पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अंगारा

'कशाला स्लीपर क्लासचे तिकीट काढलेस? मी म्हटलं होतं, चांगले ए.सी. टू किंवा थ्री चं तरी करून दिलं असतं.', निरंजनचे वडील त्याला म्हणत होते.

'बाबा, आता नोकरी लागली. सुरुवातीला थोडा पगार आहे, पुढे वाढेल तेव्हा करेल की ए.सी. किंवा विमानाचे तिकीट सुद्धा! पण आता कमी पगारात कसं भागवायचं हे शिकायला हवं.'

'अरे पण मी आहे ना समर्थ तुला सुरुवातीच्या काळात मदत करायला?'

'नक्कीच आहात. आणि जेव्हा भागणार नाही, तेव्हा तुमच्याकडेच येईल. पण मला सुद्धा तुमच्या सारखा सेल्फ मेड बनू देत.'

ते ऐकून मात्र निरंजनच्या वडिलांच्या चेहेऱ्यावर समाधानाचे स्मित होते. ते म्हणाले,

'जा, आधी आजीचा निरोप घे बघू!'

 

निरंजन आजीच्या खोलीत गेला. आजीच्या हातात नेहेमीप्रमाणे जपाची माळ होती. आजी नामस्मरण करत होती.

'आजी, तुझी किती ग आठवण येईल मला कलकत्त्याला!', निरंजन आजीला नमस्कार करत म्हणाला.

'औक्षवंत हो, माझ्या बाळा.', आजीने निरंजनच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याला आशीर्वाद दिला. निरंजन आजीच्या बाजूला जरावेळ बसला. तिला आपल्या नवीन कामाबद्दल सांगत होता. अवघी हयात फक्त घर सांभाळण्यात घालवलेल्या आजीला हे नवीन आय.टी.चे काम समजलेच असेल असे नाही. हे निरंजनला सुद्धा ठाऊक होते. पण आजीसोबत जरा वेळ घालवावा, असे त्याला वाटत होते. आणि ते आजीला सुद्धा समजल्याने ती सगळे अगदी कौतुकाने ऐकत होती. एक वेगळेच प्रेम त्यात होते. शेवटी निरंजन निघाला. आजीने बळेच एक शंभराची नोट त्याच्या हातात दिली आणि म्हणाली,

'तू कितीही मोठा साहेब झाला तरी तुझी आजी तुला खाऊसाठी ही छोटीशी भेट नेहेमी देणार.'

आजीला बिलगून निरंजन म्हणाला,

'आजी, मी कितीही मोठा झालो तरी तुझा खाऊ माझ्यासाठी नेहेमीच सगळ्यात प्रेमाचा असणारे.'

आजी हसली. आणि लगेच एक पुडी त्याच्या हातात दिली.

'निरंजना, हा महाराजांचा अंगारा. तुला कुठलेही संकट हा अंगारा तुझ्याजवळ असेपर्यंत स्पर्श देखील करणार नाही. हा नीट जपून ठेव.'

निरंजन हसला आणि म्हणाला,

'अगं आजी, माझ्यावर कुठले संकट येणार?'

'बाबा, आम्ही म्हातारी माणसं. चार पावसाळे जास्त पाहिलेले. पण संकटांचं भय तुमच्यासाठी वाटतं. तुम्ही नवीन पिढी, तुमचे विचार वेगळे, विश्वास वेगळे. पण माझ्यासाठी हे ठेव.'

'ठेवतो ना आजी. अजून कोणावर नसला तरी तुझ्यावर माझा नक्कीच विश्वास आहे!'

आजीला बरं वाटलं. अंगाऱ्याची पुडी खिशात ठेवून निरंजन निघाला.

 

वर्धा स्टेशनवर निरंजन आला. नवीन जॉबचा आनंद त्याच्या मनांत होता. पण घरापासून दूर जाण्याचे दुःख सुद्धा होते. मिश्र भावनांमध्ये त्याने स्टेशनवर ट्रेन आल्यावर आपल्या आई-वडिलांचा निरोप घेतला. आईच्या डोळ्यांत अश्रू होते. निरंजन तिला म्हणाला,

'रडू नकोस आई. सुट्टी मिळाली की मी लगेच येईल बघ!'

बाबांचा हात लगेच खिशाकडे गेला. ते बघून निरंजन म्हणाला,

'बाबा, भरपूर पैसे दिले आहेत तुम्ही ऑलरेडी. अजून नको!'

तरी पण बाबांनी पाचशेची नोट त्याच्या हातात दिलीच. भरल्या मनाने निरंजन ट्रेन मध्ये बसला.

 

शिट्टी वाजली. ट्रेन कलकत्त्याकडे निघाली. निरंजन कानात हेडफोन घालून आपल्या सीटवर बसला होता. त्याची सीट टी.सी. सोबत होती. टी.सी. आला. त्याने निरंजनाच्या तिकीटाची तपासणी केली. त्याने विचारले,

'नवीन जॉब काय?'

'होय.', हसून निरंजन म्हणाला.

'अभिनंदन आणि ऑल द बेस्ट!', टी.सी. म्हणाला. टी.सी.ने आपली बॅग सीटवर ठेवली आणि पुढे म्हणाला,

'बाळा, बॅगकडे बघशील का? मी जरा तीन बोगीचे तिकीट तपासून येतो.

'हो बघतो की. तुम्ही जाऊन या मी इथेच आहे.'

टी.सी. निघून गेला.

 

दुपारची वेळ होती. चहावाला आला. निरंजनने चहा घेतला. कानात हेडफोन घालून गाणे ऐकत तो चहा घेत होता. खिडकीतून बाहेरचे नित्य बदलणारे दृश्य बघत होता. त्याचे आयुष्य देखील आता अश्याच बदलाच्या वाटेवर होते. निरंजन आपल्या विचारतंद्रीत होता. मनांत उमेद होती, त्या उमेदीवर स्वप्न बांधत होता. काही वेळानी टी.सी. परतला. टी.सी.ने निरंजनची सारी विचारपूस केली. वर्धेत कुठे राहतो, वडील काय करतात, शिक्षण कुठे झाले इत्यादी सारे टी.सी.ने विचारले. निरंजनने सुद्धा सारे सांगितले. तेवढेच घरापासून लांब जाताना त्याला जरा बरे वाटले.

 

सूर्य मावळला. अंधार पडला. हळूहळू ट्रेनमधील सहप्रवासी आपापले जेवणाचे डबे उघडू लागले. एकाच्या डब्याचा सुगंध दुसऱ्याच्या नाकात भिनत होता. त्यामुळे दुसऱ्याची भूक खवळली की तो आपला डबा काढताच तिसऱ्यासोबत तसेच होई. ट्रेनच्या डब्यात ही डब्यांची वेगळीच ट्रेन सुरु होती. ते नानाविध पक्वानांचे सुगंध निरंजनची सुद्धा भूक वाढवत होते. त्याने आपला डबा उघडला. आईने त्याच्या आवडीची भेंडीची खरपूस भाजी, पळी फोडणी घातलेलं वरण, फुलके आणि भात दिला होता. सोबत कैरीचं मुरलेलं लोणचं आणि मेतकूट सुद्धा होते. दोन दिवस पुरेल इतका डबा होता. शिवाय चिवडा, शेव आणि फळं देखील होती. घरापासून दूर जाणाऱ्या आपल्या मुलाला भरपूर आपल्या हाताचं जेवण देण्याची त्या मातेची ती माया होती. निरंजन डबा बघून आनंदला. त्याने टी.सी.ला सुद्धा डबा देऊ केला. टी.सी. आपला डबा काढत म्हणाला,

'अरे जेव तू. मला पण बायकोनी बघ भरपूर डबा दिला आहे.'

दोघांनी डबे उघडले आणि जेवू लागले. सोबत गप्पा सुरु होत्या. दोघे एकमेकांच्या डब्यातील पक्वान्न खात त्यांची स्तुती देखील करत होते. भरपूर जेवण झाले. निरंजनचा डबा बराच उरला होता. ए.सी. नसल्यामुळे अन्न खराब व्हायची भीती त्याला होती. पुढे कोणी भुकेला खायला मागायला आल्यावर त्याला ते अन्न द्यायचे निरंजनने ठरवले.

रात्र वाढली. निरंजन आपल्या वरच्या बर्थवर झोपायला गेला. हळूहळू आजूबाजूचे सहप्रवासी पण झोपत होते. डब्यातल्या खिडक्या आणि दिवे बंद होत होते. लोकांची ये-जा कमी झाली होती. निरंजनला सुद्धा काही वेळाने झोप लागली.

 

निरंजनला स्वप्न पडले. त्याला आपल्या घरचे सगळे स्वप्नात दिसत होते. सगळे आनंदी होते. घरी सगळे छान गप्पा मारत होते. अचानक त्याची आई रडायला लागली. वडिलांचा चेहरा हतबल दिसत होता. आजी कोपऱ्यात जाऊन बसली. निरंजन त्यांना विचारत होता, 'आई काय झालं? का रडतेस?' आई उत्तर देईना. तो आजीजवळ गेला. विचारायला लागला, 'आजी अशी कोपऱ्यात एकटी का बसली आहेस?' आजी बोलेना. बाबा सुद्धा कशाला उत्तर देईना. शेवटी आजी म्हणाली,

'बाळा, तो महाराजांचा अंगारा मी तुला दिला होता, तो कुठे आहे?'

निरंजन आपले खिसे चाचपडायला लागला. अंगारा त्याला सापडत नव्हता. त्याची भीती वाढत होती. आजीने विचारले,

'अंगारा हरवलास?'

'नाही आजी, इथेच आहे. शोधला की सापडेल बघ!'

पण अचानक आजीने डोळे मिटले. निरंजन प्रचंड घाबरला आणि त्याची झोप उघडली. त्याचे स्वप्न तुटले. त्याने आजूबाजूला बघितले. तो ट्रेनमध्ये होता. प्रवासी झोपले होते. अंधार होता. ट्रेन थांबली होती. त्याला जरा हायसे वाटले. तो उठला आणि पाणी प्यायला. त्याने खाली बघितले. टी.सी. जागेवर नव्हता. ट्रेन कुठे आहे हे बघायला तो खाली उतरला. ट्रेनच्या डब्याच्या मागून खिडक्या ठोठावण्याचे आवाज येत होते. कोणी म्हातारी बाई लोकांना खायला मागत होती. लोक मात्र तिला दाद देत नव्हते. निरंजनला आठवले, आपल्याकडे बरेच अन्न आहे. त्याने बॅग मधून डबा काढला आणि ते अन्न त्या बाईला द्यायचे ठरवले. एक-एक खिडकी ठोठावत ती बाई त्याच्या खिडकीजवळ आली. तिचा चेहरा काळवंडला होता. कपाळावर एक-दोन जखमांचे डाग होते. डोक्यावर पांढरे केस विस्कटलेले होते. नेसलेली साडी मळकटलेली होती. तिने ती बंद खिडकी ठोठावली आणि 'मला खायला दे' अश्या खुणा केल्या. निरंजन तिला अन्न देण्यासाठी खिडकी उघडायला गेला... आणि अचानक टी.सी. तिथे आला आणि त्याने निरंजनचा हात धरला. टी.सी.ने खिडकी घट्ट बंद केली आणि तो म्हणाला,

'तू हे काय करतो आहेस?'

निरंजन हबकला. तो म्हणाला,

'उरलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून तिला देतो आहे.'

'अरे पण आजूबाजूला बघ! अंधारात काही दिसते आहे का? कुठली जमीन किंवा झाड? नाही ना? कारण आपण नदीवरच्या पुलावर आहे आणि इथे गाडी थांबली आहे! त्यामुळे एक तर ही बाई हवेत उडते आहे किंवा वीस-पंचवीस फूट उंच तरी आहे! खिडकी उघडू नकोस अजिबात!'

निरंजनच्या अंगावर ते ऐकून शहारे आले. शरीर गार झाले, चेहरा फिकट पडला आणि त्याच्या सर्वांगाला कापरा सुटला! अचानक त्याला ती बाई दुसऱ्या बाजूच्या खिडकीने दिसली. भर डिसेंबरच्या महिन्यात बंद डब्यात त्याला, टी.सी.ला आणि सगळ्या प्रवास्यांना घाम फुटला. टी.सी. ओरडला,

'खिडक्या बंद ठेवा! कोई भी अपनी खिडकी मत खोलना!'

आणि ते ऐकून ती बाई अचानक नाहीशी झाली! टी.सी. निरंजनला धरून होता. निरंजन खाली बसला.

 

अचानक लागून असलेल्या डब्यातून एक मुलगी दारातून अन्न घेऊन त्या बाईकडे जाताना दिसली. ती दरवाजा उघडणार होती. ट्रेन आतून कनेक्ट असल्यामुळे टी.सी. धावला आणि जोरदार ओरडला,

'दरवाजा मत खोलना! पोरी, दरवाजा उघडू नकोस!'

निरंजन त्याच्या मागे धावला. मुलीने दरवाजा थोडा उघडला होता तेव्हा टी.सी. पोचला. ती बाई फटीतून हात घालून हाताला लागेल ते ओढू बघत होती. मुलगी समोर होती. टी.सी.ने तिच्या समोर उडी मारली आणि मुलीला मागे ढकलले. मुलगी मागे पडली, हातातला डबा सांडला. त्या बाईने टी.सी.चा हात धरला होता. ती आत ट्रेनच्या डब्याचे दार टी.सी.चा हात धरून उघडू पाहत होती. तिच्या हातात विलक्षण जोर होता. टी.सी. हात सोडवण्याची पूर्ण खटपट करत होता. निरंजन तिथे होता. टी.सी. त्याच्यावर आणि त्या मुलीवर ओरडला,

'तुम्ही आत जा! लगेच!'

पण निरंजनला अचानक आजीचा आवाज ऐकू आला,

'महाराजांचा अंगारा तू नीट ठेवला आहेस ना?'

त्याने पॅन्टचा खिसा चाचपडला. त्यात अंगारा होता. त्याने अंगाऱ्याची पुडी बाहेर काढली आणि तो अंगारा त्या बाईवर भिरकावला! बाई नाहीशी झाली! घामाघूम झालेला टी.सी. मटकन खाली बसला. त्याला थोडे बाजूला सारून निरंजनने दार घट्ट लावून घेतले. टी.सी.ला घेऊन तो जागेवर आला आणि त्याला बसवले. शिट्टी वाजली आणि ट्रेनपण सुरु झाली. ट्रेनने वेग पकडला.

दोघांना पण आजूबाजूच्या प्रवाश्यांनी पाणी दिले. दोघेही पाणी प्यायले. एक सरदारजी तिथे होता. तो निरंजनला म्हणाला,

'वीरे, तू बडा बहादूर है! आज तेरा तिगडम काम नहीं करता तो बडी मुसीबत थी! शाबाश वीरे! अब पानी पी ले, और सो जा. हम सब है इधर. कोई गल नहीं. पर हम सब तेरे शुक्रगुजार है!'

'ठीक कहा पाजी! निरंजन, तू नसतास तर आज अनर्थ घडला असता. तुला काय बोलू मी? पण तू सुद्धा घाबरला आहेस. जा तू वर जाऊन झोप. शांत हो. आपण सारे सोबत आहोत.', टी.सी. म्हणाला.

सगळे आपापल्या जागी जाऊन झोपायचा प्रयत्न करू लागले, पण सगळेच घाबरले होते. शक्ती गळल्यासारखी वाटल्याने निरंजनला मात्र झोप लागली.

 

सकाळ झाली. निरंजन उठला. खाली टी.सी. बसला होता. खिडक्या उघड्या होत्या. त्यांतून गार वारा वाहत होता. निरंजन खाली उतरला. टी.सी.ने विचारले,

'बाळा, तू ठीक आहेस ना?'

'होय सर! पण हे रात्री काय झाले?'

'त्याचा तू फार विचार करू नकोस. झालं गेलं, विसरून जा.'

'मी.. मी परत घरी जाऊ का?'

'बाळा, मला ठाऊक आहे, तुझ्या आयुष्याच्या नवीन टप्प्यावर जाताना असे काही घडले. पण काळजी करू नकोस. तुझ्यामागे जर पाठबळ नसते, तर तू त्यातून निघाला असता का? हे विसरून पुढे चल. प्रामाणिकपणे आपले काम कर. पुण्याई जप. काहीही होणार नाही. असं झाल्यावर काम आणि संधी सोडावी लागली असती तर आज मी इतके वर्ष काम सुद्धा करू शकलो नसतो बघ!'

निरंजनने मन बांधले. काही वेळातच ती मुलगी तिथे आली आणि म्हणाली,

'भैया, टी.सी. सर आपने मेरी जान बचाई. मैं आपको धन्यवाद कैसे बोलू?'

टी.सी.ने तिला समजावले. ती सुद्धा धीर गोळा करून आपला प्रवास पूर्ण करू लागली.

 

कलकत्ता आले. निरंजन सगळ्यांचा निरोप घेऊन उतरला. त्याने आपला नवीन जॉब सुरु केला. प्रामाणिकपणे काम सुरु केले. त्याचा छान जम बसला. त्यामुळे उन्हाळा आल्यावर त्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली. पैसे जमवून यावेळेस त्यानी ए.सी. थ्री चे तिकीट काढले. घरी जायला तो आनंदाने निघाला.

पुन्हा रात्रीच्या वेळी एका जागी ट्रेन थांबली. खिडक्या ठोठावल्या जाण्याचे आवाज येत होते. अचानक निरंजनची खिडकी ठोठावल्या गेली. ए.सी. डबा असल्याने काच उघडल्या जाणार नव्हत्या. पण निरंजनने आपल्या खिशातून अंगाऱ्याची पुडी काढली आणि खिडकीजवळ ठेवली. खिडकी ठोठावण्याचा आवाज बंद झाला. ट्रेन पुन्हा सुरु झाली आणि निरंजन शांतपणे झोपी गेला..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू