पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्या लोकरीची ऊब

       "आई, प्लीज! काही ही पाठवू नको. कुरियरचे भरमसाठ पैसे वाया जाणार, शिवाय प्रियांश ला आवडत ही नाही असल्या वस्तू घालायला", माझी लेक थोडी चिडून मला बोलली.
गेली सहा वर्षे लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या माझ्या एकुलत्या-एक मुलीला मी विचारलं, "अग, प्रियांश फक्त २ वर्षांचा आहे. तू त्याला घालशील तर त्याला सवय लागेलच ना?"
"आई, आता थोडा स्पष्ट बोलते हं; त्या तिकडच्या साध्या लोकरीचा अमेरिकेच्या कडक थंडीत काही उपयोग होत नाही. मी चांगले महागाईचे फर-कोट घेतले आहेत प्रियांश आणि आमच्यासाठी. म्हणून म्हणते आहे, ऐक माझं .... नको पाठवू तुझे विणलेले स्वेटर इथे. अर्थात तू हट्ट धरून पाठवलेस, तरी मी नाही वापरणार. म्हणून सांगते... प्लीज ऐक !", प्रीती खूपच स्पष्ट शब्दात नकार देत होती.
माझे यजमान हयात असे पर्यंत लेकीचे खूपच लाड पुरवायचे. मला नेहमीच म्हणायचे, "तिला काय हवं ते करू दे, सतत तिला सूचना देत जाऊ नकोस". त्यांच्या त्याच शब्दांना आठवत, मी "बरं, फोन ठेवते" म्हणत व्हिडिओ-कॉल बंद केला.

        विणकाम ही केवळ माझी आवड नाही; माझा सर्वात आवडता छंद म्हणता येईल. किशोरवयात, नातेवाईकांकडून सणावारांना मिळालेले पैसे वाचवून मी माझ्या आवडीचे छान मऊ-मऊ, रंगीत लोकरीचे गोळे आणि सुया विकत घ्यायचे. त्या काळात, सर्व साधारण मुलींना सतत घरातली कामे किंवा स्वयंपाक असायचाच. हे सर्व मला ही करावं लागायचं. पण तरी, स्वतःसाठी काही वेळ काढून, गच्ची वर उन्हात चटई घालून आजीच्या बाजूला बसून मी भरपूर विणकाम शिकून घेतलं. ती पण मला ह्यासाठी खूप प्रोत्साहन द्यायची आणि वेगवेगळ्या विणकामाच्या पद्धती शिकवायची. कालांतराने माझ्या जवळ वेगवेगळ्या आकाराच्या सुया आणि बहु-रंगी लोकरीच्या गोळ्यांचा एक सुंदर संचय झाला होता. एका मोठ्या ड्रॉवरमध्ये मी हे सर्व नीट मांडून ठेवायचे, जणू खजिनाच होता तो माझा. हळूहळू मी लहान मुलांसाठी मोजे, छोटे लोकरीचे फ्रॉक, स्वेटर, माकड टोपी, मफलर सारख्या लोकरी वस्तू बनवण्यात अधिकच प्रवीण होत गेले. आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना माझे आई-वडील अभिमानाने माझे हे कौशल्य सांगत, माझ्या काही निर्मिती मी त्यांना दाखवाव्या असे सुचवायचे. आलेल्या पाहुण्यांकडून माझी स्तुती ऐकून मला ही माझ्या ह्या कलाविष्कारांचा अभिमान वाटत असे.
       बी.ए. चे शिक्षण पूर्ण होताच माझा विवाह एका संपन्न कुटुंबात झाला. माझ्या सासरच्या मंडळींनाही लवकरच माझे लोकरीवरील प्रेम जाणवले आणि ते ही आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांना "विणकामात आमची सुनबाई खूपच कुशल आहे" असे सांगू लागले. बघता-बघता आमच्या विस्तारित कुटुंबातील, मित्रमंडळातील आणि शेजार-पाजारच्या लोकांना ही ह्याची जाणीव होत गेली आणि कधी रुखवत, तर कधी बारसे, अशा प्रसंगांसाठी मी विणलेल्या लोकरीच्या वस्तूंच्या मागण्या यायला लागल्या. मी ही प्रेमाने दरवेळी वेगवेगळ्या डिजाईनचे विणकाम करून त्यांना भेट म्हणून द्यायचे. माझ्या पतीने मला विणकामाची बरीच पुस्तके भेट दिली आणि मी ही त्यांचा पूर्ण उपयोग करीत नवनवीन, आधुनिक नमुने आणि डिझाइन शिकून माझे कौशल्य विकसित करत गेले. मी मात्र त्यातून पैसे कमवण्याचा विचार कधीच केला नाही, कारण माझे पती त्यांच्या कारकिर्दीत चांगलेच कमवत होते आणि आम्हाला एकच मूल असल्याने माझ्या स्वतःच्या कमाईची काही आवश्यकता नव्हती. पण मी बऱ्याच वेळा आमच्या कम्युनिटी सेंटरमध्ये प्रदर्शनांसाठी माझे स्वेटर, फ्रॉक इत्यादी ठेवत होते.

इतकी वर्षे झाली.... 

      मी आता एक ज्येष्ठ नागरिक असून एकटीच, पण एक सुखी जीवन जगत आहे. माझे पती निधन पावले, पण माझ्यासाठी सर्व सुख-सुविधा आणि काही न विसरता येणाऱ्या सुखद आठवणी सोडून गेले. सोबतीला इतर कुटुंबीय व मित्र-परिवार आहेच; पण अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या प्रीतीची आणि विशेषतः माझ्या छोट्याशा प्रियांशची उणीव खूपच भासते. प्रीतीच्या डिलिव्हरीच्या वेळेस गेले होते मी तिथे, पण केवळ तीन महिनेच मला माझ्या छोट्या नातवाच्या सहवासात राहता आले. तेव्हापासून त्यांना प्रत्यक्ष भेटण्यास आतुर झालेली मी, फक्त मी विणलेले लोकरीचे कपडेच त्यांच्या पर्यंत पोचवू शकते. ते कपडे घालताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहावा इतकीच इच्छा होती माझी. हिवाळी ऋतूची चाहूल लागताच मी त्यांच्यासाठी विणकामाला सुरुवात केली होती. पण आता, प्रीतीच्या बोलण्यावरून मला खरंच वाटत नाही, हे लोकरी कपडे त्याच्यापर्यंत कधी पोचतील. कधी प्रियांश हे कपडे घालेल का?
कधी प्रियांशला जाणवेल का माझं प्रेम, माझी माया, माझ्या लोकरीची ऊब?
मला त्याक्षणी खूपच नाकारले गेल्यासारखे वाटले, तेही माझ्या स्वतःच्या मुलीकडून!
मी माझे अश्रू आवरून डोळे पुसत असतानाच मला रजनीने आवाज दिला.

    "ताईजी, काम झालंय माझं, येऊ का मी?", माझ्या भव्य घरात कामाला असलेल्या रजनीने विचारले. मी होकार देऊन ती जाणार, एवढ्यात ती माझ्या खोलीत येऊन माझ्या खुर्चीच्या जवळ बसली.
रजनी म्हणाली, "ताईजी, तुम्ही किती सुंदर स्वेटर बनवता हो! मला माहित आहे हे तुम्ही तुमच्या नातवासाठी विणले आहेत, पण ताईजी, बघा ना, घरात ह्याच मापाचा तुम्ही विणलेला एखादा जुना स्वेटर असला तर, माझा धाकटा लेक आहे ना त्याच्यासाठी. अहो मला किती पण वाटलं ना, की त्याला असे सुंदर, रंगीत, मऊ, ऊबदार स्वेटर घ्यावे, पण तुम्हाला माहीत आहे ना, मला परवडणार नाही हो! आणि त्यातही, तुमच्या हातचे विणकाम! ताईजी मी तुमची खुशामद नाही करत हो, खरंच सांगते, तुमच्या सारखे सुरेख, नाजूक विणकाम हे फार थोड्यांना जमते. जादूच आहे तुमच्या हातात! ताईजी बघा की काही असेल तर....".
      रजनीची ही वाक्य ऐकताच मी उठले आणि माझ्या कपाटातून मी विणलेले ४-५ स्वेटर व २ मफलर काढून तिच्या समोर ठेवले. उत्तम दर्जाच्या शुद्ध काश्मिरी लोकरीचे विणलेले हे कपडे मी खास माझी मुलगी, जावई व प्रियांशसाठी जपून ठेवले होते, पण त्यांना रजनीला काढून देताना मला एक क्षणही विचार करावासा नाही वाटला. प्रियांशनी माझे स्वेटर घालावे, माझ्या प्रेमाची ऊब त्याच्या पर्यंत पोचावी इतकीच इच्छा होती माझी, पण मी अगदी प्रसन्न मनाने, संतुष्ट चित्ताने हे सर्व रजनीच्या सुपूर्द करत म्हणाले, "हे घे... तू, तुझा नवरा आणि तुझ्या छोट्या मुलासाठी भेट. शिवाय मला तुझ्या बाकी दोन मुलांचेही माप कळव. मी त्यांच्यासाठी पण स्वेटर बनवते”- तिच्या व तिच्या मुलांबद्दल खूपच आपुलकी वाटून मी बोलले.
"नाही नाही ताईजी!" रजनी लगेच म्हणाली, "अहो हे तर खूपच महाग असतील. मी हे कसे घेऊ शकते? अहो मी तुम्हाला सहज विचारलं, तुमच्या जवळ काही जुनं असेल तर द्या म्हणून. हे नाही घेऊ शकत मी....".
पण मी रजनीची समजूत काढली, "नाही म्हणू नकोस! ह्या कपड्यांची ज्यांना गरज आहे, ज्यांना कदर आहे, त्यांनाच हे मिळावेत! माझ्या प्रियांशसाठी त्याची श्रीमंत आई खूप फर चे कोट घेईल गं, पण इथे, तुझीच नाहीत, इतर किती मुलं असतील, जे ह्या कडक हिवाळ्यात एक साधा स्वेटर मिळावा म्हणून आतुर असतील. माझ्या नातवाला ह्यांची गरज नाही, पण तुझ्या मुलांना आहे. आणि तुझ्या कुटुंबानी मी विणलेले स्वेटर घालावे, ह्यातच माझा खरा आनंद आहे.
आता मला समजले आहे माझ्या लोकरीचा योग्य वापर कसा करायचा ते! आता मी माझे सर्व विणकाम ह्याच उद्देशाने करणार. सर्व गरजू मुलांपर्यंत माझ्या लोकरीची ऊब पोचवणार.
चल, आता हे कपडे घे बरं, आणि तुझ्या मुलांना सांग आजीनी भेट दिलेत म्हणून". मी हसत रजनीला म्हणाले.

      हा सुयोग्य निश्चय करताच मी त्वरित पुढच्या कामाला लागले.
दरवषी हिवाळी ऋतूची चाहूल लागली की मी, रजनी आणि तिच्या ओळखीच्या काही गरजू बायका माझ्या सूचनांनुसार भरपूर स्वेटर, फ्रॉक, टोप्या, मफलर वगैरे विणून, कधी झोपडपट्टीत, कधी एखाद्या अनाथ-आश्रमात, तर कधी कपडे वितरित करणाऱ्या एन.जी.ओ. ना आम्ही हे सर्व वाटून समाधान मानतो.

माझ्या मायेची ऊब त्या मुलांपर्यंत पोचली की मी ही त्यांचे हसरे चेहरे पाहून धन्य होते !

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू