनी उष्णता घेऊन आतपर्यंतचा गारठा घालवून नवी ऊर्जा स्वतः मध्ये भरून घेतात आणि असे बहरतात की एकदम फुलांनी भरून जातात. आपण आतापर्यंत बघितले की पानगळ होते मग वसंत आला की झाडांना नवी पालवी फुटते,मग फुलं येतात आणि मग फळं.पण इथे तसं नाही इथे थंडी गेली की झाडं अनेक रंगाच्या फुलांनीअगदी भरून जातात. पांढरे,लाल,पिवळे,गुलाबी, केशरी,जांभळे अगदी चारी बाजूंनी सृष्टी रंगीत होऊन जाते आणि हे पण फक्त 15 ते 20 दिवसां साठीच . त्यांनतर हळूहळू फुलं गळायला लागतात, पालवी फुटायला सुरुवात होते आणि आठवड्याभरात तर सगळीकडे आनंदी हिरवळ पसरते .
हे सर्व घडत असतांना लहानगे निसर्गाच्या ह्या बदलाला कुतूहलाने बघतात,किशोरवयीन आपल्याच मस्तीत त्याकडे दुर्लक्ष करतात, तरुण आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन भटकंती करतात, मध्यमवयीन काही सतत बर्फ बघून उदासीनता अनुभव करतात तर काही ह्या सर्वांचा थोडा वेगळा आध्यात्मिक अर्थ लावतात.आम्ही आलो त्यावेळी घराच्या मागच्या बाजूला अरण्य भासावं इतकी घनदाट झाडं होती. हरीण,ससे, लहान मोठ्या खारुताई, सुंदर रंगांने नटलेले, वेगवेगळ्या आवाजात गोड गाणारे पक्षी,कधी कधी कोल्होबा सारखी  दिसणारी कायोटि सहज हाजरी लावून जात असे.पलीकडे पण वस्ती असेल असे अजिबात वाटत नव्हते.पानगळ सुरू झाल्यावर मागे काही तरी आहे असे वाटले, हळूहळू रंगीत झाडांमागून घरांची शिखरं डोकावू लागली आणि सर्व पानं गळून पडल्यावर पलीकडे पण सुंदर घरं,वस्ती आहे असं बघून खूपच आश्चर्य आणि आनन्द वाटला. जगात पण प्रपंच,नाती,मैत्री,समाज,अश्या भोवतालच्या जगासोबत अनुभवलेल्या ,जोडलेल्या भावनांचा अरण्य इतका घनदाट पसरला असतो की त्याच्या पलिकडे पण जग आहे हे जाणवतंच नाही. जसं जसं ह्यातून ईर्ष्या, द्वेष, लोभ, मोह, स्वार्थ,क्रोध,अहंकाराची पानं गळून पडतात तसं तसं पलीकडचं सहज,सुंदर, शांत,आनन्दी जग अनुभवास येऊ लागतं. ही पानगळ बघत असतांना अनेक विचार, भावना मनात येत असतात.प्रत्येक झाडावरून सतत एकेक पान गळून पडत असतं,जणू सांगतंय रोजच्या रोज येणारे नकारात्मक विचार त्या त्या वेळीच सोडून दिलेलेच बरे,एखादी वाऱ्याची झुळूक आली की जरा जास्त पानं पडतात जणू एखादा चांगला सद्विचारी मित्र भेटतो त्याच्या विचारांचा प्रभाव आपल्या मनावर पडतो, एखादं चांगलं पुस्तक वाचण्यात आलं आणि त्याच्या कथानकाशी समरस होताना जाणवलं त्यामुळे जवळच्या लोकांबद्दलचा राग,लोभ गळून पडतो. जोराचा वारा सुटला की तर पाच सहा फांद्या अगदी बोडक्या होऊन जातात जणू एखादा मोठा अपघातच घडला, आजारपण आलं की कशालाच काही अर्थ नाही, मिळालेलं आयुष्य आनन्दाने जगून घ्यावं हे जाणवून मोहाच्या अनेक फांद्या रिकाम्या होतात.
         अशी ही नयनरम्य, मनमोहक पानगळ आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देऊन गेली.  

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू