पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पारिजातचे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन

*"मराठी इतकी सुंदर भाषा जगात दूसरी नाही, ज्ञानेश्वरी वाचली तरी जिभेवर साखर घोळेल" :- संमेलनाध्यक्ष ए. के. शेख यांचे प्रतिपादन*

 

*पारिजातचे पहिले राज्यस्तरीय कवीसंमेलन सानपाडा, नवीमुंबई येथे दिमाखात पार पडले*

 

    पारिजात साहित्य समूहाचे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी केमिस्ट भवन, सानपाडा, नवी मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडले. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी गझलेचे व्यासपीठ असे संबोधले जाणारे ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख होते. संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र केमिस्ट असो.चे सचिव श्री.सुनील छाजेड तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी कादंबरीकार सौ.राजश्री भावार्थी उपस्थित होत्या. विशेष निमंत्रित अतिथी म्हणून गझलकार विजय जोशी, गझलकारा उर्मिला बांदिवडेकर, कवी बाळासाहेब तोरसकर, गझलकार साबीर बिराजदार, सिराज शिकलगार, मोहन जाधव, कवी अनंत जोशी, कवी दीपक पटेकर, लालित्य लेखिका कवयित्री भारती भाईक, कवयित्री फरझाना डांगे, कवयित्री डॉ.श्यामल पाटील अग्रवाल आदी उपस्थित होते. पारिजात साहित्य समूहाचे सर्वेसर्वा समूह प्रशासक प्रा.एस. यु. मुल्ला, शबाना मुल्ला या दांपत्यांच्या आयोजन व कठोर परिश्रम पारिजात काव्यसंमेलनाच्या यशस्वीतेत दिसून आले.

 

*दीप प्रज्वलन अन् विश्व प्रार्थनेने संमेलनाची सुरुवात*

    संमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनील छाजेड यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. कवयित्री अर्चना देवधर लिखित विश्वप्रार्थना कवयित्री शबाना शेख यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाऊन संमेलनाला सुरुवात झाली. उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी, निमंत्रित अतिथी आदींचे स्वागत अध्यक्ष व आयोजकांनी केल्यानंतर शबाना शेख यांचा पहिला काव्यसंग्रह "धुक्यातील दवबिंदू" व राजश्री भावार्थी यांच्या "शापित सौदर्य" या कादंबरीचे प्रकाशन संमेलनाचे अध्यक्ष ए. के. शेख व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. *या दोन्हीही पुस्तकाच्या छपाई पासून प्रकाशनापर्यंत शॉपीजन या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. साहित्यिकांसाठी आणि कलावंतांसाठी शॉपीजन हा असा मंच आहे की त्यावर आपले साहित्य, कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह इत्यादी शून्य किमतीमध्ये आणि कमीत कमी वेळेत छापून घेऊ शकता. या संमेलनाच्या निमित्ताने कवयित्री शबाना मुल्ला यांनी शॉपीजनच्या मराठी विभागाच्या प्रमुख ऋचा दीपक करपे यांचे आभार मानले.* या संमेलनाचे उद्घाटक श्री.सुनील छाजेड यांनी संमेलनाला शुभेच्छा देताना नवनवीन शब्द आपल्या कवितांमधून कानावर पडतील असे सांगत संमेलनाची तयारी पाहूनच भारावून गेले. राज्यभरातून आलेल्या सारस्वतांचे आणि आयोजक मुल्ला दाम्पत्यांचे त्यांनी कौतुक केले. प्रमुख अतिथी कादंबरीकार राजश्री भावार्थी यांनी आपल्या भाषणात कथा कशी लिहावी यासंबंधी सुरेख मार्गदर्शन करत संमेलनाला शुभेच्छा दिल्या. यानंतर कवयित्री शबाना मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त पारिजात समूहात पार पडलेल्या काव्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. 

 

*विशेष निमंत्रित अतिथिंचे काव्य सादरीकरण*

काव्यसंमेलनाच्या सकाळच्या सत्रात विशेष निमंत्रित कवी कवयित्री काव्य सादर केले. ज्येष्ठ गझलकारा उर्मिला ताई बांदिवडेकर यांच्या "नवऱ्याची पंगा घ्यायचा नाही" या कवितेने सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडले. गझलकार विजय जोशी(विजो) यांनी "गांधी" ही अप्रतिम गझल सादर केली. कवयित्री भारती भाईक यांनी "नारी.., शब्द शारदा या काव्यरचना, कवी दीपक पटेकर यांनी "संसार" हे वृत्तबद्ध काव्य, गझलकार मोहन जाधव यांनी "आयुष्याच्या वाटेवरती गाव कधी तर शहर कधी" ही सुरेख गझल, सिराज शिकलगार यांनी अप्रतिम गझल, कवयित्री फरजाना डांगेनी "नारी न तो बला न तो अबला" ही बहारदार कविता, कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी संविधान दिनानिमित्त "अगा भारता तुझी विविधता", कवी अनंत जोशी यांनी "नाही व्हायचं मला डोळ्याला पट्टी बांधणारी गांधारी", डॉ.श्यामल पाटील अगरवाल.. "पाऊस आपल्या मनमनातला", शबाना मुल्ला यांची "वात्सल्याचे रूप" ही रचना कवयित्री रश्मी थोरात यांनी सादर केली तर शबाना मुल्ला यांनी "हिला काय कळतं" अशा बहारदार रचनांचा रंग उधळला. पद्माकर कुलकर्णी व प्रतिभा कुलकर्णी यांचा "हसरी मैफिल" हा १५ मिनिटांचा कार्यक्रम हास्य कवितांनी संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.

 

*मराठी इतकी सुंदर भाषा जगात दूसरी नाही... ज्ञानेश्वरी फक्त वाचली तरी जिभेवर साखर घोळेल"*

    आपल्या खुमासदार शैलीत अध्यक्षीय भाषणात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी मराठी भाषेची थोरवी गायली. अध्यक्षीय भाषण काय असतं.. हे शेख साहेबांचं भाषण ऐकल्यावर समजतं. गझलकार ए. के. शेख सरांचे कौतुक करणारे दिलखुलास खुमासदार भाषण सर्वांच्या मनाला आनंद देऊन गेलं. पुढे बोलताना ते म्हणाले, मराठीची सेवा करतो त्याची शासनाने दखल घ्यावी.

मराठीच्या पाट्या लावा म्हणता मग मराठीला तुम्ही प्राधान्य द्या. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडतात हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळावा यासाठी 25 वर्षे भांडतो आहोत त्याची दखल घ्या. मराठीची कौतुके करताना "ज्ञानेश्वरी वाचली तरी जिभेवर साखर घोळेल".. अशी महती सांगितली. दक्षिणेत बघा ते आपली भाषा कशी जपतात. कबीर, तुकाराम वाचा अर्थ जाणा म्हणजे लिखाणासाठी उर्मी येईल... "साहित्याची उर्मी म्हणजे चैतन्याचा स्त्रोत".. असे सांगताना, झोपेत जरी ओळ सुचली तरी त्याक्षणी उठून ती लिहिली तर ती तुमची ओळ अन्यथा शेजारी गेलीच समजा...असेही दिलखुलासपणे बोलून भाषणात रंगत आणली. *प्रतिभा...परमेश्वराने बहाल केलेली देणगी* प्रतिभा म्हणजे सृष्टीच्या पलीकडील सृष्टी दाखवणारी... कविता. ज्याप्रमाणे आकाश म्हणजे स्वच्छ दिसते ते अन् आभाळ म्हणजे भरून येतं ते...असे शांताबाई म्हणायच्या...तशीच प्रतिभा आपल्यात निर्माण झाली पाहिजे. भाषणात गझलेने रंगत आणताना त्यांनी..

*"डाव मित्राचेच होते नेमके*

*घाव मित्राचेच होते नेमके*

*पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे*

*नाव मित्राचेच होते नेमके"*

अशी सहज साधी पण मतितार्थ दडलेली गझल ऐकवताना साध्या, समजणाऱ्या शब्दात रचना करण्याचा सल्ला दिला. पी.सावळाराम हे आपले पहिले गुरू तर सुरेश भट आपल्याला आदरणीय गुरु असल्याचे सांगितले. 

*गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय..*

*महागाईने पिचलेल्याना होळी काय दिवाळी काय..*

या त्यांच्या गझलेने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला.

 

*दुसऱ्या सत्राच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय जोशी (विजो)*

   दुपारच्या दुसऱ्या सत्रातील काव्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना काव्य संमेलनाचे विजय जोशी (विजो) यांनी आपल्या कवितांमध्ये काव्य गुण आवश्यक आहेत, यमक साधत लिहिलेल्या कवितांकडून वृत्तात कविता लिहिण्याचा अभ्यास करा, प्रयत्न करा. त्याचप्रमाणे आपल्या काव्यात व्याकरण आणि शुद्ध लिखाण असेल याचे भान ठेवा, असे सांगताना "कवितेची लांबी ही तहान लागल्यावर जेवढे आवश्यक तेवढेच पाणी पितो" तशीच असावी. मोजक्या शब्दात आशयघन कविता लिहावी. असे मोलाचे मार्गदर्शन केले. कवी बाळासाहेब तोरसकर, साबीर बिराजदार आदींनी देखील सारस्वताना सुरेख मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकारा नंदिनी काळे, कवी प्रदीप बडदे, कवयित्री रश्मी थोरात यांनी केले तर कवी संमेलनासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचे, सहभागी पारिजात करांचे, हॉल उपलब्ध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुनील छाजेड, आणि कळत नकळत उपयोगी पडलेल्या सर्वांचे कवयित्री शबाना शेख यांनी आभार मानले.

 

*"प्रा.एस.यू. मुल्ला आणि शबाना मुल्ला यांच्यावर उधळली स्तुतीसुमने"*

 पारिजातचे पहिले कवी संमेलन, त्याचे आयोजन, नियोजन, सर्व सुखसोयी, येणाऱ्यांची बडदास्त, स्वागत, मानसन्मान, आदी देत असतानाही आपल्या चेहऱ्यावर केवळ हास्य ठेवणाऱ्या प्रा.एस.यू.मुल्ला आणि शबाना मुल्ला यांचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले. असामान्य असे कवी संमेलन आयोजित केल्याबद्दल मुल्ला दाम्पत्यांचे सर्वांनी आभार मानले. शबाना मुल्ला यांची कन्या निलोफर मुल्ला ही कवी संमेलनासाठी खास अमेरिकेतून आलेली हे विशेष कौतुकास्पद. आपल्या आईवर तिने हिंदी आणि इंग्रजीतून केलेले शब्दांकन वैशिष्ट्यपूर्ण होते. शबाना मुल्ला यांचे बंधू आदी कुटुंबीय देखील खास उपस्थित होते.

 

*या कवी/कवयित्री उधळली पारिजातची शब्दफुले*

कवयित्री करुणा शिंदे...यांनी परक्याचे धन, दिवाण..स्त्री शक्ती..सविता कांबळे...बाप, डॉ.अलका कुलकर्णी..

स्पर्श, शशिकला अभंगराव... स्वप्नांच्या गावात राम आता वाटत नाही, मयूर पालकर.... 'लग्न' ही सामाजिक आशयाची कविता, दीपा पराडकर... माझं मन, सीमा भंडारे, मंगला ढगे... बंध मैत्रीचे, वर्षा गोरे...ती आणि मी, संध्या टिपरे... मेट्रो, अनघा कुलकर्णी.., मनीषा सामनेरकर...लेक, रोहिणी गंधेवार...पाऊले चालती... अभंग, ज्योती देशपांडे...अभिजात सौंदर्य, हर्षाहिरा पाटील.. तिरंगा, प्रवीण कावणकर..जगणं राहून गेलं, कल्पना पाटकर.. काळे मणी, विक्रांत डींगणकर... बाळा परतून ये ना, पल्लवी भागवत.. मन मोहिनी, वनिता पाटील...तू आणि मी, सोनाली वेतकर...गुलमोहर, रंजना विधाते...प्रेम, सीमा झुंझारराव...आयुष्य तेच आहे, सानिका कदम... कसं कोण विसरेल, विजया चिंचोळी, वर्षा फटकारे....प्रारब्ध, ऋतुजा गवस....विसावा, डॉ.निर्मल कासेकर...पाऊस, जमालोद्दिन शेख..बहिणीचे वरदान, पूर्वा तुषार चौधरी... ज्योतिबाजी, सुचित्रा कुंचमवार... पाडवा भेट, कल्पना देशमुख...अवकाळी पाऊस, डॉ.प्रितिराणी जुवेकर...इच्छा, रश्मी थोरात...मी इवलेसे अशी एकापेक्षा एक सरस परिजाताची फुले सर्व कवींनी आपल्या काव्यातून उधळली. साबीर बिराजदार... शबानादिदिंची गायलेली बाबा गझल, हृदयातच उठले वादळ.... अन् सय्यद चांद तरोडकर यांची..."खड्डा मनात आता खोदून पाहतो"

"दुःखास त्यात आता लोटून पाहतो" काव्य संमेलनास चार चाँद लावून गेली.

    सायंकाळी ६.०० वाजता फोटोसेशन आणि मित्र मैत्रिणींना पुन्हा भेटू असे आश्र्वासित करत आलिंगन देत एकमेकांचा निरोप घेतला.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू