पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप २०२३ सालाला..

 

       थंडीच्या सुखद गारव्यात

            करूया स्वागत नववर्षाचे

            मित्र मैत्रिणी आप्तेष्टांसवे

            जमवू मैफिलसत्र जल्लोषाचे 

                    असो कोणता धर्म, जात, पंथ, संप्रदाय नवीन विचारांनी नवीन संकल्पांने नववर्षाचे स्वागत करताना आपण सर्वजण एकरूपतेने, एकजुटीने, एकोप्याने एकत्र येत आहोत. नव्याचे आपण नेहमी स्वागत करत आलो आहोत. परिवर्तन हा सृष्टीचा नियमच आहे आणि तो सर्वांना मान्य करावा लागतो. काळ बदलतो तसे विचार बदलतात. रोजचा दिन काहीतरी नवीन बरोबर घेऊन उगवतो आणि जुन्या घटनांना बुडवून नवीन प्रभात घेऊन जन्मास येतो. म्हणूनच तुतारी या कवी केशवसुत म्हणतात "जुने जाऊ द्या मरणालागूनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका". निसर्गाकडून नेहमीच माणसाला काहीतरी नवीन शिकायला मिळत असते. आपण उगवता आणि मावळता सूर्य नेहमीच पाहतो. तो आपल्याला नेहमीच सतेज दिसतो परंतु तो काहीतरी सांगत असतो, "अरे माणसा, मला नुसता पाहू नकोस. माझ्याबरोबर माझ्या वेगात, माझ्या चर्येत, माझ्या तेजात एकरूप होऊन जा. बघ तू उठला नाहीस तरी मी उठलो. आधीच दिवसांचा, विचारांचा, प्रसंगी आलेल्या रागांचा त्याग करून पुन्हा नवतारुण्य, नवचैतन्य धारण करून प्रकाशाच्छित अवस्था मी प्राप्त करून घेतली आहे. तर तू ही माझ्याबरोबर उठ, जुने राग, लोभ, द्वेष, क्रोध, मत्सर विसरून जा आणि नवशक्तीने प्रसन्न होऊन चालू लाग. हातून घडलेल्या कर्मात नातं साठव. त्याचे तोल मापन कर आणि प्रसन्नतेने माझ्याबरोबर चालत रहा. रात्र वैऱ्याची आहे, तुझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नकोस. हा रात्रीचा अंधकार तुझ्या चैतन्याला, तेजाला गिळून टाकेल. तुझा तो सर्वनाश करेल तेव्हा तू अंध:कारावर विजय मिळव. दिवस जसा सोन्याचा श्रमाचा घालवला तशी रात्रदेखील सुखात श्रमपरिहार करण्यात जावू दे. क्षणिक काळाबरोबर विसंगती चाखून पुन्हा माझ्यासोबत दुप्पट तेजाने, चैतन्याने संकल्पपूर्तीच्या उत्साहाने चालू लाग".

                किती छान होते २०२३ साल! मागील दोन वर्षांचे कोरोनाचे संकट टळले असून लोकांना पूर्वीसारखे स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी आता बळ मिळाले होते. पूर्ववत जीवन सुरू झाल्यामुळे लेकरांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते. बागा, मैदानें मुलांनी, लोकांनी फुलून गेले होते. कोरोना काळात मनावर जे दडपण होते ते संपूर्ण नाहीसे झाले होते. दोन वर्षात शालेय नुकसान झालेले भरून काढण्यासाठी शाळकरी आता अभ्यासाला लागलेले होते. ज्यांच्या घरातील कर्तेसवरते कोरोनाने हिसकावून नेले होते ते आपल्या दुःखातून सावरून जाऊन आताशी आपले जीवन व्यतित करण्याचा प्रयत्न करत होते. नवनवीन तंत्रज्ञान, नवीन धरणे, नवीन पूल, रस्ते, इमारती तसेच मेट्रोचे उद्घाटन, पुस्तकांचे स्टॉल्स, कवी संमेलने, साहित्यिक मेळावे, सहली अशी अनेक ठिकाणे नवनव्या कार्यक्रमांनी , प्रसंगांनी सुरळीत चालू झाले होते. मॉल्स, चित्रपटगृहे, हॉटेल्स या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही आता पूर्वीसारखे डुबून गेलो होतो.

                   या २०२३ सालाला आता लवकरच निरोप देणार आहोत. नाताळचा आनंद साजरा करून आम्हाला गतवर्षात आम्ही खूप काही कमावले, गमावले हे सांगताना मन भरून येत आहे. आम्हाला जो पूर्ववत आनंद मिळवून देणारे हे २०२३ साल इतक्या पटकन निघून गेले की ३६५ दिवस कसे संपले तेही कळाले नाही. हल्ली लग्न, वाढदिवस, बारशी अशा अनेक कार्यक्रमांनी मानवी मनाला तजेला मिळवून दिला आहे. दोन जीवांचे मिलन झाल्यानंतर त्यांच्यात बरसणारा आनंद द्विगुणित होत आहे. करिअरचे उद्दिष्ट लक्षात ठेवून मुले त्या दृष्टीने भवितव्याची वाटचाल करण्यात गुंतली आहेत. मागील दोन वर्षात सर्वच प्रकारे नुकसान झाले असल्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

                  आता नवीन २०२४ साल येत आहे. त्याच्या स्वागतासाठी सर्व लहान थोर जय्यत तयारीला लागलेले आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, समारंभाचे, काव्यमैफिलींचे आयोजन, प्रयोजन होत आहे. लग्न सोहळे धुमधडाक्यात साजरे होत आहेत. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी तरुणाई प्रतिक्षेत आहे. पर्यटनस्थळे, हॉटेल्सचे बुकिंग होत आहे. 

                 चला आपणही सूर्याप्रमाणे तेजस्वी होऊन मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करूया आणि नव्या संकल्पांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील राहू या.

 

सौ. भारती सावंत

खारघर, नवी मुंबई

 

 

9653445835

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू