पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझे आवडते पुस्तक: श्यामची आई

 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शॉपिझेन आयोजित उपक्रम

 

        माझे आवडते पुस्तक            

 

           पुस्तक वाचन हा माझा प्राणप्रिय छंद आणि या छंदाने मला ज्ञानाचा आणि शब्दांचा अमूल्य साठा भरभरून दिला आहे. पुस्तक मग ते कोणत्याही विषयाचे किंवा लेखकाचे असो, हातात घेतल्यावर संपेपर्यंत खाली ठेवावेसे वाटत नाही. मी अनेक प्रकारची पुस्तके वाचली आहेत. पुस्तकातून मिळालेले ज्ञान कठीण काळात मार्ग काढण्यासाठी सहाय्यक ठरते. बालकथा, मासिके, नेत्यांची चरित्रे, कादंबऱ्या आणि आत्मकथा. या सर्वात साने गुरुजींच्या "श्यामची आई"या पुस्तकाने माझ्या मनावर फार प्रभाव पाडला आहे. साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे आत्मचरित्र असून मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती, कृतज्ञता यांच्या अपार भावना त्यांनी या पुस्तकातून मांडल्या आहेत. आई आणि मुलाचे नाते जगभरात अतूट आणि अनमोल असेच असते. बालकाचा जन्म झाल्यापासून एवढेच नव्हे तर बाळ गर्भात असताना देखील आई त्याला सदाचार शिकवण्यात कुठेही कसूर सोडत नाही. आई मैत्रीण बनून त्याला जीवनमूल्य शिकवत असते. प्रसंगी ती त्याच्यावर हातदेखील उगारते. परंतु तिच्या या दटावण्यातच तिचे प्रेम दडलेले असते. आपला मुलगा कोणत्याही गोष्टीत मागे राहू नये असे तिला नेहमीच वाटत असते. सुसंस्कार व मोठ्या लोकांविषयी आदर, वृद्ध, दीनदुबळ्या लोकांविषयीचा कळवळा या पुस्तकातून साने गुरुजींनी फार सुंदर रीतीने लिहिलेला आहे. 'श्यामची आई' या पुस्तकातील श्याम मित्रांसोबत पोहायला न जाता लपून बसतो हे त्याच्या आईला असे घाबरणे पसंत पडत नाही. ती त्याला कठोर होऊन रागावते मायेने जवळ घेऊन समजावून देखील सांगते, "श्याम उद्या तुला कोणी भित्रा म्हटलेले मला आवडणार नाही. तो माझा अपमानच ना? माझा अपमान तो तुझाही अपमान ना?" आपल्या मुलाला सर्व यावे, त्याने प्रत्येक गोष्ट शिकावी अशी तिची धडपड असायची. लहानपणी बाहेरगावी शिकत असताना श्यामने डोक्यावरील केस वाढवले. वडिलांना ते आवडले नाही. त्यांनी श्यामला हजामत करायला सांगितले. श्यामला रडू आले तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली," तुझे बाबा बोलले म्हणून एवढे रागावू नको. आज पर्यंत तुमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत त्यांनी. त्यांच्या धर्मभावांना दुखावू नकोस" केस वाढवणे हा मोह आहे आणि मोह सोडणे म्हणजे धर्म! अशी धर्माची सुंदर व्याख्या तिने शामला विश्लेषण करून सांगितली. आईला तिच्या सर्व कामात मदत करत होता तेव्हा इतर बायका त्याला बायकी म्हणून हिणवत होत्या. परंतु आईने त्यांना सहज शब्दात समजावले की बायकांना पुरुषांची कामे आली पाहिजेत आणि पुरुषांना बायकांची कामे, याचे नाव लग्न! यातून तिचे मुलाविषयीचे असणारे अपार प्रेम, माया, ममता निदर्शनास येते. आई आपल्या लेकरांच्या भल्यासाठी खूप काबाडकष्ट करते. त्याच्या भल्याचाच नेहमी विचार करत असते हेच या पुस्तकातून सतत जाणवत राहते. पायाचे तळवे ओले झाल्यामुळे श्याम मातीत जायला तयार होत नाही. तो आईला आपले ओचे पसरून त्यावर तळवे ठेवतो असे म्हणाला तेव्हा हळव्या मनाच्या त्याच्या आईने त्याला पटवून देताना म्हटले, "श्याम ओले पाय मातीत खराब होऊ नये म्हणून जसा जपतोस तसाच मनालादेखील घाण लागू नये म्हणून जपायला शिक" आणि तिने आपले ओचे खाली पसरून श्यामच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतली. 

                मूकी फुले, भूतदया, मोरी गाय यासारख्या गोष्टींमधून आपण निसर्गावर आणि पशुपक्षी पानांफुलांवर प्रेम करावे याची शिकवण मिळते. इतर कथांमधून चोरी न करणे, खोटे न बोलणे, स्वाभिमान, स्वावलंबन अशा सद्गुणांची शिकवण मिळत असते. आजच्या पिढीला देखील अशा सुसंस्कारांची गरज आहे असे वाटत राहते. प्रत्येक मूल हे चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असते. त्याला जसा आकार द्यावा तसा ते आकार घेत असते. 'श्यामची आई' हे पुस्तक वाचत असताना डोळे पाणावल्याचेही भान राहत नाही.

          गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबात शाम जन्माला आला. जीवनात आलेल्या अडीअडचणीतूनदेखील जीवन सुखात आणि संस्कारात जगता येते हे श्यामच्या आईने श्यामला शिकवले आहे. श्यामला आई सुसंस्काराने संपन्न बनवते आणि शिक्षणासाठी नेहमीच पाठिंबा देते. परिस्थितीचा चटका सहन करत, माधुकरी मागत श्यामचा मोठा भाऊ शिक्षण घेत असतो आणि खडतर परिस्थितीत श्याम व त्याचा छोटा भाऊ आईवडिलांजवळ राहून विद्यार्जन करत असतात. मोठे कुटुंबपद्धती, खेडेगावचे वातावरण, तेथील संस्कार यांचे संमिश्र विश्लेषण या पुस्तकातून मार्मिकपणे मांडताना साने गुरुजींनी असे लिहिले आहे की ही कथा खेड्यापाड्यातील प्रत्येक मुलाची आहे. जणू काही पूज्य साने गुरुजींनी आत्मकथाच लिहिली आहे. परंतु आई-वडील, आजी, काका-काकू, शेजारी, गुरुजी यांना एकमेकांविषयी वाटणारे प्रेम, आदर यामुळे 'श्यामची आई' हे पुस्तक फारच रंजक झाले आहे. त्यामुळे लहान थोर सर्वांनाच ते विशेष भावते. मुलेदेखील मोठ्यांशी सन्मानाने वागून त्यांनी सांगितलेले काम न कुरकुरता करतात. एवढेच नव्हे तर जातीपातींचे प्रस्थ कट्टर असुनही ब्राह्मण कुटुंबातील शाम दलित म्हातारीची लाकडाची मोळी तिच्या डोक्यावर ठेवतो. यावरून तो समाजाला माणुसकीचे मूल्य शिकवत असल्याचे दिसून येते. साने गुरुजींचा शाम आणि त्याची आई हे घराघरात आदर्श मानले गेले. प्रत्येक आईला आपला मुलगा श्याम सारखा असावा असेच वाटते.

                  प्रत्येक लहान थोराने फक्त एकदा वाचावे नव्हे तर पुन्हा पुन्हा वाचावे असे हे पुस्तक जातीभेद न पाहता माणुसकी हाच धर्म मानून दलित म्हातारीला मदत करताना इतर लोकांनी हेटाळणी करूनही आईचा पाठिंबा असल्याने शाम आनंदाने तिला मदत करतो व माणुसकी जपतो.   

        श्यामला आईविषयी वाटणारे प्रेम तिने त्याला दिलेले संस्कार जास्त लक्षात राहतात. छोटी मुले किती निरागस आणि खोडकर असतात.सुटीत नदीवर मनमुराद पोहायला जाणे.मैदानी खेळ,मस्ती,भांडण यां मानवी पैलूंना साने गुरूजींनी इतके छान रंगविले आहे की प्रत्येक व्यक्तीला ती कथा स्वत:चीच असल्याचा भास होतो. खूप सुंदर हे पुस्तक माझ्याच नव्हे तर हरेकाच्या संग्रहीची अनमोल ठेव आहे.

 

सौ.भारती सावंत

खारघर, नवी मुंबई 

 

9653445835

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू