पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाणियावरी मकरी...


पाणीयावरी मकरी : वेगळ्या शैलीतील आत्मचरित्र!

    'पाणीयावरी मकरी' हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, व्याख्याते, वक्तादशसहस्त्रेषू अशी ओळख असणारे गुरूवर्य राम शेवाळकर यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे. भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन ११डिसेंबर २००७ रोजी दिल्ली येथे झाले. हा दुर्मिळ योग गुरूवर्य शेवाळकरांच्या आत्मचरित्राने साधला. हे आत्मचरित्र तब्बल साडेचारशे पृष्ठांचे असले तरीही एकदा हातात घेतले की सोडवत नाही. आगळेवेगळे शीर्षक आत्मकथेला दिल्यावरून अनेकांनी त्यांना त्याचे कारण विचारले. 'पाणीयावरी मकरी' ह्या शीर्षकाचा संबंध ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाच्या दहाव्या अध्यायातील सतराव्या ओवीत आहे असे सांगून शेवाळकर म्हणतात, ओवीत असे लिहिले आहे की,
'म्हणोनी माझी वैखरी
मौनाचेही मौन करी।
हे पाणियावरी मकरी रेखिली पां ।।१७॥
शेवाळकर म्हणतात, 'जिथे प्रत्यक्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की, माझे कार्य हे पाण्यावरील मगरीप्रमाणे आहे. तिथे ज्ञानेश्वरांपुढे माझे कार्यही पाण्यावर येणाऱ्या मगरीइतकेही नाही. मी असे काही फार मोठे कोणतेच कार्य केले नाही. आणि म्हणून या शीर्षकाची निवड केली आहे.
        गुरुवर्य शेवाळकरांची ज्ञानेश्वरांवर प्रचंड भक्ती, निष्ठा, प्रेम, अभ्यास सारे काही आहे. शिवाय त्यांचा स्वतःचा जीवनाकडे बघण्याचा काव्यमय दृष्टिकोनही या शीर्षकामागे असावा. प्रचंड ताकदीने आणि शब्दलेण्यांनी शेवाळकरांनी हे वाङ्मयीन अपत्य सजवले आहे. वाक्या वाक्यात जणू गीता- ज्ञानेश्वरी उतरलेली आहे असे जाणवते. त्यांच्या लिखाणाची नेहमीची वैशिष्टये प्रवाही, अर्थवाही भाषा यांमुळे चरित्र सहज उलगडत जाणारे आहे. यामध्ये असलेली छोटी छोटी वाक्ये अनेकवेळा खूप काही सांगून जातात. तत्वज्ञानाचं भांडार जणू मोकळे करून जातात. या आत्मकथेत काय नाही ? साहित्यातले सारे रस यामध्ये प्रचंड ताकदीने शेवाळकरांच्या लेखणीने ओतले आहेत. म्हणूनच ते वाचनीय, मननीय नि अनुकरणीय आहेत. कुणालाही न दुखावता चांगले ते या पुस्तकात घ्यायचे ही त्यांची प्रामाणिक भूमिका या पुस्तकात आढळून येते. आत्मकथनाच्या बाबतीत शेवाळकरांचे यांचे विचार मर्मग्राही आहेत. 'पाणीयावरी मकरी' या ग्रंथातील 'दोन शब्द' या स्वतःच्या मनोगतामध्ये ते लिहितात, स्वतःची कथा लिहिता येईल; पण ते आत्म्याचे चरित्र होणार नाही. आत्म्याचा शोध घेणे जितके अवघड आहे तितके 'स्व'चा शोध घेणे नाही.' 'स्व' चा शोधसुद्धा आपण प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे घेत नाही. पूर्णपणे घेतला तरी तो तसाच्या तसा निवेदन करण्याची धिटाई सर्वांमध्ये नसते. अप्रिय व अडचणीच्या तथ्यांवर सामान्यपणे पांघरुण घालण्याची किंवा ते शक्य नसल्यास प्रसाधनांद्वारे अधिक खुलवून वा नटवून मांडण्याची माणसाची प्रवृत्ती असते. त्यामुळे आत्मचरित्रे एक तर सारवासारवीच्या बुद्धीने किंवा आवराआवरीच्या भावनेने लिहिली जातात. यापैकी प्रस्तुत लेखन कोणत्या वर्गवारीमध्ये बसते त्याचा निवाडा करण्याचा अधिकार वाचकांचाच आहे. मला भूतकाळात डोकावण्याची व कदाचित रमण्याचीही आवड आहेच. त्या स्वानुभवाने लेखन करताना पुनः प्रत्ययाचे समाधान मिळते. क्वचित अनुभवाकडे पाहण्याची नवी दृष्टी कालांतराने उपलब्ध होते. त्यातील अनोखा अन्वयार्थ उलगडतो, नवी परिमाणे न्याहाळण्याचाही नाद लागतो. आता त्या प्रसंगांकडे स्वच्छ, वस्तूनिष्ठ दृष्टीने पाहता येते.
       सर्वच अनुभवांना प्रस्तुत लेखनात प्रवेश मिळाला नसेल. त्यांपैकी काही अनुभव यातनादायक ठरले असते वा अन्यायकारक ठरले असते. ते अनुभव या लेखनात अप्रवेश्य ठरण्याचे कारण, यात मला माझ्या आयुष्याबद्दल सांगायचे होते. मनस्तापदायक बाबी गोंजारीत बसण्याच्या आवडीला यात स्थान मिळाले नाही. आयुष्यात सुष्ट-दुष्ट, बरेवाईट दोन्ही प्रकारचे लोक येतात. काही आपल्या वागण्या बोलण्याने विद्ध किंवा विफल करून जातात. आपण किती सोसले हे दाखविण्याच्या हौसेपोटी त्यांना शब्दांच्या मखरात बसवून त्यांचे आयुर्मान वाढविण्याची वृत्ती मला मानवत नाही.'
        'पाणीयावरी मकरी' या पुस्तकातून शेवाळकरांचे एकूण जीवनदर्शन होते. या ग्रंथामध्ये आत्मविश्वास आहे; आत्मचिंतन आहे; परंतु दांभिकपणा, स्वतःचा मोठेपणा दर्शविण्याचा कुठेही प्रयत्न नाही. गंगेचे नितळ पाणी जसे शांतपणे प्रवाहित होते, रस्त्यात भेटणारास आपल्यामध्ये सामावून घेते; मात्र कशातही अडकून न पडता पुढे-पुढेच जाते, तसे हे आत्मचरित्र आहे. कुणाच्याही वादात न पडता, कुणाबद्दल चकार शब्द न काढता, दुसऱ्यांकडून जे चांगले घेता येईल, जे चांगले शिकता येईल ते घेत, शिकत व इतरांना स्वतःच्या नकळत अनेक चांगल्या गोष्टी देत, मार्गदर्शन करीत, चांगल्या अनुभवाचे भांडार खुले करीत जीवन जगण्यास चांगली भरभक्कम पुरेशी शिदोरी देत हे आत्मकथन शेवटी 'निरोप तीर्थावरील स्वैरचिंतन' या अध्यायाने थांबते. 'पाणीयावरी मकरी' या आत्मकथन ग्रंथात एकूण ४१ अध्याय आहेत. होय, त्यांना धडे, प्रकरणं असे म्हणता येणार नाही, कारण हा ग्रंथ ज्ञानेश्वरीसम आहे, विनोबांचे स्मरण आहे, रामायण आहे, आचार्यकुल आहे, मातृदेवो-पितृदेवो यांचे जीवनसार आहे, कीर्तन आहे, बाबा आमटे यांचे आनंदवन आहे. म्हणूनच या आत्मचरित्रात जीवन जगण्याचे सार आहे. 'पाणीयावरी मकरी' ग्रंथात एकूण ४१ अध्याय आहेत. शीर्षके जर आपण बघितली तरी त्यातली काव्यत्मकता आपल्या लक्षात येईल. जन्मोत्री,पूर्व संचित, कीर्तन केसरी, आमचे कौटुंबिक जग,अक्षर ओळख, शब्दांची भेट, अर्थाची ओळख, निर्वाहयात्रा, उपक्रमांची मांदियाळी, माझी जिव्हा यात्रा, शब्दांची सलगी, ग्रंथगुरुंचा सहवास, धन्यो गृहस्थाश्रमः, स्वास्थ्याची आर्जवे, स्वरांचे सान्निध्य, संध्याछाया, सुखविती हृदया, धन्यता आणि निरोप तीर्थावरील स्वैरचिंतन इत्यादी शीर्षकांनी आत्मचरित्र सजविले आहे. काव्यात्मक नाव असणाऱ्या अशा ग्रंथास जेव्हा वाचक हातात घेतो तेव्हा त्या ग्रंथास वाचून हातावेगळे केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. सुमारे साडेचारशे पानांचे चरित्र कुठेही कंटाळवाणे वाटत नाही, पान न पान, अक्षर न अक्षर वाचावयास प्रवृत्त करते.
      प्रचंड विद्वत्ता, विपुल ग्रंथरचना व ग्रंथनिर्मिती, जिव्हेवर सरस्वती, हजारो व्याख्याने दिलेले, हजारो व्यक्तींशी परिचित असणारे राम शेवाळकर स्वतःबद्दल एके ठिकाणी लिहितात की, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अविरोध अध्यक्ष झालो, तेव्हा मी स्वतःकडे प्रतिध्वनीची भूमिका घेतली. स्वतंत्र प्रतिभेचा किंवा स्वतंत्र दर्शनाचा मी जाणूनबुजून दावा केला नाही, कारण तशी वस्तूस्थिती नव्हतीच. स्वतंत्र कल्पना वा स्वतंत्र विचार यावर त्यामुळेच कधी अधिकार सांगितला नाही. प्रज्ञावंतांनी विचार द्यायचे, मी त्याचा प्रसार करायचा, प्रतिभावंतांनी कलाकृती निर्माण करायची, तिच्या सौंदर्याचे रहस्य मी असंख्यांना समजावून सांगायचो. सरळसरळ ही दुय्यम भूमिका आहे. लेखनाची हौस असणारे ऐंशी टक्के लोक हेच करीत असतात.' असे विचार अंगी बाणवणारे व 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' या बाण्याने आयुष्यभराची यशस्वी केवळ वाटचाल राम शेवाळकरच करू जाणोत. कुणाच्या कर्तबगारीने, प्रगतीने, यशामुळे द्वेष मनी बाळगणे शेवाळकरांच्या स्वभावातच नव्हते. कोणाबद्दल द्वेष बाळगणे म्हणजे स्वतःच्या अपयशाची कबुली देणे होय, असे शेवाळकर मानत. अशा वृत्तीतून माणूस स्वतःचीच हानी करून घेतो आणि स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडल्याचा पुरावा तो उपलब्ध करून देतो, अशाच विचारांनी गुरुवर्य शेवाळकर आयुष्य जगले. म्हणूनच ते 'अजातशत्रू' हे विशेषणत्व लावून सर्वांमध्ये मिसळले, हेच त्यांचे आभुषण होते, तेच त्यांच्या यशस्वी जीवनाचे गमक होते.
          गुरूवर्य राम शेवाळकर ही व्यक्ती, हे व्यक्तीत्व जाणून घ्यायचे असेल तर त्यांचे पाणीयावरी मकरी हे पुस्तक अवश्य वाचायलाच हवे...
          ००००
       नागेश सू. शेवाळकर, पुणे
        (९४२३१३९०७१)


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू